Thursday, April 19, 2018

कठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई


मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मॅचसाठीची माझी फॅंटसी टीम पाहून माझा मित्र मला म्हणाला, '' ओंकार मी तर तुला क्रिकेटमधील कळतं असे समजत होतो तरी तुझ्या टीममध्ये रोहित शर्मा का नाही?'' मी त्याला सध्याच्या ट्रेंडिंग पद्धतीनुसार उत्तर दिले, '' हिंदू रोहित शर्माच्या ऐवजी ख्रिश्चन ए.बी.डी. व्हिलियर्सची मी टीममध्ये निवड केली कारण मला हिंदू असल्याची लाज वाटते'' माझे हे उत्तर हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला भंपक वाटू शकते.  ते भंपक आहेच. मी एखाद्या संबंध नसलेल्या गोष्टीला ताणून त्याचा कसाही अर्थ ( मला हवा तसा ) लावतोय असाही अनेकांचा समज होईल. होय अगदी असेच आहे. माझ्यामध्ये हे मान्य करण्याचा उमदेपणा तरी शिल्लक आहे. परंतु सध्या कठुआ बलात्काराच्या प्रकरणानंतर या देशातील 'ब्रेक इन इंडिया' ब्रिगेड ज्या पद्धतीने प्रचार करते आहे ते पाहिले तर मी ही रोहित आणि एबीडी या दोन क्रिकेटपटूंची  तुलना करताना घेतलेला धर्माचा आधार  हा एकदम संत, सोज्जवळ प्रकारातील वाटू शकतो.

जगातील कोणत्याही भागात झालेला बलात्कार हा बलात्कारच असतो. याला जाती, धर्म, भाषा याचे कोणतेही लेबल लावता कामा नये. या प्रकरणातील आरोपीला त्याचे लिंग छाटण्यापासून ते मृत्यूदंडपर्यंतच्या सर्व शिक्षा क्रमश: देण्यात याव्यात. त्याने त्याचे मरण अगदी रोज पाहावे, खंगत, खंगत मरावे या मताचा मी आहे. कठुआमधील त्या कोवळ्या जीवाचा चेंदामेंदा करणाऱ्या  आरोपींनाही हीच शिक्षा व्हावी.  यामधील एक आरोपी  पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार अल्पवयीन आहे. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झालाच तर त्यालाही इतर आरोपींसारखीच शिक्षा व्हावी. त्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करावी, याबद्दलही माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

कठुआतील बलात्काराबद्दल संताप हा आहेच. पण या बलात्काराला ज्या पद्धतीने रंग दिला जातोय ते पाहून या रंगरगोटीमध्ये 'ब्रेक इन इंडिया' ब्रिगेडचे ब्रश आहेत, हे सातत्याने समोर येत आहे. यापूर्वी दहशतवाद्यांमध्ये 'चांगले दहशतवादी' आणि 'वाईट दहशतवादी' असा फरक करण्याचा प्रयत्न एका वर्गाकडून सातत्याने होत असल्याचे जगाने पाहिले आहे. आता बलात्कारामध्येही 'चांगला बलात्कार' आणि 'वाईट बलात्कार' असा फरक आपल्या देशात होत आहे.

बलात्काराचा आरोपी हिंदू असेल तर तो वाईट बलात्कार आहे. बलात्काराचा आरोपी हिंदू असेल आणि तो भाजप शासीत राज्यामध्ये झाला तर तो वाईटामधील वाईट बलात्कार. बलात्काराचा आरोपी हिंदू, पीडित मुस्लिम आणि तो भाजपशासीत राज्यात झाला असेल तर मग हाय तोबा!! संपूर्ण जगभर बोंबाबोंब करण्याची 'हीच ती
वेळ, हाच तो क्षण'!. आता याच्या उलट बलात्काराचा आरोपी मुस्लिम असेल तर तो बलात्कार नाहीच... असला तरी त्यामधील आरोपीच्या धर्माकडे दुर्लक्ष करायचे 'बलात्काराला धर्म नसतो' ही टेप सुरु करायची. हा बलात्कार जर भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात झाला असेल तर मग असे काही झाले ह्याचा विचारही करायचा नाही ( चांगल्या दहशतवाद्यांप्रमाणे चांगला बलात्कार तो हाच असावा). बलात्काराच्या आरोपीकडे आपल्या विचारसरणीतून पाहत यामध्ये भेद करण्याची पद्धत या मंडळींनी सुरु केली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस आसामी मुलीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आले. पण तिथे आरोपी मुस्लीम असल्याने या प्रकरणाला तितके महत्त्व देण्यात आले नाही. जम्मूमध्ये मौलवीने मुस्लिम मुलीवर बलात्कार केला. मुस्लीम बहुल राज्यातील दोन मुस्लिमांमधील ही गोष्ट समजण्यात आली. कर्नाटकात अलिकडच्या काळात बलात्काराच्या ज्या घटना घडल्या त्यावरही देशातील या ब्रिगेडी मंळींना हिंदू असल्याची लाज वाटली नाही.

या देशात हिंदूंच्या आयुष्याची किंमत ही या ब्रिगेडसाठी शून्य आहे. उद्या मी मारलो गेलो तर यांना याचे काहीही सोयरसुतक वाटणार नाही. रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये काही मंडळींनी मला जाळले तर 2 रुपयाच्या चहासाठी मला मारण्यात आले असा निष्कर्ष काढून ही मंडळी केस बंद करुन टाकतील. 59 निरपराध हिंदूंना कंपार्टमेंटमध्ये जाळले तेंव्हाही या 59 जणांच्या जीवाची किंमत ही 2 रुपयाच्या चहाचा कप इतकीच होती.

मी दलित असेल आणि मला सवर्ण जातीमधील व्यक्तींनी ठार मारले तरच माझा मृत्यू हा या मंडळींसाठी मोठी घटना असेल. 'गेले! दलित मतंही गेले!!' असे चित्कार काढणारे ट्विट करत माझ्या मृत्यूवर देशातील तमाम  बुद्धीजीवी, निष्पष, स्वतंत्र विचारांची मंडळी तुटून पडतील. ज्याला विकासाची पूर्ण संधी आहे, असा एक दलित युवक काही तत्कालीन कारण आणि संघटनेतील कामात आलेला भ्रमनिरास यामधून आत्महत्या करतो. त्यानंतर विद्यापीठातील त्याचे सहकारी पोलिसांना त्याच्या मृतदेहापर्यंत पोहचू नये यासाठी झटतात. त्यांना हा मृतदेह  जास्तीत जास्त हा विषय तापवला जाईल याचा प्रयत्न करतात हे या साऱ्या देशाने पाहिले आहे.

भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथे बहुसंख्यांच्या मतावर निवडून आलेले सरकार हे अल्पसंख्याकांचे तृष्टीकरण करणारे हवे असते. या देशातील बहुसंख्य गटातील मंडळींना अल्पसंख्याक व्यक्तींना मिळणारी सुविधा पाहून त्या गटात जाण्याची घाई झालेली असते.

2014 नंतर सत्ताधाऱ्यांकडून या वर्गाचे होणारे लाड थांबले. 'गरीब बिचाऱ्या मुख्याध्यपकाचा मुलगा मारला हो' असा टाहो फोडूनही दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणाऱ्या हातांना बंदुका खाली ठेवा असे सांगणारे हे सरकार नाही. त्यामुळेच आता जम्मूमध्ये झालेल्या एका बलात्काराची ढाल पुढे करत ही मंडळी या भागात रोहिंग्यांना वसवण्याचे उद्योग सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत. एका 'गाझावादी' आमदाराने तर कारगील  प्रकरणात वाजपेयी सरकारची नाचक्की झाली होती. कारगीलमधील पाकिस्तानची घुसखोरीची माहिती देणाऱ्या बकरवालांनी देशाचे रक्षण केले. पण वाजपेयी सरकारची नाचक्की केली. हीच बाब भाजप सरकारला डाचत आहे, असा या प्रकरणाचा मी या लेखाच्या सुरुवातीला रोहित आणि एबीडीमधील भेदालाही लाजवणारा लेख लिहला आहे. 

कठुआ प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जम्मूतील मंडळींनी केली. त्यासाठी मोर्चा काढला तर ही मंडळी थेट बलात्काराचे समर्थक ठरवले गेले. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही रात्री 2 वाजता याकूबची फाशी रद्द व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडणारी, त्यासाठी कायद्यातील तरतुदींचा किस मांडणारी मंडळी  काश्मीर खोऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याने तयार केलेली फाईल ही 'मेरा वचनही शासन है' या थाटात घेऊन नाचत आहेत.

या मंडळींनी यापूर्वीच्या सरकारकडून मिळालेल्या भरभक्कम रसदीच्या जोरावर देशातील राजकीय आणि न्याय व्यवस्थेची मोठी विचीत्र अवस्था करुन ठेवली आहे.  अनेक जण अशा प्रकारच्या प्रोपगंडाचा विरोध करु शकत नाहीत कारण त्यांच्या मनात संभ्रम या व्यवस्थेने निर्माण केला आहे. धर्मनिरपेक्षता, सहिष्णूता या साखळ्यांनी या मंडळींचे हात बांधून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना अल्पसंख्याक मंडळींच्या दादागिरीच्या विरोधात हात उचलताच येत नाही.

वेगवेगळ्या जातींच्या टोप्या घालून, जाती सन्मान मोर्चा काढत हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा डाव पद्धतशीरपणे सुरु आहे. 200 वर्षांपूर्वी ब्रिटीशांच्या विरोधात झालेल्या लढाईचा आधार घेत या देशात दंगली पेटवण्याचा उद्योग या वर्षी झाला. या दंगलीचे नक्षली कनेक्शनही अलिकडेच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून समोर आले आहे.

मी हिंदू  आणि भारतीय आहे. या देशाचा मोठा भूगाग याच बोटचेप्या वृत्तीने माझ्या पूर्वजांनी गमावला आहे. तरीही  आसाममध्ये बांगलादेशींचे आणि जम्मू काश्मीरमध्ये रोहिंग्यांचे स्वागत करणारी ब्रिगेड या देशात सक्रीय आहेत. हे मी उघड्या डोळ्याने पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर येणारी पिढी मला कधीही माफ करणार नाही. आज फेसबुक, ट्विटर उघडताच बंगाल आणि केरळमध्ये होत असलेल्या राजकीय हिंसाचारात मृत्यू पावलेल्या मंडळींचे चेहरे डोळ्यासमोर येतात. ही मंडळीही कुणाचे तरी मुलगा, भाऊ, नवरा असतील...कुणाचे काय ते माझे भाऊ आहेत. पण या मंडळींचा आक्रोश या 'ब्रेक इन इंडिया' ब्रिगेडला दिसत नाही. त्यांच्यासाठी ही मंडळी माणूसच नाहीत.

मोदी सरकारला पुढील महिन्यात चार वर्ष पूर्ण होतील. शैक्षणिक भाषेत सांगयाचे तर मोदी सरकारचे आठ सेमिस्टर पू्र्ण होत आहेत. प्रत्येक सेमिस्टरला एक 'हेट थिअरी' मांडून ही मंडळी आता इंजिनिअर झाले आहेत. आता त्यांनी एमबीएची तयारी सुरु केली आहे. कठुआ प्रकरण हे याच एमबीए तयारीचा भाग आहे. याच कठुआ बलात्काराच्या तिरडीवर या मंडळींना पुढील वर्षी सत्तेची मलई खायची आहे.


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...