Monday, November 10, 2014

महाराष्ट्राचे केजरीवाल !


उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

      बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.

हिंदुत्व, मराठी आत्मसन्मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सा-या शब्दाचा अर्थ बहुधा उद्धव ठाकरे कंपनीला कुरवाळणे हाच होत असावा. जसं काही सर्व मराठी मतदार हे फक्त शिवसेनेलाच मतदान करतात. अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमुल काँग्रेस, तेलगु देसम, अकाली दल, बिजू जनता दल, असम गण परिषद या देशातल्या अन्य प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर किमान एकदा तरी सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला हे  उद्धव ठाकरेंचे वडील जिवंत असतानाही हे जमलं नाही. पण यांनी मात्र विधानसभा निवडणूक प्रचारात मोदींचा बाप काढला.


 मनोहर जोशी ( मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष - मुंबई), नारायण राणे ( मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता- कोकण),
सुरेश प्रभू ( कॅबिनेट मंत्री - कोकण), रामदास कदम ( विरोधी पक्ष नेता - कोकण), अनंत गिते ( केंद्रीय मंत्री - कोकण) आणि आता पुन्हा गटनेते एकनाथ शिंदे ( ठाणे + कोकण ) ही शिवसेनेकडून सर्वोच्च पदी बसलेल्या व्यक्तींची विभागवार यादी आहे. या पक्षाला आजवर मुंबई आणि कोकण सोडून उरलेल्या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला सर्वोच्च पदी संधी द्यावीशी वाटली नाही.  आता विदर्भातला एक स्वच्छ प्रतिमेचा , हिंदुत्तववादी, तरुण नेता स्वबळावर मुख्यमंत्री बनलाय हेच यांना मान्य नाही. त्यामुळेच ते रोज मानापमान नाट्याचे नवे प्रयोग रंगवतायत.

. निवडणुकीच्या काळात शत्रू नंबर 1 ठरवलेल्या या उद्धव सेनेची भाषा मंत्रिपद समोर दिसताच मवाळ झाली, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपदासह दहा मंत्रिपद म्हणजे यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसताना त्यांच्या बोटाला धरुन मु्ख्यमंत्री करणं म्हणजे यांचा सर्वोच्च सन्मान. रिमोट कंट्रोलच्या जोरावर राज्य हाकणा-या बाळासाहेबांचं नावं लावणारी उद्धवसेना सत्तेच्या तुकड्यासाठी भाजपापुढे लाचार झालीय.

 
          अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा असलेला, महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करु शकणारा सुरेश प्रभू हा चेहरा शिवसेनेला कॅबिनेट मंत्री म्हणून मान्य नव्हता. यापूर्वी बाळासाहेबांनीही त्यांचा तडकाफडी राजीनामा घेतला होता. मा्तोश्रीचे उंबरठे झिजवल्याशिवाय, स्वयंघोषीत मराठी सम्राटाला मुजरा केल्याशिवाय, किंवा पैशाचं राजकरण केल्याशिवाय उद्धवसेनेत मोठं होता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.


   भाजपाची प्रचार टीम म्हणजे अफजलखानाच्या फौजा इतकं भंपक विधान बाळासाहेबांनी कधीच केलं नसंत
   भाजपाला अफजलखान आणि औरंगजेब म्हणारे उद्धवजी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाला आठवण करुन देतायत. 144 +144 = 288 इतकं साोप समीकरणं त्यांनी उधळून लावलं. युती झाली असती तर 210 जागी विजय मिळाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असता. एमआयएमचा राज्यात शिरकावही झाला नसता. पण हे सर्व  उद्धव ठाकरेंनी होऊ दिलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागील दोन निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्वादी पासून ते थेट एमआयएम  आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असताना यांना कधीही हिंदुत्व आठवलं नाही.

      मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. याच काळात मुंबईतल्या बकालपणात झपाट्यानं वाढ झाली. झोपडपट्टीवासींना मोफत घरे देण्याच्या सवंग घोषणेमुळे मुंबईत परप्रातींयांची गर्दी नियंत्रणाच्या पलिकडं गेली. अमराठी वर्ग मुंबईत झपाट्यानं पुढं येत असताना,श्रीमंत होत असताना मराठी माणसाला काल शिवसेनेनं वडापावचा गाडा दिला. आज त्याचं नाव बदलून शिववडापावचा गाडा देण्यात येतोय. आता मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याच्या हलचाली सुरु होताच टक्केवारी बंद होण्याच्या भीतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राग पुन्हा आळवला जातोय.


           सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारं पुरेसं गांभीर्य मोदींमध्ये आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, उच्च शिक्षण आणि विकासाचं व्हिजन असलंं की  सत्ता मिळू शकते हे मनोहर पर्रिकर आणि  सुरेश प्रभुंना केंद्रीय मंत्री करुन त्यांनी दाखवून दिलंय. जात या निकषावर मुख्यमंत्री ठरत नाही हे महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये दिसलं. मोदींचं हेच मॉडेल राज्यात राबवण्याची कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे.पण देवेंद्र फडणवीसांचा सुशासनाचा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून भावनिक राजकारणाची नौटंकी सोबतच  सतत यू टर्न घेण्याची ' आप निती 'चे प्रयोग शिवसेना नेतृत्वाकडून दाखवले जातायत. सतत यू टर्न घेण्याची सवय असेल तर  अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हा अपघात झाला तर मराठी खतरे में असा नारा देत सुरु केलेलं राज्यातलं दुकान बंद होण्याची भीती बाळासाहेबांना सतावत असावी.त्यामुळेच दसरा मेळाव्यातल्या त्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं आवाहन बाळासाहेबांनी सभेस उपस्थित असलेल्या ' तमाम...' वर्गाला केलं असावं.

10 comments:

Niranjan Welankar said...

Excellent, impeccable and most appropriate! खरोखर जोरदार झाला आहे ब्लॉग. काळ्या पैशाची दिवाळखोरी दुरुस्त होईल, पण बौद्धिक दिवाळखोरीचं काय हा प्रश्नच आहे.

Anonymous said...

लेख आवडल्या गेला आहे. पर्त्येक वाक्याशी सहमत. मी खुद्द संघासाठी पडेल ती कामे करतो.सेनेशी केलेली युती तुटावी अशी माझीही मनोमन ईच्छा होती.आणी तसेच झाले.

Narendra prabhu said...

प्रचाराच्या दरम्यान अत्यंत उर्मट शब्दात भाजपावर अपमानास्पद आरोप करणारी शिवसेना, सोबत घेण्याचे कारणच काय?

शिनु said...

प्रत्येक वाक्याशी सहमत.
आज थोरले ठाकरे असायला हवे होते. सत्तेची बेरीज अधिक समंजस असती

प्रसाद देशपांडे said...
This comment has been removed by the author.
प्रसाद देशपांडे said...
This comment has been removed by the author.
प्रसाद देशपांडे said...
This comment has been removed by the author.
प्रसाद देशपांडे said...

लेख आवडला, में शिवसेनेचा समर्थक नाही तरी पण नदीच्या पलीकडची एक बाजू.

हि सर्व तारांबळ ह्या लोकांची( हरियाना मध्ये INLD, हरियाना जनहित कॉंग्रेस, महाराष्ट्र शिवसेना, बिहार जनता दल उनायटेड, पंजाब अकाली दल) फक्त एकाच कारणाने झालीये ती म्हणजे हे सर्व छोटे स्वार्थी, वैयक्तित मान अपमान पूर्ण समाजाचा मान अपमान पूर्ण समाजावर थोपवणारी आणि संकुचित राजकारणातून निर्माण झालेले पक्ष अश्या काई अविर्भावात जगात होते कि आपल्या शिवाय कोणताही राष्ट्रीय पक्ष किंवा दुसरा समविचारी पक्ष ( फक्त लोकांना दाखवण्य पुरते समविचारी) सत्तेत येणार नाही, ना राज्यात ना केंद्रात.

इतके दिवस ह्या सर्व चांडाळ चौकडी छोट्या पक्ष्यांचे फावले. पण जसे लोकसभेचे निकाल आले त्या नंतर ह्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आला. करण भारतीय जनता पक्ष्याला बर्याच विधान सभा मतदार संघात बढत होती म्हणून त्यांनी विधानसभे मध्ये त्या जागा मागितल्या. आता विधानसभे नंतर नगरपालिका, महानगरपालिका अश्या निवडणुका येऊ घातल्या आहेत तिथे पण हेच समीकरण लागू होणार. तर साहजिकच हे स्थानिक पक्ष्य त्यांच्या अस्तित्वाचा विहार करणार आणि इथून पुढे ह्यांना ह्या अडचणी येणार. आता हे धर्मनिर्पेक्ष्यतेचा, समाजवादाचा भोभाटा मिरवणे ढोंगी एकत्र येत आहेत.

तर ह्या छोट्या पक्ष्यांना त्यांच्या Black Maling ची जी कंत्राटे मिळायची पूर्ण बहुमताचे सरकार आले नाही ती कंत्राटे नाही मिळणार. मोदींनी ह्यांचा हाताचे हे कोलीत काढून घेतलाय. आता पक्ष्य चालवायचा म्हणजे पैसा आला आणि सत्तेच्या बाहेर राहून पैसा मिळणे अवघड आणि सध्या परिस्तिती पण अशी कि न केंद्र न राज्यात कुठेच ह्या लोकांना बोलणी करता येत नाहीये. सध्याच्या राजकीय सामिकारणी ह्यांना इतके लाचार केले आहे कि ह्यांचे वय आणि ह्यांचा अनुभव सध्याचे राजकारना ला कमी पडतोय. सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे कि जर सत्तेची फळे चाखायची तरी अस्तित्वाचा प्रश्न जसे में वरती म्हंटले सगळी कडे मोठा वाट द्यावा लागणार आणि सत्तेच्या बाहेर राहून किती दिवस पक्ष टिकून ठेवायचा आणि किती दिवस हे लाचार, लोचट आमदार खासदार एकनिष्ठ ठेवू शकणार जेणे करून पक्ष फुटणार नाही (जसे भुजबळ ने केले होते, जसे येदुर्रापा ने कर्नाटका मध्ये कॉंग्रेस फोडून सत्ता स्तपन केली होती)? म्हणजे दोन्ही बाजूनी मरण ह्या छोट्या पक्ष्यांचे आहेच.

ह्या सर्व घडामोडीं मध्ये एकच राजकारणी योग्य दिशेने जात आहे तो म्हणजे शरद पवार (मला स्वतःला अतिशय राग येतो ह्या माणसाचा ज्याने राज्यात जातीचे राजकारण शिजवले वाढवले) पण भाजपा ला बाहेरून पाठींबा देऊन ह्याने पक्ष फुटीची शक्यता पाहिल्याचा दिवशी दूर केली. जर बाहेरून पाठींबा देणार असतोल तर पक्ष तोडून जाण्यात काहीच अर्थ नाही, अजून एक म्हणजे हा माणूस माझ्या अंदाजे अतिशय संयमी भूमिका घेईल, म्हणजे ८-१० महिने सत्ता चालू देईल ह्यांना सत्तेत अडचणी आणेल. ८-१० महिन्या मध्ये जसे केजरीवाल ची प्रतिमा भाजपा ने केलीये तशीच पण वेगळ्या कारणाने जसे कि आरक्षण, जातीय, सांप्रदायिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांन वरून मलीन करायची करायचा प्रयत्न करेल आणि योग्य वेळ आली कि बाहेरून दिलेला पाठींबा काढून घेईल मला नाही वाटत अल्पमातला सरकार जास्ती काळ टिकेल आणि productive काम करेल. कारण भाजपा शाशीत राज्यात हे लोक काहीही फुकट देण्याच्या घोषणा करत नाहीत न जातीच्या आधार वर ना धर्माच्या जर केले असेल तर ते माझ्या वाचनात नाही. आणि कॉंग्रेस ने आपल्या लोकांना ह्या सर्व गोष्टी ची अशी काही सवय लावलीये कि आपण असे की भेटले नाही तर सत्ताधीश काही जनहिताचे काम करत नाहीयेत असा ठपका मांडून टाकतो. ह्या सवई मोडणे लोकांना फक्त कष्ट करून आपले जीवन सुधारू शकते असे विचार रुजवण्या साठी अजून एक पिढी जाईल. ( हा विषय वेगळा ).

मी काई लिखाणात तरबेज blogger नाहीये तरी पण माझ्या पद्धतीने बाजू मांडायचा प्रयत्न केला.

Vijay Shendge said...

लेख खुप आवडला.

जेवण - Jevan said...
This comment has been removed by the author.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...