Friday, August 7, 2020

राम मंदिर : भयावरील विजयाचा उत्सव

नव्या पर्वाची सुरुवात


स्वतंत्र भारताच्या इतिहासात पाच ऑगस्ट ही तारीख भयावर विजय मिळवणारा दिवस म्हणून लिहिली गेली आहे. भारताने एक देश म्हणून दोन घटना सलग दोन वर्ष या दिवशी दुरुस्त केल्यात. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणारे कलम 370 रद्द करणारे विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यानंतर बरोबर वर्षभरानी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातील दोन विषयांची पूर्तता इतकेच या घटनांचे महत्व नाही. सामान्य भारतीयांसमोर भयाचा बागूलबुवा उभा करुन वर्षानुवर्षे ज्या दोन गोष्टी प्रस्थापित व्यवस्थेने होऊ दिल्या नाहीतत्या दोन गोष्टी या दिवशी घडल्या. त्यापैकी अयोध्येतील जन्मभूमीच्या स्थानी श्रीराम मंदिराच्या पुन्हा एकदा निर्मितीसाठी तर तब्बल पाच शतकांची प्रतीक्षा या देशाने केली आहे. 

'मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे?' या प्रश्नाच्या उत्तरातील सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे मनुष्याने जगण्यासाठी स्वत:ची संस्कृती उभी केली. ती संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून जतन केली. त्या संस्कृतीमधील वैभवशाली वारसाचा, परंपरांचा आणि इतिहासाचा अभिमान ही मनुष्याला एकमेकांशी घट्ट बांधणारा मुख्य घटक आहे. 

सततच्या आक्रमणामुळे जगभरात ज्यू विखुरले होते, इस्रायलच्या निर्मितीवेळी ज्यू धर्माच्या गौरवशाली इतिहासाने त्यांना एकत्र आणले. ज्यू लोकांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे अक्षरश: राखेतून इस्रायल हा विजिगीषू देश उभा केला. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये एक समान भाषा नव्हती. वेगवेगळे गट अस्तित्वात होते. या सर्वांना जोडणारा फ्रेंच संस्कृती हा एक धागा होता. फ्रेंच संस्कृतीच्या धाग्याने परस्परांशी जोडल्या गेलेल्या या समाजाने फक्त युरोप खंडावर नाही तर संपूर्ण जगावर परिणाम करणारी फ्रेंच राज्यक्रांती केली.   

भारतामधील हिंदू संस्कृतीमधील आदर्श पुरुष म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. भारतीयांसाठी विष्णूचा सातवा अवतार इतकेच श्रीरामाचे महत्व नाही. राम हा एक आदर्श राजा आहे. 'राम राज्य' ही भारतीय संस्कृतीमधील सर्वात आदर्श राज्यपद्धती आहे. श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने काँग्रेसी, डावे, नास्तिक, शाळावाले, हॉस्पिटलवाले आणि हल्ली नव्याने तयार झालेले चायनीज व्हायरसचे काळजीवाहू अशा मंडळींपैकी अनेकांनी भूमीपूजनाची पोटदुखी सहन होत नसतानाही रामाचे मोठेपण आणि रामराज्याची आठवण करुन देत देशातील बहुसंख्य सश्रद्ध हिंदूंना उपदेशाचे डोस पाजले आहेत. 

भारतामध्ये पाचशे वर्षांपूर्वी एक परकीय, धर्मांध आणि जुलमी राजा येतो आणि भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले रामजन्मभूी स्थानावरील मंदीर पाडतो. तो धर्मांध राजा आणि त्यानंतर दिल्लीच्या गादीवर बसलेले त्याचे वंशज परकीय होते. त्यानंतर सत्तेवर आलेले ब्रिटीशही परकीय होते. ब्रिटीश भारतामधून निघून गेल्यानंतरही ७२ वर्षे 'अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मंदिर उभं करण्याचा प्रश्न प्रलंबित असतो. हे मंदिर उभं राहू नये म्हणून भारतामधला एक वर्ग अगदी वाट्टेल ते डावपेच आखतो. ही परकीय व्यक्तीसाठी आश्चर्यकारक आणि भारतीयांसाठी शरमेची बाब आहे.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारला म्हणजेच दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी श्रीराम मंदिराची उभारणी ही एक सहज साध्य गोष्ट होती. गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराची निर्मिती सरकारच्याच माध्यमातून झाली. नेहरु सरकारने सोमनाथ प्रमाणेच अयोध्या, काशी आणि मथुरामधील मंदिरांची निर्मिती करायला हवी होती. तसे झाले असते तर, देशातील हिंदुत्ववादी संघटनांचा एक खूप मोठा मुद्दा काँग्रेस पक्षाने सुरु होण्यापूर्वीच संपवला असता. रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून संघ परिवार, भाजपा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी संघटनांचा देशभर विस्तार झाला. त्यांनी देशभरात आपल्या संघटना भक्कम केल्या. त्याच संघटनात्मक शक्तीच्या जोरावर आज नरेंद्र मोदी हा 'कट्टर हिंदू' देशाचा पंतप्रधान आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्ता मिळालीय, असा दावा अनेक मंडळी वारंवार करतात. थोडक्यात काँग्रेसने वेळीच हालचाल केली असती तर 1990 नंतर बदललेल्या इतिहासाची आज काही मंडळींना लाज वाटते, तो इतिहास घडलाच नसता.

मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे देशातील स्व प्रमाणित 'विवेकाचा आवाज' 'अंधाराची काजळी भेदणारे' 'पुरोगामी' 'समतावादी' 'मानवतावादी' 'एनजीओवादी ( मी इथे पुढचा शब्द नक्षलवादी हा शब्द वापरणार नाही, कुणाला तो आठवला तर ते तो योगायोग समजावा. मी कुणाचेही विचार नियंत्रित करु शकत नाही. विचार नियंत्रित करण्यावर माझा विश्वासही नाही)  मंडळींवर  'बिच्चारे दिवस' आलेच नसते.

प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. या वनवासातही त्यांना अनेक अडचणी आल्या. श्रीरामानांही कष्ट चुकलेले नाहीत,ति राम मंदिर सहज साध्य कसे असेल ? या भावनेतून हिंदूंनी गेली 500 वर्षे  प्रतीक्षा केली आहे. गेली 30 वर्ष यासाठी तीव्र लढा दिला. या लढ्यात अनेक हुतात्मा झाले. मंदिर स्थापना करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात नाही तर भारतात हिंदूंना कारसेवा करावी लागली. बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह सरकारने या कारसेवकांवर गोळीबार केला. त्यानंतर काही वर्षांनी गुजरातमधल्या गोध्रामध्ये कारसेवकांनी भरलेला रेल्वेचा डबा बाहेरच्या जमावाने पेटून दिला. देशातल्या हिंदूंना डिवचण्यासोबतच मुस्लिमांना गोंजारत त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम गेल्या ३० वर्षात केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने केले.

सत्तेत असलेल्या पक्षांची रामभक्तांवर दडपशाही सुरु असताना राजकीय सत्तेपासून कोसो दूर असलेल्या डाव्या संघटनांनी स्वातंत्र्यानंतर एक नवी 'इको सिस्टिम' तयार केली.या वर्गाने श्रीरामाच्या अस्तित्वावर, भारतीय संस्कृतीशी, अयोध्येशी श्रीरामाच्या असलेल्या संबंधांवर सातत्याने खोट्या प्रमेयाद्वांरे प्रश्न निर्माण केले. हिंदूच्या विचारपद्धतीत संभ्रम निर्माण केला. हिंदू समाज हा जगाच्या प्रारंभापासून सहिष्णू आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणारा आहे. या डाव्या संघटनांनी या समाजातील प्रत्येक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांवर प्रश्नचिन्ह उभे करत 'आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो' ' आम्ही हिंदू आहोतयाची लाज वाटावी अशी पिढी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 

सोमनाथ ते विश्वनाथ, कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत परकीय धर्मांध राजांच्या हिंदू मंदिरांवरील आक्रमणाच्या खुणा या देशात ठिकठिकाणी आहेत. या खुणा या मंडळींना कधीही दिसत नाहीत. वेगवेगळ्या परकीय आक्रमकांचे पुतळे पाडण्याची मोहीम जगभर सुरु असते. या चळवळीला डाव्यांचा पाठिंबा असतो. भारतामधील खिल्जी, टिपू, औरंगजेब या मंडळींनी केलेले आक्रमण या डाव्या मंडळींना दिसत नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या ABP देशातील अल्पसंख्यांकावर झालेले हल्ले त्यांना समजत नाहीत. या देशातील शेकडो मंदिरं  1947 नंतर पाडण्यात आली. हजारो धर्मांतर झाले. असंख्य महिलांना रोज  'लज्जा'स्पद प्रसंग सहन करावे लागतात. या सर्व गोष्टींचा या मंडळींना कधीही त्रास होत नाही.

राजकीय आणि बौद्धीक पातळीवरील दादागिरी सुरु असूनही हिंदू संघटनांनी राम मंदिरासाठी मोठ्या चिवटपणे लढा दिलाय. कोर्टाच्या दरबारातील आणि जनतेच्या दरबारातील प्रत्येक लढाई ते लढले. ''श्रीराम जन्मभूमी आंदोलन हे स्वातंत्र्य लढ्यासारखे व्यापक होते. यामध्ये संपूर्ण देशाचा समावेश होता.'' असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीयांनी न्यायालयातही या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडत, युक्तीवाद सादर करत आणि आक्षेपांचे खंडण करत या 500 वर्षांच्या लढाईचा निर्णायक शेवट केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एकमताने निर्णय दिला. हा निर्णय झाल्यानंतर देशात कुठेही अतिरेकी जल्लोष झाला नाही. दुसऱ्या दिवशी वाजत-गाजत मंदिर उभे करण्याचे काम सुरु झाले नाही. याचे कारण म्हणजे विरोधकांची भावना दुखावण्यात किंवा त्यांना त्रास देण्यात हिंदू समाजाला  कधीही रस नव्हता, ती हिंदू समाजाची संस्कृती नाही. 

स्वत:ला राज्यघटनेचे रक्षक म्हणवणाऱ्या 'अंधाराची काजळी फोडू छाप' व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करुन श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे मोकळ्या मनाने स्वागत करायला हवे होते. वास्ताविक तसे काहीही झाले नाही. श्रीराम मंदिराच्या जागेवर शाळा उभारा, हॉस्पिटल उभारा ही त्यांची बडबड सुरुच होती. मनासारखा निर्णय दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयावर आणि तो निर्णय देणाऱ्या खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीशावरही त्यांनी शंका उपस्थित केली. तरीही ही मंडळी स्वत:ला 'संविधानवादी' असं ठासून सांगतात आणि जगाने त्यांच्यावर तसा विश्वास ठेवावा अशी त्यांना अपेक्षा असते. 

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीची प्रक्रिया इतके दिवस सुरु नव्हती. यापूर्वीचा बहुसंख्य काळ 'आंधाराची काजळी फोडू छाप' विचारांचे सरकार होते. त्यांच्या हातात गल्लीपासून- दिल्लीपर्यंत कारभार होता. हे सर्व असूनही शिक्षण आणि आरोग्याचे  प्रश्न आजही का कायम आहेत? लहान देश आपल्या पुढे निघून जात आहेत असं मंदिर भूमीपूजनाच्या आठवड्यात रडगाणे गायणाऱ्या व्यक्तींचा विवेकशील आवाज यापूर्वी का बसला होता? अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणार म्हणजे आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असे केंद्र सरकारने किंवा कोणत्या भाजप शासित राज्य सरकारने सांगितले आहे? सरकार सोडा तुमच्या भागात राहणाऱ्या परिवारातील जबाबदार व्यक्तींनी आता हे प्रश्न सोडवण्याची सरकारला गरज नाही. 'सरकारचे जीवतकार्य आता संपले आहे, सर्व प्रश्न आपोआप मार्गी लागतील' असे वक्तव्य केले आहे का

 मंदिराच्या भूमीपूजनाचा दिवस घरात दिवाळीसारखा साजरा करणाऱ्या परिवारानेच या देशात शाळा आणि रुग्णालयांचं जाळं उभं केलंय. यामध्ये अनेक गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याची व्यवस्था उभी केलीय. रुग्णांवर वैद्यकीय उपचार होतात. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, मोठा अपघात, आणि आता चायनीज व्हायरस प्रत्येक आपत्तीमध्ये हे सर्व स्वयंसेवक सर्वस्व झोकून देऊन काम करतात. हे या मंडळींना दिसत नाही, दिसलं तरी आठवतं नाही, आठवलं तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ही मंडळी राम मंदिराचे काम सुरु झाले याचा आनंद न झाल्याने 'माझं मत जरा वेगळं आहे' असं ओरडत समाजाच्या मुख्य धारेपासून वेगळी पडत चालली आहेत. त्यांनीच त्यांच्या सोयीसाठी मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे समजण्याचा काळ हा सोशल मीडियाच्या युगात इतिहासजमा झालाय.  

शहरातल्या कोणत्याही इमारतीकडे पाहून ' अरे इथे हॉस्पिटल बांधले असते तर आज चायनीज व्हायरस पेशंट्सवर चांगले उपचार झाले असते' हे सांगणाऱ्या व्यक्तींचा 'कोरोना वॉरियर्स' म्हणून गौरव करणे  जितके हास्यास्पद आहे त्यापेक्षा जास्त जास्त हास्यास्पद असा या मंडळींचा हॉस्पिटल आणि शाळा प्रेमाचा आलेला हा हंगामी उमाळा आहे.

परकीय सत्ताधीश देशातून निघून गेले म्हणजे देश बदलला असं होत नाही. परकीयांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्यानंतरच भीतीच्या सावटातून देशाची सुटका होते. भारतात पहिले मंदिर पाडले गेले तेंव्हापासून आजपर्यंत हिंदूंच्या मनात परकीय आक्रमकांनी भीतीचा पर्वत तयार केलाय.काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या विशाल भारत देशात शतकं उलटली, कित्येक पिढ्या बदलल्या, जीवनपद्धतीमध्ये बदल झाले, तरी भीतीचा पर्वत मार्गातून हटत नव्हता. 

हा भीतीचा पर्वत वितळण्यास 5 ऑगस्ट 2020 या दिवशी सुरुवात झालीय. हा दिवस म्हणजे फक्त अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची  तारीख नाही, तर शेकडो वर्षांचे भय नष्ट होत आहे याची जाणीव करुन देणारा  दिवस आहे. एक असे भय ज्यावर हिंदू समाजाने आजवर फारशी मोकळेपणे चर्चा केलीच नाही. याच भयामुळे हिंदू बायकांना मोकळेपणे फिरण्यावर बंधनं आली. याच भयामुळे अनेक मंदिरातले देव एखाद्या घरात लपवले गेले.  याच भयामुळे नवी दिल्लीत अठराव्या शतकात एकही भव्य मंदीर उभे राहिले नाही. 1939 साली पूर्ण बिर्ला मंदीर हे नवी दिल्लीमध्ये काही शे वर्षानंतर उभे राहिलेले भव्य मंदीर आहे. याच भयातून निर्माण झालेल्या चुकीच्या समजुतीमधून सरकारी कार्यक्रम असूनही पंडित नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूजेला जाणे टाळले. भारतीय उपखंडातल्या प्रत्येक भागातील भग्न मंदिरं आणि मोडकळीस आलेल्या लेण्यांमधून या भयाचे अवशेष सापडतात. हे भय अखेर आता संपलंय. जे आजवर गमावलं ते सारं गंगार्पण म्हणून सोडून देण्याची परंपरा आता खंडित झालीय. आपला नष्ट झालेला सांस्कृतिक वारसा हिंदू समाज पुन्हा उभा करु शकतो याची जाणीव 5 ऑगस्ट 2020 या दिवशी झालीय. 

धर्माला दडपशाही आणि बुद्धीभेद करुन कायम स्वरुपी नष्ट करता येत नाही, हा विश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारा हा दिवस आहे. 5 ऑगस्ट 2020 या दिवशी भारतीयांच्या भयावरील विजयाच्या उत्सवाला आता सुरुवात झालीय.

टिप - श्रीरामाच्या आयुष्यावरील भ्रामक समजुती दूर करणारा माझा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

12 comments:

Suhas Joshi said...

नेहमीसारखाच छान लेख. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या सरळ आणि साधं तर्काने विचार करणार्या असंख्य सर्वसामान्य भारतियांच्या मनाचं प्रतिबिंब त्यात उमटलेलं आहे.. धन्यवाद!

Amol A Deshmukh said...

Excellent. स्वप्रमाणित परिच्छेद 👍

Unknown said...

Excellent

Unknown said...

,👍👌👌👍

milind said...

Good

Unknown said...

खूप छान.

Pravin Joshi said...

खूप छान ओंकार. तुझे लिखाण खरंच अभ्यासपूर्ण असते. हार्दिक अभिनंदन

Onkar Danke said...

धन्यवाद, काका

Onkar Danke said...

धन्यवाद

Onkar Danke said...

खूप खूप धन्यवाद

Onkar Danke said...

प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.

Onkar Danke said...

धन्यवाद, सुहासजी. तुमच्या प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवतात.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...