Monday, May 1, 2017

बाहुबलीचा सारांश


कट्टप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर देणारा सिनेमा म्हणजे बाहुबली-2.  'लार्जर दॅन लाईफ' सेट्स, अॅनिमेशन, व्हीएफएक्स या हॉलिवूडपटात जमून येणाऱ्या गोष्टी राजमौली यांनी रजनीकांत एखाद्या सिनेमात गॉगल उडवतो, तशा सराईत पद्धतीनं पहिल्या भागात दाखवल्या. आजवर अशा प्रकारचं काही भारतीय सिनेमात पाहयची सवय नसणाऱ्या मंडळींनी पहिला भाग उचलून धरला.


    बाहुबली 2 हा सिनेमा हा उत्तरार्ध नसून पूर्वार्ध आहे. या भागात कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर तर दडलंय. पण ही स्टोरी एस.एस. राजामौली यांनी अत्यंत रंजक पद्धतीनं सांगितलीय.  निष्ठा, कपट, हिरोगिरी, पातळयंत्री षडयंत्र, मातृप्रेम, मत्सर ,आपली आवडती स्त्री मिळवण्यासाठी रचलेला कट, आपली आवडत्या स्त्रीचा स्वाभिमान जपण्यासाठी सर्व सुखसोयींवर सोडलेलं पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवाद आणि राज्यघटनेवर सर्वोच्च श्रद्धा या सर्व गोष्टींचं दर्शन बाहुबली 2 मध्ये आपल्याला सतत होतं.

      माहिष्मती साम्राज्य या मध्य भारतातल्या काल्पनिक नगरात घडणाऱ्या कथेवर महाभारताचा प्रभाव आहे. कथेचा नायक अमरेंद्र बाहुबली (प्रभास)  हा युधिष्ठीरासारखा धर्माचं पालन करणारा, भीमासारखा बलवान, अर्जुनासारखा कुशल रणणितीकार आणि लढवय्या, नकूलसारखा सुंदर आणि सहदेवासारखा साधा आहे.

भल्लालदेव ( राणा डुग्गुबट्टूी) हा दुर्योधनासारखा बलवान पण अहंकारी, राज्य मिळवण्याच्या इर्षेनं पेटलेला, आपल्या भावाला मारण्याचं षडयंत्र तो रचतो. तर बिज्जलदेव ( नासर) हा धुतराष्ट्र बनलाय. जो शारिरिक व्यंगामुळे राजा बनू शकत नाही. आपली अपूर्ण इच्छा त्याला मुलाला सिंहासनावर बसवून पूर्ण करायची आहे. यासाठी तो काहीही अगदी आपल्या बायकोचा खून करण्यासही तयार आहे.  तो भल्लालदेवाला शकूनीसारखं आपल्या पातळयंत्री कारस्थानाची साथ देतो. तर कट्टप्पा ( सत्यराज ) हा आपल्या शपथेला बांधलेला, राजघराण्याचा एकनिष्ठ सेवक आहे. राजाज्ञा म्हणून इच्छेविरुद्ध प्राणप्रिय व्यक्तीवर ( अमरेंद्र बाहुबलीवर ) शस्त्र उगारणाऱ्या कट्टप्पाला पाहताच महाभारतामधल्या भिष्म पितामहची आठवण होते.

  पण महाभारत आणि बाहुबलीमधलं हे साम्य इथंच संपतं. त्यानंतर राजामौली यांनी या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेलंय. या सिनेमाला ही वेगळी उंची मिळवून देतात ती म्हणजे या सिमेमातलं स्त्री पात्रं. शिवगामी ( रम्या कृष्णन), देवसेना ( अनुष्का शेट्टी)  अवंतिका ( तमन्ना ) ही या सिनेमातली स्त्रीपात्रं खंबीर रुपात आपल्याला पाहयला मिळतात.

         या सिनेमातली पहिली प्रभावी स्त्री आहे शिवगामी.  नवरा सक्षम नसल्यानं राज्यकारभाराची धुरा तिच्या खांद्यावर पडते. यावेळी ती राज्य नुसतं चालवत नाही, तर 'मेरा वचन ही शासन है' असं सांगत आपल्यातल्या खंबीर सत्ताधीशाचं दर्शन घडवते. लहानग्या बाहुबलीला जवळ घेणारी, त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या प्रेमळ मातेचं रुप पहिल्यांदा शिवगामीमध्ये दिसतं. राजा कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नवऱ्याच्या सर्व खटपटींकडं दुर्लक्ष करत ती योग्य निवाडा करते. बाहुबलीची राजा म्हणून घोषणा करते.

 आपल्या शक्तीची असलेली जाणीव, स्वाभिमान हाच शिवगामीचा अहंकार आहे. याच अहंकारातून आपल्यापेक्षा छोट्या कुंतल राज्याची हेटाळणी करते. या राज्याची राजकन्या देवसेनेचं लग्न तिची भावना जाणून न घेता भल्लादेवाशी निश्चित करते. शिवगामीचा आदेशाला  न पाळणारा अमरेंद्र बाहुबली आणि  अहंकाराला आव्हान देणारी देवसेना यांना एका क्षणात दूर लोटण्याचा शिवगामीचा निर्णय माहिष्मती साम्राज्यात महाभारत घडण्यात निर्णायक ठरतो.


     पहिल्या भागात कमी भूमिका वाटेला आलेल्या देवसेनेच्या पात्राला दुसऱ्या भागात चांगली स्पेस मिळाली आहे. देवसेना या पात्राची ओळख ही अवंतिकासारखीच होते. आयुष्य संकटात आल्यावर एका क्षणात युद्धाला  ती सज्ज होते. आपल्या शत्रूचा खात्मा करते. तिचं हे शौर्य बाहुबली पाहत बसतो. तो तिच्या प्रेमात पडतो. इथवर देवसेना आणि अवंतिकाची स्टोरी सारखी आहे. पण नंतर अवंतिका बाहुबलीची अनुयायी होणं स्विकारते. तिच्या सोबत गाणं गाणं आणि आपल्या नाभीचं दर्शन घडवणं या सारख्या फिल्मी गोष्टीमध्ये अवंतिकाला पहिल्या भागात मर्यादीत करण्यात आलंय. पण दुसऱ्या भागात देवसेना दाखवताना ही  पुनरावृत्ती टाळलीय. बाहुबलीच्या खांद्याला खांदा लावून लढणारी पराक्रमी स्त्री म्हणूनच देवसेना ठसठशीतपणे समोर येते. त्यामुळे साहजिकच कॅमेरा देवसेनेच्या नाभीवर फोकस करत नाही.


        अमरेंद्र बाहुबलीच्या पराक्रामाची तिला बरोबरी करता येत नाही. पण त्यामुळे देवसेना त्यापुढे दबून जात नाही. शिवगामी लग्नाचा प्रस्ताव पाठवते त्यावेळी तिचा स्वाभिमान जागृत होतो. एका क्षणात ती आपल्या पक्षा सर्वार्थानं बलाढ्य अशा राजघराण्याचा प्रस्ताव फेटाळून लावते. "ज्या मुलाबद्दल त्याच्या संपत्तीशिवाय मला काहीही माहिती नाही, अशा मुलाशी मी लग्न का करु ?''  असा थेट प्रश्न देवसेना विचारते.

      यानंतर माहिष्मतीच्या राजदरबारात घडणारा प्रसंग खास आहे.  देवसेना द्रौपदी प्रमाणे क्षत्रिय धर्माची आठवण शिवगामीला करते. यावेळी अमरेंद्र बाहुबली तिच्या सोबत उभा राहतो. कुंतीच्या आदेशानुसार भावामध्ये द्रौपदीला वाटणारा अर्जुन तो बनत नाही. आपल्या बायकोसाठी तो राजसिंहासन सहजपणे सोडून देतो.


    पहिल्या भागात बाहुबलीच्या प्रेमात पडल्यानंतर अवंतिका युद्ध कौशल्य विसरुन गेली की काय असं वाटतं. पण देवसेनेचं तसं नाही. आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माहिष्मतीच्या सेनापतीची ती एका क्षणात बोटं छाटते. यासाठी बाहुबलीच्या हिरोगिरीची ती वाट पाहत नाही.

  आपला नवरा मारला गेल्यानंतरही सूडानं पेटलेली देवसेना  ही दु:शासनाच्या रक्तानं केशसंभार करण्याची  प्रतिज्ञा करणाऱ्या द्रौपदीसारखी आहे. आपल्या या आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ती  25 वर्ष जिद्दीनं भल्लादेवला टक्कर देते आणि क्लायमेक्सला  आपला प्रतिशोध पूर्ण करते.


       या सिनेमातलं  तिसरं सशक्त पात्र आहे अवंतिका. तिची भूमिका छोटी आहे. पण ती बाहुबलीच्या भावात्मक आयुष्याचा महत्वाचा हिस्सा आहे. स्वत: बरोबरच आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी आदिवासी योद्ध्याची भूमिका तिनं रंगवलीय.पण दुसऱ्या भागात तिच्याकडं साफ दुर्लक्ष करण्यात आलंय. या भागामध्ये तिला एकही संवाद  देण्यात आला नाही.अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रसंग तिच्या वाट्याला आलेत. ज्यामध्येही ती गर्दीचा भाग बनलीय. बाहुबलीच्या मेकिंगमधला हा महत्वाचा दोष आहे.

   सिनेमाची परिणामकारता ही त्यामधील पात्रांच्या सादरीकरणावर अवलंबून असते. बाहुबलीसारखा तंत्रप्रधान सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमातल्या दुसऱ्या भागातली देवसेना किंवा पहिल्या भागातली अंवतिका या खंबीर आहेत. ज्या  टिपीकल सिनेमाप्रमाणे कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. तर त्या विचार करु शकतात. विचार करुन आपला जोडीदार निवडू शकतात. आणि गरज पडली तर युद्धामध्ये उतरुन शत्रूला मारुही शकतात. ' शिव आणि शव यामध्ये शक्तीचा फरक आहे' हे बाहुबलीचं वाक्य या सिनेमातली महिला पात्रं आणि अन्य टिपीकल सिनेमातला फरक एका वाक्यात स्पष्ट करतं.


       अर्थात हा काही अगदी परफेक्ट सिनेमा नाही. बाहुबली 1 मध्ये क्लायमॅक्सला जबर धक्कातंत्राचा वापर करण्यात आलाय. बाहुबली 2 चा क्लायमॅक्स हा अगदीच सरळ आहे.या सिनेमातलं एकही गाणं तुमच्या लक्षात राहत नाही.  कट्टप्पानं बाहुबलीला मारलं तो प्रसंग म्हणजे या सिनेमाचा हायलाईट. पण हा प्रसंग देखील अनिल कुंबळेनं बॉल टाकावा तसा अगदी सरळसोट मार्गानं दाखवण्यात आलाय. महेंद्र बाहुबली हा मोठा योद्धा आहे. अगदी अमरेंद्र बाहुूबलीचा वंशज. तरीही तो माहिष्मती सारख्या बलाढ्य साम्राज्याला एका क्षणात आव्हान देतो. आणि तो हे युद्ध  जिंकतो. या युद्धाची तयारी, नियोजन हे काहीच दाखवलं नाही. बहुधा  अमरेंद्र बाहुबलीची लव्हस्टोरी दाखवताना रेंगाळल्यानं राजामौलींनी इथं फारसा वेळ दिला नसावा.

      या त्रुटींकडं दुर्लक्ष करुनही बाहुबली हा भारतीय सिनेमाचा एक नवा मापदंड आहे. बाहुबलीच्या दोन्ही भागांमध्ये भारतीय संस्कृती, तसंच स्थापत्य शास्त्राचं वैभवशाली दर्शन आहे. ज्यामुळे पुरातन संस्कृतीबद्दल प्रेक्षकांच्या विशेषत: मुलांमध्ये कुतहल निर्माण होतंय. भारतीय सिनेमातला टिपीकल सर्वधर्मसमभाव दाखवण्याचा उद्योग या दोन्ही भागात कुठेही नाही. यासाठी सिनेमा तयार करताना घेण्यात येणाऱ्या भन्साळीछाप कल्पना स्वातंत्र्याचा आधार  राजामौलींनी घेतला नाही याबद्दल राजमौलींचे  खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

 सिनेमातील युद्धात देण्यात येणाऱ्या संस्कृत आज्ञा टिमच्या बारीक-बारीक अभ्यासाची साक्ष देतात. भारतीय संस्कृती, परंपरा याच्याशी विसंगत असा कोणताही प्रसंग या सिनेमात दाखवण्यात आलेला नाही. चित्रपटाच्या शेवटी  अन्यायकारी भल्लादेवाचा सोनेरी मुकट पहिल्या भागात ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवण्यात आलंय तिथं येऊन पडतो. धर्मापुढे अर्धमाचा पराभव होतो. दृष्ट शक्ती सज्जन शक्तीच्या पायाशी लोळण घ्यावी लागते. हा हिंदू संस्कृतीचा संदेश या शेवटच्या प्रसंगातून देण्यात आलाय.

          ठाराविक पद्धतीचा इतिहास पुढच्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न प्रस्थापित मंडळींनी स्वातंत्र्यानंतर आजवर केलाय. इतिहासाची ही साचेबद्धता मोडण्याची संधी बाहुबलीच्या दोन भागांनी भारतीय सिनेमाला दिलीय. महाभारत ते  बाबर-अकबर हे मुगल राजे सुरु या दरम्यानच्या कालखंडामध्ये शेकडो शक्तीशाली साम्राज्य या देशाच्या वेगवेगळ्या भागात निर्माण झाली.  ही साम्राज्य त्यांच्या चालिरिती, पंरपरा, त्या काळातलं विज्ञान यावर भविष्यकाळामध्ये सिनेमांची निर्मिती व्हायला हवी. बाहुबलीचे दोन भव्य आणि यशस्वी असे भाग पाहिल्यानंतर माझ्या सारख्या सामान्य चित्रपट प्रेक्षकाची हीच इच्छा आहे.

   बाहुबलीच्या दोन भागाचा हाच माझा सारांश आहे.


6 comments:

Shirish Garje said...

टिपिकल साउथ सिनेमा से ज्यादा बहुत कुछ है इस सिनेमा में।

Shirish Garje said...

बढ़िया लिखा है ओंकार आपने बहुत खूब👍

ज्ञानेश said...

सुंदर वर्णन आणि त्याहून सुंदर टिपिकल बॉलिवूडपेक्षा यात काय वेगळेपण आहे त्याची मांडणी. नट्या या केवळ नट्या नसून कथेतील पात्र आहेत यासंबंधीचे विश्लेषण अप्रतिम.
महाभारतातील प्रसंगांची तुलना अशा कथेत अपरिहार्यपणे येतेच. त्यात एक छोटी गल्लत झालीये. द्रौपदी दु:शासनाचे रक्त प्रश्न करण्याची प्रतिज्ञा करत नाही तर ती त्याच्या रक्ताने केशसंभार करेन अशी प्रतिज्ञा करते.
Rest all good as always. Keep writing...

ज्ञानेश said...

Read प्रश्न as प्राशन

Onkar Danke said...

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या वाक्यात योग्य बदल केला आहे.

sanjivanshankar said...

मस्त विश्लेषण

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...