Wednesday, April 15, 2020

सीतेवरील अन्याय आणि शंबुक वध - रामायणातील खोट्या गोष्टीचायनीज व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात टीव्हीवर सर्वात जास्त बघितला जाणारा कार्यक्रम म्हणजे रामायण. हजारो किलोमीटर लांब आणि वेगवेगळ्या भाषा, जाती, चाली-रिती यांचा समावेश असलेल्या भारत देशाला एकत्र बांधून ठेवणारे तीन अक्षरी नाव म्हणजे श्रीराम. श्रीरामाच्या आयुष्यावर आधारित रामायण ही मालिका तीन दशकांपूर्वी जितकी लोकप्रिय होती तितकीच आजही आहे हे आता सिद्ध झाले आहे.

मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या आयुष्यावर प्रश्न विचारणे ही भारतामध्ये पुरोगामी होण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे. या पुरोगामी मंडळींकडून श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वाधिक वादग्रस्त भासवला जाणारा भाग म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा, सीतेला वनवासाला पाठवणे आणि शंबुक या शूद्राचा श्रीरामाने शिरच्छेद करणे हा आहे. या घटनांमुळे श्रीराम हे असुरक्षित, स्त्रीविरोधी आणि जातीयवादी आहेत असा कांगावा या मंडळींकडून सतत केला जातो. दुर्दैवाने देशातल्या अनेक ग्रंथांमध्ये आणि रामायणातील उत्तरकांडात याबाबत उल्लेख असल्याने हे प्रसंग श्रीरामाच्या आयुष्यात घडले असा अनेकांचा समज आहे. पण हे प्रसंग प्रत्यक्ष रामायणात घडलेच नाहीत. हे पुराव्यासह मांडण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.

सीतेची अग्निपरीक्षा

याबबात सांगितली जाणारी कथा थोडक्यात : रावण वधानंतर श्रीरामाने सीतेच्या पावित्र्यावर संशय घेत त्यांना परत घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी सीतेने आपल्या चारित्र्याची खात्री श्रीरामाला व्हावी यासाठी अग्निपरीक्षा दिली. ( सीता यांनी अग्नीत उडी घेतली) त्यावेळी अग्नीदेवतेने सीतेला सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर सर्व देवांनी एकत्रपणे रामाला सीता यांचे पावित्र्य पटवून दिले आणि रामाने सीतेचा स्विकार केला. काही जणांच्या मते रावणाने खऱ्या सीतेला पळवले नव्हतेच. रावणाने पळवलेल्या सीता ह्या ख-या सीतेची सावली होत्या. खऱ्या सीता ह्या अग्नीदेवतेकडे होत्या. त्यामुळे अग्नीपरीक्षेनंतर सीतेची सावली अग्नीमध्ये जाताच खऱ्या सीता प्रकट झाल्या.

रामायणात स्त्रियांना बरोबरीचे स्थान होते. श्रीरामाच्या आई कौसल्या या राज्यकारभारात भाग घेत असत. कैकेयी यांनी तर दशरथ राजाला युद्धात मदत केली. त्या दशरथ राजाबरोबर युद्धात सहभागी होत्या. श्रीरामाच्या पत्नी सीता यांनीही त्यांचा अभ्यास पूर्ण केला होता. त्यांनी स्वयंवरातून जोडीदार निवडला. त्यांचे लग्न जनक राजाने ठरवले नव्हते. संपूर्ण रामायणात असलेले हे समानतेचे सूत्र सीतेच्या अग्निपरीक्षेच्यावेळी अचानक कसे तुटले? याचा विचार करायला हवा.

श्रीराम स्वत:ही धर्म आचरण करण्याचे मुर्तीमंत प्रतिक मानले जातात. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत. राजा सुग्रीवाच्या पत्नीला त्यांच्या मोठ्या भावाने वालीने कैद केले होते. बलिला मारल्यानंतर सुग्रिवाच्या पत्नीची कैदेतून सुटका झाली. त्यावेळी श्रीरामाने सुग्रीवाला पत्नीचा स्विकार करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे श्रीरामाने सीता यांच्या अग्निपरीक्षेचा आग्रह धरणे ही त्यांच्या संपूर्ण स्वभावधर्माच्या विरुद्ध गोष्ट वाटते.

कोणत्याही स्त्रीच्या पावित्र्याचा मापदंड हा अग्निपरीक्षा म्हणजेच तिचे शरीर हे अग्नीरोधक असणे हा कसा असू शकतो? असं असेल तर सर्व पवित्र स्त्रीने अग्निरोधक असायला हवं पण ते शक्य नाही. अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना मान्यता दिली तर भविष्यात कर्मकांड बळावेल आणि समाजातील स्त्रीयांचे स्थान दुर्बल होईल हे श्रीरामाला नक्कीच माहिती असणार त्यामुळे ते अशा प्रकारच्या प्रथांना परवानगी देतील हे पटत नाही.

रामायणाची गती ही प्रवाही आहे. ही प्रवाही गती रावण वधानंतर श्रीराम – सीतेची जेंव्हा पहिल्यांदा भेट होते त्यावेळी अचानक गडबडते. युद्धकांडातील सर्ग ११४ मध्ये श्रीरामाने सीतेला परत भेटण्याचे वर्णन हे अगदी भावनाविवश होऊन केले आहे. पण त्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात अचानक श्रीराम सीतेला भरत, लक्ष्मण, सुग्रीव किंवा विभीषणाजवळ राहयला सांगतात. त्यानंतर सर्ग ११६ मध्ये सीता लक्ष्मणांना अग्निपरीक्षेची तयारी करायला सांगतात. सीता अग्नीत प्रवेश करतात. सर्ग ११७ मध्ये अग्नीदेवतेसह सीता आणि स्वर्गातून सर्व देव प्रकट होतात. त्यानंतर सर्ग ११८ मध्ये राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात.

आता सर्ग ११४ मधील रामाचे सीतेसाठी भावनाविवश होणे... या श्लोकानंतर पुढचे  श्लोक काढले आणि सर्ग ११८ मधील आणि त्यापुढे  राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात, हा श्लोक ठेवला तर संगती लागते. या दोन श्लोकांमधील सर्व श्लोक हे नंतरच्या काळात रामायणात घुसडण्यात आले आहेत याची खात्री पटते.  


उत्तरकांड रामायणाचा भाग नाही

श्रीरामाने सीतेचा त्याग करणे आणि शंबुकाचा शिरच्छेद करणे हे दोन प्रसंग श्रीराम राजा बनल्यानंतरचे आहेत. रामायणातील उत्तरकांडात त्याचे वर्णन केले आहे. उत्तरकांड हे रामायणातले सातवे आणि शेवटचे प्रकरण. पण हे प्रकरण मुळ रामायणात महर्षी वाल्मिकी यांनी लिहलेच नव्हते. युद्धकांड या सहाव्या प्रकरणानंतर रामायण समाप्त झाले. उत्तरकांड नंतरच्या काळात लिहिले गेले असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. यासाठी या अभ्यासकांनी अनेक पुरावे देखील दिले आहेत. हे पुरावे कोणते ते पाहूया

पहिला पुरावा – हिंदू धर्माच्या कोणतेही प्रसिद्ध ग्रंथ, स्त्रोत्र किंवा आरतीमध्ये त्याच्या शेवटी हा ग्रंथ वाचून, स्त्रोत्र किंवा आरती म्हंटल्यानंतर काय फायदा होईल याचे हमखास वर्णन असते. ज्याला फलश्रृती असे म्हणतात. रामायणाची फलश्रृती ही महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडाच्या शेवटी सर्ग १२८ मध्येच लिहिली होती. त्यामुळे हे सिद्ध होते युद्धकांड हेच रामायणातले शेवटचे प्रकरण आहे.

दुसरा पुरावा – रावणाच्या दरबारात कैदेत असलेल्या हनुमाला ठार मारण्याचे आदेश रावण देतो. त्यावेळी विभीषण रावणाला सांगतो की हनुमान हा श्रीरामाचा दूत आहे, दूताला मारल्याची घटना आजवर कधीही झालेली नाही. शास्त्राला मान्य नाही. त्यावेळी रावण विभीषणाचे मत मान्य करतो आणि हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. पण उत्तरकांडात अचानक रावणाने कुबेराच्या दुताला ठार मारल्याचा उल्लेख आहे. या दोन परस्पर विरोधी घटना आहेत. महर्षी वाल्मिकी ही एकच व्यक्ती या घटना लिहू शकत नाही.

तिसरा पुरावा –  महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडात स्पष्ट लिहलंय की रामराज्यात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही. कोणत्याही वडिलांवर मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ कधीही आली नाही. पण उत्तरकांडात मात्र अचानक एक ब्राह्मण आपल्या मुलाचे प्रेत घेऊन श्रीरामाच्या दरबारात येतो आणि सांगतो, शंबुकाने माझ्या मुलाचा वध केला त्यानंतर ब्राह्मणाच्या विलापामुळे संतापलेले श्रीराम मागचा-पुढचा विचार न करता शंबुकाचा वध करतात. या दोन्हीही परस्परविरोधी घटना आहेत. ज्यामुळे सिद्ध होतं की उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नसून त्यानंतर हजारो वर्षानंतर लिहिले गेले आहे.

चौथा पुरावा – रामायण आणि महाभारत यांच्यात सुमारे तीन हजार वर्षांचा कालावधी आहे असे मानले जाते. महाभरातामधील वनपर्वात मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला रामायण समजावून सांगतात, याचे वर्णन आहे. यामध्ये देखील मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला युद्धकांडापर्यंत रामायण सांगातात. याचे कारण महाभारताच्या काळातही युद्धकांड हेच रामायणातील शेवटचे प्रकरण होते.

पाचवा पुरावा – रामायणातले सर्वात जुने हस्तलिखीत काही वर्षांपूर्वी सापडले. हे हस्तलिखित सहाव्या शतकातील आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर हजारो वर्षांनंतरचे हे हस्तलिखित आहे. या हस्तलिखितामध्येही उत्तरकांडचा उल्लेख नाही. युद्धकांडनंतरच हे रामायण समाप्त होते.


नाविकाचा मान राखणारे, जटायूचा वडिल मानून त्यांचा अंत्यसंस्कार करणारे, सुग्रीवावरील अन्याय दूर करणारे, शबरीची उष्टी बोरं आवडीनं खाणारे श्रीराम हे उत्तरकांडात अचानक एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरुन मागचा पुढचा विचार न करता शंबुकाचा वध कसा करु शकतात? संपूर्ण रामायणात स्त्रीयांना सन्मान द्या अशी शिकवण आहे. त्यानंतर अचानक उत्तरकांडात एका धोब्याच्या सांगण्यावरुन श्रीराम सीतेवर अविश्वास कसा दाखवू शकतातनिर्वासित अहिल्याला आई म्हणणारे श्रीराम, वनवासात पाठवलेल्या कैकेयीबद्दल कोणतीही कटूता न ठेवणारे श्रीराम आपल्या पत्नीला दुय्यम वागणूक कशी देऊ शकतात ? पत्नीचा त्याग कसे करु शकतातयाचा अर्थ स्पष्ट आहे, उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नाही.

ज्या लोकांची भारतीय संस्कृतीवर श्रद्धा नाही त्यांनीच सीतेची अग्निपरीक्षा, सीता त्याग आणि शंबुक वध या गोष्टींचा रामायणात समावेश केला आहे. श्रीराम हे देखील अपयशी होते असा प्रचार करण्यासाठी या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. 

आपला देश हा अफवांचा देश आहे. या देशात एकाच गोष्टीचे, बातमीचे अनेक व्हर्जन सतत प्रचलित असतात. सध्याच्या व्हॉट्सप युगात तर याचा सर्वांनाच अनुभव आहे. रामायणातले उत्तरकांड आणि या लेखात उल्लेख केलेल्या तीन गोष्टी देखील अशाच प्रकारचे व्हर्जन आहे. अनेक सामान्य भक्त हे आजवर रामायणातील अफवांना बळी पडले आहेत. 

हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला मला शेवटी कळकळीनं विचारावं वाटतं, 'तुमचा भाऊ, नवरा किंवा मुलाच्या चारित्र्यावर विश्वास आहे ना ? मग आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श पूत्र असलेल्या श्रीरामाच्या चरित्रावर तुम्ही कसा अविश्वास दाखवू शकता? तुम्ही खरोखरच मनुष्य असाल तर सीतेची अग्निपरीक्षा, सीतेचा त्याग आणि शंबुकाचा शिरच्छेद या घटना रामायणात घडल्या आहेत, ही समजूत काढून टाका. भ्रामक कथा, दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका आपल्या -हदयातील श्रीरामाला जागृत करा '.

जय श्रीराम. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...