Monday, November 10, 2014

महाराष्ट्राचे केजरीवाल !


उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

      बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.

हिंदुत्व, मराठी आत्मसन्मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सा-या शब्दाचा अर्थ बहुधा उद्धव ठाकरे कंपनीला कुरवाळणे हाच होत असावा. जसं काही सर्व मराठी मतदार हे फक्त शिवसेनेलाच मतदान करतात. अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमुल काँग्रेस, तेलगु देसम, अकाली दल, बिजू जनता दल, असम गण परिषद या देशातल्या अन्य प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर किमान एकदा तरी सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला हे  उद्धव ठाकरेंचे वडील जिवंत असतानाही हे जमलं नाही. पण यांनी मात्र विधानसभा निवडणूक प्रचारात मोदींचा बाप काढला.


 मनोहर जोशी ( मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष - मुंबई), नारायण राणे ( मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता- कोकण),
सुरेश प्रभू ( कॅबिनेट मंत्री - कोकण), रामदास कदम ( विरोधी पक्ष नेता - कोकण), अनंत गिते ( केंद्रीय मंत्री - कोकण) आणि आता पुन्हा गटनेते एकनाथ शिंदे ( ठाणे + कोकण ) ही शिवसेनेकडून सर्वोच्च पदी बसलेल्या व्यक्तींची विभागवार यादी आहे. या पक्षाला आजवर मुंबई आणि कोकण सोडून उरलेल्या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला सर्वोच्च पदी संधी द्यावीशी वाटली नाही.  आता विदर्भातला एक स्वच्छ प्रतिमेचा , हिंदुत्तववादी, तरुण नेता स्वबळावर मुख्यमंत्री बनलाय हेच यांना मान्य नाही. त्यामुळेच ते रोज मानापमान नाट्याचे नवे प्रयोग रंगवतायत.

. निवडणुकीच्या काळात शत्रू नंबर 1 ठरवलेल्या या उद्धव सेनेची भाषा मंत्रिपद समोर दिसताच मवाळ झाली, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपदासह दहा मंत्रिपद म्हणजे यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसताना त्यांच्या बोटाला धरुन मु्ख्यमंत्री करणं म्हणजे यांचा सर्वोच्च सन्मान. रिमोट कंट्रोलच्या जोरावर राज्य हाकणा-या बाळासाहेबांचं नावं लावणारी उद्धवसेना सत्तेच्या तुकड्यासाठी भाजपापुढे लाचार झालीय.

 
          अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा असलेला, महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करु शकणारा सुरेश प्रभू हा चेहरा शिवसेनेला कॅबिनेट मंत्री म्हणून मान्य नव्हता. यापूर्वी बाळासाहेबांनीही त्यांचा तडकाफडी राजीनामा घेतला होता. मा्तोश्रीचे उंबरठे झिजवल्याशिवाय, स्वयंघोषीत मराठी सम्राटाला मुजरा केल्याशिवाय, किंवा पैशाचं राजकरण केल्याशिवाय उद्धवसेनेत मोठं होता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.


   भाजपाची प्रचार टीम म्हणजे अफजलखानाच्या फौजा इतकं भंपक विधान बाळासाहेबांनी कधीच केलं नसंत
   भाजपाला अफजलखान आणि औरंगजेब म्हणारे उद्धवजी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाला आठवण करुन देतायत. 144 +144 = 288 इतकं साोप समीकरणं त्यांनी उधळून लावलं. युती झाली असती तर 210 जागी विजय मिळाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असता. एमआयएमचा राज्यात शिरकावही झाला नसता. पण हे सर्व  उद्धव ठाकरेंनी होऊ दिलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागील दोन निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्वादी पासून ते थेट एमआयएम  आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असताना यांना कधीही हिंदुत्व आठवलं नाही.

      मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. याच काळात मुंबईतल्या बकालपणात झपाट्यानं वाढ झाली. झोपडपट्टीवासींना मोफत घरे देण्याच्या सवंग घोषणेमुळे मुंबईत परप्रातींयांची गर्दी नियंत्रणाच्या पलिकडं गेली. अमराठी वर्ग मुंबईत झपाट्यानं पुढं येत असताना,श्रीमंत होत असताना मराठी माणसाला काल शिवसेनेनं वडापावचा गाडा दिला. आज त्याचं नाव बदलून शिववडापावचा गाडा देण्यात येतोय. आता मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याच्या हलचाली सुरु होताच टक्केवारी बंद होण्याच्या भीतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राग पुन्हा आळवला जातोय.


           सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारं पुरेसं गांभीर्य मोदींमध्ये आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, उच्च शिक्षण आणि विकासाचं व्हिजन असलंं की  सत्ता मिळू शकते हे मनोहर पर्रिकर आणि  सुरेश प्रभुंना केंद्रीय मंत्री करुन त्यांनी दाखवून दिलंय. जात या निकषावर मुख्यमंत्री ठरत नाही हे महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये दिसलं. मोदींचं हेच मॉडेल राज्यात राबवण्याची कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे.पण देवेंद्र फडणवीसांचा सुशासनाचा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून भावनिक राजकारणाची नौटंकी सोबतच  सतत यू टर्न घेण्याची ' आप निती 'चे प्रयोग शिवसेना नेतृत्वाकडून दाखवले जातायत. सतत यू टर्न घेण्याची सवय असेल तर  अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हा अपघात झाला तर मराठी खतरे में असा नारा देत सुरु केलेलं राज्यातलं दुकान बंद होण्याची भीती बाळासाहेबांना सतावत असावी.त्यामुळेच दसरा मेळाव्यातल्या त्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं आवाहन बाळासाहेबांनी सभेस उपस्थित असलेल्या ' तमाम...' वर्गाला केलं असावं.

Sunday, November 2, 2014

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !


2014 हे खरोखरच एक अनोख वर्ष आहे.  या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आलं. भ्रष्ट, नाकर्ते, सरंजामी, देशविघातक अशा युपीए सरकारचा पराभव होणार हे स्पष्ट होतं. मोदी लाट निकालात दिसेल याचाही अंदाज होता, पण सर्व शक्याशक्यतेच्या पलिकडं नेणारा सुखद धक्का मोदींनी दिला. केवळ भाजपाला  लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवता येतं हे मोदींनी दाखवून दिलं.त्यापाठोपाठ दुस-या टप्प्यात राज्यात देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं भाजपाचा पहिला मु्ख्यमंत्री झालाय. भाजपाला स्पष्ट बहुमत नाही. तरीही 120 पेक्षा जास्त जागा जिंकत आणि आपल्या मतांची टक्केवारी दुप्पॉट करत भाजपानं राज्यातला नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवलाय. तोही अगदी स्वबळावर. 'मराठी खतरे में' असा नारा देत अस्मिताचं राजकारण करणा-या कोणत्याही ठाकरेंच्या अहंकाराला न कुरवाळता.

       गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे  निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
           
           भाजपाशी ऐन निवडणुकीत युती तोडून तथाकथित स्वाभिमान दाखवणारे उद्धव ठाकरे हे मागील महिनाभर अनेक पत्रपंडितांचे हिरो होते. ( वर्षभरापूर्वी केजरीवाल आणि नंतर राहुल गांधी यांना खांद्यावर घेणाराही हाच वर्ग होता) भाजपा नेतृत्त्वाला महाराष्ट्रविरोधी ठरवून, अफजलखानाची टोळी संबोधून भर सभेत टाळ्या मिळवता येतात. हेडलाईनही छान होते. पण यातून पक्ष वाढत नसतो. विरोधकांवर हल्ला करत असताना पक्ष वाढवण्याची जबाबदारीही पक्षप्रमुखाला पार पाडायची असते. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल व्यापक नाराजीचा फायदा शिवसेनेलाही झाला. ही नाराजी नसती तर शिवसेना पन्नाशीही ओलांडू शकली नसती. 'शहा'णे व्हा असा सल्ला देणा-या उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाला त्यांची युती सहन करावीच लागली असती. त्यांना आपसुक मोठेपणा मिळाला असता. आणि कुणास ठाऊक ज्या मु्ख्यमंत्रीपदासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केला ते मुख्यमंत्रीपदही देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मिळाले असते.

                    'मराठी खतरे में' चा नारा देत एकगठ्ठा मराठी मतं मिळवण्याचा उद्धवसेनेचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. ' अफजलखानाच्या दरबारात ' शिवसेनेचे अनंत गिते 'विडे '  चघळत राहिले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिकेतली साथ सोडण्याचा ताठ बाणा, ' मोडेन पण वाकणार नाही ' असा अभिमान बाळगणा-या या मराठीच्या कैवा-यांनी दाखवला नाही. उद्धव ठाकरेंच्या महत्वकांक्षेमुळे नारायण राणे, राज ठाकरे पक्ष सोडून गेले त्यामुळे शिवसेनेवर त्यांची एकहाती सत्ता आली. पण युतीवर एकहाती सत्ता राखू शकेल असं संघटन आपल्याकडे नाही. जनाधार तर त्याहून नाही हे उद्धव ठाकरेंना लक्षातच आलं नाही. निवडणूक निकालाने त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलीय.

              शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.

           प्रबळ विरोधक आणि ऐनवेळी समोर युद्धाला उभा राहिलेला मित्रपक्ष या सर्व लढाईनंतरही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ही व्यक्ती मु्ख्यमंत्री होणं याला मोठं महत्व आहे.जातीची व्होटबँक, उद्योगसमूह, सहकारी बँक, सहकारी कारखाना असं कोणतही पाठबळ नसताना मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले आणि प्रखर वैचारिक निष्ठा जोपसणारे युवा मु्ख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.

      देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आहेत. अर्थशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. राजकीय आयुष्यात प्रामणिकता जपणा-या फडणवीसांसमोर राज्याचा कारभारही पारदर्शी करण्याची जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्यावरुन धारेवर धरणा-या आणि चितळे समितीसमोर बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणा-या या मुख्यमंत्र्याला आता भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील.
           
       महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगानं शहरीकरण होत चालेलं राज्य आहे. उंची मॉल्स, विदेशी बनावटीच्या गाड्या, गज्ज भरलेल्या बाजारपेठा, अगदी लेटेस्ट मोबाईल्स, मल्टीप्लेक्स अशा स्मार्ट सिटी राज्यात उदयाला येतायत. त्याचवेळी ग्रामीण भागातली परिस्थिती झपाट्यानं बिघडतीय. वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेला शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकायला लावणारी निगरगट्ट यंत्रणा या राज्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मेकओव्हर करण्याचं अभियान या सरकारला करावं लागेल. त्याचबरोबर   प्रादेशिक असमतोल, नक्षलवाद आणि युवकांच्या मेंदूत भिनवत चालेलं ब्रिगेडी जातीयता आणि एमआयएमची धार्मिकता याचं भूत उतरवण्याचं आव्हानं  पेलण्याची शक्ती या युवा मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी आशा त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरुन करायला हवी.
 
            आगामी काळातल्या जगात होणा-या बदलामध्ये 125 कोटींच्या या लोकसंख्येच्या देशाची भूमिका महत्त्वाची असेल. जागतिक आव्हांनाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये होणा-या बदलाचे केंद्रबिंदू असतील नरेंद्र मोदी. महाराष्ट्राविना राष्ट्र कसे चालेल ? महाराष्ट्रात हीच जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना पार पाडावी लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे दोन सर्वोत्तम व्यक्तींच्या हाती 2014 या वर्षानं सोपवलंय.केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही भाजपाची घोषणा खरी ठरली. या घोषणेमुळे भाजपामध्ये मोठे बदल झाले पुढेही होतील. देशात आणि महाराष्ट्रातल्या बदलाची सुरुवातही 2014 मध्ये झालीय. हे वर्ष त्यामुळेच नेहमीच संस्मरणीय ठरणार आहे. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...