Wednesday, November 25, 2015

गरीब


आमिर हा हुशार कलाकार, निर्माता आहे. चांगला कलाकार कसं आपला सिनेमा रिलीज करताना इतरांचा कोणता सिनेमा तेंव्हा असणार नाही.  आपल्यावरचा फोकस कमी होणार नाही. याची काळजी घेतो तसंच आमिर दादरी प्रकरण त्यानंतर आलेला पुरस्कार वापसीचा पूर यावेळी  गप्प होता. अगदी त्याचा अडीच दशकाचा सहकलाकार, सुपरस्टार मित्र शाहरुख खान अडचणीत आला असतानाही तो गप्प होता. मागे कधी तरी फना चित्रपटापूर्वी तो नर्मदा बचाव आंदोलनात उतरला होता. सत्यमेव जयते सारखे संवेदनशील कार्यक्रमतला त्याचा 'रोल'त्यानं तितक्याच तडफेनं केला होता. त्यामुळे आमिर एक सामाजिक जाणीव असलेला कलाकार आहे. असाच सा-यांचा समज आहे. पण   आमिर गप्प होता. बिहार निवडणुका संपल्या. पुरस्कार वापसीचा पूर ओसरला. लोकं पुन्हा कामाला लागले. संसद अधिवेशनात जीएसटीसह खोळंबलेली विधेयकं मांडण्यासाठी सरकार सज्ज होऊ लागलं. त्याचवेळी आमिरनं या देशात असुरक्षित असल्याचं सांगत या असहिष्णुतेच्या 'दंगल' मध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली.

या देशानं एक सुपरस्टार म्हणून आमिरवर प्रेम केलं. या देशात 80 टक्के हिंदू आहेत. या हिंदूंनी आपला पैसा खर्च करुन आमिरच्या चित्रपटांना गर्दी केली. त्याचा बॅँक बॅलेंन्स फुगवण्यात हातभार लावला. चॉकलेट हिरो असलेल्या आमिरचं रंगिलातलं सर्वस्वी वेगळ्या रुपाचं कौतूक करताना आम्हाला त्याचा धर्म अडवा आला नाही. कारगिल युद्धाच्यावेळी आलेल्या सरफरोशमध्ये एसीपी अजय राठोड म्हणून त्यानं गुलाफ हसनची धुलाई केली त्यावेळी आम्ही रोमांचित झालो. लगानमधल्या भूवनची शेवटची फिल्मी फटकेबाजी पाहताना आजही एखादी live मॅच पाहताना होतो तसा आनंद बहुतेकांना होतो. तारे जमींपर मधला इशानच्या शिक्षकाचा संवेदनशील रोल पाहून आम्ही हळवे झालो. रंग दे बसंतीमधल्या डीजे रोल पाहताना आम्ही अस्वस्थ झालो. या देशातल्या नागरिकांनी ( ज्यामध्ये ८० टक्के हिंदू आहेत ) आमिरची ही सारी फिल्मी रुपं डोक्यावर घेतलीत. त्यामुळेच त्याचं हे विधान धक्कादायक आणि दुखावणारं आहे.

    यापूर्वी नेहरुंच्या काळात सिनेमात आलेल्या मुस्लिम कलाकारांना दिलीपकुमार, मीनाकुमारी ही हिंदू नावं स्विकारावी लागली. आमिर, शाहरुख किंवा अन्य कोणत्याही खानला आज हे करावं लागत नाही. हे बदललेल्या मानसिकतेचं लक्षण नाही ? आमिरच्या बायकोला पेपर वाचून भिती वाटते. देश सोडावासा वाटतो. त्याच्या याच भितीचं आमिर संधी मिळाली की पद्धतशीरपणे मार्केटिंग करतो. सर्व देशाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तुझ्यावर प्रेम केलं. पण तरीही आमिरला आज तो मुस्लिम असल्यानं या देशात  मागच्या सात-आठ महिन्यापासून असुरक्षित वाटतंय. रोजचा पेपर उघडल्यानंतर कोणता देश राहण्यासाठी आमिरला सुरक्षित वाटतो ? पाकिस्तान सारख्या फेल नेशनमध्ये तर तो कधीही जाणार नाही. सौदी अरेबिया, इराण, किंवा अन्य पश्चिम आशियाई देशही त्याची निवड असणार नाही. युरोपीयन देशांनीही सीरियन प्रकरणानंतर आपल्या सीमा अधिक आत घेण्यास सुरुवात केलीय. अमेरिकेतल्याही ३१ राज्यांचा अशा प्रकारच्या निर्वासितांना आणि उप-यांना घेण्यास विरोध आहे.  अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प सारख्या मंडळींनी आमिरला तो मुस्लिम आहे असं ओळखपत्र दिलं की आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित झालो असं आमिरला वाटेल.

       आमिर खानचा आजवरचा इतिहास पाहिला की तो हे सारं का करतोय याची उकल व्हायला लागते. नर्मदा  विस्थापितांच्या आंदोलनात आमिर सहभागी होतो. पण काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर तो काहीच बोलत नाही. १९९३ मध्ये या देशात दंगल होते. आमिर राहत असलेल्या शहरात त्याच्या जवळच्या उपनगरात लोक जाळली जातात. त्यावेळी त्याला कधी असुरक्षित वाटत नाही. रझा अकदामीचे गुंड म्यारमारमध्ये काही तरी घडलं म्हणून हे शहर वेठीस धरतात. शहिदांच्या स्मारकाची मोडतोड करतात. त्यावेळी  आमिरला तोंड उघडावं वाटत नाही. युपीएच्या राजवटीमध्ये धार्मिक हिंसाचार विधेयक आणून देशातल्या बहुसंख्य लोकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी त्यांच्या बाजूने आमिर बोलत नाही.  याकुबच्या अंत्ययात्रेला जमावबंदी मोडून हजारो नागरिक जमतात. ही सारी गर्दी पाहून आमिर आणि त्याच्या बायकोला कधी असुरक्षित वाटलं नाही.

सरकारच्या निर्णयाविरुद्ध, सरकारी धोरणांच्या विरुद्ध, एखाद्या विचारसरणीच्या विरोधात बोलणं ही एक गोष्ट आहे. तो आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आमिरनं तो मार्ग जरुर वापरवा. पण देशातल्या वातावरणाचा आपण बळी पडलोत  असं वातावरण तो का तयार करतोय ?  लव्ह जिहादच्या गदारोळात आमिरला कुणी त्याच्या लग्नावरुन टार्गेट केलंय ? बीफ बंदीच्या वादळात आमिरचं फ्रिज उघडून तो काय खातो हे कुणी पाहण्याचा प्रयत्न केलाय ? धोबी घाट चित्रपटाच्या वेळी त्याची बायको किरणनं रियल लोकेशनवर शूट केलं त्यावेळी कुणी तिला त्रास दिलाय ? कदाचित तो ज्या पाली हिल परिसरात राहतोय त्या परिसरातल्या नागरिकांना संजय दत्तला अटक झाली त्यावेळी असुरक्षित वाटलं असावं. देशातलं सर्वात लक्झरी आयुष्य जगायचं. याच देशातल्या लोकांच्या प्रेमाच्या जीवावर  मनमुराद पैसा कमवायचा आणि सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर पेपर वाचून देश असुरक्षित बनलाय आपण बाहेर गेलं पाहिजे असा गळा काढायचा हे उद्योग आमिर खान करतोय.

    या देशात अनेक प्रश्न आहेत. जे काल होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या स्टारडमच्या जीववर जो झटतो तो हिरो. हे  सरकार पटत नाहीय ना ? मग साडेतीन वर्ष थांबावं, आमिरनं लोकसभा निवडणुकीत त्याला हव्या त्या पक्षाचा प्रचार करुन सरकार कसं चुकतंय हे देशाला पटवण्याचा प्रयत्न करावा. देशातल्या बहुसंख्य नागरिकांनी जे सरकार निवडून दिलं. त्या सरकारच्या विरोधात पद्धतशीररित्या वातावरण तापवण्याचा, जागतिक स्तरावर त्याची बदनामी करण्याचा, अल्पसंख्याक नागरिकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.या देशातली असहिष्णुता ही 'मिस्टर इंडिया' सारखी आहे.जी एक विशिष्ट प्रकारचा चष्मा घालणा-या लोकांनाच दिसते. बहुधा तो चष्मा आता आमिरलाही मिळाला असावा.याच चळवळीला आमिर अशा बोलण्यातून आणखी बळ देतोय. त्याच्यावर जीव ओवाळून टाकणा-या कोट्यावधींच्या मनात तो संभ्रम निर्माण करतोय.कोणताही देश परफेक्ट नसतो, त्याला परफेक्ट बनवावं लागतं. 'हा रंग दे बसंती' या आमिरच्याच चित्रपटला डायलॉग आज तो विसरलाय. की त्याच्या आजवरच्या इतिहासाप्रमाणे तो हा डायलॉग बाजूला ठेवून त्याला हवा तोच रोल करतोय ?

जाता जाता - अ व्यक्तीनं ब व्यक्तीला भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी तो व्यक्ती ब च्या देशभक्तीवर शंका व्यक्त करतो. पण ब व्यक्ती जेंव्हा देश सोडण्याची भाषा करतो. त्यावेळी तो धर्मनिरपेक्ष आहे. त्याच्या देशभक्तीवर शंका कुणीही घ्यायची नाही. हे असं का ?  

Monday, November 9, 2015

पहिले पाढे पंचावन्न...


आर्थिक मुद्दे, विकास, चारित्र्यवान नेता आणि देशासाठी सारं काही करण्याची जिद्द या गोष्टींवर निवडणुका जिंकता येत असत्या तर अटलबिहारी वाजपेयींचा निवडणुकीत कधीच पराभव झाला नसता. लालू प्रसाद यादव यांच्यासारखे जातीय, गुन्हेगार आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करणा-या मंडळींना लोकांनी डोक्यावर घेतलं नसतं. भारतीय निवडणुकांमधलं हे सत्य आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या मोदी लाटेच्या प्रभावाला दिल्ली विधानसभा निवडणुकांनतर  अर्धविराम लागला. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर त्याला पूर्णविराम लागलाय. मोदी लाट संपलीय. एकाच पद्धतीनं प्रत्येक निवडणुका जिंकता येत नाहीत. प्रत्येक निवडणुकांचा स्वभावधर्म वेगळा असतो. पण त्या निवडणुका हरण्याचा भाजपचा पॅटर्न समान आहे.

     तयारीचा अभाव

दिल्लीप्रमाणेच बिहारमध्येही भाजपनं प्रचाराला उशीरा सुरुवात केली. नितीश-लालू हे दोन ध्रुव एकत्र येऊन तयारीला लागले होते. पण भाजपची मंडळी नितीश - मांझी फियास्कोचा आनंद घेण्यात गुंग होती.बिहारमध्ये भाजप हा विरोधी पक्ष होता. त्यामुळे सरकारच्या अपयशाला ठळकपणे जनतेसमोर घेऊन प्रचारात आघाडी घेण्याची  संधी भाजपकडे होती. पण ती त्यांनी गमावली. अमित शाह येतील आणि सारं काही ठिक करतील या विश्वासावर भाजपची नेते मंडळी राहिली, असं माझ्या एका बिहारमधल्या मित्रानं सांगितलं. त्यावेळी लालू-नितीश जोडीनं प्रचारात आघाडी घेतली होती. मोदी सरकार गरिबांच्या विरोधात कसे आहे, 15 लाखांचा जुमला, सुट बुट की सरकार,  भू संपादन विधेयक या सारख्या माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मिती केली. भाजप प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मागे पडला.

मोदी-शहांवर सारे विसंबून

दिल्ली आणि बिहारचे निकाल म्हणजे नरेंद्र मोदींचा पराभव आहे. हा दावा करण्याची संधी भाजपनेच विरोधकांना दिली आहे. या दोन्ही निवडणुकीत मोदी विरुद्ध स्थानिक नेते असाच सामना होता. या निवडणुकीत स्थानिक नेते जिंकले. म्हणजेच मोदी हरले असा अर्थ काढायला सारे मोकळे आहेत. नरेंद्र मोदी हे जादूगार नाहित किंवा अमित शाह हे चाणक्य नाहीत त्यांनाही मानवी मर्यादा आहेत हे भाजपने समजून घ्यायला हवं. मोदी-शहांना गुजराती राजकारण खडा-न खडा माहिती आहे. राष्ट्रीय राजकारणाचीही त्यांची समज मोठी आहे. पण म्हणून अन्य राज्यांमध्ये ते स्थानिक चेहरा ठरत नाहीत. त्या लोकांसाठी ते बाहेरचेच आहेत. मोदींचा करिश्मा आणि शहांच व्यवस्थापन याला स्थानिक नेत्यांची जोड मिळणे आवश्यक आहे. मैथिली, भोजपूर, टपोरी बिहारी या सारख्या स्थानिक भाषांमधून महाआघाडीचे नेते भाजपची येथेच्छ टर उडवत होते. त्याला मोदी-शहांच्या शुद्ध हिंदीमधलं उत्तर स्थानिकांना कसं अपिल होणार ?  सुशील मोदी, राजीव प्रताप रुढी, रवीशंकर प्रसाद, राधेमोहन सिंह आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्यासह स्थानिक मंडळींचा पुरेपूर वापर केला गेला
का ? शत्रूघ्न सिन्हा यांची दिल्लीतल्या राजकारणातली उपयुक्तता कदाचित संपली असेल. पण बिहारींसाठी आजही ते सर्वात मोठे बॉलिवूडचे स्टार आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ज्यावेळी भाजपकडे कुणीही फिरकत नव्हतं, तेॆंव्हापासून ते पक्षासासाठी घाम गाळतायत... अशा शत्रूंना  भाजपनं रिकामं ठेवलं. त्यांनंतर त्यांच्या रिकामटेकड्या उद्योगांनी पक्षाला राष्ट्रीय मीडियावर रोज मागे नेण्याचं काम केलं.

    दिल्लीत भाजपचे 7 खासदार आहेत. तरीही विधानसभेत जागा मिळाल्या 3.बिहारमध्येही भाजपकडे 22 खासदार आहेत.   प्रत्येक निवडणुकीत मोदी-शाहांनाच घाम गाळावा लागत असेल तर हे खासदार केवळ खूर्ची उबवण्यासाठी आहेत का ? मोदी शहांना वेगवेगळ्या भागात फिरावं लागणं हे स्थानिक केडर नसल्याचा परिणाम आहे. प्रत्येक निवडणूक बुथमध्ये मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण होईपर्यंत निवडणुका कशा जिंकल्या जाणार ?

माध्यम व्यवस्थापन

बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका या जातीच्या आधारवरच लढल्या जातात हे अराजकीय व्यक्तीही सांगू शकेल. अशा परिस्थितीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणावरच्या मुलाखतीमुळे विरोधकांना फुलटॉस मिळाला. ते विधान तोडून- मोडून वापरण्यात आलं हे खरंय. पण ही तर भाजप विरोधकांची पूर्वीपासून परंपरा आहे. अशा परिस्थितीमध्ये तो भाग मुलाखतीमधून गाळायला हवा होता.

 बिहारमध्ये बहुसंख्य असलेल्या मागासवर्गींयामध्ये भाजपबद्दल भीती तयार करण्यात या मुलाखतीचा मोठा वापर लालू-नितीशनं केला. त्यानंतर व्ही.के. सिंह, योगी आदित्यनाथ , गिरीराज सिंह या सारख्या वाचाळ मंडळींनी पक्षाचं विरोधकांपेक्षा जास्त नुकसान केलं.

विचारधारा


हिंदुत्व हाच भाजपचा आधार आहे. काँग्रेस, समाजवादी किंवा डावी मंडळी काहीही झालं तरी 'एम' फॅक्टरकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. पण भाजपवाले आपला मुख्य आधार हा नेहमी गृहित धरतात. हिंदुत्व या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी असेल. पण निवडणुकीसाठी सर्व हिंदुंचे एकत्रिकरण हीच या शब्दाची व्याख्या आहे. हे एकत्रिकरण करताना सकारात्मकतेला सर्वोच्च प्राधान्य हवं. बीफ खाल्लं म्हणून जमावनं एका मुस्लिमाची हत्या केली ही बातमी 24x7 चालू असताना बिहारमध्ये भाजप हरली तर पाकिस्तानात फटाके फुटतील , यासारखं विधान करण्याची गरज काय होती ?  भाजपचे पहिल्या फळीतले प्रवक्ते आता मंत्री आहेत. त्यामुळे ते नेहमी माध्यमांसमोर येत नाहीत. आता दुस-या फळीतल्या प्रवक्त्यांनी भाजपची बाजू अधिक जोरकसपणे मांडायला हवी. माध्यम व्यवस्थापन हा निवडणुकीतल्या यशाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपमध्ये मोदी युग असताना किमान याबाबतीत तरी पक्षानं मागे पडायला नको.

चांगली काम करुनही 2004 मध्ये वाजपेयी सरकारचा पराभव झाला. त्या पराभवापासून ते बिहारच्या पराभावापर्यंत भाजपच्या पराभवाची कारणं समान आहेत. केवळ स्थानिक आणि तात्कालिक संदर्भ वेगळे. शत प्रतिशत भाजपससाठी झटणा-या मोदी-शहांनी आता तरी हे पहिले पाढे पंचावन्न थांबवायला हवे.  अन्यथा....

जाता जाता - भाजपला खूप सारं बोधामृत दिल्यानंतर  भाजप विरोधकांसाठी काही सल्ले - 1) विचारधारा गुंडाळून ठेवा 2) एकत्र रहा 3) धर्मनिरपेक्षतेचा अहोरात्र जप करा 4) सारं काही झाकून ठेवा


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...