Thursday, October 27, 2011

पुस्तक नव्हे मसालापट !

 
गोपाळ हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि जमीनीच्या वादाने खंगलेल्या निवृत्त शिक्षकाचा मुलगा. आरती ही एका जिल्हाअधिका-याची मुलगी. दोघेही वर्गमित्र. इयत्ता पाचवीमध्ये असताना गोपाळ आरतीच्या डब्यातला चॉकलेट केक चोरतो...गोपाळची चोरी पकडली जाते गोपाळला शिक्षा होते. मात्र या घटनेनंतर गोपाळ आणि आरती  मित्र बनतात. वेगळ्या आर्थिक आणि समजिक स्तरातील गोपाळ आणि आरती एकमेकांचे अगदी जिवलग मित्र बनतात. त्यानंतर गोपाळ आरतीकडे आकर्षिला जातो

आरती आणि गोपाळ यांच्या या कथेतला तिसरा कोन आहे तो म्हणजे राघव. या दोघांचा वर्गमित्र गोपाळ गरीब आणि आरती श्रीमंत असल्यामुळे उरलेला तिसरा स्तर याच्या वाटेला आलाय अर्थात राघव आहे  मध्यमवर्गीय. AIEEE आणि JEE सारखी खडतर परीक्षा पास झालेला स्कॉलर विद्यार्थी. इंजिनियर झाल्यानंतर इन्फोसिसची नोकरी नाकारत  पत्रकारिता हा व्यवसाय निवडणारा ध्येयवादी तरुण. हा राघव  आरतीच्या प्रेमात पडतो तर आरती त्याक्षणी साधारण असलेल्या गोपाळच्या ऐवजी स्कॉलर म्हणून ओळखल्या जाणा-या राघवकडे आकर्षिली जाते.आरतीने आपल्याला नाकारुन राघवचा स्वीकार केला आहे ही बाब गोपाळला  अस्वस्थ करत असते.त्यामुळे गोपाळ सतत आपण राघवपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. परिस्थितीने गांजलेल्या आणि प्रेमात आपटी खालेल्या गोपाळची भेट स्थानिक आमदाराशी होते आणि त्याची परिस्थिती बदलू लागते. गोपाळची जमिन आणि आमदाराचा पैसा याचा संगम होऊन गंगा टेक हे एक नवे खासगी कॉलेज तयार होते.कोणतीही डीग्री नसलेला गोपाल या कॉलेजचा संचालक होतो. राघववर मात करण्याचे त्याचे प्रयत्न सफल होत आलेले असतानाच गोपालला आपल्या चुकीच्या वागण्याचा साक्षात्कार होतो. अत्यंत नाट्यमय रित्या तो स्वत:ला आरती समोर खलनायक ठरवतो. ज्या राघवला त्याने देशोधडीला लावलेले असते त्याला पुन्हा एकदा स्थिर होण्यासाठी पडद्याआडून मदत करतो आरती आणि राघव यांना पुन्हा 'एकत्र' आणण्यात महत्वाची भूमिका बजावतो. नायक आणि नायिकांचे मिलन होतो आणि हे मिलन घडवून आणल्याबद्दल खलनायकालाही सहानभूती मिळते. कोणत्याही मसाला हिंदी चित्रपटला शोभेल असे हे कथानक आहे  'रिव्ह्युलेशन २०२०'  या चेतन भगत यांच्या ताज्या पुस्तकाचे. 

दोन मित्र आणि त्यांची एक कॉमन मैत्रीण यातल्या कथानकाचे नाव Revoltion 2020 कसे असू शकेल ? हे पुस्तक आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे. मार्कांच्या उतरंडीवर आधारित असलेल्या या शिक्षणपद्धतीत सर्वात वरच्या १० टक्के स्तरातीलच मुले आपल्याला हवे ते शिकू शकतात. पण बाकीच्या ९० टक्क्यांचे काय ?  IIT सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये  आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची सुरु असलेली धडपड.सुरु असते. या पुस्तकातील गोपालचे वडील ही त्याच प्रकारातले आहेत. ते गोपाल पहिल्या प्रयत्नात प्रवेश परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात अपयशी होतो. त्यामुळे ते गोपालला  कोटाच्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवतात. कोटामधले कोचिंग क्लासेसची रचना, तिथली प्रवेश पद्धती,कोचिंग क्लासेसवर आधारित तेथिल  अर्थव्यवस्था हा प्रकार पुस्तकात चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गोपाल दुस-या प्रयत्नातही प्रवेश परीक्षेत चांगले मार्क्स घेण्यात अपयशी होतो. अपयशी झालेला गोपाल वारणसीमध्ये परततो आणि चेतन भगतांची गा़डी पुन्हा एकदा गोपाल आरती आणि  अधूनमधून राघव या स्टेशनवर फिरत राहते.

           या पुस्तकाचा नायक ( म्हणजे ज्याला शेवटी नायिका मिळते  तो ) राघव याला क्रांती घडवायची आहे. तो त्यासाठी इंजिनयर असूनही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पत्रकारिता सुरु करतो. बड्या वृत्तपत्रातील नोकरी गेल्यानंतर स्वत:चे वृत्तपत्र सुरु करतो. या वृत्तपत्राच्या माध्यमातून शिक्षण  क्षेत्रातील भ्रष्टाचार बाहेर काढतो. त्यामुळे स्थानिक आमदाराची जेलमध्ये रवानगी होते. हे सगळे ठिक. आमदाराशी पंगा घेतल्यामुळे त्याचा पेपर उद्धवस्त होतो हे देखील मान्य. मात्र नंतर ज्या वृत्तपत्रामधून आपल्याला काढून टाकण्यात आले तेच वृत्तपत्र आपल्याला परत का बोलावते ? हे त्याला समजत नाही.ज्या वृत्तपत्राने दबावामुळे  आपल्याला काढून टाकले त्याच वृत्तपत्राने आपल्याला परत घेतले यामागे काही राजकारण असू शकते् हे त्याला का वाटत नाही ?  गोपाल आणि आरतीमधले प्रसंग त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर होणा-या भेटी यामध्ये इतकी पाने खर्ची करण्यात आली आहेत की त्यामुळे राघवच्या आयुष्यात  घडणारी ही  स्थित्यंरे अत्यंत घाई घाईने उरकण्यात आली आहेत असे वाटते. 

एखाद्या व्यवसायिक चित्रपटामध्ये ज्या प्रमाणे नाच गाणे, नायक नायिकांमधले भावोत्तकट प्रसंग यात बरीच रिळे खर्च केली जातात. ही सर्व दृश्य पिटातल्या प्रेक्षकांना सुखावणारी असतात. त्यामुळे गल्लाही चांगला जमतो. मात्र त्यामुळे एक सशक्त चित्रपट पाहिल्याचे समाधान सच्चा रसिकांना होत नाही. चेतन भगतच्या या पुस्तकाचेही असेच आहे. 
   
              अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचार हा विषय तरुणाईच्या अजेंड्यावर आला आहे. या  आंदोलनाच्या काळात चेतन यांनी  ठाम समर्थन केले होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार ही मध्यवर्ती थीम असलेलले पुस्तक असा प्रचार करत चेतन भगत यांचे नवे पुस्तक बाजारात आल्याने त्याच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या. मात्र या अपेक्षा तू पूर्ण करु शकलेला नाही. हे पुस्तक भ्रष्टाचार , नवी क्रांती याबाबतचे पुस्तक नसून एका मुलीला प्राप्त करण्यासाठी दोन मित्रांमध्ये असणा-या स्पर्धेबाबतचे वाटते.  

फाईव्ह पॉईंट समवन या सारख्या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे चेतन भगत हे लेखक आहेत. सहसा पुस्तके वाचण्याच्या फंदात न पडणारे अनेक तरुण त्यांचे पुस्तक आवडीने वाचतात. त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तरुणाईची 'भाषा' समजणारा लेखक म्हणून चेतन भगत यांचे नाव घेतले जाते. त्याच चेतन भगत यांनी  निराश केले आहे. मळलेली वाट सोडून  एका नव्य वाटेवर चालणारी, प्रस्थापित रचनेच्या विरुद्ध काही तरी वेगळे करण्याची धमक दाखवणा-या व्यक्ती हे आजच्या तरुणाईचे आयडॉल आहेत. अण्णा हजारे किंवा स्टीव्ह जॉब्ज यांना गेल्या काही महिन्यात ज्या पद्धतीने तरुणाईने उचलून धरले त्यातून हे सिद्ध होते. चेतन भगत यांनाही आपल्या या पुस्तकातून वास्तवदर्शी पुस्तक लिहण्याची चांगली संधी होती. मात्र त्या मार्गावर फार न जाता केवळ त्या वेगळ्या वाटेचे मार्केटिंग करत त्यांनी एक साचेबद्ध पुस्तक सर्वांसमोर ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकेल अशा  एका नव्या मसालापटाची कथा आपण या पुस्तकात वाचली इतकेच समाधान या पुस्तकातून होऊ शकेल. 
 

Wednesday, October 5, 2011

एक होता 'युवराज' !


परक्रमी राजा , त्या राजाने लढलेली युद्ध त्याचा दरबार त्याला असलेले अंतर्गत आणि बाह्य शत्रू त्या राजाची मुलं त्याला मुलांमध्ये असलेली स्पर्धा त्यातही ती सावत्र भावंड असतील तर त्यांच्यामध्ये सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्याची असलेली तयारी हे विषय काही नवे नाहीत. महाभारतापासून ते अगदी काल-परवा प्रसिद्ध झालेल्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा हाच गाभा राहिला आहे. किरण नगरकर यांनी लिहलेल्या 'ककल्ड' या पुस्तकाची कथा आहे एका युवराजाची. बहुतेकांना संत मीराबाई माहिती असतात. भक्ती परंपरेत या मीरेला मोठं स्थान आहे. या मीरेचे सासरे आणि सर्वात शक्तीशाली राजपूत राजे राणा संग यांच्या परक्रमांच्या आणि त्यांना प्रत्येक युद्धात झालेल्या जखमांच्या अख्यायिकाही अनेकांना माहिती असतील. मात्र या मीरेचा पती या राज संग यांचा सर्वात ज्येष्ठ मुलगा भोजराज याचे काय ? काळाचे पुढे बघणारा, कोणत्याही शूर राजपुतांपेक्षा शौर्यामध्ये काकणभरही कमी नसलेला हा युवराज नेमकं काय रसायन होतं हे कुणालाचं माहिती नाही. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला घडलेली ही युवराजाची कथा इतिहासात हरवलेली आहे. इतिहासाने ज्याचे अस्तित्वच पुसून टाकले त्या युवराजाला प्रकाशात आणण्याचे काम नगरकरांनी आपल्या या पुस्तकात केले आहे.


            हा कालखंड आहे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा. राणा संग यांच्या नेतृत्वाखालील मेवाड हे एक सामर्थ्यशाली राज्य त्या काळी हिंदूस्थानात होते. मेवाडच्या या वैभवशाली राज्याचा वारस भावी राणा म्हणजे युवराज. भूतकाळापासून बोध, वास्तवाचे भान आणि भविष्यकाळाचा अचूक वेध घेण्याची शक्ती ह्या युवराजामध्ये आहे. मेवाडला अधुनिक युगाला साजेसं घडवणे हाच त्याचा ध्यास आहे. याबबत त्याचे सतत चिंतन सुरु असते. राजे, सरदार, राण्या, दास-दासी अगदी हिजडे अशा प्रचंड मोठ्या गदारोळातही हा युवराज एकाकी आहे. त्याचा बायको ( हिरवे डोळेवाली हे युवराजनं ठेवलेलं तिच नाव ) त्याला जवळ येऊ देत नाही. अगदी  पहिल्याच रात्री  आपला 'संबध' शक्य नाही असे त्याला स्पष्टपणे सांगते. तो असह्य होतं. अगतिक होतं, बेचैन होतं मात्र कधीही तिच्यावर बळजबरी करत नाही तिच्यावर पुरुषी वर्चस्व गाजवत नाही. त्यामुळे षंढ हा शिक्का त्याच्या कपाळावर बसतो. त्याची सावत्र आई राणी कर्मावती आणि सावत्र भाऊ विक्रमादित्य त्याचं हे खासगी दु;ख जगाच्या वेशीवर टांगतात. वेगवेगळ्या अख्यायिकांमधून युवराज बदनाम होत राहील याची काळजी  घेत असतात.


             भारतीय परंपरेत 'परमेश्वर पियकर' असणे ह्याला मोठे महत्व आहे. त्याला खूप मोठा संदर्भ आहे. मात्र ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या भावी आयुष्याची स्वपनं रंगवणा-या शक्तीशाली सम्राटाच्या कर्तबगार मुलाच्या आयुष्यात जेव्हा अशी  परमेश्वराला प्रियकर मानणारी स्त्री येते तेंव्हा त्याची काय अवस्था होत असेल ? आपला 'प्रतिस्पर्धी ' हा दुसरा कोणी नसून  खुद्द श्रीकृष्ण ( बन्सीबाज ) आहे हे जेंव्हा समजते त्यावेळी तो अस्वस्थ होऊन जातो. एका पतीचं हे अस्वस्थ होणं  नगरकरांनी अत्यंत तपशीलवार आणि समर्थपणे उभे केले  आहे ते मुळातूनच वाचायला हवे.

    सर्वांच्या गोतावळ्यात राहणा-या या युवराजाचा सखा असतो तो म्हणजे श्रीकृष्ण. ज्याच्या मनात आपल्या प्रतिमेविषयी कसलाच न्यूनगंड नाही असा देव. युवराजाला सतत वाटायचं की श्रीकृष्ण हा एक नाही किमान तीनचार तरी श्रीकृष्ण होते. तो अष्टपैलू होता. त्याच्या व्यक्तिमत्वावर नेमकं बोट ठेवून ' हाच तो ' म्हणता येत नसे.  आपली सारी नीतीतत्वं वेळ पडली तर तो बाजूला ठेवायचा किंवा बदलायचा किंवा विसरुन जायचा.

           युवराजाची ही श्रीकृष्ण भक्ती आंधळी नव्हती. तर आपल्या या आदर्श पुरुषाचे वागणे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी किती जुळणारे आहे याचा तो सतत शोध घेत असे. राजपूत शूर आणि पराक्रमी असूनदेखील आपल्या शौर्याच्या पुराव्यासंबंधी कायम साशंक का ? राजपुतांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान स्वत:च बलिदान करण्यातचं का मानला जायचा ? नामर्द ठरवण्याची भीती त्यांना सतत का भेडसावयची ? हे प्रश्न त्याला कायम पडत असतं.

    रणांगणात पाठ फिरवायची नाही हा राजपुतांचा बाणा. युवराजांची तत्वे मात्र  अगदी 'रणछोडदास' च्या परंपरेतली. शेपटी पायात घालून माघार घेण्यात काहीच कमीपणा नाही हे त्याला वाटत असे. कितीही चिथवलं तरी योग्य वेळेपर्यंत शांत राहणे हीच हुशारी आहे. युद्ध हा पर्यायी उपाय नव्हे तर सर्व वाटाघाटी फसल्या तरच वापरायचा अंतिम मार्ग हे त्याचं तत्व होतं. बहुतेक वेळा युद्धामुळे हाती काहीच लागत नाही आणि जिथून सुरुवात झाली आहे त्याच ठिकाणी तुम्ही येऊन पोचता. युद्ध करायचंच असल्याच आपल्या राजकीय प्रदेशात आणि अर्थिक स्थितीत प्रचंड आणि जमल्यास कायमस्वरुपी फरक पडणार असेल तरच करावे नाहीतर स्वस्थपणे घरी बसून शेजा-याबरोबर शांतीपूर्ण संबंध जोपासावेत हे युवराजांचे युद्धासंबंधीचे विचार केवळ पंधराव्या नाही तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही अगदी समर्पक आहेत.

        यु्द्धासंबंधी इतके टोकाचे विचार असलेल्या या युवराजाकडे ईडरच्या लढाईचे नेतृत्व सोपवण्यात येते. त्यावेळी तो आपली अपारंपरिक युद्धनिती सैनिकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतं. त्या लढाईत अगदी कमीत कमी हानी होऊन राजपुतांना प्रचंड असा विजय मिळतो. त्याचे सारे सैन्य त्याला डोक्यावर घेते मात्र राज्याच्या राजधानीत त्याचं भ्याड म्हणत काळे निशान फडकवत स्वागत होतं. हा सारा अपमान गिळून तो मेवाडच्या भल्यासाठी काम करत राहतो. सांडपाणी आणि पाणीपुरवठा व्यवस्था हा त्याचा सर्वात आवडीचा विषय.
     
               गटार आणि सांडपाण्याच्या निच-यासंबंधी कोणी फारशी आस्था दाखवत नाही. पण त्यावर गंभीर उपाय करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीतरी उपाय करण्याच राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं नाही तर लवकरच आम्ही सारे स्वत:च्याच घाणीत वाहून जाणार आहोत.असा इशारा या युवराजानं पंधराव्या शतकात दिला होता. आज याला सहाशे वर्षे झाली तरीही या प्रश्नाकडे बघण्याचा आपल्या राज्यकर्त्यांचा दृष्टीकोण बदललेला दिसत नाही.

         आदर्श राजाचे महत्वाचे लक्षण म्हणजे त्याची दृष्टी ही काळाच्या पुढे असवी लागते. शिवाजी महाराज किंवा जे-जे आदर्श राजे होऊन गेले ते सर्व याच परंपरेतले होते.  युवराजही याच परंपरेतला.त्याची गुप्तचर यंत्रणा भक्कम होती. हिंदूकूश पर्वताच्या पलिकडे राज्य करणा-या बाबराच्या दरबारापर्यंत त्याच्या हेरांनी जाळं विणलेलं होतं. बाबराच्या रोजनिशीतल्या चिठ्टीचा अर्थ काढून तो लवकरच हिंदूस्थानावर हल्ला करणार आहे त्याचा आता नुसताच हल्ला करण्याचा नाही तर दिल्लीची गादी बळकावण्याचा विचार आहे असं भाकित या युवराजाने व्यक्त केलं होतं.

        दिल्लीची राजसत्ता दुबळी झालेली असताना ती राजपुतांनी ताब्यात घ्यावी हा त्याचा सल्ला धुडकावला जातो. बाबरासोबतचे युद्ध  त्याच्या इतकी अधुनिक शस्त्रे जमा होत नाही तो पर्यंत पुढे ढकला हा त्याचा सल्लाही दुर्लक्षित राहतो. आपल्या सामर्थ्यावर फाजिल आत्मविश्वास असलेले राणा संग यांच्या नेतृत्वाखालील राजपुत सैन्य बाबराशी लढाईसाठी मैदानात उभं राहतं. युद्धात उतरण्यापूर्वी शत्रूच्या बारीक सारिक सवयींचा योग्य अभ्यास असायला हवं हा या युवराजाने दिलेला सल्ला हे राजपुत सरदार फेटाळून लावतात. परिणामी प्रचंड तयारीच्या आणि एकजिनसी अशा मुगल सैन्यासमोर या राजपूत सैन्याचा एकतर्फी पराभव होतो. भारतामध्ये मोगल सम्राज्याचा पाया रचला जातो.

             जो एक महापरक्रमी असा राजा होऊ शकला असता त्याचा एक सर्वस्व गमावलेला युवराज अशा अवस्थेत शेवट होतो.. काळाच्या पुढे बघणारा हा युवराज आपल्याला लाभला होता. मात्र त्याच्या खडतर नशिबामुळे त्याला ओळखणारा समाज या देशाला मिळू शकला नाही. युवराजच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या शोकांतिकेपेक्षा आपल्या देशाची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही एकच जाणीव किरण नगरकरांचे 'ककल्ड' वाचत असताना सतत अस्वस्थ करत असते.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...