Monday, July 18, 2011

काँग्रेसचा चेहरा


कुणी त्यांना मनोरुग्ण म्हणतं... तर कुणी देशद्रोही, कोणी गांधी घराण्याचा भाट तर कोणी पाकिस्तानचा समर्थक फेसबुक  किंवा कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस  दिग्विजय सिंह यांच्या बेताल बडबडीची येथेच्छ धुलाई सुरु आहे. बटला हाऊस एन्रकाऊन्टर बद्दल शंका, करकरेंच्या हत्येच्या कारणाबद्दल वादग्रस्त विधान, अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांना निर्दोष असल्याचं दिलेलं प्रमाणपत्र, कलमांडींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला पाहिजे अशी केलेली मागणी, अण्णा हजारेंना 15 ऑगस्टपासून उपोषण कराल तर याद राखा अशा आशायची दिलेली धमकी ते आता मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात नाकारता येत नाही अशा अर्थाचे केलेले विधान.दिग्विजय सिंग यांच्या बेताल बड़बडीची एक्सप्रेस  सुरुचं आहे. अशा प्रकारच्या बेताल बडबडीमुळेच दिग्विजय सिंह सध्या सर्वत्र हेटाळणीचा विषय बनले आहेत.

          आज काँग्रेस पक्षातल्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या दिग्विजय सिंह यांचा जन्म    1947 चा.  मध्यप्रदेशातल्या गुना जिल्ह्यातल्या रोघगटमधल्या राजघराण्यात जन्मलेले असल्यामुळे त्यांना दिग्गीराजा या नावानेही ओळखले जाते. वयाच्या 22 व्या वर्षीच त्यांना आपल्या सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. आपल्या जातीयवादी राजकारणामुळे मध्यप्रदेशातच नाही तर संपूर्ण देशभर वादग्रस्त बनलेले दिवंगत काँग्रेस नेते अर्जुन सिंह हे त्यांचे गुरु. 1980 मध्ये अर्जुन सिंह यांच्या मंत्रीमंडळात त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली. 1993 मध्ये अर्जुन सिंहाच्या लॉबिंगचा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवतानाही मोठा फायदा झाला.  फुटीरतावादी राजकारणाचा आपल्या गुरुंचाच वापसा दिग्विजय सिंह यांनी पुढे चालवला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला नाही तर 10 वर्षे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं ते 2003 मधील मध्य प्रदेश विधानसभेच्या प्रचारात सांगत असतं. हा शब्द त्यांनी आजवर तरी पाळला आहे. मागच्या सात वर्षात काँग्रेस केंद्रात सत्तेवर असूनही दिग्विजय सत्तेच्या बाहेर आहेत.

                आपल्या प्रत्येक कृतीमधून संदेश जात असतो हे राजकारण्यांना विशेषत: सत्तेवर असलेल्यांना पुरेपुर माहित असंत. काँग्रेसी संस्कृती कोळून प्यालेल्या दिग्विजय सिंह यांना तर हे पुरेपुर माहित असणार. दिग्विजय सिंहांच्या बेताल बडबडीच्या तसेच त्यांच्या एकंदरित राजकारणाचा विचार करत असताना हा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे. दिल्लीत काही वर्षांपूर्वी  बटाला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीवर त्यांनी शंका उपस्थित केली होती. वास्ताविक दिल्ली आणि केंद्र दोन्हीकडेही काँग्रेसचेच सरकार तेंव्हा होते आणि नंतरही आहे. तरीही त्यांनी बटाला हाऊस एन्काऊन्टवर शंका निर्माण केली. अगदी उत्तर प्रदेशातल्या आझमगडला जाऊन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांची विचारपूसही केली. दिग्विजय यांच्या या मुस्लिम कार्डाचा मोठा फायदा कॉँग्रेसला 2009 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे 21  खासदार निवडून आले.

              ब्रिटीशांनी राज्य करण्यासाठी जे 'फोडा आणि झोडा'  तत्व राबवले. तेच तत्व दिग्विजय यांच्यासारखे नेते वापरताना दिसतायत. 26/11 चा हल्ला झाल्यानंतर लगेच काही मुस्लिम संघटनांच्या वेबसाईटवर हा हल्ला हिंदू संघटनांनी इस्त्रायली गुप्तचर संघटना मोसादच्या मदतीनं केला अशा अर्थाच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. अशा प्रकारच्या विखारी प्रचारालाच दिग्विजय सिंह यांनी करकरेंबाबतच्या वादग्रस्त  विधानांनी बळ दिलं होतं. अजमल कसाबवरचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु असताना त्यांनी ते विधान करुन तपास यंत्रणेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तपासकामाबाबत शंका निर्माण करण्याची त्यांची सवय नुकतीच पुन्हा एकदा उफाळून आली होती. अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांना त्यांनी निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिलेलं आहे.

            दिग्विजय सिंग यांच्या अशा प्रकारच्या बडबडीमुळे दोन प्रश्न निर्माण होतात एक म्हणजे  सत्तारुढ पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करण्याची गरज का आहे ? वास्ताविक त्यांच्याकडे सत्ता असल्याने ते अशा प्रकारची विधानं टाळून आपल्याला वाटत असलेल्या माहितीचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सहज करुन घेऊ शकतात. दुसरा महत्वाचा  वादग्रस्त विधानाबद्दल त्यांची तपास यंत्रणेकडून चौकशी होणार का ? मात्र सत्तेची कवचकूंडलं लाभलेल्या नेत्यांना कितीही विपरित परिस्थितीमधून आपण निश्चित बाहेर पडू असा विश्वास असतो. हाच विश्वास दिग्विजय सिंह यांच्यासारख्या राजकारण्यांना बेफाम बनवतो.

     भारतामधील बहुतेक पक्षाचे राजकारण हे सत्ताकेंद्रीतचं असते. सत्ता मिळवण्यासाटी आणि ती टिकवण्यासाठी काँग्रेसनं नेहमीच व्होट बॅँक पॉलिटिक्सचा वापर केलेला आहे. शहाबानो प्रकरण असो वा सच्चर कमिशन प्रत्येक वेळी आपल्या फायद्यापुरता मुस्लिम मतांचा कैवार काँग्रेसनं घेतलाय.  दिग्विजय सिंहांच्या आझमगड यात्रेचा उत्तर प्रदेशात फायदा झाला हे लक्षात येताच त्यांना फ्रि हॅंड दिला असावा. आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उत्तर प्रदेशचे प्रभारी आणखी बेताल बडबड करण्याची शक्यता जास्त आहे.

       भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद, घटक पक्षातील वाद, अंतर्गत सुरक्षा या सारख्या अनेक मुद्द्यांवर सध्या केंद्र सरकार अडचणीत सापडलंय.मनमोहन सरकारकडे लोकसभेत तर बहुमत आहे मात्र त्यांची लोकांमधील लोकप्रियता झटपाट्यानं कमी होऊ लागलीय. अशा परिस्थितीमध्ये ज्वलंत मुद्यावरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी दिग्विजय सिंह यांच्यासारखा मुखवटा काँग्रेसनं पुढं केलाय. मुस्लीम समाजालाच्या प्रश्नावर मुलभूत उपाय शोधण्यापेक्षा कधी ओसामा बिन लादेनला 'ओसामाजी' असे म्हणत, किंवा कधी रा.स्व.संघाबद्दलची भिती दाखवून मुस्लिमांना कुरवळण्याचे काम दिग्विजय सिंह करतायत.

   आज 21 व्या शतकातल्या या टेक्नोसेव्ही युगात देशाला पुन्हा एकादा व्होट बॅंक पॉलिटिक्सकडे घेऊन   जाणा-या दिग्विजय यांची कोणतीही खरडपट्टी काँग्रेस हायकमांडने केलेली नाही. उलट पक्षाचे भावी महाराज राहुल गांधी यांच्या राजकीय प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि अधुनिकता यांचा मुखवटा धारण करणा-या काँग्रेस पक्षाचा चेहरा मात्र दिग्विजय सिंह यांच्या विचारासारखाच मध्ययुगीन आहे हेच पक्षाच्या अलिकडच्या धोरणावरुन स्पष्ट होतंय.

3 comments:

Niranjan Welankar said...

सध्या देशात अत्यंत भंकस गोष्टी होत आहेत. लेख चांगला होता, पण नेहमीसारखा स्पेशल वाटला नाही, थोडासा जनरलच वाटला.

santosh gore said...

देशात कुठंही बॉम्बस्फोट झाला तरी काँग्रेसला भीती वाटते. कारण त्यात सापडणारे आरोपी मुस्लिम असतात. मात्र हे त्यांना बोलून दाखवता येत नाही. त्यामुळे ते हिंदूंना धोपटतात. त्यासाठीच दिग्विजयसिंग नेमला आहे. बेताल वक्तव्यक करून मुस्लिम वोट बँक जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याला माता सोनिया आणि राजपूत्र राहुल यांचाही पाठिंबा आहेच.

आनंद पत्रे said...

छान लिहिलंय.. काहीही असो हा महामुर्ख माणूस आहे...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...