Wednesday, October 5, 2011

एक होता 'युवराज' !


परक्रमी राजा , त्या राजाने लढलेली युद्ध त्याचा दरबार त्याला असलेले अंतर्गत आणि बाह्य शत्रू त्या राजाची मुलं त्याला मुलांमध्ये असलेली स्पर्धा त्यातही ती सावत्र भावंड असतील तर त्यांच्यामध्ये सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्याची असलेली तयारी हे विषय काही नवे नाहीत. महाभारतापासून ते अगदी काल-परवा प्रसिद्ध झालेल्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा हाच गाभा राहिला आहे. किरण नगरकर यांनी लिहलेल्या 'ककल्ड' या पुस्तकाची कथा आहे एका युवराजाची. बहुतेकांना संत मीराबाई माहिती असतात. भक्ती परंपरेत या मीरेला मोठं स्थान आहे. या मीरेचे सासरे आणि सर्वात शक्तीशाली राजपूत राजे राणा संग यांच्या परक्रमांच्या आणि त्यांना प्रत्येक युद्धात झालेल्या जखमांच्या अख्यायिकाही अनेकांना माहिती असतील. मात्र या मीरेचा पती या राज संग यांचा सर्वात ज्येष्ठ मुलगा भोजराज याचे काय ? काळाचे पुढे बघणारा, कोणत्याही शूर राजपुतांपेक्षा शौर्यामध्ये काकणभरही कमी नसलेला हा युवराज नेमकं काय रसायन होतं हे कुणालाचं माहिती नाही. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला घडलेली ही युवराजाची कथा इतिहासात हरवलेली आहे. इतिहासाने ज्याचे अस्तित्वच पुसून टाकले त्या युवराजाला प्रकाशात आणण्याचे काम नगरकरांनी आपल्या या पुस्तकात केले आहे.


            हा कालखंड आहे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा. राणा संग यांच्या नेतृत्वाखालील मेवाड हे एक सामर्थ्यशाली राज्य त्या काळी हिंदूस्थानात होते. मेवाडच्या या वैभवशाली राज्याचा वारस भावी राणा म्हणजे युवराज. भूतकाळापासून बोध, वास्तवाचे भान आणि भविष्यकाळाचा अचूक वेध घेण्याची शक्ती ह्या युवराजामध्ये आहे. मेवाडला अधुनिक युगाला साजेसं घडवणे हाच त्याचा ध्यास आहे. याबबत त्याचे सतत चिंतन सुरु असते. राजे, सरदार, राण्या, दास-दासी अगदी हिजडे अशा प्रचंड मोठ्या गदारोळातही हा युवराज एकाकी आहे. त्याचा बायको ( हिरवे डोळेवाली हे युवराजनं ठेवलेलं तिच नाव ) त्याला जवळ येऊ देत नाही. अगदी  पहिल्याच रात्री  आपला 'संबध' शक्य नाही असे त्याला स्पष्टपणे सांगते. तो असह्य होतं. अगतिक होतं, बेचैन होतं मात्र कधीही तिच्यावर बळजबरी करत नाही तिच्यावर पुरुषी वर्चस्व गाजवत नाही. त्यामुळे षंढ हा शिक्का त्याच्या कपाळावर बसतो. त्याची सावत्र आई राणी कर्मावती आणि सावत्र भाऊ विक्रमादित्य त्याचं हे खासगी दु;ख जगाच्या वेशीवर टांगतात. वेगवेगळ्या अख्यायिकांमधून युवराज बदनाम होत राहील याची काळजी  घेत असतात.


             भारतीय परंपरेत 'परमेश्वर पियकर' असणे ह्याला मोठे महत्व आहे. त्याला खूप मोठा संदर्भ आहे. मात्र ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या भावी आयुष्याची स्वपनं रंगवणा-या शक्तीशाली सम्राटाच्या कर्तबगार मुलाच्या आयुष्यात जेव्हा अशी  परमेश्वराला प्रियकर मानणारी स्त्री येते तेंव्हा त्याची काय अवस्था होत असेल ? आपला 'प्रतिस्पर्धी ' हा दुसरा कोणी नसून  खुद्द श्रीकृष्ण ( बन्सीबाज ) आहे हे जेंव्हा समजते त्यावेळी तो अस्वस्थ होऊन जातो. एका पतीचं हे अस्वस्थ होणं  नगरकरांनी अत्यंत तपशीलवार आणि समर्थपणे उभे केले  आहे ते मुळातूनच वाचायला हवे.

    सर्वांच्या गोतावळ्यात राहणा-या या युवराजाचा सखा असतो तो म्हणजे श्रीकृष्ण. ज्याच्या मनात आपल्या प्रतिमेविषयी कसलाच न्यूनगंड नाही असा देव. युवराजाला सतत वाटायचं की श्रीकृष्ण हा एक नाही किमान तीनचार तरी श्रीकृष्ण होते. तो अष्टपैलू होता. त्याच्या व्यक्तिमत्वावर नेमकं बोट ठेवून ' हाच तो ' म्हणता येत नसे.  आपली सारी नीतीतत्वं वेळ पडली तर तो बाजूला ठेवायचा किंवा बदलायचा किंवा विसरुन जायचा.

           युवराजाची ही श्रीकृष्ण भक्ती आंधळी नव्हती. तर आपल्या या आदर्श पुरुषाचे वागणे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी किती जुळणारे आहे याचा तो सतत शोध घेत असे. राजपूत शूर आणि पराक्रमी असूनदेखील आपल्या शौर्याच्या पुराव्यासंबंधी कायम साशंक का ? राजपुतांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान स्वत:च बलिदान करण्यातचं का मानला जायचा ? नामर्द ठरवण्याची भीती त्यांना सतत का भेडसावयची ? हे प्रश्न त्याला कायम पडत असतं.

    रणांगणात पाठ फिरवायची नाही हा राजपुतांचा बाणा. युवराजांची तत्वे मात्र  अगदी 'रणछोडदास' च्या परंपरेतली. शेपटी पायात घालून माघार घेण्यात काहीच कमीपणा नाही हे त्याला वाटत असे. कितीही चिथवलं तरी योग्य वेळेपर्यंत शांत राहणे हीच हुशारी आहे. युद्ध हा पर्यायी उपाय नव्हे तर सर्व वाटाघाटी फसल्या तरच वापरायचा अंतिम मार्ग हे त्याचं तत्व होतं. बहुतेक वेळा युद्धामुळे हाती काहीच लागत नाही आणि जिथून सुरुवात झाली आहे त्याच ठिकाणी तुम्ही येऊन पोचता. युद्ध करायचंच असल्याच आपल्या राजकीय प्रदेशात आणि अर्थिक स्थितीत प्रचंड आणि जमल्यास कायमस्वरुपी फरक पडणार असेल तरच करावे नाहीतर स्वस्थपणे घरी बसून शेजा-याबरोबर शांतीपूर्ण संबंध जोपासावेत हे युवराजांचे युद्धासंबंधीचे विचार केवळ पंधराव्या नाही तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही अगदी समर्पक आहेत.

        यु्द्धासंबंधी इतके टोकाचे विचार असलेल्या या युवराजाकडे ईडरच्या लढाईचे नेतृत्व सोपवण्यात येते. त्यावेळी तो आपली अपारंपरिक युद्धनिती सैनिकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतं. त्या लढाईत अगदी कमीत कमी हानी होऊन राजपुतांना प्रचंड असा विजय मिळतो. त्याचे सारे सैन्य त्याला डोक्यावर घेते मात्र राज्याच्या राजधानीत त्याचं भ्याड म्हणत काळे निशान फडकवत स्वागत होतं. हा सारा अपमान गिळून तो मेवाडच्या भल्यासाठी काम करत राहतो. सांडपाणी आणि पाणीपुरवठा व्यवस्था हा त्याचा सर्वात आवडीचा विषय.
     
               गटार आणि सांडपाण्याच्या निच-यासंबंधी कोणी फारशी आस्था दाखवत नाही. पण त्यावर गंभीर उपाय करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीतरी उपाय करण्याच राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं नाही तर लवकरच आम्ही सारे स्वत:च्याच घाणीत वाहून जाणार आहोत.असा इशारा या युवराजानं पंधराव्या शतकात दिला होता. आज याला सहाशे वर्षे झाली तरीही या प्रश्नाकडे बघण्याचा आपल्या राज्यकर्त्यांचा दृष्टीकोण बदललेला दिसत नाही.

         आदर्श राजाचे महत्वाचे लक्षण म्हणजे त्याची दृष्टी ही काळाच्या पुढे असवी लागते. शिवाजी महाराज किंवा जे-जे आदर्श राजे होऊन गेले ते सर्व याच परंपरेतले होते.  युवराजही याच परंपरेतला.त्याची गुप्तचर यंत्रणा भक्कम होती. हिंदूकूश पर्वताच्या पलिकडे राज्य करणा-या बाबराच्या दरबारापर्यंत त्याच्या हेरांनी जाळं विणलेलं होतं. बाबराच्या रोजनिशीतल्या चिठ्टीचा अर्थ काढून तो लवकरच हिंदूस्थानावर हल्ला करणार आहे त्याचा आता नुसताच हल्ला करण्याचा नाही तर दिल्लीची गादी बळकावण्याचा विचार आहे असं भाकित या युवराजाने व्यक्त केलं होतं.

        दिल्लीची राजसत्ता दुबळी झालेली असताना ती राजपुतांनी ताब्यात घ्यावी हा त्याचा सल्ला धुडकावला जातो. बाबरासोबतचे युद्ध  त्याच्या इतकी अधुनिक शस्त्रे जमा होत नाही तो पर्यंत पुढे ढकला हा त्याचा सल्लाही दुर्लक्षित राहतो. आपल्या सामर्थ्यावर फाजिल आत्मविश्वास असलेले राणा संग यांच्या नेतृत्वाखालील राजपुत सैन्य बाबराशी लढाईसाठी मैदानात उभं राहतं. युद्धात उतरण्यापूर्वी शत्रूच्या बारीक सारिक सवयींचा योग्य अभ्यास असायला हवं हा या युवराजाने दिलेला सल्ला हे राजपुत सरदार फेटाळून लावतात. परिणामी प्रचंड तयारीच्या आणि एकजिनसी अशा मुगल सैन्यासमोर या राजपूत सैन्याचा एकतर्फी पराभव होतो. भारतामध्ये मोगल सम्राज्याचा पाया रचला जातो.

             जो एक महापरक्रमी असा राजा होऊ शकला असता त्याचा एक सर्वस्व गमावलेला युवराज अशा अवस्थेत शेवट होतो.. काळाच्या पुढे बघणारा हा युवराज आपल्याला लाभला होता. मात्र त्याच्या खडतर नशिबामुळे त्याला ओळखणारा समाज या देशाला मिळू शकला नाही. युवराजच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या शोकांतिकेपेक्षा आपल्या देशाची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही एकच जाणीव किरण नगरकरांचे 'ककल्ड' वाचत असताना सतत अस्वस्थ करत असते.

6 comments:

Gireesh Mandhale said...

Good Article! Informative!
Should read this book now..

Niranjan Welankar said...

जोरदार. भन्नाट!! खूपच छान आहे लेख. आवडला. सर्वच अप्रतिम आहे. विषय, मांडणी, माहिती, रसग्रहण... असे आणखे लेख लाभले तर अजून मजा येईल. जोरदार. युवराजच्या शैलीतला हा लेख आहे. आणि त्याच्या विषयाच्या दुर्मिळतेमुळे तो आणखी महत्त्वाचा ठरतो. भारी.

pmvaria said...

very nicely written...

Shrijeet said...

good

हेरंब said...

अप्रतिम !! एका सुंदर पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय.. खरंच काहीच माहित नव्हतं याबद्दल !! विशलिस्ट मधे अॅड केलं !

santosh gore said...

Onkar, chaan mahiti dilis.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...