Wednesday, May 4, 2011

आता हवे ऑपरेशन पाकिस्तान

       


          अब तो नगारा बजही चुका है
            सरहद पर शैतान का
             नक्शे परसे नाम मिटा दो
                पापी पाकिस्तान का

  अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा अंत अमेरिकेने केला. महासत्ता असणे म्हणजे काय ? देशावर हल्ला झाला की त्याला कसे उत्तर द्यायचे ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहशतवाद कसा संपवावा लागतो  हे अमेरिकेने जगाला दाखवून दिले. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर मला कारगिल युद्धच्या वेळी गाजत असलेल्या या काही ओळी सतत आठवत आहेत. या ओळीत भाबडेपणा असेल, पण ज्या देशानं मागच्या 60 वर्षात पाकिस्तानकडून झालेले अगणित हल्ले सोसलेत त्या देशवासियांचा प्रामाणिक संताप आहे. आता अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला ठार करत भारताच्या सीमेवर शैतानाचा नगारा वाजवलाय. त्यामुळे आपल्याला संपूर्ण पाकिस्तानचा नाही मात्र त्या देशात राजश्रायनं सुखाने नांदत असलेल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या सर्व अड्यांचा नायनाट  करण्याची वेळ आली आहे.

     दहशतवाद्यांशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली म्हणजे ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करु शकतात अशा ठिकाणांचे संरक्षण करणे , गुप्तचर यंत्रणांचे जाळे व्यापक बनवूनही दहशतवाद्यांचा बिमोड करता येऊ शकतो. तिसरी पद्धत जी इस्त्रायलने अनेकदा वापरली ती म्हणजे जे दहशतवादी आपल्याला हवे आहेत त्यांना जगाच्या कोणत्याही कोप-यातून शोधणे आणि त्यांना ठार मारणे.म्युनिच ऑलिम्पिकच्या दरम्यान झालेल्या हत्याकांडानंतर इस्त्रायलनं अशा प्रकारची मोहिम यशस्वीपणे राबवली आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे ज्या ठिकाणी दहशतवादी प्रशिक्षण घेतात, त्यांचे प्रमुख राहतात अशा ठिकाणांवर थेट हल्ला चढवणे. दाऊद इब्राहिम किंवा अन्य भारतविरोधी दहशतवादी आपल्यावर कोणता हल्ला करतील याची वाट न पाहता त्यांच्यावर हल्ला चढवणे. त्यांना जमल्यास पकडणे अथवा थेट ठार मारणे.

दहशतवादाविरोधाची लढाई आजवर भारताने नेहमी आपल्याच प्रदेशात लढली आहे. आता गरज आहे ती ही लढाई शत्रूच्या प्रदेशात म्हणजेच पाकिस्तानात जाऊन लढण्याची.आता एखादा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कारवाई करण्याचे दिवस संपलेत. आता दहशतवाद्यांवर पहिला हल्ला करण्याची वेळ आली आहे. ज्यामध्ये शस्त्र आपले असतील, दिवस आपला असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदेश हा पाकिस्तानचा असेल.

    पाकिस्तानशी चर्चा करणे, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर त्यांच्याविरोधाचे पुरावे सादर करणे यासरखे उपाय आपण आजवर करत आलो आहोत आता अमेरिकेनं केलेल्या ताज्या कारवाईचा आधार घेत आपल्याला आपल्या या धोरणांची पुढची पायरी म्हणजेच निर्णायक हल्ला करण्याची वेळ आली आहे. दाऊद असो वा लादेन जगभरातल्या दहशतवाद्यांचे अभयआरण्य म्हणजे पाकिस्तान. ही गोष्ट पुन्हा एकदा सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट झालीय.त्यामुळे आता आपल्या आजवरच्या संयमी धोरणाला मुठमाती देत निती-अनितीचा विचार न करता, मानवातवादी आणि मेणबत्तीवाल्यांकडे दुर्लक्ष करत हे दहशतवाद्यांचे अभयआरण्य नष्ट करण्यासाठी 'ऑपरेश पाकिस्तान' सुरु करणे आवश्यक आहे.

          भारताची भैगोलिक परिस्थिती, अमेरिका आणि भारताच्या शक्ती आणि जागतिक स्थानांमधील फरक, दोन्ही देशांचे् प्रश्न याची तुलना माझे विरोधक नक्की करतील. मात्र मुंबईच्या आकाराचा सर्व शत्रूराष्ट्रांनी वेढलेला इस्त्रायल सारखा देश आपल्या शत्रूंना नेहमी ठेचून काढू शकतो तर भारत का नाही ? अमेरिकेवर 11 स्पटेंबर 2001 ला हल्ला झाला मात्र त्यानंतर त्यांनी आपली सुरक्षा यंत्रणा इतकी पोलादी बनवली की त्यांनतर या देशावर एकही हल्ला झाला नाही. अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे आहे ? देशाच्या अस्मितेच्या चिंधड्या उडालेलं आपण किती काळ सहन करणार ? बेसावध सरकार, निष्क्रिय गुप्तचर आणि स्वार्थी नोकरशाही यांनी पोखरलेल्या या देशातलं कोणतही शहर त्यामधला कोणताही भाग सुरक्षित नाही  हे वारंवार सिद्ध झालंय. ज्या देशाच्या सरकारला आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडता येत नाही , आपल्या देशावर एकदा नाही तर वारंवार हल्ला करणा-या शत्रूंचा नायनाट करता येत नाही अशा देशाला महासत्ता म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही.

     अमेरिकेनं केलेल्या ताज्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या वातवरणाचा फायदा घेण्याची योग्य संधी आहे. आपले आजवरचे सामोपचारचे धोरण गंगार्पण करण्याची वेळ आता आली आहे... पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, अशा प्रकारची कारवाई केली तर युद्ध भडकू शकेल हे मान्य . मात्र योग्य नियोजन करुन पाकिस्तानल्या नेमक्या ठिकाणांवर हल्ला आपल्याला निश्चितच करता येऊ शकतो. पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तरी आपल्याकडे second strike capability आहे. जी पाकिस्तानकडे नाही याची जाणीव त्यांना निश्चितच असेल.त्यामुळे कोणतेही आतातायी कृत्य करण्याचे धाडस करण्यापूर्वी पाकिस्तान निश्चितच विचार करेल.सा-या जगासमोर पाकिस्तानचा बुरखा लादेन प्रकरणामुळे फाटला आहे. जगाच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी जगाचे जाऊ द्या हो किमान आपल्या देशाच्या शांततेसाठी आता ऑपरेशन पाकिस्तान भारत सरकारने सुरु करायलाच हवे. भले त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तर बेहत्तर.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...