Wednesday, September 30, 2020

टी. नटराजन : मजुराचा मुलगा ते आयपीएल हिरो!


इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) स्पर्धेत सन रायझर्स हैदराबाद कडून खेळणाऱ्या टी. नटराजन या बॉलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये नटराजनने एक नाही दोन नाही तर तब्बल सात यॉर्कर्स टाकले.
'टी-20 क्रिकेटमध्ये यॉर्कर टाकण्याचे महत्व आता उरले नाही' असं आशिष नेहरा कॉमेंट्री करताना सांगत होता. त्याचवेळी नटराजननं सात यॉर्कर टाकत नेहराचे लांब दात त्याच्या घशात घातले. तामिळनाडूतल्या एका छोट्याश्या गावातल्या मजुराचा मुलगा ते आयपीएलचा हिरो हा नटराजनचा आजवरचा प्रवास मोठ्या संघर्षचा आणि सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

पाचवीला पुजलेला संघर्ष!

तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातले चिन्नापम्पट्टी हे गाव आज क्रिकेटविश्वात थंगारासू (टी) नटारजनचे गाव म्हणून ओळखले जाते. नटराजनचे वडील साडीचे दुकानात रोजंदारीवर काम करणारे मजूर तर आई एक छोटसं चहाचं दुकान चालवते. घरची प्रचंड गरीबी. दोन भाऊ आणि तीन बहिणी अशी ही पाच भावंडं. दहा वर्षापूर्वीपर्यंत नटराजन त्याच्या आईला चहाच्या दुकानात मदत करत होता. दोन वेळेस खाण्याचा संघर्ष करणाऱ्या नटराजननं वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत क्रिकेटचे स्टेडीयम पाहिलेही नव्हते. भारतामधल्या कोणत्याही गल्लीत चालणारे टेनिस बॉल क्रिकेट हेच त्याचे विश्व. 

नटराजनच्या बॉलिंगची गावच्या क्रिकेटमध्ये जोरदार चर्चा होती. टेनीस बॉल क्रिकेटमध्ये तो सातत्याने दमदार कामगिरी करत होता. त्याचवेळी नटराजनने जयप्रकाश या स्थानिक क्लब टीमच्या कॅप्टनचे लक्ष वेधून घेतलं.  मुळचे चिन्नापम्पट्टीचे जयप्रकाश चेन्नईत स्थायिक झाले होते. नटराजनच्या बॉलिंगचं पाणी जयप्रकाश यांनी सर्वप्रथम जोखलं. त्यांनीच त्याला चेन्नईत पुढील प्रशिक्षणासाठी नेले. नटराजन तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या चतुर्थ श्रेणी लीगमध्ये बीएसएनएलच्या टीमकडून खेळू लागला. या लीगमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केले. त्यामधून त्याची 'विजय क्लब' या बड्या टीममध्ये निवड झाली. नटराजनच्या क्रिकेट करियरचा हा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर 2015 साली तो तामिळनाडूच्या टीममध्ये निवडला गेला.

रणजी टीममध्ये निवड आणि सर्वात मोठा धक्का!

कोलकाताच्या जगप्रसिद्ध इडन गार्डन मैदानात बंगालविरुद्ध त्याने रणजी पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये त्याची बॉलिंग ॲक्शन वादात सापडली. त्याच्या करियरला हा फार मोठा ब्रेक होता. त्यामुळे तो पुढची दीड वर्ष राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरचे क्रिकेट खेळू शकला नाही. तामिळनाडू क्रिकेट ॲकडमीचे प्रमुख आणि रवीचंद्रन अश्विनचे सुरवातीचे कोच सुनील सुब्रमण्यम यांनी नटराजनला या खडतर काळातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत केली. सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली नटराजननं फक्त बॉलिंग ॲक्शन बदलली नाही तर यॉर्कर आणखी घोटीव केले. नटराजन दीड वर्षांनी पुन्हा तामिळनाडूच्या रणजी टीममध्ये परतला. त्या हंगामात 24 विकेट्स घेत त्याने राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. 

सहा बॉलवर सहा यॉर्कर !!!

तामिळनाडू प्रीमियर लीग ( टीएनपीएल) या स्पर्धेला त्याच काळात सुरुवात झाली. नटराजनला डिंडीगूल ड्रॅगन्स या टीमनं करारबद्ध केलं. या स्पर्धेतल्या एका सुपर ओव्हरमध्ये अभिनव मुकुंद आणि वॉशिंग्टन सुंदर ही दिग्गज जोडी नटराजनसमोर होती. नटराजननं त्या ओव्हरमध्ये सलग सहा यॉर्कर टाकले! यॉर्करवर हुकमी प्रभुत्व असलेल्या नटराजननं आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष स्वत:कडं वेधलं. 2017 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याची मुळ किंमत ही 10 लाख रुपये होती. त्यापेक्षा तब्बल तीस पट अधिक म्हणजेच तीन कोटी रुपये मोजून त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं !!! पंजाब, कोलकाता, चेन्नई, दिल्ली या आयपीएल टीममध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली होती.

 ....म्हणून जर्सीवर जेपी नाव

किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्यांच्या धरसोड वृत्तीनुसार नटराजनला पुढे  मुक्त केलं. त्याचा सनरायझर्सच्या टीममध्ये समावेश झाला. विसाव्या वर्षापर्यंत क्रिकेटचं अधिकृत मैदानही न पाहिलेला हा मुलगा आज भुवनेश्वर कुमार आणि रशीद खान या दोन दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून बॉलिंग करतोय. दिल्लीविरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हुकमी यॉर्कर टाकून स्टॉयनीसला आऊट करत टीमला स्पर्धेतल्या पहिल्या विजयाचं दार उघडून दिलं. या आयपीएलमध्ये त्याच्या जर्सीवर जेपीनट्टू हे नाव आपल्याला दिसतं. नटराजनला क्रिकेटमध्ये पहिला ब्रेक देणारे गुरु जयप्रकाश यांच्या नावातील जेपी हे आद्याक्षर आहे. या कृतीमधून नटराजन जयप्रकाश यांनी आजवर केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करतोय. एकेकाळी क्रिकेमध्ये करियरचं स्वप्न पाहणाऱ्या जयप्रकाश यांचं नाव त्यांच्या शिष्यानं आज क्रिकेटच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर नेलं आहे.गोष्ट इथेच संपत नाही....

नटराजनची गोष्ट इथेच संपत नाही. नटराजननं परिस्थितीशी झगडत यश मिळवलं. स्वत:ला क्रिकेटच्या मोठ्या लेव्हलवर सिद्ध केलं. तो स्वत: मोठा झाला पण तो तिथेच थांबला नाही. चिन्नापम्पट्टीच्या मुलांनी क्रिकेटमध्ये मोठं व्हावं यासाठी तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतोय. 

नटराजनच्याच गावचा जी. पेरियास्वामी हा तरुण मुलगा घरच्या गरीबीमुळे क्रिकेट सोडणार होता. नटराजन त्याच्या घरी गेला. क्रिकेटमध्ये करियर करता येतं, क्रिकेटमुळे खाण्याची भ्रांत मिटते हे त्याने पेरियास्वामीला आणि त्याच्या पालकांना समजावून सांगितले. त्याला उत्तम क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली. पेरियास्वामीची टीएनपीएलच्या 'चेपॉक सुपर गिल्स' या टीममध्ये निवड झाली. टीएनपीएलच्या मागच्या वर्षीच्या फायनलमध्ये चेपॉकच्या टीमला 127 रन्सचे संरक्षण करायचे होते. पेरियास्वामीने 15 रन्समध्ये पाच विकेट्स घेत टीमला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. टीएनपीएलच्या एका हंगामात सर्वात जास्त 21 विकेट्स घेण्याचा विक्रमही पेरियास्वामीने मागच्या वर्षी केला आहे. आयुष्यातील खडतर परिस्थीतीमध्ये पेरियास्वामीवर विश्वास दाखवणाऱ्या त्याच्या पाठी ठाम उभा असलेला नटराजन हा या यशाचा शिल्पकार आहे.

नटराजननं आज गावात क्रिकेट कोचिंग ॲकडमी उभारलीय. त्यामध्ये शिकणाऱ्या मुलांना क्रिकेटचे साहित्य देण्यापासूनचा खर्च तो करतो. टीएनपीएल, आयपीएल किंवा अन्य क्रिकेट स्पर्धेत मिळवलेल्या पैशांची त्याने यात गुंतवणूक केलीय. विजय शंकरसह तामिळनाडूचे काही क्रिकेटपटू त्याला या कामात मदत करतायत. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस' शी काही वर्षांपूर्वी बोलताना नटराजन म्हणाला होता, 'मला या पैशांमधून बहिणींचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्या शिकल्या, त्यांची प्रगती झाली तर होणारा आनंद हा घरात एखादी फॅन्सी कार घेतल्याच्या आनंदापेक्षा मोठा असेल.'   

 सभोवतालच्या सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी होणारी प्रत्येक व्यक्ती ही मोठी असते. स्वत:चा संघर्ष सुरु असतानाच स्वत:सोबत आपल्या सभोवतालची माणसं मोठी व्हावी यासाठी झटणारी व्यक्ती या मोठ्या लोकांमध्येही वेगळी असतात. तामिळनाडूतल्या चिन्नापम्पट्टी गावच्या 29 वर्षांच्या टी. नटराजन गोष्ट यामुळेच वेगळी आहे. आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे.  

1 comment:

Vaibhav said...

Very inspiring story, thanks for writing and sharing.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...