Friday, June 12, 2020

चर्चिल कोण होते?


विसाव्या शतकातील निरापराध नागरिकांची हत्या करणारा शासक कोण होता ? असा प्रश्न विचारला तर साहजिकच पहिले नाव हिटलरचे येते. त्यानंतर अनेक जण हिटलरचा मित्र मुसोलिनीचे नाव घेतात. लेनिन, स्टॅलिन, माओ यासारख्या कम्युनिस्ट हुकुमशहांनी धारण केलेला समतेचा आणि क्रांतीचा बुरखाही आता फाटलाय. या तीन कम्युनिस्ट हुकूमशहांखेरीज काही जण इदी अमीन किंवा सद्दाम हुसेन यांचे नावं घेतात. ही सर्व नावं अगदी बरोबर आहेत. या सर्व शासकांच्या यादीत एक नाव मात्र बहुतेकदा नसते. त्यांनी असे काही केले असेल हे अनेकांच्या गावी देखील नसतं. विसाव्या शतकात निरापराध नागरिकांची मोठ्या प्रमाणात हत्या करणाऱ्या यादीतून हमखास विसरलं जाणारं ते नाव आहे, इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल !
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडच्या आजवरच्या प्रभावशाली पंतप्रधानांपैकी एक समजले जातात. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सततच्या हल्ल्यानंतरही शरण न जाणारा लढवय्या अशी त्यांची ओळख आहे. 'Darkest Hour' सिनेमात त्यांच्या तोंडी असणारं 'We Shall fight on the beaches, we shall fight on the landing grounds, we shall fight in the winds and the streets, we shall fight in the hills, we shall never surrender.'' हे भाषण अगदी अंगावर काटा यावा इतकं प्रभावी आहे. शाळेपासून 'चर्चिल पोवाडा' ऐकत असलेले अनेक जण हा सिनेमा पाहिल्यानंतर चर्चिल यांच्या प्रेमात पडतात. 
चर्चिल यांना साहित्याचा नोबेल पुरस्कारही मिळालाय. पूर्णवेळ राजकारणी, अगदी पंतप्रधान बनलेल्या व्यक्तीला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळणे ही खरोखरच दुर्मीळ गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या चर्चिल यांच्या पुतळ्याची त्यांच्याच कर्मभूमीत म्हणजे इंग्लंडमध्ये नुकतीच विटंबना करण्यात आली. या निमित्ताने चर्चिल यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा आढावा घ्यायला हवा. विशेषत: आंदोलकांच्या दाव्यानुसार चर्चिल हे खरोखरच वंशवादी / वर्णद्वेषी होते का? याचेही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे.
इतिहास हा नेहमी जेते लिहितात हे जागतिक सत्य आहे. दुसऱ्या महायुद्धावरचे गाजलेले हॉलिवूड चित्रपट, BBC चे माहितीपट यामधून 'चर्चिल द ग्रेट' अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. जगाला वाचवणारा नेता अशी चर्चिल यांची महती गायली जाते. त्याचवेळी जगातल्या लाखो निरपराध मंडळींचा बळी घेणारे देखील चर्चिल होते हे देखील सत्य सर्वांना समजले पाहिजे. भारताला चर्चिल यांच्या या दमनकारी राजवटीचा सर्वात जास्त फटका बसलाय.
बंगालचा दुष्काळ आणि चर्चिल
ब्रिटीशांनी भारतामध्ये केलेल्या लुटीचे बंगालमध्ये १९४३ साली पडलेला दुष्काळ हे अगदी क्लासिक उदाहरण आहे. मधूश्री मुखर्जी यांच्या 'Churchill's Secrect War' या पुस्तकात याचे सविस्तर आणि ससंदर्भ वर्णन केले आहे.
१९४० च्या दशकाच्या सुरुवातील जपानचे सैन्य भारतीय सीमेवर येऊन धडकले होते. त्यामुळे ब्रिटीशांनी जपानी सैन्याला काहीही हाती लागू नये म्हणून सर्व साधनसंपत्ती नष्ट करण्याचे धोरण स्विकारले होते. ब्रिटीशांच्या या धोरणांमुळे शेतीचे तसेच शेतकऱ्यांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्याच सुमारास आलेल्या चक्रीवादळातही सुमारे ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला. यात आणखी एक आपत्ती म्हणजे जपानच्या लष्कराने भारताला बर्मा आणि थायलंडमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा तोडला होता. या कारणांमुळे बंगालमध्ये १९४३ साली मोठा दुष्काळ पडला होता.

बंगालमध्ये दुष्काळाची होळी पेटलेली असताना विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या संरक्षणासाठी हजारो भारतीय सैनिक युद्धभूमीवर रक्त सांडत होते. या रक्ताची चर्चिल यांना काहीही किंमत नव्हती. त्यांनी दुष्काळाचे खापर भारतीय नागरिकांवरच फोडले. 'भारतीय लोक सशासारखे प्रजनन करतात' असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या चर्चिल यांचे वर्तनही त्याच स्वरुपाचे होते.
भारतात दुष्काळ, युरोपात दुसरे महायुद्ध अशी बिकट परिस्थिती असतानाही ब्रिटीश नागरिकांना कसल्याही प्रकारे झळ बसावी हे चर्चिल यांना मान्य नव्हते. ब्रिटीशांच्या गरजा भागवण्यासाठीचे उद्योग भारतात अगदी कलकत्तामध्येही अखंड सुरु होते. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर भीषण अन्नटंचाई निर्माण होणार असल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटनमधील धान्य कोठारे भरण्यावर भर दिला. धान्यांची जहाजं ऑस्ट्रेलियातून भारताला वळसा घालत युरोपकडे जात होती. चर्चिल यांनी ती जहाजे भारतात पाठवण्याचे आदेश दिले नाहीत. भुकेने तडफडत मरणाऱ्या भारतीय नागरिकांपेक्षा दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र होणाऱ्या युरोपातील देशांची चर्चिल यांना काळजी होती. त्याचबरोबर  भारत लवकरच आपल्या हातून जाणार आहे याची जाणीव झाल्याने कट्टर साम्राज्यवादी मानसिकतेच्या चर्चिल यांनी भारतीयांच्या जीवाची पर्वा केली नाही.
चर्चिल यांच्या धोरणांमुळे बंगालमधील दुष्काळात सुमारे तीस लाख जणांचा मृत्यू झाला. हिटलरने बारा वर्षांच्या राजवटीत साठ लाख ज्यूंचा नरसंहार केला. त्यामुळे त्याला क्रूरकर्मा म्हंटले जाते. एका वर्षात तीस लाख भारतीयांना मारणाऱ्या चर्चिल यांनाही क्रूरकर्मा म्हंटले तर यात चूक काय?
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांचाही चर्चिल पराकोटीचा द्वेष करत. '' It is alarming and nauseating to see Mr Gandhi, a seditious Middle Temple lawyer, new posing as a fakir...striding half-naked up the steps of the vice-regal palace.'' असे वक्तव्य चर्चिल यांनी 1931 साली केले होते. चर्चिल यांची ही गांधी कावीळ इथेच थांबली नाही. तर गांधींजींच्या उपोषणाबाबत चर्चिल म्हणतात, " Gandhi should not be released on the account of mere threat fasting, we should be rid of a bad man and enemy of the Empire if he died.''
आपल्या देशात महात्मा गांधींचा राष्ट्रपिता म्हणून गौरव होतो. महात्मा गांधींचा इतका तिरस्कार करणाऱ्या चर्चिल यांच्यात प्रेमात पडणारी शिक्षणपद्धती भारतात कशी काय विकसित झाली ? 'महात्मा गांधींना मरु द्या' अशी भावना व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाच्या आठवणीने आजही मोठे-मोठे 'बाबू' मंडळी हळवी का होतात ? चर्चिल यांचे कोणते पांग फेडण्यासाठी ही व्यवस्था तयार झाली ? हे स्वतंत्र देश म्हणून आपले अपयश नाही का ? मोदी सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.  
चर्चिल यांचा वंशद्वेष/ वर्णद्वष हा फक्त भारतीयांबाबतच होता का ? अन्य देशांबद्दल त्यांना काय वाटत होते पाहूया…
क्यूबा - 'क्यूबा हे लवकरच आणखी एक ब्लॅक रिपब्लिक होईल' अशी काळजी चर्चिल यांनी १८९६ साली व्यक्त केली होती. हैती या देशाने अनेक वर्षांपासून सुरु असलेली गुलामगिरीची प्रथा नष्ट करत स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याचा संदर्भ देत 'क्यूबा लवकरच ब्लॅक रिपब्लिक होईल' असे चर्चिल यांनी म्हंटले होते. चर्चिल हे गुलामगिरीचे समर्थक होते, हे यामधून सिद्ध होते. 
दक्षिण आफ्रिका - बोअरच्या युद्धात ब्रिटीशांनी बनवलेल्या खास कॅम्पमध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या हजारो नागरिकांचा उपासमार आणि रोगराईमुळे तडफडून मृत्यू झाला. या कॅम्पची चर्चिल यांनी सदैव पाठराखण केली. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय नागरिकंचा मताधिकार काढण्याचे विधेयक १९०६ मध्ये संमत करण्यात आले. या विधेयकाचे बीजारोपण चर्चिल यांनीच केले होते.
आयर्लंड - स्वतंत्र आयर्लंडच्या मागणीलाही चर्चिल यांचा विरोध होता. 'कोर्क पार्क हत्याकांड' आणि ब्लडी संडे' हे स्वतंत्र आयर्लंडच्या मागणीला चर्चील यांचे उत्तर होते.
सोव्हिएट रशिया - कम्युनिझमचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सोव्हिएट रशियावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला पाहिजे असे चर्चिल यांचे मत होते, असा दावा अमेरिकन गुप्तचर संघटना FBI च्या गुप्त फाईलमध्ये करण्यात आला आहे, अशी बातमी  'डेली मेल' या ब्रिटीश वृत्तपत्रानेच काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली आहे. ( अधिक माहितीसाठी संदर्भ पाहा ) 
सौदी अरेबिया - सौदी अरेबियातील वहाबीझमचे पुरस्कर्ते म्हणजे इब्न सौद.  २१ व्या शतकात अमेरिकेत झालेल्या 9/11  दहशतवादी हल्ल्यासह अनेक हिंसक घटनांमध्ये वहाबीझमच्या अतिरेक्यांचा समावेश आहे. वहाबीझमचे पुरस्कर्ते सौद यांच्या अनुयायांचा चर्चिल यांना मोठा पुळका होता. 'इब्न सौद यांचे अनुयायी हे श्रद्धावान आहेत. या अनुयायांना आपल्या विरोधकांना ठार मारण्याचा तसेच त्यांच्या बायका आणि मुलांना गुलाम करण्याचा अधिकार आहे,' अशी त्यांची समजूत होती.
इराक - इराकमधील मागास जमातींमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यावर रासायनिक अस्रांचा प्रयोग करण्यास चर्चिल यांची संमती होती. अरबांविरुद्धही घातक बॉम्ब वापरावे असे त्यांचे मत होते.
पॅलेस्टाईन - चर्चिल यांनी पॅलेस्टाईन नागरिकांची सतत हेटाळणी केली. ज्यूंच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चर्चिल यांचा जेरुसलेमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे.
केनिया - चर्चिल यांनी पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत  केनियातील डोंगराळ प्रदेशातल्या सुपीक जमिनी या केवळ श्वेतवर्णींच्या असतील असा निर्णय घेतला होता. त्यांनी हजारो केनियन नागरिकांची 'खास कॅम्प'मध्ये रवानगी केली. त्यामध्ये या नागरिकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले.
अफगाणिस्तान - अफगाण नागरिकांच्या विरुद्धही रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यास चर्चिल यांची संमती होती. पश्तून नागरिकांना कोणता वंश श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते.
चर्चिल यांच्या मते, 'श्वेत प्रोटेस्टंट ख्रिश्चन हे श्वेत कॅथलिकांपेक्षा आणि भारतीय हे आफ्रिकन्सपेक्षा श्रेष्ठ होते'. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताुसार ब्रिटन सर्वश्रेष्ठ असल्याची त्यांची धारणा होती.

नाझीवाद आणि चर्चिल
हिटलरच्या नाझीवादापासून जगाचे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणारा नेता अशी चर्चिल यांची ओळख आहे. मात्र ब्रिटीश साम्राज्याचे हिटलरपासून रक्षण करणे इतकेच चर्चिल यांचे ध्येय होते. दुसरे महायुद्ध सुरु असताना ग्रीसमधल्या नाझीवादी गटाला चर्चिल यांच्या आदेशानंतरच ब्रिटीश सैन्याने मदत केली होती. ग्रीसमधल्या नाझीवादी गटाला चर्चिल यांचा उघड पाठिंबा होता.
दुसऱ्या महायुद्धात मोठे नुकसान होऊनही स्टॅलिन यांच्या रशियाने जर्मन सैन्याचा ब्रिटीश सैन्यापेक्षा ठिकठिकाणी पराभव केला. युरोपीयन देशांची हिटलरच्या तावडीतून सुटका केली. चर्चिल हे अमेरिकेच्याच मदतीवर विसंबून होते. अमेरिकेने वेळीच युद्धात भाग घेतला आणि ब्रिटनची सुटका केली. 'ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नव्हता' अशा ब्रिटनला अमेरिकेच्या दावणीला जुंपण्याची प्रक्रिया चर्चिल यांच्या राजवटीमध्येच सुरु झाली.
ब्रिटीश साम्राज्याची अखेर
चर्चिल यांच्या साम्राज्यवादी आणि वंशवादी/वर्णद्वेष्ट्या धोरणांमुळे ब्रिटीश वसाहतींच्या देशात स्वातंत्र्य चळवळीनी अधिक वेग घेतला. त्यानंतरच्या काही वर्षात यापैकी बरेच देश स्वतंत्र झाले. जागतिक महासत्ता म्हणून ब्रिटनचे असलेले महत्त्व चर्चिल काळातच संपले. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन जागतिक महासत्तांचा उदय झाला.
विन्स्टन चर्चिल वयाच्या ९१ व्या वर्षी गेले. १८७४ ते १९६५ असा मोठा कालखंड ते जगले. लष्करी अधिकारी, लेखक ब्रिटीश पार्लमेंटचे सदस्य, पंतप्रधान आणि जागतिक नेते हा त्यांचा प्रवास होता. या संपूर्ण प्रवासात ते ब्रिटनच्या राजघराण्याचे सच्चे सेवक म्हणून जगले. त्यांचे वर्तन हे फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांसाठी तिरस्करणीय आहे. 
वर्णद्वेषी चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धामधील युद्ध गुन्हेगार होते. त्यांच्याच चुकीच्या धोरणांमुळे सुमारे तीस लाख भारतीयांचा दुष्काळात तडफडून मृत्यू झाला. नाझीवादाचा सामना केला म्हणून त्यांची पापं धुतली जात नाहीत. त्यांनी मुसोलीनीचं 'रोमन जीनियस' असं वर्णन केलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या गडबडीत ग्रीसमधल्या नाझी गटाला मदत केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर हिटलरचा प्रमुख लष्करी सल्लागार जनरल मानस्टाईन खटल्यातून मुक्ततेसाठी चर्चिल यांनी स्वत:चे वजन वापरले. जगभर अन्याय करणाऱ्या आणि स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या ब्रिटीश साम्राज्याचा निष्ठावंत चेहरा ही विन्स्टन चर्चिल यांची खरी ओळख आहे.
संदर्भ
टीप - Quora मराठी वर चर्चिल यांच्यावरील एका प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. ते उत्तरही या ब्लॉगमध्ये वापरले आहे. हे उत्तर वाचण्यासाठी इथे  क्लिक करा

1 comment:

Niranjan Welankar said...

विषय व अप्रोच चांगला घेतलाय. काही मतं खूप टोकाची वाटली. जपानची सेना व आ.हिं.से. ने भारतीय लोकांचे सप्लाईज रोखले असतील असं वाटत नाही. जनरल मॅनस्टाईन हा काही नाझी नव्हता.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...