Friday, May 22, 2020

नेपाळची नाजूक जखम


भारत सध्या चायनीज व्हायरस या जागतिक संकटाचा सामना करतोय. त्याचवेळी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतामधल्या कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भागावर नेपाळचा हक्क सांगितला आहे. नेपाळच्या पंतप्रधानाने देशाचा नवा नकाशा जाहीर करत भारताची कुरापत काढलीय. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील संबंध हे रामायणाइतके पवित्र आणि हिमालय पर्वतासारखे भक्कम आहेत. त्यामुळे या संबंधांना कुणी नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे काळजीपूर्वक पाहायला हवे.

काय आहे वाद ?

ब्रिटीश आणि नेपाळ यांच्यात 1814 ते 1816 दरम्यान झालेल्या युद्धानंतर 1816 साली सुगौलीमध्ये करार झाला. या करारानुसार महाकाली नदी ( भारतामधील नाव काली किंवा शारदा ) ही भारत आणि नेपाळमधील पश्चिम सीमा निश्चित करण्यात आली. या नदीच्या पूर्वेकडील भाग हा नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग हा भारताचा असेल हे या कराराने ठरवण्यात आले. नेपाळने हा करार मान्य केला. त्यानंतर 1920 आणि 1929 अशी दोन वर्षे भारत - नेपाळ यांच्यात या सीमेवर संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी देखील नेपाळला हा करार आणि पर्यायाने भारत आणि नेपाळमधील पश्चिम हद्द मान्य होती.

नेपाळने या प्रकरणात पहिला आक्षेप 1997 साली नोंदविला. महाकाली नदीचा उगम हा कालापानीच्या उत्तरेला लिंपियाधुरामध्ये होतो त्यानंतर ही नदी नैऋत्येला वाहते असा नेपाळने दावा केला. त्यामुळे या सर्व परिसरावर नेपाळने त्यांचा हक्क सांगितला. तर महाकाली नदीचा उगम हा लिपुलेखच्या खालच्या परिसरातील काळ्या झऱ्यांमध्ये होतो, अशी भारताने भूमिका मांडली. हा परिसर उत्तराखंड राज्यात येत असल्याने आमचा भाग आहे अशी भारताची भूमिका आहे.

गुजराल नीतीचा फटका 

 इंद्रकुमार गुजराल हे भारताचे माजी पंतप्रधान. पंतप्रधान होण्यापूर्वी गुजराल हे परराराष्ट्र मंत्री होते. या काळात भारताचे शेजारच्या देशांसोबत संंबंध सुधारावे म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले. हे धोरण गुजराल नीती म्हणून प्रसिद्ध आहे. गुजराल नीतीमध्ये नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या पाच देशांनी भारताकडे जितके मागितले त्यापेक्षा अधिक कशाचीही अपेक्षा न करता भारताने द्यावे असे तत्व होते.

इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाल्यानंतर १९९७ साली नेपाळ दौऱ्यावर गेले. या दौऱ्यापूर्वी भारत - नेपाळ सीमेचा वाद नेपाळमध्ये पेटवला जात होता. नेपाळचे तत्कालीन उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी गुजराल यांच्याबरोबरच्या चर्चेत हा वाद उपस्थित केला. गुजराल नीतीचा फायदा घेत कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा या भागावरील नेपाळचा दावा भारताने मान्य करावा अशी मागणी त्यांनी केली. नेपाळची ही खोडसाळ मागणी गुजराल यांनी त्याच चर्चेत तातडीने फेटाळणे आवश्यक होते. मात्र गुजराल यांनी तसे केले नाही. त्यांनी हा विषय वादग्रस्त असल्याचे मान्य करत संयुक्त सीमा समितीकडे सोपवला.

2019 साली काय झाले ?

गुजराल सरकार वर्षभरात गडगडले तसेच नेपाळमधील सरकारही गडगडले. या प्रकरणात 2019 पर्यंत म्हणजेच 22 वर्षे काही विशेष प्रगती नव्हती. नेपाळच्या आघाडीवर या प्रकरणात फार काही पेटावापेटवीची भाषा नव्हती. भारत सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करत जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये या फेररचनेसह नवा अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला. त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश दाखवण्यात आले. जम्मू काश्मीमधील हे दोन प्रशासकीय बदल सोडले तर उर्वरित भारताचा नकाशा हा तोच होता. या नकाशात काहीही बदल नव्हता. हा नकाशा पाहताच नेपाळ सरकारला आपल्या जुन्या मागणीची अचानक आठवण झाली.

नेपाळ सरकारला ही आठवण होण्यामागे चीनी कनेक्शन आहे. नोव्हेंबर 2019 पूर्वी सामान्य नेपाळींमध्ये चीनबद्दलच्या असंतोषात वाढ झाली होती. चीनच्या PLA कडून नेपाळच्या उत्तर भागात अतिक्रमण करण्यात आले होते. चीनी सैन्याने दादागिरी करत आपल्या तुकड्या या परिसरात तैनात केल्या. सीमा भागात रस्ते बांधणीचे काम हाती घेतले. त्याचबरोबर नेपाळ सरकारच्या प्रमुख संकेतस्थळाचे हॅकिंग, अवैध मानवी व्यापार यामध्ये चीनी नागरिकांचा सहभाग असल्याची प्रकरणं या काळात उघडकीस आली. नेपाळी नागरिकांचे या आंदोलनातून लक्ष वळवण्यासाठी नेपाळच्या चीन धार्जिण्या सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये सीमावाद उकरुन काढला.

मे 2020 मध्ये काय ?

गेल्या दोन महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जग चायनीज व्हायरसनं त्रस्त आहे. चीनच्या वूहान शहरात सर्वप्रथम आढळलेल्या या व्हायरसनं जग लॉकडाऊन केलंय. या काळात पाकव्याप्त काश्मीर हा आपलाच परिसर ताब्यात घेण्याचा नुसता विचार  सोशल मीडियावर मांडणे देखील 'मानवता द्रोह' समजून विचारणाऱ्याची जात काढत पुरोगामी टोळी त्याचे लचके तोडत आहेत. त्याचवेळी नेपाळने भारताच्या भूभागावर दावा केलाय.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी हा दावा करण्याच्या काही दिवस आधी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिबेटमधील कैलास मानससरोवर या तीर्थस्थळाला भेट देण्याऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नव्या मार्गाचे उद्धघाटन केले. उत्तराखंडातील पिठोरगड जिल्ह्यातून जाणारा हा 80 किलोमीटर लांबीचा रस्ता कैलासदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधला आहे. हा संपूर्ण रस्ता भारताच्या हद्दीतून जाणारा आहे. यापूर्वी कैलासदर्शसाठी जाणारे दोन्ही मार्गातील ८० टक्के भाग हा चीनच्या ताब्यातील आहे. आता नव्या रस्त्याने हे चित्र बदलणार आहे.

चीनच्या जाळ्यात नेपाळ

 नेपाळची एकेकाळी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र अशी ओळख होती. ही ओळख पुसण्यासाठी अनेकांनी जंग पछाडले. अखेर देशाची राज्यघटना बदलण्यात त्यांना यश आले. राज्यघटनेत बदल करणे हा एखाद्या देशाचा अंतर्गत प्रश्न असला तरी नेपाळची राज्यघटना ही कम्युनिस्ट सरकारने बदलली आहे. कम्युनिस्ट पक्षाची चीनवरील निष्ठा ही जगजाहीर आहे. नेपाळमध्ये हे सरकार सत्तेत आल्यापासूनच चीनचा नेपाळमधील हस्तक्षेप वाढला. गुंतवणुकीच्या नावावर देशात प्रवेश करत नेपाळी नागरिकांमध्ये भारताविरोधी वातावरण निर्माण करणे  हा चीनचा मुख्य उद्देश आहे. नेपाळमधील मधेशी नागरिकांना नव्या राज्यघटनेद्वारे दिली गेलेली दुय्यम वागणूक ही नेपाळच्या भारतविरोधी राजकारणाचे प्रतिक आहेच. त्याचबरोबर देशांतर्गत फूट पाडणारे देखील आहे.

नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्टवर या जगातील सर्वोच्च पर्वत शिखरावर चीनने मे महिन्यातच दावा केलाय. नेपाळमधील सरकार अस्थिर आहे. कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ओली यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केलीय. पक्षाचे नेते पुष्पकमल दहल ( प्रचंड) आणि ओली यांच्यातील मतभेद शिगेला पोहचलेत. त्याचवेळी नेपाळचे चीनमधील राजदूत हू यांछी यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत हा पेचप्रसंग सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. एखाद्या देशातल्या सत्ताधारी पक्षातील पेचप्रसंग सोडवण्यासाठी परदेशी राजदूत त्यातही विशेष म्हणजे चीनच्या राजदूताने बैठका घेणे ही घटना पुरेशी बोलकी आहे.

 चायनीज व्हायरसमुळे नेपाळमधील आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था आणखीनच चव्हाट्यावर आली आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करण्यास नेपाळ सरकार असमर्थ आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरलाय. या व्हायरसचे खापर भारत - नेपाळ यांच्यातील खुल्या सीमेवर फोडण्याचं काम नेपाळचे पंतप्रधान ओली करत आहेत. आपली खुर्ची भक्कम करण्यासाठी चीनची मदत घेत लोकांमध्ये भारतविरोधाची आग ते पेटवतायत. त्यातूनच त्यांनी नेपाळचा नवा नकाशा जाहीर करत भारत सरकारवर जोरदार टीका केलीय. साम्राज्यवादी चीनने ओलींना हाताशी धरत चीनभोवती टाकलेलं आपलं जाळं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सध्याच्या जागतिक आपत्तीमध्येही मोठ्या जोमाने केलाय.

नेपाळ वेगळे का ?

पाकिस्तान आणि चीन यांच्यानंतर भारताच्या भूभागावर दावा करणारा नेपाळ हा तिसरा देश बनलाय.यापैकी  पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या ताब्यात भारतीय भूभाग आहे, तर नेपाळच्या ताब्यात नाही. नेपाळच्या सरकारी माध्यमातून भारतविरोधी आग पेटवली जात असतानाही भारत सरकारने संयमी प्रतिक्रिया दिलीय.

या लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे भारत - नेपाळ यांच्यातील संबंध हे रामायणाइतके पवित्र आणि हिमालयासारखे भक्कम आहेत. हिंदूधर्माच्या समान संस्कृतीने हे दोन देश बांधले गेले आहेत. लाखो नेपाळी नागरिक भारतामध्ये अनेक पिढ्यांपासून राहतात. नेपाळमधील गोरखा नागरिकांची भारतीय सैन्यात खास रेजिमेंट आहे. या रेजिमेंटने 1947 नंतरच्या सर्व युद्धात अतुलनीय पराक्रम केलाय. गोरखपूरमधल्या गोरखनाथ मठाशी नेपाळच्या राजांचे खूप पूर्वीपासून संंबंध आहेत. मकर संक्राती उत्सवात गोरखनाथ मंदीर परिसरात मोठा उत्सव भरतो. या उत्सवात गोरखबाबांना खिचडीचा पहिला नैवेद्य दाखवण्याचा मान हा नेपाळच्या शाही परिवाराला आहे. नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर नेपाळमधील नागरिकांसाठी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती.

नेपाळचे पंतप्रधान ओली हे चीनचे बाहुले बनलेत. थ्री इडियट्सच्या भाषेत सांगयचे तर सध्या ' बोल वो रहे है लेकिन शब्द चीन के है ' भारताने नेपाळला नेहमीच संरक्षण दिलंय. सर्व बाजूंनी जमिन असलेल्या नेपाळला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भारतमार्गे मोठ्या प्रमाणात केला जातो. परकीय देशाची जमीन हडप करण्याची भारताची संस्कृती नाही. कोणत्याही देशावर स्वत:हून आक्रमण न करणारा भारत हा देश आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये काही शक्तींकडून मोठ्या प्रमाणात हवा भरली जात आहे. 'नेपाळने भारताला ललकारले' या सारख्या हेडलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशात परस्परविरोधी भावना भडकवण्याचे काम ही प्रचारयंत्रणा करतीय. या प्रचाराला बळी पडून सत्ताधारी भाजपच्या एका तरी नेत्याने नेपाळविरोधी विधान करावे अशी या सर्वांची इच्छा आहे. यापूर्वी माधुरी दीक्षित किंवा ऋतिक रोशन यासारख्या कलाकारांच्या विधानांचा विपर्यास नेपाळमध्ये करण्यात आलाय.

आताही भारताच्या राष्ट्रवादाची हिटलरशी तुलना करत देशाच्या 'आत्मनिर्भर'तेच्या प्रयत्नांना ब्रेक लावण्याचा भारतविरोधी शक्तींचा प्रयत्न  आहे. भारत सरकारकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जातोय.त्यामुळे देखील पाकिस्तान आणि चीनच्या डोकेदुखीत वाढ झालीय. 'चायनीज व्हायरस'मुळे चीनची जागतिक राजकारणातील प्रत्येक मंचावर कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं सुरु केलाय. तर सीमाभागात भारताने जोरदार हलचाली करत आपली सज्जता वाढवलीय. 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा अवस्थेत अडकलेला चीनी ड्रॅगन आता नेपाळला हाताशी धरत ही चाल करतोय.

पाकिस्तान आणि चीन हे भारताचे शत्रू देश आहेत. या देशांशी नेपाळची तुलना करण्याची गरज नाही. मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमक खेळण्याची गरज नसते. एखादी ओव्हर मेडन खेळणे देखील आवश्यक असते. नेपाळने निर्माण केलेला सध्याचा प्रश्न हा तसाच नाजूक आहे. त्यासाठी आक्रमक नाही तर संयमी खेळाची आवश्यकता आहे.

Monday, May 11, 2020

रवींद्र जडेजा : योद्धा क्रिकेटर'' First they ignore you, then they laugh at you,, then they fight you, then you win''  ESPN Cricinfo या क्रिकेटच्या आघाडीच्या संकेत स्थळावरील रवींद्र जडेजाच्या प्रोफाईलची सुरुवात महात्मा गांधींच्या या जगप्रसिद्ध वाक्याने होते. महात्मा गांधींच्या जन्मगावापासून साधारण १२५ किलो मीटर अंतरावर असलेल्या जामनगरच्या या 'योद्धा क्रिकेटर'ची ही सार्थ ओळख आहे.

भारताने २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. जडेजा या टीमचा सदस्य. डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या भारतातील अनेक बॉलरपैकी एक म्हणून त्याच्याकडे त्यावेळी अनेकांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर २००९ साली टी - २० वर्ल्ड कपमध्ये लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्ध १५४ चा पाठलाग करताना धोनीने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. त्या मॅचमध्ये जडेजाला ३५ बॉल्समध्ये २५ रन्सच करता आले. भारताच्या पराभवाचे खापर या संथ खेळीवर फोडण्यात आलं. क्रिकेट फॅन्सना व्हिलन सापडला. देशांतर्गत स्पर्धेत तीन त्रिशतक झळकावूनही त्याच्यावरील लोकांचे हसणे थांबले नाही. टेस्ट टीममध्ये 'धोनीचा माणूस' म्हणून तो घुसला असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील आठ वर्षात  मोठ्या संघर्षानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रवींद्र जडेजाने स्वत:ला सिद्ध केलंय.फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंगमधील उपयुक्तता सिद्ध केलीय.

जडेजा हा सौराष्ट्रमधील जामनगच्या एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा. त्याच्या भावकीतले पूर्वज स्वातंत्र्यपूर्व काळात कच्छचे राजे हॉते. राजेशाही वंशातील कोणाताही श्रीमंती त्याच्या घरात नव्हती. जडेजाचे वडील त्याला जामनगरच्या 'रॉयल स्पोर्ट ऑफ क्रिकेट' या क्लबमध्ये कधी तरी घेऊन जात. ते त्या क्लबमध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचं काम करत. सौराष्ट्राचे दोन मोठे क्रिकेटपटू रणजीतसिंहजी आणि दुलीपसिंहजी हे एकेकाळी या क्लबमध्ये क्रिकेट खेळत असत. मोठी परंपरा असलेल्या याच क्लबमध्ये सौराष्ट्राच्या तिसऱ्या मोठ्या क्रिकेटरची क्रिकेटची पहिली ओळख झाली.

जडेजासाठी क्रिकेट हा फावल्या वेळातील खेळ नव्हता. तर घरच्या गरिबीमुळे जे काही मिळत नाही त्याचा त्रास विसरण्याचे ते माध्यम होते. रॉयल स्पोर्ट्स क्लबच नाही तर संधी मिळेल तिथे तो क्रिकेट खेळत असे. जामनगरचे वर्षातील काही दिवस ५० अंश सेल्सियसच्या जवळ जाणारे तापमान, ओसाड जमिनीवर तासंतास करावी लागणारी फिल्डिंग, मोठ्या वयोगटातल्या मुलांच्या दादागिरीमुळे बहुतेकदा न मिळणारी बॅटिंग यापैकी कशाचाही परिणाम त्याच्या क्रिकेटबद्दलच्या समर्पणात झाला नाही.

 जडेजाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये दोन महेंद्रचं मोठं योगदान आहे. यापैकी दुसरा महेंद्र म्हणजे महेंद्रसिंह धोनी हा सर्वांना माहिती आहे. पहिले महेंद्र होते महेंद्रसिंह चौहान. त्याचे पहिले क्रिकेट कोच. पोलीस दलात काम केलेले महेंद्रसिंह हे प्रशिक्षित कोच नव्हते. पण ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जात. क्रिकेटच्या सरावात कोणतीही हलगर्जी त्यांना खपत नसे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी म्हणून ते त्यांना रट्टे द्यायलाही मागे-पुढे पाहत नसत. क्रिकेट आणि अभ्यास या व्यक्तीरिक्त कोणतीही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली त्यांना खपत नसे.  जडेजाने एका मॅचमध्ये भरपूर रन्स दिले होते. दुसऱ्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्येही त्याने मागच्या मॅचमधील चुकांची पुनरावृत्ती करत भरपूर रन्स दिले. या ओव्हरनंतर स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या जडेजाची महेंद्रसिंह यांनी मैदानातच धुलाई केली. त्यांच्या या शिक्षेचा तात्काळ परिणाम झाला. जडेजाने त्या मॅचमध्ये ५ विकेट्स घेतल्या !

जामनगर ते सौराष्ट्र क्रिकेटची राजधानी राजकोट हा प्रवास जडेजाने निव्वळ क्रिकेटमधील गुणवत्तेच्या जोरावर केला. घरात आनंद, पेपरमध्ये नाव, समाजात ओळख हे सर्व क्रिकेटमुळेच मिळालं. १९ वर्षाखालील राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर तर घरात पैसा आणि गाडीचे क्रिकेटच्याच जोरावरच आगमन झाले. त्याच दरम्यान जडेजाची आई गेली. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पोरासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्याने तो अबोल बनला. एकटा पडला. क्रिकेटनंच त्याला यामधून बाहेर काढलं. मोठा क्रिकेटपटू होण्याचं आईचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय बनलं.

पहिली फिल्डिंग, दुसरी बॉलिंग आणि तिसरी  बॅटिंग असं पॅशन जपणारा जडेजा २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वविजेत्या टीमचा भाग होता.राजस्थान रॉयल्सने त्याला पहिल्याच ट्रायलमध्ये टीममध्ये निवडलं. फिरकीचा जादूगर शेन वॉर्न त्याच्या खेळानं भलताच प्रभावित झाला. लांब केस, सडसडीत शरीर आणि मैदानावरील ऊर्जेचा अंखड स्रोत असलेला हा पोरगा भविष्यातला 'रॉक स्टार' आहे, असं त्याने जाहीर केलं. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सनं सर्वांनाच धक्का देत विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदासाठी जडेजानं जाम मेहनत घेतली होती.

इंग्लंडमधील २००९ चा टी-२० वर्ल्ड कप सेटबॅक होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सशी नियमबाह्य वाटाघाटी करताना सापडला. एक वर्षाची आयपीएल बंदीची शिक्षा भोगली. चेन्नई सुपर किंग्जने २०१२ साली त्याला मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलं. लोकांनी त्याच्यावर 'धोनीचा माणूस' म्हणून शिक्कामोर्तब केलं. जडेजाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या त्रिशतकांवर सारं जग हसत होतं, धोनीनं टेस्ट बॉलर म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली झालेल्या सीरिजमध्ये सहा पैकी पाच वेळा मायकल क्लार्कला आऊट करत त्यानं हा विश्वास सार्थ ठरवला.  इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी तो व्हिलन ठरला होता. त्याच इंग्लंडमध्ये २०१३ साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात त्याच्या बॉलिंगचं मोलाचं योगदान होतं.

इंग्लंड दौरा आणि रवींद्र जडेजा यांच्यात काही तरी वेगळंच नातं आहे. सर्व काही सुरळीत सुरु झालंय असं वाटत असताना २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. 'ट्रेंटब्रिजच्या ड्रेसिंग रुम आणि खेळपट्टी यांच्यातील पॅसेजमध्ये जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला ढकलंलं.' अशी तक्रार धोनीनं आयसीसीकडं केली. ही घटना घडली त्या पॅसेजमध्ये कोणताही सीसीटीव्ही नव्हता. भारताकडे कोणताही पुरावा नव्हता. इंग्लंडचे प्लेयर्स अँडरसनच्या विरुद्ध बोलतील ही कल्पनाही अशक्य होती. तरीही धोनीनं आयसीसीकडे तक्रार केली. लॉर्ड्स टेस्टपूर्वी सर्व फोकस जडेजावर शिफ्ट झाला.

लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या इनिंगमध्ये भारताची अवस्था ६ आऊट १७९ अशी असताना जडेजा बॅटिंगला आला. त्यानंतर त्याने अँडरसनच्या प्रत्येक बॉलला टार्गेट केलं. अँडरसनच्या बॉलवर तो कधी बीट व्हायचा पण नंतर  भिरकावून द्यायचा...पुन्हा चुकायचा, पुन्हा फेकून द्यायचा. दबावाच्या ओझ्यात त्याने खांदे पाडले नाहीत. त्याच्यातला 'योद्धा क्रिकेटर' जागा झाला होता. याच मॅचमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जडेजानं पहिल्यांदा  तलावारीसारखी बॅट फिरवत आनंद साजरा केला. त्यानंतर जडेजाचे हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन बनले. ५७ बॉल ६८ रन्स अशी आक्रमक मॅच विनिंग इनिंग तो खेळला.  भारतीय टीम २०११ नंतर जमेकाचा अपवाद वगळता पहिल्यांदाच उपखंडाच्या बाहेर टेस्ट मॅच जिंकली होती.

भारतीय टीममधलं धोनी युग संपलं. विराट युग सुरु झालं. जडेजाच्या भोवती टीकाकारांना सदैव दिसणारं धोनीचं संरक्षण कवच संपलं होतं. तरीही जडेजा टीममध्ये भक्कम उभा होता. विराट कोहलीच्या टीममध्येही त्याचं स्थान अबाधित होतं. भारतीय पिचवरचा तो आर. अश्विनचा भक्कम साथीदार बनला. आता तर भारतीय उपखंडाबाहेर अश्विनच्या अगोदर त्याचा विचार होतो.

पिचची साथ नसेल तर कधी - कधी अश्विनची जादू चालत नाही. अश्विनचा खराब दिवस असतानाही कॅप्टन जडेजावर विसंबून राहू शकतो. तो आपल्या 'बोरिंग लाईन'च्या जोरावर बॅट्समन्सला अडचणीत आणतो. विशाखपट्टणम ( 2016 )  टेस्टच्या शेवटच्या इनिंगध्ये कुक मैदानावर घट्ट चिकटून उभा होता. जडेजाने त्याला बोरिंग लाईनवर बॉलिंग करत भंडावून सोडलं. दिवसातल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी जडेजा काही तरी वेगळं करेल अशी कुकला आशा होती. जडेजानं त्याचं व्रत सोडलं नाही. त्याच्या बॉलची 'लाईन अँड लेन्थ' ओळखण्यात कुकने छोटी चूक केली. या चुकीचा फटका त्याला बसला. कुक आऊट झाला. इंग्लंडची टेस्ट ड्रॉ करण्याची आशा संपुष्टात आली. कुक शेवटच्या ओव्हरमध्ये चुकला नसता तर दुसऱ्या दिवशी जडेजानं पुन्हा त्याच पद्धतीनं बॉलिंग केली असती. ग्लॅमरस बॉलिंगप्रमाणे बोरिंग लाईनही टीमला मॅच जिंकण्यात आवश्यक असते हे या 'बोरिंग लाईनच्या राजा' ला पक्कं माहिती आहे.

इंग्लंडमधल्या २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पराभवाचे खापर अश्विन आणि जडेजावर फुटले. दोघांचीही टेस्ट टीममधून हकालपट्टी झाली. चहल - कुलदीपचा उदय झाला होता. त्यानंतर अश्विनला आजवर वन-डे टीममध्ये कमबॅक करता आलं नाही. संजय मांजरेकरनं २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये ज्याचं वर्णन 'Bits & pieces players' असं केलंय त्या जडेजानं फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग या तिन्ही क्षेत्रातील योगदानाच्या जोरावर वन-डे टीममध्ये पुनरागमन केलं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी झालेल्या आशिया कपमध्ये शांत डोक्यानं बॅटिंग करत जडेजानं अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव टाळला. वर्ल्ड कपमधलं टीममधलं स्थान पक्कं केलं.

वर्ल्ड कपमध्ये जडेजा सुरुवातीला १२ वा खेळाडू म्हणून खेळला. निव्वळ फिल्डर म्हणून 'अंतिम ११ मध्ये निवड हवी' अशी पात्रता असलेला तो पहिला भारतीय खेळाडू. सुरुवातीच्या मॅचमध्ये तो १२ वा खेळाडू या नात्याने फक्त फिल्डर म्हणूनच मैदानावर उतरला. वर्ल्ड कपच्या काळात ऋतिक रोशनच्या 'सुपर ३०' सिनेमाचं ट्रेलर सर्वत्र सुरु होतं. त्या सिनेमात ऋतिकचा एक डायलॉग आहे. समाजताल्या गरीब, वचिंत गटातल्या मुलांना उद्देशून ऋतिक म्हणतो, '' जब समय आएगा तो सबसे लंबा और सबसे बडा छल्लांग हम ही मारेंगे '' ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये जडेजानं मॅक्सवेलचा घेतलेला कॅच आठवून पहा...ऋतिकच्या त्या फिल्मी डायलॉगचा तो 'लाईव्ह डेमो' होता. समाजातील अती गरीब वर्गातील  सुरक्षा रक्षकाच्या मुलानं क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेत बड्या टीम विरुद्धच्या मॅचमध्ये निर्णायक क्षणी मारलेली ती 'छल्लांग' होती.

जडेजा वर्ल्ड कपमध्ये त्याचं काम चोख करत होता. त्याचवेळी कॉमेंट्री करताना वाहवत जाणाऱ्या आणि नकारत्मकतेचा डोस पाजणाऱ्या संजय मांजरेकरनं एक ट्विट करत विनाकारण वाद उकरुन काढला. नाराज जडेजानं मांजरेकरला ट्विटरवरच चोख भाषेत उत्तर दिलं. जडेजाचं हे ट्विट अनेकांना वरिष्ठ खेळाडूचा केलेला अपमान वाटलं. वर्ल्ड कपसारखी सर्वात महत्त्वाची स्पर्धा सुरु असताना वरिष्ठ खेळाडू मर्यादाभंग करत वाट्टेल ते बरळतात. त्यामुळे आपल्या देशाच्या खेळाडूच्या मनस्थितीवर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. पण त्याला संबंधित खेळाडूंनी काहीच उत्तर द्यायचं नाही....

जडेजा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकटा लढला. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर तो बॅटिंगला आला. त्यावेळी २४० च्या टार्गेटचा पाठलाग करताना ६ बाद ९२ अशी आपली नाजूक अवस्था होती. न्यूझीलंडचे बॉलर्स फॉर्मात होते. त्यांना पिच आणि हवामानाची साथ मिळत होती. महेंद्र सिंह धोनी 'आऊट ऑफ टच' होता. जडेजानं 'योद्धा क्रिकेटर' सारखा त्वेषानं प्रतिहल्ला चढवला. त्याच्या ७७ रन्समुळे आपण मानहानीकारक पराभव टाळू शकलो.

फिल्डिंग आणि बॉलिंग प्रमाणे जडेजा आता बॅटिंगही अधिक गांभीर्याने करु लागला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टॉप आणि लोअर ऑर्डरमधील समन्वयाचं काम त्याला जमलंय. टेस्ट क्रिकेटमधील फक्त १६ इनिंगमध्ये त्याची सरासरी ही २९.४० वरुन ३५. ४२ इतकी सुधारली आहे. २०१८ आणि २०१९ या वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सहा ते नऊ क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या फलंदाजामध्ये (किमान १५ इनिंग बॅटिंग हा निकष ) त्याची सरासरी  सर्वात जास्त ५७.०९ इतकी आहे.  ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, जोस बटलर, मोईन अली, बेअरस्ट्रो, क्विंटन डी कॉक या सर्वांपेक्षा जडेजाची या क्रमांकावरील बॅटिंग सरासरी जास्त आहे.

चायनीज व्हायरसमुळे अनेक देश सध्या लॉकडाऊन अनुभवत आहेत. या काळात खेळाडू वेगवेगळे व्हिडिओ करुन फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतायत. जडेजानं हवेत तलवारबाजीचा एक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला होता.

त्याचे फॅन्स या  व्हिडिओमुळे खुश झाले. काही पत्रकारांना मात्र हा व्हिडिओ चांगलाच झोंबला. 'जडेजा, तू क्रिकेटर कधी होणार ? ' असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांच्या लेखातून त्याला विचारला. जडेजाचं वागणं जातीय आहे. तो स्थानिक गुंड मुलगा आहे का ? हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांच्यावर गैरवर्तनाबद्दल (!!!) बीसीसीआयनं कारवाई केली होती, याची आठवण करुन देत जडेजाच्या अशा व्हिडिओचे कोणत्याही प्रकारे समर्थन होत नाही, असं त्यांनी या लेखात सांगितले होते.  ( लेखाची लिंक देऊन मी जाहिरात करणार नाही. गरजवंतांनी शोध घ्यावा )

खेळाडूंनी सतत 'पोलिटिकली करेक्ट' राहण्याची भाषा करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर जागतिक खेळाडू कसं वर्तन करतात याची माहिती नसल्याचे/ त्यांचा निकष जडेजाला न लावण्याचे हे उदाहरण आहे. बॉक्सर मोहम्मद अली जाहीरपणे राजकीय मतं सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असत. त्यांची धार्मिक ओळख ठामपणे सांगत. अनेक क्रिकेटर्सनी इंग्लंडच्या राणीकडून वेगवेगळ्या संरजामी पदव्या आनंदाने घेतल्या आहेत. त्या अभिमानाने मिरवल्या आहेत.हशीम अमलाने धार्मिक कारण देत मद्याच्या जाहिरातीचा लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला. या खेळाडूंच्या स्वातंत्र्याचा ते आदर करतात. त्याचे त्यांना कौतूक वाटते मग जडेजाच्या स्वातंत्र्यावर त्यांचा थयथयाट का होतो ?

रवींद्र जडेजा गेली १२ वर्ष व्यवसायिक पातळीवरचं सर्वोच्च क्रिकेट खेळतोय. कॅप्टन विराट कोहलीच्या बरोबरच त्याची कारकीर्द सुरू झाली. विराट झपाट्याने मोठा होत आज महान खेळाडू बनलाय. रवींद्र जडेजानं प्रत्येक पातळीवर संघर्ष करत स्वत:ला सिद्ध केलंय. टीममधील उपयुक्तता वेळोवेळी जगाला दाखवून दिलीय. आज तो त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फिल्डर आहे. टेस्ट टीममध्ये अश्विनच्या आधी त्याचा विचार केला जातो. बॅटिंगमधील त्याची सरासरी वाढलीय.  तो काही वर्षांनी निवृत्त होईल. तेंव्हा क्रिकेट फॅन्स त्याचे नेहमी ' Bits & pieces' क्रिकेटर म्हणून नाही तर टीमसाठी सतत कमिटेड असलेला 'ऑलराऊंडर' म्हणून स्मरण करतील.  रवींद्र जडेजा या 'योद्धा क्रिकेटर'चा हाच सर्वोच्च सन्मान असेल.
 

Thursday, May 7, 2020

दारूबंदी हवीच कारण....


If I was appointed dictator for one hour for all India, the first thing I would do would be to close without compensation all the liquor shops, and compel factory owners to produce humane conditions rooms where these workmen would get innocent drinks and equally innocent amusements.   ( M.K. Gandhi , Young India ( 25-6-31) 


संपूर्ण देश ज्यांचा राष्ट्रपिता म्हणून गौरव करतो. ज्यांच्या मार्गावर चालण्याच्या शपथा आजही अनेक जण वर्षातील किमान दोन दिवस तरी नक्की घेतात त्या महात्मा गांधी यांचे हे दारूबद्दलचे विचार आहेत. गांधीजींच्या स्वतंत्र भारताबद्दलच्या अनेक चांगल्या संकल्पना त्यांच्या अनुयायांनी धुळीस मिळवल्या.दारूबंदीचा आग्रह ही त्यापैकी एक चांगली संकल्पना.

चायनीज व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता तातडीने दारु पिणे आवश्यक आहे, अन्यथा जेल होईल या काळजीनं अनेक मद्यप्रेमी रस्त्यावर उतरले.

दारू पिल्यानंतर नशा चढते आणि माणूस झिंगतो हे माहिती होतं/पाहिलं होतं. पण या मद्यप्रेमींना सरकारच्या  निर्णयानंतरच नशा चढली. त्याच नशेत झिंगत त्यांनी थेट दारुच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. देशात चायनीज व्हायरस पसरलाय. त्यामुळे देशभर लॉकडाऊन सुरुय.  हा व्हायरस संसर्गामुळे पसरतो. दारू दुकानासमोर मोठ्या श्रद्धेनं रांगेत उभ्या असलेल्या या 'प्या' रे मंडळींपैकी एकाला जरी या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर रांगेतील अनेकांना तो होऊ शकतो. चायनीज व्हायरस हा कसा गुणाकार करतो....त्याबद्दलचे  व्हॉट्सअपवर व्हायरल झालेले अनेक मेसेज सर्वांनीच वाचले आहेत. मोठ्या तत्परतेने इतरत्र फॉरवर्ड केलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हायरसच्या गुणाकाराचा उल्लेख त्यांच्या संवादातून  केला आहे.

देशात लॉकडाऊन का सुरू आहे ? तिन्ही त्रिकाळ कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे ? हे सतत सर्व माध्यमातून सांगितलं जात असूनही, त्याची कसलीही आठवण या मंडळींना नव्हती. दारू मिळणार या कल्पनेनंच ती पिण्यापूर्वीच शुद्ध गमावत त्यांनी रस्त्यांवर गर्दी केली. या गर्दीमुळे देशातील चायनीज व्हायरसचा मुक्काम किती लांबणार आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

या 'प्या' रे मंडळींचा सतत एक दावा असतो की, ' दारूमुळे राज्याला महसूल मिळतो. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये हा महसूल राज्याला अत्यंत आवश्यक आहे...' एखाद्या अर्थव्यवस्थेचा आधार हा दारू विक्री असेल तर ती अर्थव्यवस्था किती ठिसूळ आहे हे वेगळं सांगायला नको. राज्य आणि देशाने याचा गांभिर्याने विचार करायला हवा.

चायनीज व्हायरसग्रस्त अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्रीन झोनच्या भागातील रस्ते, पडक्या शाळा, पाण्याच्या टाक्या किंवा अन्य पायाभूत सुविधा उभारणीसाठी मजुरांना कामाला लावायला हवं. यामुळे सध्या घरात बसून राहिलेल्या मजुरांना रोजगार मिळेल. हातावर पोट असलेल्या मोठ्या वर्गाची चिंता मिटेल. मजुरांना त्यांच्या गृह राज्यात कसे पाठवायचे ? हा प्रश्न निर्माण होणार नाही. दारू दुकानं उघडण्यासाठी लॉबिंग करणारे आणि त्याचं समर्थन करत चढ्या भावात बाटल्या खरेदी करून घरात बार उघडणाऱ्या प्रत्येक करदात्या मंडळींनी दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरला तरी अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. ऐन लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची ढाल पुढे करत दारूची दुकाने उघडणे हा 'रोगापेक्षा इलाज भयंकर' प्रकार आहे.

 सध्या 'प्या' रे गटातल्या एका गृहस्थाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो गृहस्थ अगदी आनंदाने वेडापिसा झालाय. ' मी किती बाटल्या घेतल्या, त्यापैकी आता किती पिणार, मला किती जाम भारी वाटतंय, मी आता कसं समाधानाने झोपणार'  याचं तो अगदी 'हाय जोश' मध्ये वर्णन करतोय. व्यसनी मंडळींचं वर्णन करण्यासाठी तळीराम  हा शब्द आता चांगलाच प्रचलित झालाय.  तुम्हाला त्यांना दारुडे किंवा बेवडे हे अस्सल मराठी शब्द वापरणे बरं वाटत नाही हे एकवेळ ठीक. पण ज्या शब्दात राम आहे असा शब्द तुम्ही या व्यसनी मंडळींना कसा लावू शकता ? श्रीराम हे काय दारु पित होते का ? मग या व्यसनी लोकांचा उल्लेख करताना 'राम' ही जोड कशाला हवी ?

'अमेरिकन / युरोपीयन लोकं दारू पितात. अमुक देशाची ही दारू आहे. तमुक देशाची ही दारू आहे. दारू पिणे ही तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. भारतातच संस्कृतीरक्षकांना दारूचे वावडे आहे' असा प्रचार काही मंडळींकडून केला जातो. वास्ताविक अमेरिकन / युरोपीयन देशांकडून घेण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या देशातील मंडळींमध्ये फिटनेस , खेळाची आवड आहे. अगदी लहानवयापासून ही आवड जोपासली जाते. त्यासाठी वेळ दिला जातो. त्यावर मेहनत घेतली जाते.त्यामधून ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची मोठी साखळी तयार होते. इतिहास असो वा शिल्पकला आपल्या देशातील सर्व संस्कृती उत्तम पद्धतीने जतन करण्याची त्यांना सवय आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, नवे-नवे शोध लावण्याच्या बाबतीत ही मंडळी सदैव आघाडीवर असतात. सार्वजनिक स्वच्छतेची सवय तर या मंडळींमध्ये जन्मजात म्हणावी इतकी सहज असते. या देशांकडून इतक्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असताना त्यांची फक्त दारू पिण्याचीच सवय आपल्याकडे आणण्याचा अट्टहास कशाला ?

'त्याचा पैसा आहे, तो वाट्टेल ते खरेदी करेल' हे लॉजिक असेल तर अंमली पदार्थांची खरेदी सरकारने कायदेशीर करावी. लोकं आपल्या पैशाने शहरातल्या ड्रग्ज पार्कमध्ये जावून आवडीचे अंमली पदार्थ खरेदी करतील.  गांजाची शेती करायला परवानगी देत त्यावर कर लावावा. त्यामुळे शेतकरी श्रीमंत होतील आणि सरकारलाही कर मिळेल. आणखी एक उपाय सांगितला जातो तो म्हणजे दारूवरील कर वाढवा ती आणखी महाग करा. आता दारूवर कर वाढवला की हातभट्टीवरील अवैध दारूच्या निर्मितीचा धंदा वाढणार.  गरीब मंडळी तिकडं मोठ्या प्रमाणात वळणार या प्रकारची दारू पिल्याने जीव गेल्याच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर वाढला की काळाबाजार आणखी वाढणार. करवाढ हा जर सर्व गोष्टींवरील उपाय असेल तर प्रत्येक वस्तूवर ११० टक्के कर लावला की सरकारचे काम संपेल. आपल्याला या प्रकारच्या समाजवादी अर्थव्यवस्थेत देशाला पुन्हा ढकलायचे आहे का ?

महात्मा गांधींपासून अभय बंगांपर्यंत अनेक मंडळींनी दारूबंदीचा सातत्याने आग्रह केला आहे. दारू पिणे इतकेच प्रतिष्ठेचे असेल तर त्यांनी याबाबत मार्गदर्शन करणारे क्लासेस काढले असते. दारू ही कोणत्याही प्रकारातील असो ती शरिराला अपायकारच असते. हे WHO पासून ते आपल्या घरातील बायको, आई, वडिल किंवा अन्य वडिलधा-या मंडळींपर्यंत अनेक जण सतत सांगत असतात. 'दारू पिण्याला सेफ लिमिट असते' हा देखील एक जागतिक प्रोपगंडा आहे. जितकी अधिक दारू प्याल तेवढे दुष्परिणाम अधिक होतात. 'व्हायरस' हा श्रीमंत - गरीब असा भेद करत नाही, हे आपण सध्या वारंवार ऐकतो तसंच दारू देखील श्रीमंत- गरीब असा कोणताही भेद करत नाही. गंमत म्हणून, सामाजिक वातावरण म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सुरू केलेली दारू अगदी सहज व्यसन बनू शकते.

व्यसनाचा अंमल असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालाय. व्यसनी माणसाचे शरीर खंगत  जाते. अनेकदा नंतर पश्चाताप करुन किंवा औषधोपचारावर अफाट खर्च केल्यानंतरही फरक पडत नाही. दारूच्या नशेत होणारा हिंसाचार ही देखील मोठी समस्या आहे. या हिंसाचाराच्या छायेत अनेक महिला आणि त्यांची मुलं जगत असतात. त्यांचे संसार उद्धवस्त होतात. अनेकांची कमाई, बचत सर्व काही दारूच्या पुरात वाहून जाते. दारूबंदीच्या मागणीसाठी महिला वर्ग सातत्याने आग्रही  असतो याचे हे मुख्य कारण आहे. समाजातल्या एका मोठ्या वर्गाच्या मागणीकडे आपण फक्त महसूल प्राप्तीच्या हव्यासापोटी दुर्लक्ष किती दिवस करणार ?

पत्रकार पराग फाटक यांनी एक छान मुद्दा त्यांच्या फेसबुक वॉलवर मांडलाय. पराग लिहितात, 'ऑफिसात दारू पिऊन येऊ शकत नाही, दारू पिऊन गाडी चालवू शकत नाही, दारू पिऊन देवळात जाता येत नाही. आणखी अनेक गोष्टी दारू पिऊन करता येत नाहीत. ज्या अर्थी एवढ्या ठिकाणी दारूबंदी आहे त्याअर्थी काहीतरी लॉजिकल कारण असणार. जिथे जबाबदारीचं काम आहे तिथे दारू पिऊन यायला, काम करायला परवानगी नाही.'

  आपल्याला जबाबदार, चांगल्या सवयी असलेला, निरोगी समाज हवा आहे की व्यसनी, खंगलेला, स्वनियंत्रण गमावलेला समाज हवा आहे ? याचा सरकार आणि समाज या दोघांनीही विचार करणे आवश्यक आहे. दारू न पिणारे सर्वच जबाबदार, चांगल्या सवयी असलेले आणि निरोगी असतात असा माझा अजिबात भाबडा समज नाही. पण दारूबंदी करून सर्वांनाच चुकण्याची एक खूप मोठी सवय कायमची निकालात काढता येऊ शकते.

 दारूबंदी न करता प्रबोधनातून समाज व्यसनमुक्त झाला असता तर आज व्यसनमुक्ती केंद्र कायमची बंद झाली असती. 'संसाराला उद्धवस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू' ही १९९० च्या दशकातील टीव्हीवरील अगदी परिणामकारक जाहिरात होती. ती परिणामकारक होती म्हणूनच आजही अनेकांच्या लक्षात आहे. या प्रकराच्या अनेक जाहिरांतीवर सरकारने आणि स्वयंसेवी संस्थांनी बराच खर्च केलाय. तरीही स्त्री आणि पुरुषांमध्ये भारतात दारू पिण्याचं प्रमाण हे सतत वाढत आहे, असे सर्व अहवाल सांगतात.

स्वनियंत्रण, वेगवेगळ्या प्रचारात्मक साहित्यामधून प्रबोधन हा देशामध्ये उपाय असता तर चायनीज व्हायरस लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर २४ तास पोलीस तैनात करावे लागले नसते. दारूची नशा रोखण्यासाठी देखील हेच लागू आहे. दारूच्या दुष्परिणामातून देशातील खूप मोठ्या पिढीचा बचाव करायचा असेल तर सार्वत्रिक दारूबंदी हाच उपाय आहे. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...