Saturday, January 19, 2019

पांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवेभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ज्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली आहे त्या डायना एल्डुजी यांचे हे विचार आहेत.  'कॉफी विथ करण' या  उडाणटप्पू कार्यक्रमात सहभागी झालेल्या हार्दिक पांड्या- के.एल. राहुल या दोन खेळाडूंवर कारवाई करताना  डायनाबाईंना 80 वर्षांपूर्वीचा हा इतिहास आठवला आहे. सध्या सोशल मीडियावर #10YearsChallenge हा प्रकार लोकप्रिय झालाय. आजच्या या ट्रेंडिंग पिढीला डायनाबाईंनी दिलेले हे #80YearsChallenge आहे. 

करण जोहरच्या ज्या कार्यक्रमामुळे हे दोघेही अडचणीत आले आहेत, त्या कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे हे सर्वांना माहिती आहे. या कार्यक्रमात विचारले जाणारे प्रश्न आणि त्याला मिळणारी उत्तरं याला देखील आता अनेक जण सरावली आहेत. तरीही त्या कार्यक्रमात हार्दिक आणि राहुल यांनी त्यातही विशेषत: हार्दिक पांड्याने जी काही उत्तरं दिली त्यावरून सोशल मीडियातील काही जणांना एकदमच सात्विकतेचं भरतं आलं. त्यांनी आपल्या टोळीसोबत पांड्या-राहुलचं 'ऑनलाइन लिंचिंग' सुरू केलं. 

हार्दिक पांड्याचे या कार्यक्रमातील उत्तरं ही उद्धट होती. पण या मंडळींनी त्याला एकदम तिरस्करणीय व्यक्तींच्या यादीत नेऊन ठेवले. आता करण जोहर कॉफी सोबत 'संकष्टीला तुम्ही काय खाता?' असे प्रश्न काही विचारत नाही. त्यामुळे हा कसा कार्यक्रम आहेयामध्ये कोणत्या भागाला जास्त प्रसिद्धी दिली जाते? त्याच्या उत्तरामुळे काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव या दोन्ही खेळाडूंनी आणि त्यांच्या पीआर टीमने ठेवायला हवी होती. अर्थात त्यांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही. तसंच या दोन करारबद्ध खेळाडूंना अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बीसीसीआयच्या कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली याचे उत्तर अजूनपर्यंत तरी समोर आलेले नाही. 

विनोद राय आणि डायना एल्डुजी यांची सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे कारभारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या या मंडळींच्या कार्यकालाची कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही. त्यामुळे ही मंडळीही अगदी निवांतपणे बीसीसीआयची सत्ता उपभोगत आहेत. एकमेकांशी ईमेल-ईमेल खेळत राहणे आणि पाठवलेला प्रत्येक ईमेल माध्यमांच्या हातामध्ये जाईल याची व्यवस्था करणे हे या मंडळींच्या कार्यकाळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांनी या प्रकरणात केलेले ईमेलही असेच उघड झाले आहेत. या मेलमध्येही प्रत्यक्ष कोणतीही जबाबदारी न घेता ईमेल देवाण-घेवाणीचे व्रत ही मंडळी या प्रकरणातही पाळतायत.

वास्ताविक या व्हिडिओवर ऑनलाइन आकांडतांडव करणाऱ्या मंडळींपैकी एकानेही अधिकृत तक्रार केलेली नाही. तरीही बीसीसीआयचे एक कारभारी असलेले विनोद राय यांनी या खेळाडूंवर दोन मॅच बंदीची शिफारस केली. खरं तर अशी शिफारस करण्यापूर्वी आणि हार्दिक पांड्याचा माफीनामा फेटाळताना विनोद राय यांनी स्वत: तो व्हिडिओ एकदा पाहणे किमान अपेक्षित आहे. पण आपण तो व्हिडिओ पाहिलेला नाही. याबाबत आपण फक्त माध्यमामध्ये आलेल्या बातम्या वाचल्या आहेत असे राय यांनी यामधील एका ईमेलमध्ये मान्य केले आहे.

प्रत्यक्ष व्हिडिओ न पाहता फक्त बातम्या वाचून या खेळाडूंवर दोन मॅच बंदी घालावी हा विनोद राय यांचा प्रस्तावच बरा होता असे वाटण्याची वेळ दुसऱ्या कारभारी डायना एल्डुजींमुळे आली आहे. त्यांना हे प्रकरण इतक्या लवकर संपवायचे नाही. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची शिफारस केली. या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. हे दोन्ही खेळाडू अगदी वर्ल्ड कप पूर्वीच्या वन-डे सीरिजमधून बाहेर गेले. ते टीममध्ये कधी परत येणार हे कुणालाही माहिती नाही. राय आणि एल्डुजी यांच्यातील या रस्सीखेचामुळे पांड्या-राहुल यांचे करियर मात्र चांगलेच ताणले गेले आहे.

स्वस्त डेटामुळे कायम ऑनलाइन असलेली मंडळी सोशल मीडियावर काय बडबडतात, कसली मागणी करतात किंवा कुणाला 'ट्रोल' करतात याला काहीही मर्यादा नाही. ही मंडळी सतत कशावर तरी चिडलेली असतात, त्यांना आपला राग शमवण्यासाठी दररोज काहीतरी टार्गेट हवं असतं. अशा या ऑनलाइन झुंडीच्या मागणीला किती महत्त्व द्यायचे हे उमजायला हवे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही मागील वर्षी अशीच चूक केली होती.

बॉल टेम्परिंग प्रकरणात आयसीसीच्या नियमानुसार स्टिव्ह स्मिथवर एक टेस्टची बंदी आणि बॅनक्राफ्टवर काही डिमेरीट पॉइंट आणि मानधनामध्ये कपात इतकीच कारवाई होणे योग्य होते. मात्र त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अशाच झुंडीच्या मागणीला बळी पडले. त्यांनी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एक वर्षांची आणि बॅवक्राफ्टवर नऊ महिन्याची बंदी घातली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम गेली वर्षभर या प्रकरणाची झळ सहन करतंय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हाच चुकीचा पॅटर्न आता बीसीसीआयने पुढे नेला आहे. या बोर्डाचा कारभार पाहून आपण ऑस्ट्रेलिया किंवा भारतामध्ये जन्मलो नाही हे बरे झाले असेच बेन स्टोक्सला वाटले असेल. स्टोक्सचं सोडा विराट कोहलीचे मैदानावरचे बोलणे कसे असते हे सर्वांनाच माहिती आहे. आता उद्या विराटच्या बोलण्यावरून भावना दुखावतात अशी आरडाओरड - रडारड सुरू झाली तर विराटलाही पांड्या - राहुलप्रमाणे #80YearsChallenge मंडळी अनिश्चित काळासाठी निलंबित करणार का? हा मला पडलेला प्रश्न आहे.  

के.एल. राहुलचा फॉर्म सध्या खराब आहे. त्याने आपला खेळ सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळायला हवे होते. याच आठवड्यात बंगळुरूत कर्नाटक-राजस्थान यांच्यात रणजी स्पर्धेतला उपांत्यपूर्व सामना झाला. राहुलला हा सामना या बंदीमुळे खेळता आला नाही. 

हार्दिक तर या प्रकरणामुळे 'घरकोंबडा' झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मुंबईतील एका जिमखान्याने हार्दिकचे सदस्यत्व रद्द केले.  देशांतर एकीकडे मॅच फिक्सर खासदार होतो. त्याला देशातील प्रतिष्ठित मैदानावर सन्मानाने ओपनिंग बेल वाजवण्यासाठी बोलवले जाते. आणि दुसरिकडे हे असले 'ढोंगी' निर्णय घेतले जातात. 'मंकी गेट' प्रकरण 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने ज्या पद्धतीने हाताळले त्याचा फटका सायमंड्सच्या करियरवर झाला. क्रिकेट बोर्ड आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाही या निराशेतून तो बाहेर आलाच नाही. यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. या प्रकरणानंतर सायमंड्सचा खेळ पुन्हा कधीच बहरला नाही. बीसीसीआयही हार्दिक पांड्याचा सायमंड्स करू पाहतंय. 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन वेगाने धावा जमवणे आणि पाचव्या गोलंदाजाचा प्रश्न सोडवण्यात मदत करणे ही दोन्ही कामे तो उत्तम प्रकारे करू शकतो. मात्र पांड्या सध्या अनिश्चित काळासाठी टीमच्या बाहेर गेलाय. पांड्या बाहेर असल्याने कुलदीप यादव- यजुवेंद्र चहल ही फिरकी जोडी एका सामन्यात खेळवण्याचा प्रयोग भारतीय संघ व्यवस्थापन करू शकत नाही. वन-डे क्रमवारीत पहिल्या सहामध्ये असणा-या या दोघांपैकी एकाला बीसीसीआयच्या या चौकशी धोरणामुळे वर्ल्ड कपमध्ये टीमच्या बाहेर बसावं लागणार आहे. वन-डेमध्ये रवींद्र जाडेजा हा सातव्या क्रमांकावरचा फलंदाज नाही हे यापूर्वीही सिद्ध झालंय. विजय शंकर अगदीच नवा आहे. महेंद्र सिंह धोनी आणि अंबाती रायडू  वेगाने धावा करू शकत नाहीत. त्यात पांड्याही टीममध्ये नाही. त्यामुळे मधल्या फळीचा भार हा दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांच्यावरच पडणार आहे. (यातही कार्तिक – केदार हे दोघे एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे.)

आयसीसी स्पर्धेतल्या पिचचा पॅटर्न पाहता या वर्ल्ड कपमध्येही बहुतेक सामन्यात 300 धावा होणार अशा परिस्थितीमध्ये अस्थिर मधली फळी आणि गोलंदाजांच्या वापरावर येणाऱ्या मर्यादा या भारतीय टीमसाठी मारक ठरू शकतात.

करण जोहरच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या  जे बोलला ते योग्य नसेल पण बीसीसीआयचे हे हंगामी प्रशासकांनी हे प्रकरण हाताळताना घोडचूक केलीय. याचा फटका आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला बसू शकतो. त्याचबरोबर नव्या पिढीतील नव्या दमाचे प्रश्न सोडवताना प्रशासक हे अशा प्रकारचं #80YearsChallenge देणार असतील तर त्यांचा कारभार किती दिवस सुरू ठेवायचा याचे उत्तरही आता शोधण्याची वेळ आलीय. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...