Monday, November 10, 2014

महाराष्ट्राचे केजरीवाल !


उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

      बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.

हिंदुत्व, मराठी आत्मसन्मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सा-या शब्दाचा अर्थ बहुधा उद्धव ठाकरे कंपनीला कुरवाळणे हाच होत असावा. जसं काही सर्व मराठी मतदार हे फक्त शिवसेनेलाच मतदान करतात. अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमुल काँग्रेस, तेलगु देसम, अकाली दल, बिजू जनता दल, असम गण परिषद या देशातल्या अन्य प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर किमान एकदा तरी सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला हे  उद्धव ठाकरेंचे वडील जिवंत असतानाही हे जमलं नाही. पण यांनी मात्र विधानसभा निवडणूक प्रचारात मोदींचा बाप काढला.


 मनोहर जोशी ( मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष - मुंबई), नारायण राणे ( मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता- कोकण),
सुरेश प्रभू ( कॅबिनेट मंत्री - कोकण), रामदास कदम ( विरोधी पक्ष नेता - कोकण), अनंत गिते ( केंद्रीय मंत्री - कोकण) आणि आता पुन्हा गटनेते एकनाथ शिंदे ( ठाणे + कोकण ) ही शिवसेनेकडून सर्वोच्च पदी बसलेल्या व्यक्तींची विभागवार यादी आहे. या पक्षाला आजवर मुंबई आणि कोकण सोडून उरलेल्या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला सर्वोच्च पदी संधी द्यावीशी वाटली नाही.  आता विदर्भातला एक स्वच्छ प्रतिमेचा , हिंदुत्तववादी, तरुण नेता स्वबळावर मुख्यमंत्री बनलाय हेच यांना मान्य नाही. त्यामुळेच ते रोज मानापमान नाट्याचे नवे प्रयोग रंगवतायत.

. निवडणुकीच्या काळात शत्रू नंबर 1 ठरवलेल्या या उद्धव सेनेची भाषा मंत्रिपद समोर दिसताच मवाळ झाली, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपदासह दहा मंत्रिपद म्हणजे यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसताना त्यांच्या बोटाला धरुन मु्ख्यमंत्री करणं म्हणजे यांचा सर्वोच्च सन्मान. रिमोट कंट्रोलच्या जोरावर राज्य हाकणा-या बाळासाहेबांचं नावं लावणारी उद्धवसेना सत्तेच्या तुकड्यासाठी भाजपापुढे लाचार झालीय.

 
          अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा असलेला, महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करु शकणारा सुरेश प्रभू हा चेहरा शिवसेनेला कॅबिनेट मंत्री म्हणून मान्य नव्हता. यापूर्वी बाळासाहेबांनीही त्यांचा तडकाफडी राजीनामा घेतला होता. मा्तोश्रीचे उंबरठे झिजवल्याशिवाय, स्वयंघोषीत मराठी सम्राटाला मुजरा केल्याशिवाय, किंवा पैशाचं राजकरण केल्याशिवाय उद्धवसेनेत मोठं होता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.


   भाजपाची प्रचार टीम म्हणजे अफजलखानाच्या फौजा इतकं भंपक विधान बाळासाहेबांनी कधीच केलं नसंत
   भाजपाला अफजलखान आणि औरंगजेब म्हणारे उद्धवजी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाला आठवण करुन देतायत. 144 +144 = 288 इतकं साोप समीकरणं त्यांनी उधळून लावलं. युती झाली असती तर 210 जागी विजय मिळाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असता. एमआयएमचा राज्यात शिरकावही झाला नसता. पण हे सर्व  उद्धव ठाकरेंनी होऊ दिलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागील दोन निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्वादी पासून ते थेट एमआयएम  आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असताना यांना कधीही हिंदुत्व आठवलं नाही.

      मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. याच काळात मुंबईतल्या बकालपणात झपाट्यानं वाढ झाली. झोपडपट्टीवासींना मोफत घरे देण्याच्या सवंग घोषणेमुळे मुंबईत परप्रातींयांची गर्दी नियंत्रणाच्या पलिकडं गेली. अमराठी वर्ग मुंबईत झपाट्यानं पुढं येत असताना,श्रीमंत होत असताना मराठी माणसाला काल शिवसेनेनं वडापावचा गाडा दिला. आज त्याचं नाव बदलून शिववडापावचा गाडा देण्यात येतोय. आता मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याच्या हलचाली सुरु होताच टक्केवारी बंद होण्याच्या भीतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राग पुन्हा आळवला जातोय.


           सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारं पुरेसं गांभीर्य मोदींमध्ये आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, उच्च शिक्षण आणि विकासाचं व्हिजन असलंं की  सत्ता मिळू शकते हे मनोहर पर्रिकर आणि  सुरेश प्रभुंना केंद्रीय मंत्री करुन त्यांनी दाखवून दिलंय. जात या निकषावर मुख्यमंत्री ठरत नाही हे महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये दिसलं. मोदींचं हेच मॉडेल राज्यात राबवण्याची कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे.पण देवेंद्र फडणवीसांचा सुशासनाचा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून भावनिक राजकारणाची नौटंकी सोबतच  सतत यू टर्न घेण्याची ' आप निती 'चे प्रयोग शिवसेना नेतृत्वाकडून दाखवले जातायत. सतत यू टर्न घेण्याची सवय असेल तर  अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हा अपघात झाला तर मराठी खतरे में असा नारा देत सुरु केलेलं राज्यातलं दुकान बंद होण्याची भीती बाळासाहेबांना सतावत असावी.त्यामुळेच दसरा मेळाव्यातल्या त्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं आवाहन बाळासाहेबांनी सभेस उपस्थित असलेल्या ' तमाम...' वर्गाला केलं असावं.

Sunday, November 2, 2014

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !


2014 हे खरोखरच एक अनोख वर्ष आहे.  या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आलं. भ्रष्ट, नाकर्ते, सरंजामी, देशविघातक अशा युपीए सरकारचा पराभव होणार हे स्पष्ट होतं. मोदी लाट निकालात दिसेल याचाही अंदाज होता, पण सर्व शक्याशक्यतेच्या पलिकडं नेणारा सुखद धक्का मोदींनी दिला. केवळ भाजपाला  लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवता येतं हे मोदींनी दाखवून दिलं.त्यापाठोपाठ दुस-या टप्प्यात राज्यात देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं भाजपाचा पहिला मु्ख्यमंत्री झालाय. भाजपाला स्पष्ट बहुमत नाही. तरीही 120 पेक्षा जास्त जागा जिंकत आणि आपल्या मतांची टक्केवारी दुप्पॉट करत भाजपानं राज्यातला नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवलाय. तोही अगदी स्वबळावर. 'मराठी खतरे में' असा नारा देत अस्मिताचं राजकारण करणा-या कोणत्याही ठाकरेंच्या अहंकाराला न कुरवाळता.

       गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे  निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
           
           भाजपाशी ऐन निवडणुकीत युती तोडून तथाकथित स्वाभिमान दाखवणारे उद्धव ठाकरे हे मागील महिनाभर अनेक पत्रपंडितांचे हिरो होते. ( वर्षभरापूर्वी केजरीवाल आणि नंतर राहुल गांधी यांना खांद्यावर घेणाराही हाच वर्ग होता) भाजपा नेतृत्त्वाला महाराष्ट्रविरोधी ठरवून, अफजलखानाची टोळी संबोधून भर सभेत टाळ्या मिळवता येतात. हेडलाईनही छान होते. पण यातून पक्ष वाढत नसतो. विरोधकांवर हल्ला करत असताना पक्ष वाढवण्याची जबाबदारीही पक्षप्रमुखाला पार पाडायची असते. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल व्यापक नाराजीचा फायदा शिवसेनेलाही झाला. ही नाराजी नसती तर शिवसेना पन्नाशीही ओलांडू शकली नसती. 'शहा'णे व्हा असा सल्ला देणा-या उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाला त्यांची युती सहन करावीच लागली असती. त्यांना आपसुक मोठेपणा मिळाला असता. आणि कुणास ठाऊक ज्या मु्ख्यमंत्रीपदासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केला ते मुख्यमंत्रीपदही देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मिळाले असते.

                    'मराठी खतरे में' चा नारा देत एकगठ्ठा मराठी मतं मिळवण्याचा उद्धवसेनेचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. ' अफजलखानाच्या दरबारात ' शिवसेनेचे अनंत गिते 'विडे '  चघळत राहिले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिकेतली साथ सोडण्याचा ताठ बाणा, ' मोडेन पण वाकणार नाही ' असा अभिमान बाळगणा-या या मराठीच्या कैवा-यांनी दाखवला नाही. उद्धव ठाकरेंच्या महत्वकांक्षेमुळे नारायण राणे, राज ठाकरे पक्ष सोडून गेले त्यामुळे शिवसेनेवर त्यांची एकहाती सत्ता आली. पण युतीवर एकहाती सत्ता राखू शकेल असं संघटन आपल्याकडे नाही. जनाधार तर त्याहून नाही हे उद्धव ठाकरेंना लक्षातच आलं नाही. निवडणूक निकालाने त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलीय.

              शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.

           प्रबळ विरोधक आणि ऐनवेळी समोर युद्धाला उभा राहिलेला मित्रपक्ष या सर्व लढाईनंतरही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ही व्यक्ती मु्ख्यमंत्री होणं याला मोठं महत्व आहे.जातीची व्होटबँक, उद्योगसमूह, सहकारी बँक, सहकारी कारखाना असं कोणतही पाठबळ नसताना मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले आणि प्रखर वैचारिक निष्ठा जोपसणारे युवा मु्ख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.

      देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आहेत. अर्थशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. राजकीय आयुष्यात प्रामणिकता जपणा-या फडणवीसांसमोर राज्याचा कारभारही पारदर्शी करण्याची जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्यावरुन धारेवर धरणा-या आणि चितळे समितीसमोर बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणा-या या मुख्यमंत्र्याला आता भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील.
           
       महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगानं शहरीकरण होत चालेलं राज्य आहे. उंची मॉल्स, विदेशी बनावटीच्या गाड्या, गज्ज भरलेल्या बाजारपेठा, अगदी लेटेस्ट मोबाईल्स, मल्टीप्लेक्स अशा स्मार्ट सिटी राज्यात उदयाला येतायत. त्याचवेळी ग्रामीण भागातली परिस्थिती झपाट्यानं बिघडतीय. वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेला शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकायला लावणारी निगरगट्ट यंत्रणा या राज्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मेकओव्हर करण्याचं अभियान या सरकारला करावं लागेल. त्याचबरोबर   प्रादेशिक असमतोल, नक्षलवाद आणि युवकांच्या मेंदूत भिनवत चालेलं ब्रिगेडी जातीयता आणि एमआयएमची धार्मिकता याचं भूत उतरवण्याचं आव्हानं  पेलण्याची शक्ती या युवा मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी आशा त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरुन करायला हवी.
 
            आगामी काळातल्या जगात होणा-या बदलामध्ये 125 कोटींच्या या लोकसंख्येच्या देशाची भूमिका महत्त्वाची असेल. जागतिक आव्हांनाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये होणा-या बदलाचे केंद्रबिंदू असतील नरेंद्र मोदी. महाराष्ट्राविना राष्ट्र कसे चालेल ? महाराष्ट्रात हीच जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना पार पाडावी लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे दोन सर्वोत्तम व्यक्तींच्या हाती 2014 या वर्षानं सोपवलंय.केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही भाजपाची घोषणा खरी ठरली. या घोषणेमुळे भाजपामध्ये मोठे बदल झाले पुढेही होतील. देशात आणि महाराष्ट्रातल्या बदलाची सुरुवातही 2014 मध्ये झालीय. हे वर्ष त्यामुळेच नेहमीच संस्मरणीय ठरणार आहे. 

Wednesday, August 27, 2014

लव्ह जिहाद - दहशतवाद्यांचे नवे अस्त्र


तारा सचदेव राष्ट्रीय पातळीवरची नेमबाजपटू.  राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणा-या ताराची नेमबाजीच्या कोर्टवर एका युवकाची भेट झाली. त्या युवकानं ताराला  स्वत:च नाव रणजितकुमार कोहली सांगितलं.  रणजित ताराचा सराव पाहण्यासाठी नियमित येत असे. तारा-रणजितची सुरुवातीला ओळख नंतर मैत्री मैत्रीतून प्रेम आणि या प्रेमाचं रुपांतर विवाहात झालं.सात जुलै 2014 या दिवशी रांचीमध्ये झालेल्या या लग्नात शहरातल्या अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या.   अगदी चार-चौघांप्रमाणेच सुरु असलेल्या ताराच्या या आयुष्याला लग्नानंतर मात्र एक धक्कादायक वळण लागलं.

      ज्या रणजितवर विश्वास ठेवून तारानं लग्न केलं. त्याचं खरं नाव रणजितकुमार कोहली नसून रकिबुल हसन असल्याचं ताराला लग्नानंतर पहिल्याच दिवशी ताराला समजलं. रकिबुलनं काही मौलवींना घरात बोलवून ताराला इस्लाम स्विकारण्यास सांगितलं. तारानं धर्मांतर करण्यास नकार दिला. या नकारामुळे नंतरचा महिनाभर तिचा सतत छळ करण्यात आला. घरात उपाशी कोंडून ठेवणे, तिच्या गनपॉईंटवर बंदूक ठेवून  शारीरिक संभोग आणि अंगावर कुत्रे सोडणे यासारखा अमानवी छळ केल्याची तक्रार तारानं केलीय. या काळात ताराचं नाव बदलून सारा असं  ठेवल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय.

     एका हातात तलवार आणि दुस-या हातात कुराण घेऊन भारतासह जगभरात इस्लामाचा प्रचार झाल्याची अनेक उदाहरणं या इतिहासात ठिकठिकाणी आढळतात. एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर त्या भागात मोठा नरसंहार करणे आणि त्या प्रदेशातल्या स्त्रियांवर अत्याचार करुन त्यांचे सक्तीनं धर्मांतरण करण्याचा कार्यक्रम या इस्लामी राज्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा राबवलाय. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये या कट्टरवादाचा रुप बदललंय. मात्र त्याचा उद्देश तोच आहे, धर्माचा प्रसार. धर्म प्रसारासाठी या कट्टरवाद्यांच्या नव्या अस्त्राचं नाव आहे, 'लव्ह जिहाद'.

      रांचीमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या तारा सचदेव प्रकरणामुळे लव्ह जिहादचा मुद्दा सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही याबाबतच्या तक्रारीची गेल्या काही दिवसांपासून नोंद झालीय. पण गेल्या किमान 10 वर्षांपासून 'लव्ह जिहाद'चा हा अजेंडा देशभर राबवण्यात येतोय.केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेलं पुणे शहर, मराठवाड्यातले सर्वच जिल्हे या भागात अशा प्रकारच्या लव्ह जिहादची प्रकरणं वारंवार समोर आली आहेत.


           काय आहे लव्ह जिहाद ?

लव्ह जिहाद रोखण्यासाठी तसंच याला बळी पडणा-या तरुणींना परत आणण्यासाठी सुरु असलेल्या 'बेटी बचाव' अभियानातल्या कार्यकर्त्यांशी  चर्चा केल्यानंतर या लव्ह जिहादचे स्वरुप समजू शकते.त्यांच्या पद्धतीनुसार  मुस्लिमेतर तरुणींशी मैत्री करायची, वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन काही तात्कालीन कामात तत्परतेनं मदत करुन  त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्या धर्मावर टीका करत असतानाच त्यांच्यासमोर इस्लामाचे उद्दात्तीकरण करायचे, शाहरुख, आमिर, सैफ अली या सारख्या मुस्लिम अभिनेत्यांनी हिंदू स्त्रियांशी केलेल्या विवाहाचा दाखला द्यायच ( त्यांचे विवाह हा पूर्ण वैयक्तिक भाग असेल. यामध्ये जबरदस्ती नाही हे मान्य. पण एक उदाहणर म्हणून त्यांचा वापर लव्ह जिहाद्यांकडून केला जातो. या अभिनेत्यांचा समाजमनावर असलेला पगडा लक्षात घेता त्यांच्या या वैयक्तिक गोष्टींचा वापर मोठ्या खूबीनं एक 'गुंतवणूक' असा केला जातोय )या मुलीला फुस लावून कुटुंबापासून विभक्त करायचे, नंतर मौलवीच्या साक्षीनं तिच्याशी निकाह करुन तिचे धर्मांतर करायचे, हा सारा प्रकार स्वखुषीने होत असल्याचं भासवून तिच्या कागदावर सह्या घ्यायच्या. काही काळ तिचा 'वापर' झाला की नंतर या मुलीला सोडून द्यायचे किंवा त्यांची रवानगी कुंटणखाण्यात करायची अथवा आखाती किंवा आफ्रिकन देशात त्यांची  विक्री करायची. मुस्लिमांची जननसंख्या वाढवण्यासाठी देशभर सुरु असलेला हा प्रकार लव्ह जिहाद म्हणून ओळखला जातो.

      केरळ तसंच कर्नाटकातल्या मंगळूरु जिल्ह्यात सक्रीय असलेल्या 'पॉप्यूलर फ्रंट' य़ा धार्मिक संस्थेचं लव्ह जिहादला मोठं पाठबळ असल्याचं मानलं जातं. केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलनं या प्रकरणी केलेल्या दाव्यानुसार 4 हजार 500 युवतीनं याचं लक्ष्य बनवण्यात आलंय. तर एकट्या  कर्नाटकात 30 हजार युवतींच लव्ह जिहादच्या अंतर्गत धर्मांतर करण्यात आल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीनं केलाय. केरळमध्ये 2006 नंतर अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी मुस्लिम धर्माचा स्विकार केल्याची माहिती  केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी 25 जून 2014 या दिवशी राज्य विधानसभेत दिली होती.अर्थात या सर्व महिलांचे सक्तीनं धर्मांतर झालं किंवा हा सारा प्रकार लव्ह जिहादचा भाग आहे हे सारे दावे सन्मानीय चंडी साहेबांनी फेटाळून लावलेत.

           शेहान शा आणि सिराजुद्दीन विरुद्ध केरळ सरकार या 2009 साली उघड झालेल्या प्रकरणातही लव्ह जिहादची कार्यपद्धती समोर आली आहे. ( या संपूर्ण प्रकरणाबाबत माझे मित्र विक्रम वालावलकर यांनी इथे सविस्तर लिहले आहे. सर्वांनी ते आवश्य वाचावे )  या प्रकरणाच्या निकालपत्रात मा. न्यायाधिशांनी संविधानातले 25 वे कलम धर्मस्वातंकत्र्य, प्रेम विवाह, जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर आणि या सर्व प्रकारात सरकारची जबाबदारी याबाबत सविस्तर विश्लेषन केलं आहे. ठराविक धर्माच्या मुलींना अन्य धर्मांत धर्मांतरित करण्याचे योजनाबद्ध पद्धतीनं प्रयत्न काही संघटना करत आहेत, याची दखल सरकारने घ्यायला हवी.  भारतीय संविधानातले 25 वे कलम कोणत्याही व्यक्तीच्या सक्तीनं धर्मांतर करण्याच्या कारवाईत गुंतण्याची परवानगी देत नाही. 
   
 मा. न्यायाधिशांच्या विवेचनातला पुढचा भाग जास्त महत्त्वाचा आहे. '' पालकांना आपल्या पाल्याला हवे तसे घडविण्याचा अधिकार नजरेआड करता येणार नाही. केवळ मुलगा किंवा मुलगी वयात आली म्हणजे त्याच्या / तिच्या पालकांना त्यांच्या भविष्याबाबत किंवा करियरबाबत काहीही बोलता येत नाही असा होत नाही. पालकांना आपल्या मुलाचे संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांना मुलांचे करियर घडवण्याचा तसंच त्यांना मार्गदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मुलींच्या पालकापासून हे अधिकार हिरावून घेण्याची संधी कलम 25 देत नाही. कलम 25 व्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करते पण याचा उद्देश कुुटुंबव्यवस्था आणि संस्कृती नष्ट करणे असा नाही.''

2009 मध्ये केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालपत्रात लव्ह जिहादच्या कारवाया रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना पुरेशे निर्देश दिलेले आहेत. अर्थात या अंतर्गत नेमक्या किती महिलांचे धर्मांतर झाले यासाठी कर्नाटक सरकारने यापूर्वी नेमलेल्या सीआयडी चौकशीमध्ये ठोस माहिती मिळाली नाही. परंतु या भागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या घटना, या परिसरतून हिंदू तरुणी अचानक बेपत्ता होणे, त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी इस्लाम धर्म स्विकारल्याचा प्रकार समोर येणे ( अर्थात यातील बहुतेक धर्मांतर हा स्वखुषीने केल्याचा दावा होतो ) केरळ आणि कर्नाटकातला सामाजिक असमतोल ढासळण्यासाठी
पुरेसा आहे.

केरळ,  कर्नाटात पाच वर्षांपूर्वी जे उघडकीस आलं तेच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये सध्या येत आहे. तारा सचदेवनं या प्रकरणी तक्रार करण्याचं धैर्य दाखवलं, आणि हे सारं प्रकरण बाहेर आलं. पण बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या सारख्या राज्यातल्या मुस्लिम बहुल भागात अशा अनेक तारा सचदेव आजही दहशतीमध्ये जगत असतील हा विचार अस्वस्थ करणारा आहे.

धर्मांतरासाठी होत असलेल्या या लव्ह जिहादचा वापर जननसंख्या वाढवणे हाच आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यात गेल्या 50 वर्षात लक्षणीय रित्या वाढत असलेली एकाच धर्माची लोकसंख्या हा त्या सर्व प्रदेशाचा कारभार आपल्या ताब्यात घेण्याचा संघटित प्रयत्नच म्हणाव लागेल. बांग्लादेशी नागरिकांच्या अनिर्बंध घुसखोरीचा ताण भारतीय अर्थ तसंच प्रशासकीय व्यवस्थेला सहन करावा लागतोच. त्याचबरोबर 'लव्ह जिहाद' च्या नावाखाली देशात विशिष्ट लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न तितक्याच जोरकस पद्धतीनं होतोय.

    आता केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, म्हणून याबाबत सर्व काही 'मोदी सरकार' करेल म्हणून स्वस्थ बसू नका. या सर्व नेटवर्कला असलेली स्थानिक मदत तोडण्यासाठी सर्व जबाबदार भारतीयांनी एकत्र येणं आवश्यक आहे. स्थानिक शासन व्यवस्था, राज्य सरकार हे केवळ मतांची भाषा समजणारं असू शकतं. मतकेंद्रीत राज्यव्यवस्थेमुळे देशाची संस्कृती गेल्या 67 वर्षात बदलून गेलीय. या बदललेल्या 'मत' संस्कृतीमुळेच लव्ह जिहाद हे नवे अस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागलंय. हे अस्त्र निकामी करण्यासाठी
संघटन हाच एकमेव उपाय आहे.

विशेष आभार - माझे मित्र आणि कायदेतज्ज्ञ विक्रम वालावलकर यांनी आपल्या सावधान ! लव्ह जिहाद या ब्लॉगमधील मजकूर वापरण्यास आनंदाने परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभर              
                        

Monday, August 18, 2014

श्रीलंकन क्रिकेटचा बुद्ध


1990 च्या दशकात अंतर्गत यादवीनं होरपळत असलेल्या श्रीलंकन मनाला काही प्रमाणात उभारी देण्याचं काम क्रिकेटनं केलं. रणतुंगा सारखा हुशार कॅप्टन, क्लासिकल अरविंद डिसल्वा, धडाकेबाज जयसुर्या आणि बेधडक कालुवितरणाच्या केमिस्ट्रीच्या जोरावर श्रीलंकेनं 1996 मध्ये थेट विश्वचषकालाच गवसणी घातली. रणतुंग-डिसल्वा आणि जयसुर्या या त्रिकूटानं श्रीलंकनं क्रिकेटमधल्या 'अच्छे दिन' ला सुरुवात केली. त्यांची ही मशागत वाया जाणार नाही याची काळजी जयवर्धने-संगकारा आणि मुरलीधरन त्रिकुटानं नंतरच्या कालखंडात घेतली आहे.

          मुरलीधरन यापूर्वीच निवृत्त झालाय. आता जवर्धनेनंही टेस्ट क्रिकेटमधून आपली बॅट म्यान केली. 1997 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केल्यापासून ऑगस्ट 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या टेस्टपर्यंत त्यानं टीमला नव्या वैभवाला नेलं. या 149 टेस्टमधली त्याची प्रत्येक इनिंग हे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याचं एक वेगळं उदाहरण होती. नालंदा कॉलेजच्या मैदानापासून ते लॉर्डसच्या सेंच्युरी बोर्डापर्यंत वेगवेगळ्या वातावरणात त्याच्या बॅटनं नजाकत दाखवली. त्याचे कव्हर ड्राईव्हस बॉलला मैदानाच्या कोणत्याही दिशेला सहज पिटाळत असत. डिप मिडवेकटपासून ते फाईनलेगपर्यंत मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात तो सहजगत्या स्वीप करत असे. लेगसाईडला सापळा रचलाय हे लक्षात येताच हूक आणि पूलचा वापर करत ते चक्रव्यूह उधळून लावणारा महेला पाहून तो दिवस सार्थकी झाला अशी माझी अनेकदा भावना झालीय.

      महेला रंगात असताना त्यानं नुसता तटावलेला चेंडूही एक कलात्मक उंची देऊन जायचा. मैदानातल्या रिकाम्या जागा भरत त्यानं काढलेले 2 किंवा  3 रन्स प्रतिस्पर्धी टीममधल्या प्रत्येकालाच 'कामाला' लावत असत. मुंबईत वानखेडेवर वर्ल्ड कप फायनलमधलं महेलाचं शतक हे त्याच्या या सा-या बॅटिंग प्रकाराचं एक उदाहरण. या इनिंगमध्ये टीम अडचणीत असताना त्यानं डॉट बॉल खेळून काढले. नंतर एक-एक रन काढत धावफलक ढकलायला सुरु केलं. मैदानातल्या मोकळ्या जागा फिल्डर्स आणि कॅमेरामनला दाखवत दोन-दोन रन्स काढले. भारतीय फिल्डर्सला मैदानाच्या सर्व दिशांना पिटाळतं 3 रन्स वसूल केले. आणि नंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये गाडी सराईतपणे टॉप गियरला टाकत फोर, सिक्स आपल्या बॅटच्या कुंचल्यातून अलगद शिंपडले. धोनीच्या विजयी शायनिंग इनिंगपुढे महेलाची ही क्लासिकल इनिंग विस्मरणात गेली. पण ज्याला क्रिकेटपटूंच्या टेंपरामेंटचा अभ्यास करायचा त्यांना महेलाची ही वर्ल्ड कप फायनलमधली इनिंग गाळून पुढे जाणं अशक्य आहे.

         एक कॅप्टन म्हणूनही महेलानं आपली छाप सोडलीय. स्लीपमध्ये सदैव दक्ष असणा-या महेलानं टेस्टमध्ये  200 पेक्षा जास्त झेल घेतले. यापैकी केवळ मुरलीधरनच्या बॉलिंगवर 77 झेल घेतले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात यशस्वी बॉलर-फिल्डर जोडी आहे. स्लिपमध्ये महेला उभा राहत असला तरी त्याची संपूर्ण मैदानावर हुकमत असायची. नवोदित बॉलर्सला 'गोष्टी सांगेन  युक्तीच्या चार ' म्हणत सतत मार्गदर्शन करणारा महेलाकडे अनुभवी बॉलर्सला हवी तशी फिल्डिंग लावण्याचे स्वातंत्र्य दाखवणारी परिपक्वताही होती. प्रतिस्पर्धी बॅट्समनला फटके मारण्यापूर्वी विचार करायला लावेल अशी फिल्डिंग तो लावत असे. आपल्या सापळ्यात बॅट्समन अडकला की स्लिपमधून बॉलर्सच्या दिशेनं जल्लोष करत येणारा महेला हे मैदानावरचं नेहमीचं चित्र होतं. 2008 मध्ये त्यानं स्वत:हून कॅप्टनसी सोडली. त्यानंतर संगकारा आणि दिलशान कॅप्टन झाले. पण हे दोघही आणिबाणीच्या वेळी महेलावर विसंबून राहत असत. महेलानंही हातचं राखून न ठेवता त्यांच्या कॅप्टनसीमध्येही आपल्या नेतृत्वगुणाची झलक दाखवली. अगदी अलिकडे एंजलो मॅथ्यूजला कॅप्टन म्हणून ग्रृम करण्याची जबाबदारी कुणावर सोपवयाची असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी श्रीलंकन बोर्डाला एकच नाव आठवलं ते म्हणजे महेला जयवर्धने.

     
     बॉलिवूडमध्ये  लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन अशा जोड्या गाजल्या.या जोडीतल्या कोणत्याही एकाचं नाव घेतलं की दुसरं नाव आपसूक ओठावर येतं तसंच जयवर्धनेच्या खेळाचा ताळेबंद मांडताना संगकारा हे नाव नैसर्गिक रित्या मांडावं लागतं. जयवर्धने आणि संगकारा हे दोघे जर वकील, बिल्डर किंवा सी.ए. असते तर त्यांनी त्यांच्या भागिदारीतल्या फर्मचं नाव कदाचित जयवर्धने एण्ड संगकारा असोसिएट्स असं ठेवलं असंत. पण हे दोघं क्रिकेटपटू असल्यानं त्यांच्या एकत्रित फर्मचं नाव होतं श्रीलंकन क्रिकेट. डिसल्वा-रणतुंगा किंवा जयसूर्या- अट्टापटू अशा यशस्वी जोड्या श्रीलंकेनं यापूर्वी अनुभवल्या होत्या.पण जयवर्धने-संगकारा जोडीनं भागीदारीतला एक नवा उच्चांक प्रस्थापित केला.

        या जोडीनं 120 इनिंगमध्ये 6 हजार 554 रन्सची पार्टनरशिप केली. क्रिकेटच्या इतिहासात केवळ ( सचिन -द्रविड 143 इनिंगमध्ये 6 हजार 920 रन्सची पार्टनरशिप) ही जोडी महेला-संगाच्या पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये सिंहली स्पोर्ट क्लबच्या मैदानात या जोडीनं 624 रन्सची पार्टनरशिप केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली ही कोणत्याही विकेटसाठी एका इनिंगमध्ये केलेली सर्वोच्च पार्टनरशिप आहे. याच इनिंगमध्ये महेलानं आपल्या कारकिर्दीमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 374 नोंदवली. गेली दहा वर्ष श्रीलंकन बॅटिंगचा टेस्ट क्रिकेटमध्ये भार पेलण्याचं काम या जोडीनं केलंय. हेन्स-ग्रिनिच, हेडन-लॅँगर, पॉन्टिंग-लॅँगर , द्रविड-लक्ष्मण, सेहवाग-गंभीर, अमला-कॅलिस, किंवा स्ट्रॉस-कूक या सर्व बेस्ट पयेरला मागे टाकत या जोडीनं ही कामगिरी साध्य केलीय.

       घरच्या मैदानावरचा सिंघम अशी महेलाची हेटाळणी नेहमीच केली गेली. पण जे पिच मुरलीची बॉलिंग सुरु असताना  फिरकीचा चक्रव्यूह वाटयचे तेच महेलाची बॅटिंग सुरु असतना अगदी पाटा वाटावे इतके निर्जीव भासायचे. यात महेलाच्या सर्वांगसहज बॅटिंगचा वाटा कसा नाही ? अगदी सर डॉन ब्रॅडमनपासून प्रत्येक महान बॅट्समनचे सर्वाधिक रन्स हे  आपल्या होम पिचवरच झाले आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हा जर भारतीय उपखंडताल्या खेळाडूंच्या यशस्वीतेचा निकष मानला गेला ( य़ापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेत महेलाला टेस्ट सेंच्युरी झळकवता आली नाही ) तर उपखंडा बाहेरचे खेळाडू भारतात किती यशस्वी झाले याचा अभ्यास करुन क्रिकेटमधले महानतेचे निकष पुन्हा एकदा लिहायला हवेत.

              लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर जेंव्हा हल्ला झाला त्यावेळी घरच्यांचा विचार करण्यापूर्वी आपले टीममधले सर्व कितपत सुखरुप आहेत, याचा विचार आपल्या मनात आल्याचं महेलानं त्यानंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं.  जखमी खेळाडूंची वैद्यकीय मदत आणि या जीवघेण्या हल्ल्यानंतर घरच्यांचा विचार न करता टीममधल्या सहका-यांचे मनोधैर्य खचणार नाही याची काळजी वाटणं यासाठी तुमच्या मानसिकतेमध्ये गौतम बुद्धांच्या मानसिकतेचा काही तरी अंश असायला हवा. महेला जयवर्धनेच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर श्रीलंकन क्रिकेटचा बुद्ध ही उपमा त्या निश्चितच चपखलपणे लागू होते.

     
         

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...