Saturday, September 3, 2016

मदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी


समजा मला एखादा गंभीर आजार झालाय. या आजारातून काही दिवसांनी मी बरा झालो. पण मला जे नवं आयुष्य मिळालंय ते डॉक्टरांच्या औषधोपचारामुळे नाही तर एखाद्या साधूच्या आशिर्वादामुळे किंवा  त्यांनी दिलेल्या दृष्टांतामुळे मिळालंय असं मी जगाला ओरडून सांगू लागलो तर अगदी समान्य बुद्धी असलेल्या व्यक्तींच्या मनातही कोणते विचार येतील 1) मी थापा मारतोय 2) मला त्या साधूनं हिप्नोाटाईज केलंय ३) आजापणातून उठल्यानंतर माझ्या मनावर काही तरी परिणाम झालाय. त्यामुळे आता मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. अर्थात मी साधूचा दाखला देत असल्यामुळे मला बरी करणारी व्यक्ती ही मुसलमान किंवा ख्रिश्चन नाही तर ती हिंदू आहे हे उघड आहे. त्यामुळे 'विवेकाचा जागर' करणारी तमाम मेणबत्ती ब्रिगेड जागी होईल. निषेध मोर्चा, एक दिवसाचा उपवास, प्राईम टाईमवर चर्चा होऊन मी आजारपणातून बरं झाल्यावर व्यक्त केलेली भावना  म्हणजे देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा असून त्यामुळे पंडित नेहरुंनी जो लोकशाहीचा पाया रचलाय. त्याला धोका निर्माण झालाय. अशा प्रकारची प्रवृत्ती वाढणं ही देशापुढची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे या निष्कर्षावर बहुतेक प्राईम टाईम चर्चांचं आणि स्तंभलेखकांचं एकमत होईल.

                पश्चिम बंगालमध्ये राहणा-या मोनिका बेसरा या आदिवासी ख्रिश्चन महिलेला टीबी आणि पोटामध्ये ट्युमर झाला होता. बेलूरघाटमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या हॉस्पिटलमधले डॉ. रंजन मुस्तफा त्यांच्यावर उपचार करत होते. डॉ. मुस्तफा यांच्या उपचाराचा मोनिका यांना फायदा होत होता. त्यांचा आजार बरा होण्याच्या टप्प्यावर आला असताना  एकेदिवशी त्यांना अचानक लॉकेटमध्ये मदर तेरेसा यांचं चित्र  दिसलं आणि त्यांचा ट्युमर पूर्णपणे बरा झाला. व्हॅटिकन चर्चला मदर तेरेसा यांना संतपद देण्यासाठी हा दावा म्हणजे आयतं कोलित मिळालं. मोनिका यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मुस्तफा यांचं  मत काय आहे हे विचारात घ्यावं असं त्यांना वाटलं नाहीच. ज्या मदर तेरेसांना आपले आजार बरे करण्यासाठी कॅलिफोर्नियातल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत असत त्या मदर तेरेसांचा नुसता फोटो मोनिकांचा आजार  बरा झाला  हे व्हॅटिकनला पटलं आणि जगानंही ते विनातक्रार मान्य केलंय.

           गोरगरिबांच्या वेदनांमुळे कळवळणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावरुन मायेचा हात फिरवणाऱ्या मदर तेरेसा या गरीबांच्या नाही तर गरीबीच्या मैत्रिण होत्या. गरीबी, आजारपण, उपासमार या देवानं भेट दिलेल्या गोष्टी आहेत असं त्या मानत. त्यांच्या संस्थेला या गरिबीच्या निर्मुलनासाीठी अब्जावधी डॉलर्समध्ये  मदत मिळत असे पण त्यांची हॉस्पिटल हे अस्वच्छतेचं आगार होतं. मुळचे कोलकाताचे पण आता लंडनमध्ये असलेले डॉ. अरुप चटर्जी यांनी 'द फायनल व्हर्डिक्ट' हे पुस्तक तेरेसा यांच्या कार्यावर लिहलंय. या पुस्तकात त्यांनी ब्रिटनमधलं प्रसिद्ध मेडिकल जर्नल लासेंटचे संपादक डॉ. रॉबिन फॉक्स यांनी 1991 मध्ये  तेरेसा यांच्या चॅरिटी हॉस्पिटलचा दौरा केला तो प्रसंग सांगितलाय. या दौऱ्यात डॉ. फॉक्स यांना अनेक धक्कादायक आणि तितक्याच संतापजनक गोष्टी समजल्या.या हॉस्पिटलमध्ये साधी वेदनाक्षम औषधं नव्हती.

सुयांचा वापर कसाही केला जायचा अगदी गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनाही हॉस्पिटलमध्ये नेलं जायचं नाही. कॅन्सरच्या रुग्णांनाही अॅस्पिरिन सारखी डोकेदुखीची गोळी दिली जात असे.येशू ख्रिस्तांनी मरताना वेदना भोगल्या. त्यामुळे या गरिब रुग्णांनीही वेदना भोगल्याच पाहिजेत हा या हॉस्पिटलचा हट्ट होता.

या संस्थेकडे असलेल्या रुग्णवाहिकेचा उपयोग हा रुग्णांसाठी नाही तर संस्थेतल्या ननना इकडून तिकडे नेण्यासाठी होत असे. या संस्थेकडून रोज हजारो गरीबांना मोफत जेवण दिलं जात असे हा दावाही डॉ. चटर्जी यांनी खोडून काढलाय.संस्थेमध्ये रोज जास्तीत जास्त 300 लोकांनाच जेवण दिलं जात होतं आणि हे जेवण देखील ज्या गरीब ख्रिश्चन व्यक्तींकडे या संस्थेनं दिलेलं फुड कार्ड होतं अशाच मंडळींना मिळत असे असा गौप्यस्फोटही चटर्जी यांनी आपल्या पुस्तकात केलाय.

    मदर तेरेसांनी जगभर आपल्या संस्थांचं जाळं उभारलं. जगभरातून देणगीच्या स्वरुपात  आलेली पैशाची गंगा तेरेसांच्या व्हॅटिकनमधल्या बँकेत लुप्त होत असे, भारतीय कायद्यानुसार आवश्यक असलेल्या संपत्तीचा अपवाद वगळता आपल्या संपत्तीच्या मिळकतीचा कोणताही तपशील  तेरेसा यांनी जाहीर केला नाही. मिशनरीला मिळालेली केवळ सात टक्के रक्कम ही गरिबांसाठी वापरली जात असे असा दावा स्टेर्न या जर्मन मासिकानं 1991 मध्ये केला होता.  1965 पासून मिशनरी ऑफ चॅरिटिज  संस्थेचे आर्थिक व्यवहार पोपनं आपल्या पंखाखाली घेतले. मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर ही पकड आणखी घट्ट झालीय.

    जगभरातले लुटारु, हुकूमशाहा, घोटाळेबाज अशी ओवाळून टाकणारी मंडळी या संत मदर तेरेसांचे सवंगडी होती. 1971 ते 86 या काळात हैतीचे हुकमशाह असलेले  जीन क्लाऊड डूवलीये यांनी त्यांचा राजकीय सन्मान केला. ज्या व्यक्तीनं हैतीचं भविष्य नासवलं. गरिबांर प्रचंड अत्याचार केली त्याची या कनवाळू टेरेसांनी तोंड फाटेपर्यंत स्तूती केली. या हुकमशाहकडून मिळणारी भलीमोठी देणगी हेच या प्रशंसेचं कारण होतं.

          चार्ल्स किटींग या अमेरिकन उद्योगपतीनं 1980 च्या दशकात 'किटींग सेव्हिंग अॅण्ड लोन्स'ही कंपनी काढली होती. या कंपनीत अमेरिकेत हजारो सामान्य नागरिक ज्यापैकी अनेक जण पेन्शनर  होती त्यांनी गुंतवणूक केली. अमेरिकेतल्या आम आदमीचा   पैसा किटींगनं बुडवला. पण तेरेसांनी त्याला चांगल्या चारित्र्याचं प्रमाणपत्र बहाल केलं. ''किटींग हे सज्जन गृहस्थ आहेत त्यांच्यावरील खटल्याचा निवाडा करताना दयाळूपणा दाखवा "अशी विनंती करणारं पत्र तेरेसांनी या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांना पाठवलं कारण किटींग यांनी तेरेसा यांच्या संस्थेला 1 मिलियन डॉलरची देणगी दिली होती. सुदैवानं  अमेरिकन न्यायाधिशांवर तेरेसांचं सामाजिक स्टेटस, नोबेलसह जगभरातले त्यांना मिळालेले पुरस्कार याचा परिणाम झाला नाही. त्यांनी कटींग यांना १० वर्षांची शिक्षा दिली. या खटल्यातल्या एका अॅटर्नी जनरल यांनी तेरेसांना पत्र पाठवलं. या पत्रात, "किटींग यांनी कष्टकऱ्यांचा पैसा हडप केला आहे. असा हरामाचा पैसा देणगी म्हणून तुम्ही स्विकारलाय. त्यामुळे एक उत्तम धर्म प्रचारिका या नात्यानं तुम्ही हा पैसा परत करा" अशी मागणी केली.पण टेरेसा यांनी या पत्राला कधीही उत्तर दिलं नाही.

                   अफ्रिकन नागरिकांनी कंडोम वापरण्याला तेरेसांनी विरोध केला. 1979 मध्ये तेरेसांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांनी गर्भपात ही जगातली सर्वात विनाशकारी गोष्ट आहे असं मत व्यक्त केलं. आयर्लंडमध्ये 1995 साली घटस्फोट आणि पुनर्विवाहावरची बंदी उठवण्यासाठी मतदान झालं. त्यावेळी तेरेसांनी या कल्पनेला जाहीर विरोध केला. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य संघनेनं त्यांचा सन्मान केला. त्यावेळी तेरेसांनी एडसचं वर्णन  'अयोग्य  लैंगिक संबंधांबद्दल मिळालेली शिक्षा' असं केलं.  1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर आणिबाणी लादली.त्याावेळी या आणिबाणीमुळे संप बंद झाले आहेत. लोकांच्या नोकऱ्या वाढल्यात. त्यामुळे लोकं आनंदी आहेत असं सांगून तेरेसांनी भारतीय लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या या काळ्याकुट्ट पर्वाचं स्वागत केलं.

1984 मध्ये भोपाळमध्ये वायू दुर्घटना घडली. भोपाळमध्ये राहणारी हजारो मंडळी रात्रीच्या झोपेत गेली. अनेक जण कायमची अपंग झाली. या घटनेनंतर तेरेसा तात्काळ भोपाळमध्ये पोहचल्या. दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी हा त्यांचा हेतू नव्हता. तर या दुर्घटनेला जबाबदार असलेला युनियन कार्बाईड या कंपनीच्या व्यवस्थापनाला माफ करावं अशी मागणी तेरेसा यांनी केली. शेवटी तेरेसांना हवं होतं तेच झालं. कंपनीचा प्रमुख वॉरेन एंडरसनला अर्जुन सिंह-राजीव गांधी जोडीनं अमेरिकत जाऊ दिलं. एंडरसननं आपलं उरलेलं आयुष्य अमेरिकेत सुखानं घालवलं.भारत सरकारला एंडरसनला शिक्षा देणं तर सोडाच त्याच्यावरचा खटलाही व्यवस्थितपणे चालवता आला नाही.1984 च्या 13 वर्ष आधी 1971 सालीही या बाईंनी असाच संतापजनक प्रकार केला होता. बांग्लादेश युद्धानंतर लगेच त्यांनी ढाक्याला भेट दिली.त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या छावणीत काही हजार अन्यायग्रस्त महिला आढळल्या. या महिलांनी कपड्यांचा फास घेऊन आत्महत्या करु नये म्हणून त्यांना नग्न ठेवण्यात आलं होतं. अशा महिलांनाही गर्भपात करायला तेरेसांचा विरोध केलाय. हे मातृत्व देवाचा प्रसाद आहे अशी तेरेसांचा भूमिका होती.

                 ख्रिस्तोफर हिचेन्स या  पत्रकारानं मदर तेरेसांच्या आयुष्यावर आधी लघुपट बनवला आणि नंतर पुस्तक लिहलं. हिचेन्स तेरेसांचं वर्णन हे फॅनेटिक, फंडामेंटालिस्ट आणि फ्रॉड असंच करतात. '' या बाईला संतपद दिलं तर गरीब आणि आजाऱ्यांची संख्या वाढेल. त्याचं संतपद म्हणजे कॅथलिक चर्चनं अंधश्रद्धा आणि दिखावूपणापुढे पत्कारलेली शरणागती आहे.'' असंही हिचेन्स यांनी सांगितलंय.

       Hell's Angel या हिचेन्स यांनी बनवलेल्या लघुपटामध्ये मदर तेरेसांनी जे काम आयुष्यभर प्रामाणिकपणे केलं त्या धर्मांतरणाच्या कामावर प्रकाश टाकलाय. जीवदानापेक्षा मृत्यूदान हेच तेरेसांचं मिशन होतं. रुग्णांना जितका जास्त त्रास होईल तितके ते येशुच्या जवळ जातील अशी तेरेसांची श्रद्धा. ज्यांचं मरण दाराशी येऊन ठेपलंय अशा आपल्या हॉस्पिटलमधल्या गरिब, असाह्य आणि आजारपणामुळे जर्जर झालेल्या मंडळींना   बाप्तिस्मा देऊन त्यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्याचं काम तेरेसा आणि त्यांची धर्मप्रचारक मंडळी करत असत.

      संत मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थेनं गेल्या सहा दशकांच्या कार्यात काय साध्य केलं ? लोकांच्या वेदना तेरेसांच्या कार्यामुळे काडीनंही कमी झाल्या नाहीत. भारत सोडा कोलकाता या शहरामध्ये तरी तेरेसांच्या कामामुळे काय सकारात्मक बदल झाला ? उलट कोलकातामधल्या गरिबीचा जगभर व्यापार करुन देशातल्या 'सिटी ऑफ जॉय'ची जगभर नकारात्मक इमेज बनवण्यात तेरेसांचा मोठा वाटा आहे.  तीन दशकांच्या मार्क्सवादी राजवटीत तेरेसांच्या कार्याचा वटवृक्ष झाला.  त्याच परिणाम तेरेसांच्या मृत्यूनंतरही जाणवतोय.  देशभरातली प्रमुख शहरं औद्योगिकरणाच्या युगात स्वत:ला अपडेट करत असताना कोलकाता शहर हे तिसऱ्या जगातल्या विश्वातच अडकून पडलंय.

     मदर तेरेसा यांना संतपदाचा दर्जा देण्याची प्रक्रिया घाईनं करण्यात येतीय. याचं कारण म्हणजे ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या दृष्टीनं असलेलं भारताचं महत्व आहे. मदर तेरेसांच्या कारकीर्दीत देशातल्या अनेक भागात ख्रिस्ती मिशनऱ्यांचं जाळं वाढलं.ईशान्य भारतामध्ये त्यांची संख्या वाढली. नागालँडमध्ये तर आज 98 टक्के ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन धर्माचं जाळं भारतामध्ये वाढवण्याचं काम मदर तेरेसांनी आयुष्यभर केलं. आपल्या संस्थेला मिळणारा पैसा, आपली सामाजिक प्रतिष्ठा याच कामासाठी त्यांनी वापरली. त्यामुळेच मदर तेरेसा या स्वतंत्र भारतामधल्या धार्मिक साम्राज्यवादी ठरतात. धर्मप्रसारसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दलच त्यांना संतपद देण्यात येतंय.
     
    

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...