Sunday, January 9, 2011

कांगारूंचा कडेलोट !

                               
संपूर्ण क्रिकेट विश्वावर तळपणारा ऑस्ट्रेलियन साम्राज्याचा सूर्य आता मावळलाय. यंदाच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव इतका जबरदस्त आहे की सारे ऑस्ट्रेलियन फॅन्स सध्या एका काळरात्रीचा अनुभव घेत असतील.अगदी दिवार चित्रपटातल्या अमिताभच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पिछले 24 सालमें नही हुआ वो इस बार हुआ है.इंग्लंडने 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात  अ‍ॅशेस सीरिज जिंकलीय.त्यांनी तिन्ही टेस्ट डावाच्या फरकाने जिंकल्या.एकाच सीरिजमध्ये 3 टेस्ट डावाने पराभूत होण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच आलीय. केवळ ऑस्ट्रेलियन फॅन्स नाही तर संपूर्ण क्रिकेट जगसाठी हा एक नवा अनुभव आहे.


         मी क्रिकेटमधले वेस्ट इंडिजचे युग पाहिलेले नाही. लॉईड, रिचर्डस, ग्रिनीच, हेन्स, मार्शल या सारख्या महारथींचा खेळ मी पाहिलेला नाही. मात्र क्रिकेटमधले ऑस्ट्रेलियन यूग पूर्णपणे अनुभवलंय. सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी तसेच एकदिवसीय सीरिज एकतर्फी जिंकण्याचा पराक्रम करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया. प्रतिस्पर्धी टीमला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.मॅच जिंकून देणारे 1 किंवा 2 नाही तर संपूर्ण 11 खेळाडू एकाच टीममध्ये बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. क्रिकेटमधली सर्वात खडूस टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. अशी या ऑस्ट्रेलियन टीमची नाना रुपं मी गेल्या 15 वर्षात अनुभवलीत. क्रिकेटमधल्या एकेकाळच्या सर्वात बलाढ्य टीमसाठी 2010 हे वर्ष अतिशय खराब गेलं. T-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये त्यांचा इंग्लंडकडून एकतर्फी पराभव झाला. त्यानंतर लॉर्डस टेस्टमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यांची टीम केवळ 88 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर याच वर्षाच्या शेवटी मेलबॉर्न टेस्टमध्ये ही टीम 98 रन्सवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानने त्यांना तब्बल 15 वर्षानंतर टेस्ट मॅचमध्ये हरवलं. भारतानं टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये वन-डे सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला.अ‍ॅशेस  सीरिजमध्ये  ही टीम अपमानस्पदरित्या घरच्याच मैदानावर पराभूत झाली. 


                                ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंग हा या साम्राज्याचा  शेवटचा सुलतान ठरलाय. या संपूर्ण वर्षात त्याला केवळ 37 च्या सरासरीनं रन्स करता आले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या 4 टेस्टमध्ये तर त्यानं केवळ 113 रन्स केलेत. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा यांच्या ऑस्ट्रेलियन साम्राज्य उभे करण्यात पॉन्टिंगचा वाटा मोठा आहे. वॉर्न - मॅग्रा,हेडन, गिलख्रिस्ट यांच्या निवृत्तीनंतर दुबळ्या झालेल्या ऑस्ट्रेलियन टीमला त्याच्या बॅटनं अनेकदा तारलंय. आता त्याच पॉन्टिंगचा फॉर्म हरपल्यानं ऑस्ट्रेलियाच्या सा-या मर्यादा क्रिकेट विश्वासमोर उघड्या पडल्यात. टीमची नाव संकटातून बाहेर काढू शकेल असा जिद्दी प्लेअर ( माईक हसीचा काही प्रमाणात अपवाद ) या वर्षात ऑस्ट्रेलियनं टीमला सापडलाच नाही.
   
                                 पॉन्टिंगमधला कॅप्टनही अलिकडच्या काळात हरवलाय. मैदानात सतत फिल्डर्सच्या जागा बदलणे आणि सहका-यांना सूचना देणं ही त्याची सवय आहे. कॅप्टनसीची शैली आहे. मात्र त्याच्या  या सवयीचा फटका त्याच्याच बॉलर्सला बसतोय. सतत बदलणा-या फिल्डिंगमुळे त्याच्या टीममधले अगोदरच सामान्य असलेले बॉलर्स गोंधळून जातायत. भारत  विरुद्धच्या टेस्टमध्ये त्यानं लावलेल्या फिल्डिंगवर शेन वॉर्नने जोरदार टीका केली होती.त्याचबरोबर अखिलाडू वृत्तीबद्दलही तो पुरता बदनाम झालाय. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात सौरव गांगुली आऊट आहे हे ढळढळीत असत्य अंपायरला सांगणारा  पॉन्टिंग आजही सगळ्यांना आठवत असेल. आता तर मैदानावर घडणा-या चुकीच्या गोष्टींच्या बाजुने उभी राहयची त्याला सवयचं लागलीय.  फॉर्म हरपलाय, मॅच हरण्याचे नवे रेकॉर्ड  होतायत. तरी तो कॅप्टनसीवरुन हटायला तयार नाहीयं.एखाद्या राजकारण्याप्रमाणे तो मीच नेतृत्वासाठी कसा सक्षम आणि एकमेव लायक उमेदवार आहे याचे दावे करत सुटलाय. 


        यापूर्वी ऑस्ट्रेलियानं एका सीरिजमधल्या पराभवानंतर ताबडतोब स्टीव्ह वॉला कॅप्टन्सीवरुन दूर केलं होतं. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांना पॉन्टिंगला काढण्याचे धाडस झालं नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ही शोकांतिका आहे.याला कारणही तसेच आहे. त्यांना अजुनही पॉन्टिंगचा सक्षम वारसदार मिळालेला नाही. मायकल क्लार्कला या खालसा झालेल्या संस्थानाचा वारसदार म्हणून ओळखले जाते. मात्र त्याचा गेल्या काही सीरिजमधला फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. फॉर्म हरपलेला आणि कॅप्टन म्हणून टीममध्ये असणारा खे्ळाडू पाहण्याची सवय आता कदाचित  ऑस्ट्रेलियन फॅन्सला करावी लागेल. त्यापेक्षा कॅमेरुन व्हाईट हा मला कॅप्टनसीसाठी योग्य वाटतो. तो एक अस्सल आक्रमक ऑस्ट्रेलियन आहे. व्हिक्टोरिया बुशरेंजर्सची कॅप्टनसी त्यानं यशस्वीपणे हातळली आहे. धाडसी निर्णय घ्यायला तो घाबरत नाही. सहका-यांकडून 100 टक्के खेळ करुन घेण्याची त्याची क्षमता आहे. आता त्याच्याकडे T-20 टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. मात्र त्याला पूर्णवेळ कॅप्टनही करायला हवं.असं मला नेहमी वाटते.


          ऑस्ट्रेलियन प्लेअर्स अ‍ॅशेस  सीरिजमध्ये ज्या पद्धतीने खेळले त्याला खरंच तोड  नाही. ऑस्ट्रेलियन ओपनर्सचे रनिंग बिटवीन द विकेट इतके गचाळ यापूर्वी मी पाहिले नव्हते. ऐडलेड टेस्टच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅटिच आणि वॉटसन यांनी रन चोरताना जो अफलातून गोंधळ घातला त्याला तोड नाही.त्या टेस्टमध्ये सायमन कॅटिच ज्या पद्धतीनं रन आऊट झाला त्याचा आपल्या काही भारतीय बॅट्समन्सनाही हेवा वाटला असेल.


  त्यांच्या टीम निवडीमध्येही कायम गोंधळ होता. मिचेल  जॉन्सला दुस-या टेस्टमध्ये अगदी तडकाफडकी वगळण्यात आलं. मार्कस नॉर्थ आणि नॅथन हॉरित्झकडे दुर्लक्ष करण्यात आले. हॉरित्झ हा त्यांचा सध्याचा फॉर्मात असलेला स्पिनर. मात्र त्याच्या ऐवजी मायकल बियर सारख्या एकदम कोप-यातल्या स्पिनरला हुडकून खेळवण्यात आलं. शेवटच्या टेस्टमध्ये वारंवार नो बॉल टाकून बियरनं आपला   दर्जा काय आहे हे निवड समितीला दाखवून दिलं.


        ऑस्ट्रेलिय क्रिकेट यामधूनही सावरु शकते. मात्र त्यासाठी त्यांनी आता धाडसी बदल करायला हवेत. नवोदित खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी वेळ द्यायला हवा. केवळ मोठ्या खेळाडूंची तात्पूरती रिप्लेसमेंट म्हणून त्यांना खेळवण्याचा प्रयोग करु नये.  कॅलिन फर्गसन, क्लिंजर, ख्रिस्टीन  सारखे अनेक गुणावान प्लेअर ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक लीगमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपला ठसा उमटवत आहेत. त्यांना कुजवण्यात काय अर्थ आहे ? सर्वात महत्वाचे म्हणजे जी जिद्द आणि शेवटच्या बॉलपर्यंत हार न मानण्याची त्यांची सवय त्यांना पुन्हा एकदा लावून घ्यायला हवी.
     
        ऑस्ट्रेलियन टीमनं मागच्या दोन दशकात प्रतिस्पर्धी टीमची जी अवस्था केली तीच आज त्यांची झालीय. दिवसानंतर रात्र येतेच याचा अनूभव विजयाचा माज चढलेल्या या टीमला आला असेल. वीस वर्षांच्या आसपास असलेल्या युवा कांगारुंना हे पाहण्याची सवय नाहीयं. ती सवय त्यांनी आता लावायला हवी. क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणा-या कांगारुंचा साम्राज्यपदावरुन कडेलोट झालाय. क्रिकेट विश्व ख-या अर्थाने आता समतल झालंय.

6 comments:

हेरंब said...

खुपच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहे. खूप छान विश्लेषण.. एखाद्या वर्तमानपत्राला पाठवा.. !

Niranjan Welankar said...

नमस्कार. सुंदर लेख. क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि ज्ञान पाहून फार बरं वाटलं.

santosh gore said...

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकले. मात्र क्रिकेट रसिकांचे हृदय ते जिंकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे अत्यानंदच होतो.

मंदार जोशी said...

अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख.
हेरंब म्हणतो तसं वर्तमानपत्राला जरूर पाठवा.

Deepak Parulekar said...

सुंदर लेख! आवडला! विश्लेषण खरचं छान आहे !

megha kuchik said...

tu lihil aahe te agadi khar aahe australiyacha kadelot hotoy...matra kangaru aata sankramavasthet aahet...navya kheladulana adjust vhayala akhad varsh tari lagel...junya lokana bajula karayala kahi kal lgel as vatat...aani ek blogche colour combination,design chhan aahe...descent vatat

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...