Sunday, August 7, 2011

भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक

तो क्रिकेटचा देव मानला जात नाही. किंवा कॅप्टन कूल म्हणूनही ओळखला जात नाही. त्यानं कधी एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर्स मारले नाहीत... किंवा त्याचा कधी  ऑफ साईडचा महाराजा म्हणून गौरव झाला नाही. तरीही भारतीय क्रिकेट टीम जेंव्हा जेंव्हा संकटात सापडली तेंव्हा  गल्ली पासून दिल्ली पर्यंतचे क्रिकेट चाहते आणि ्अगदी निवड समितीलाही एका क्रिकेटपटूची आठवण होते. तो म्हणजे संकटमोचक राहुल द्रविड. भारतीय क्रिकेटचा 'सच्चा सेवक' ही ओळख असलेला राहुल द्रविड लवकरच वन-डे क्रिकेटमधून रिटायर  होणार आहे.


      दिलेली प्रत्येक जबाबदारी आपलं सर्वस्व ओतून पार पाडणा-या द्रविडचा निवड समितीनं अगदी यूझ एण्ड थ्रो अशा पद्धतीनं वापर केला. वन-डे क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन्स काढूनही याची कायम टेस्ट प्लेयर अशीच ओळख. आता इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर अवघ्या चार महिन्यात धोनीची ब्रिगेड जमिनीवर आलीय. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर  क्रिकेटमध्ये 'भारतीय युग ' अवतरलं अशी स्वप्न पाहणा-यांना आता ही टीम इंग्लंड विरुद्ध 50 ओव्हर्स बॅटिंग करेल ना अशी शंका वाटू लागलीय. त्यामुळेच या टीमचं बुडत जहाज वाचवण्यासाठी जवळपास दोन वर्षांनंतर कुणालाही कल्पना नसताना ( अगदी राहुल द्रविडलाही ) त्याचा वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला.  निवड समितीच्या या Use & Throw पॉलिसीला द्रविडनं आपली निवृ्ती जाहीर करुन चपराक लगावलीय.

          निवड समितीलच्या लहरी वृत्तीची किती उदाहरणं द्यावीत... 2003 च्या वर्ल्ड कपपूर्वी अगदी अचानक राहुल द्रविडवर विकेट किपरची जबाबदारी सोपवण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट किपर  हा एक स्पेशलाईजड जॉब आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट पिचवर आणि तेही वर्ल्ड कप सारख्या अतिशय महत्वाच्या स्पर्धेत अशी जबाबदारी द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या जागेवर दुसरा एखादा क्रिकेटपटू असता तर त्यानं ही धोक्याची जबाबदारी  निश्चितच नाकारली असती. पण भारतीय क्रिकेटची सेवा करणे हे एकमेव तत्व घेऊन खेळणा-या द्रविडनं हा  धोका स्विकारला. क्रिकेटवेड्या देशात वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एखादी चूक आपलं करियर उद्धवस्त करु शकते हे माहिती असूनही ( हा वर्ल्ड कप आपण जिंकला... मात्र अजूनही दक्षिण  आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या ओव्हर्समुळे कित्येक जण आशिष नेहराला माफ करायला तयार नाहीत ) द्रविडनं विकेट किपिंगचे ग्लोव्ज हातामध्ये चढवले आणि अगदी फायनलपर्यंत आपली जबाबदारी नेटानं आणि जिद्दीनं पार पाडली.

        त्यानंतर दोनच वर्षात राहुल द्रविड कॅप्टन झाला. तिस-या क्रमांकावरचा त्या काळातला सर्वात यशस्वी बॅट्समन म्हणून त्याची ओळख होती. तरीही त्यानं टीमच्या रणणिनीताचा भाग म्हणून स्वत:च पाचव्या क्रमांकावर डिमोशन केलं. वन-डे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याची संधी ही पहिल्या तीन बॅट्समनलाच मिळते. हे त्याला निश्चितच माहिती होतं. तरीही त्यानं खालचा क्रमांक स्विकारला. त्याकाळात अगदी दिनेश कार्तिक, रॉबीन उथ्थप्पा या सारख्या नवोदित बॅट्समन्सनही राहुल द्रविडपेक्षा वरच्या क्रमांकावर बॅटिंग केलीय.

    2007 च्या  इंग्लंड सीरिजपर्यंत राहुल द्रविडचं वन-डे टीममधलं स्थान कॅप्टन म्हणून आणि प्लेयर म्हणून अबाधित होतं. मात्र भविष्याचा विचार करत त्यानं स्वत:हून कॅप्टनसी सोडली. टीमच्या भविष्याचा विचार करत कॅप्टनसीची कवचकुंडल स्वत: हून सोडणारे किती प्लेयर तुम्हाला या क्षणी आठवतात ?  ज्या द्रविडनं टीमचा विचार करत कॅप्टनसीचा त्याग केला त्या द्रविडला त्याच्याशी कसल्याही प्रकारची सल्ला मसलत न करता 2007 च्या ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर अचानक वन-डे टीममधून काढण्यात आलं.

   त्यानंतर थेट  2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड समितीला आठवण झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी झालेल्या t-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय युवा बॅट्समननी साफ निराशा केली होती. इंग्लंड मध्ये  स्विंग होणा-या खेळपट्यांवर  या IPL च्या हिरोंचं तंत्र साफ उघड पडलं.टीम इंडियांच्या बॅटींगच्या ढासळता किल्ला सावरण्यासाठी 2009 मध्ये द्रविड या बुरुजाची निवड समितीला आठवण झाली.  तब्बल दोन वर्षांनतर द्रविडनं वन-डे साठी पॅड बांधले. त्या सीरिजमध्ये 40 च्या सरासरीनं रन्स करुनही त्याला पुढच्या सीरिजमधून वगळण्यात आलं.

   आता 2011 साली लॉर्डस टेस्टमध्ये झहीर खान जखमी झाल्यानं कॅप्टन धोनीनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धोनीला विकेट किपर म्हणून पुन्हा एकदा  38 वर्षे पूर्ण झालेला द्रविडचं आठवला.  जवळपास सहा वर्षांनतर अचनाक ही जबाबदारी सोपवण्यात येऊनही द्रविडनं हे काम बिनबोभाटपणे पार पाडलं. इतकचं काय तर नॉटिंगहॅम टेस्ट पूर्वी गौतम गंभीर जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा द्रविडला ओपनिंगला ढकलण्यात आलं. द्रविडऩं पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. लॉर्डस पाठोपाठ नॉटिंगहॅममध्येही शतक झळकावलं.

        आता इंग्लंड विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी राहुल द्रविडची निवड समितीला आठवण झालीय. ज्या रैना, रोहित आणि विराट कोहलीकडं  टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिलं जातंय... त्यांच्यापैकी कुणी (खरं तर  तिघ जण मिळूनही ) 50 ओव्हर्स खेळतील याची खात्री निवड समितीला नाही. त्यामुळे या रैना, रोहित आणि व कोहली यांना झाकण्यासाठी द्रविडची निवड समितीला आठवण झालीय. लॉर्डस, नॉटिंगहॅम, एजबस्टनच्या उसळत्या पिचवर खेळण्यासाठी द्रविड आणि राजकोट. हैदराबाद, ग्वाहलेरच्या पाटा पिचवर खेळण्यासाठी रैना, रोहित आणि कोहली....हेच निवड समितीचं धोरण आहे. निवड समितीच्या या धोरणाची पूरेपूर माहिती असूनही त्यावर कोणताही आक्षेप न नोंदवता आपली कारकिर्द ऐन बहरात असताना राहुल दविडनं वन-डेमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतलाय.

मला अनेक गोष्टींची हुरहुर वाटते. आपल्याला लोकमान्य टिळक, सावरकर तसेच तरुण वयातले अटलजी .यांची भाषणं प्रत्यक्ष ऐकता आली नाहीत. बालगंधर्वांची नाटकं पाहिली नाहीत की जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं भारवलेला विद्यार्थी चळवळीचा काळ अनुभवता आला नाही. अगदी क्रिकेटमधलं बोलायचं तर डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सुनील गावसकर यांची बॅटिंग पाहण्याचं भाग्य ही मला नाही. असं असलं तरी मी पुढच्या पिढीला हे नक्की सांगू शकेल की मी माझ्या आयुष्यातली 15 वर्षे राहुल द्रविडची बॅटींग पाहिलीय.त्याची ही बॅटिंग मला सतत उभारी देत राहील. काळ कोणताही असो.... परिस्थिती कशीही असो  न डगमगता.... न खचता आपलं काम करत राहयचं....माझ्या कुटूंबासाठी, माझ्या मित्रपरिवारासाठी त्याही पुढे जाऊन माझ्या देशासाठी 'मिस्टर डिपेंडेबल' बनण्याचा सतत प्रयत्न करायचा.

राहुल द्रविडनं आता वन-डेमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र टेस्ट साठी अजूनही त्याची गरज क्रिकेटला आहे. फास्ट फूड क्रिकेटच्या या काळात शैलीदार बॅटिंगची परंपरा जपणा-या बोटावर मोजता येतील इतक्या क्रिकेटपटूंमध्ये तो सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळेच .   Rahul Dravid will continue playing test.cricket. So basically Test Cricket has not announced its retirement yet. अशा प्रकारचे SMS मला येत आहेत. अशा प्रकारचे SMS ही भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक म्हणून ओळखल्या जाणा-या द्रविडला क्रिकेट फॅन्सनी दिलेली सलामी आहे.

14 comments:

हेरंब said...

काही मुद्द्यांशी वैयक्तिक असहमत... पण तरीही लेख खूप आवडला.

Niranjan Welankar said...

अत्यंत जोरदार लेख आहे. खूपच अप्रतिम. द्रविड की जय हो. खरोखर अत्यंत मोठ्या मनाचा व अफाट क्षमतेचा माणूस आहे. लेख छान जमला आहे. आणि खूप सुंदर वर्णन आहे.... मला वाटलं होतं, पुढचा ब्लॉग मुंबई समुद्रावर येईल... पण जोरदार. खूप आवडला ब्लॉग.......

सिद्धार्थ said...

लेख खूप आवडला.

मला हि काही मुद्दे पटले नाहीत पण द्रविडच्या प्रतिभेबद्दल मनात तिळमात्र देखील शंका नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासारख्या संयमी खेळ्या करून खेळपट्टीवर तग धरणारा खेळाडू पुन्हा मिळणे सोप्पे नाही.

Hatts off to Dravid...

megha kuchik said...

खरंच खुप सुंदर लेख...पाटा पिचवर द्रविड नको पण बाऊंसी पिचवर द्रविडच तारणहार, द्रविडवर हा अन्याय आहे....द्रविडसारखा सुसंस्कृत खेळाडूला खेळताना पाहता येणार नाही याची खंत वाटते

Swadesh said...

खरच निवड समिती राहुल द्रविडचा युझ अॅण्ड थ्रो सारखाचा वापर करत आहे. ज्या द्रविडने देशासाठी सर्वस्व अर्पण करून भारताला अनेक विजय मिळवून दिले त्याच्याबरोबर बीसीसीआयची वागणूक अपमानास्पद आहे. त्यांना क्रिकेटमधले काही कळते की नाही हे मला माहित नाही पण पैसा कळतो. म्हणूनच इंग्लंडमधली आपली ढासळती पत राखण्यासाठी द्रविडचा ढाल म्हणून ते वापर करू इच्छितात आणि आपला दबदबा आबाधित ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत. रंग बदलणा-या सरड्‌यासारखे ते आहेत. असो द्रविड हा ग्रेट आहे आणि तो ग्रेटच राहणार, सच्चा सेवक

Onkar Danke said...

@ हेरंब नक्कीच तुझं या विषयावर वेगळे मत असू शकते. द्रविडकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला चष्मा आहे. मनमोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल खूप धन्यवाद..

Onkar Danke said...

धन्यवाद निरंजन...अशा सारखा क्रिकेटपटू आपल्याला पाहता आला हे आपले भाग्यच आहे. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

Onkar Danke said...

@ सिद्धार्थ... पर्थ असो कोलकाता जमैका असो किंवा ट्रेच ब्रिज प्रत्येक ठिकाणी राहुल द्रविड भक्कम पणे उभा राहिलाय. अशा प्रकारचा अस्सल टेस्ट प्लेयर भविष्यात होईल का याबाबत मला शंकाच आहे.
प्रतिक्रीयेसाठी खूप खूप धन्यवाद

Onkar Danke said...

@ मेघा खूप खूप आभार.

आज द्रविड, सचिन, लक्ष्मण सारखे प्लेयर असल्यामुळे रैना, कोहली रोहित ही मंडळी सुपात आहेत. उद्या हेृी मंडळी रिटायर झाल्यावर ह्यांना आणि भारतीय क्रिकेटला कोण वाचवणार ?

Onkar Danke said...

@ स्वदेश

द्रविड हा ग्रेट आहे आणि तो ग्रेटच राहणार, सच्चा सेवक
अगदी 1000 टक्के सहमत
प्रतिक्रीयेबद्दल खूप खूप धन्यवाद

siddhai said...

काही मुद्द्यांशी सहमत... काही काही मुद्द्यांशी नाही पण तरीही लेख खूप आवडला. चांगला आहे नो डाउट

Onkar Danke said...

रुपेंद्र दादा खूप खूप धन्यवाद....

THE PROPHET said...

द्रविडबद्दल माझ्यासारखाच विचार करणारा अजून एक बघून खूप आनंद वाटला. छान लेख आहे!

Onkar Danke said...

@ THE PROPHET,

खूप खूप धन्यवाद. तुमची प्रतिक्रीया मी उशीरा पाहिली त्यामुळे त्यावर रिप्लाय करायला उशीर झाला.त्याबद्दल सॉरी

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...