Wednesday, January 26, 2011

वर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 2 ) ---- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड

                                            दक्षिण आफ्रिका


क्रिकेटमधली चोकर्स म्हणून ओळखली जाणारी टीम म्हणजे दक्षिण आफ्रिका. महत्वाच्या क्षणी दडपणात येऊन करुन विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणारी टीम म्हणून ही  ओळखली जाते. ( आठवा 1999 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये क्लूसनरने केलेला गोंधळ )   कधी पावसामुळे डकवर्थ लूईस मेथडचा फटकाही या टीमला बसला आहे.  ( आठवा 1992 आणि 2003 चा वर्ल्ड कप )  संपूर्ण स्पर्धेत चागली कामगिरी करुन एखाद्या क्रिकेटपटूपुढे अथवा बलाढ्य संघापूढे अचानक नांगी टाकण्याची सवय या टीमला आहे. ( आठवा 1996 च्या वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये ब्रायन लाराने ठोकलेले शतक ) क्रिकेट विश्वात अशा प्रकारचे दुर्दैवी प्रसंग आफ्रिकेच्या वाट्याला अनेकदा आले आहेत किंवा दडपणाखाली त्यांनी ते ओढवून घेतले आहेत. त्यामुळेच त्यांना अद्याप  एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता या वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेतेपदासह चोकर्स हा आपल्यावरचा शिक्का पुसून टाकण्याचे आव्हान  ग्रॅमी स्मिथच्या या यंग आफ्रिकन टीमपुढे असणार आहे.

   आफ्रिकेनं जाहीर केलेल्या 15 जणांच्या टीममध्ये केवळ 4 प्लेअर्सनाच ( ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलीस, डि व्हिलियर्स आणि रॉबीन पिटरसन )  वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे. तब्बल 11 आफ्रिकन प्लेअर्स यंदा आपला पहिला वर्ल्ड कप खेळणार आहेत. नव्या दमाच्या या आफ्रिकन टीममध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही.स्मिथ आणि आमला ही जोडी त्यांच्या इनिंगची सुरुवात करेल. हशिम आमला सध्या आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय पिचवरचा त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. तर मोठ्या स्पर्धेत खेळण्याची जिगर स्मिथमध्ये आहे. त्यामुळे या जोडीकडून आफ्रिकेला मोठी आशा असेल. आक्रमण आणि बचाव या दोन्ही भूमिका ही ओपनिंग जोडी एकाच मॅचमध्ये निभावू शकते. डि व्हिलियर्स हा एक सर्वोत्तम फिल्डर,  चपळ विकेट किपर आणि आक्रमक बॅट्समन या वर्ल्ड कपचे खास आकर्षण ठरु शकतो. भारताविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याची कामगिरी ढेपाळली. मात्र त्याच्या सारख्या क्रिकेटपटूला फॉर्मात येण्यासाठी केवळ एक वन-डे पुरेशी ठरु शकते. जॅक कॅलीस नावाचा एक सध्याचा सर्वोत्तम ऑलराऊंडर हे आफ्रिकेचे आणखी एक शक्तीस्थान. सर गॅरी सोबर्सच्या जातकुळीतला क्रिकेटपटू या एका शब्दात त्याचं वर्णन पुरेसं आहे. तसेच त्याच्या जिगरबाज वृत्तीचा अनुभव भारताने नुकताच घेतला आहे. तर जे.पी. ड्युमिनी या युवा आफ्रिकन क्रिकेटपटूचं मी  सध्याच्या क्रिकेटमधला मायकल बेव्हन या शब्दात वर्णन करेल. टीमसाठी खेळणारा हा क्रिकेटपटू आहे. कोणतेही फटके न मारता केवळ एकरी दुहेरी धांवाच्या मदतीने स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याचे काम तो करतो. बेवन प्रमाणेच त्याचं रनिंग बिटविन द विकेट उत्तम आहे. तसेच लोअर ऑर्डरच्या मदतीने टीमला संकटातून बाहेर काढणे त्याला चांगलं जमतं.  बॉलला रन या गतीने तो 50 रन्स आरामात करु शकतो.

                                
       फास्ट बॉलिंग ही आफ्रिकेची नेहमीच शक्ती राहिली आहे. त्यांच्याकडे काल डोनाल्ड होता. आज डेल स्टेन आहे. सध्याच्या क्रिकेटमधला सर्वोत्तम फास्ट बॉलर म्हणून तो ओळखला जातो. भारताच्या पिचवर यापूर्वीही तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेच्या या स्टेन गन पासून सर्व टीमला सावधान राहावे लागेल. डेल स्टेनच्या मदतीला मॉर्ने मॉर्केल, सोत्सोबो हे फॉर्मात असलेले बॉलर आफ्रिकन टीममध्ये आहेत.त्यामुळे वेन पार्नेलला बहुतेक काळ टीमच्या बाहेर बसावे लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये 3 स्पिनर्सचा समावेश असला तरी अंतिम 11 मध्ये केवळ योहान बोथालाच संधी मिळू शकते. तसेच जे.पी. ड्युमिनी आणि रॉबिन पिटरसनच्या पार्ट टाईम बॉलरचाही कॅप्टन स्मिथला उपयोग होऊ शकतो.

    हे सर्व काही खरं असतं तरी आफ्रिकेच्या टीममध्ये सर्व काही आलबेल नक्कीच नाहीय. त्यांच्या मीडल ऑर्डरमध्ये अनुभवाची कमतरता आहे. तसे्च ड्युमिनी वगळता अन्य युवा बॅट्समन्समध्ये सातत्य नाही. त्यामुळे स्मिथ, आमला, कॅलीस आणि डि व्हिलियर्स या चौघांना बॅटिंगचा मुख्य भार व्हावा लागेल. आफ्रिकेचा स्पिन   ऐटॅकही कमकुवत आहे. अनुभवी योहान बोथा भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये फेल गेला. ड्यु प्लेसिस आणि इम्रान ताहीर हे अगदीच नवखे आहेत. स्पिन बॉलिंगला मदत करणा-या भारतीय पिचवर चांगल्या स्पिनरची कमतरता आफ्रिकेला जाणवू शकते.

   दक्षिण आफ्रिकेला आपल्या गटात भारत आणि इंग्लंड या दोन बलाढ्य देशांप्रमाणेच वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोन धोकादायक टीमबरोबर खेळावे लागणार आहे. आफ्रिकेचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश हा नक्की मानला जातोय. त्यापुढच्या तीन मॅचमध्ये मात्र त्यांचा क्रिकेट बरोबरच मानसिक क्षमतेचाही कस लागेल.

                                                            इंग्लंड
                                          

                          

    ज्या गो-या साहेबांनी क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगाला शिकवला त्याच साहेबांच्या देशाला म्हणजे इंग्लंडला आजवर एकदाही वर्ल्ड कप स्पर्धा जिंकता आलेली नाही.  एवढच नाही तर पहिल्या पाचही वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल गाठणारी इंग्लंडची टीम पुढच्या चार वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपूर्वीच आऊट झालीय. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. मागच्या वर्षी झालेली T-20 स्पर्धा इंग्लंडने जिंकलीय.त्यापाठोपाठ इंग्लंडने तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये  अ‍ॅशेस  सीरिज जिंकलीय. या विजयामुळे इंग्लंडचे शेयर्स सध्या गगनाला भिडलेत. अनेक क्रिकेट रसिक तसेच जाणकारांनी यंदा इंग्लंडला आपली पसंती दिलीय. अर्थात इंग्लंडचे हे हवेत असलेलं विमान ऑस्ट्रेलियानेच जमिनीवर आणलंय. हा ब्लॉग लिहत असताना  कांगारु विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये इंग्लिश टीम पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्ल्ड कपच्या कठीन पेपरपूर्वी स्ट्रॉस आणि कंपनीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

    कॅप्टन स्ट्रॉसच्या या टीममध्ये विकेट किपर मॅट प्रायरचा समावेश आश्चर्यकारक मानला जातोय. स्टीव्ह डेव्हिस आणि क्रेग क्रिसवेचर या युवा विकेट किपरच्या ऐवजी प्रायरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.फारशा फॉर्मात नसलेल्या प्रायरवर विकेट किपींग बरोबरच इनिंगची सुरुवात करण्याचाही अवघड जबाबदारी असेल.प्रायरच्या खराब फॉर्मामुळे कॅप्टन स्ट्रॉसचे काम आणखी वाढलंय. त्याला  त्याला कॅप्टनसी बरोबरच टीमला जलद ओपनिंग करुन देण्याचे कामही करावे लागेल. इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमध्ये जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि केविन पीटरसन असे अनुभवी बॅट्समन आहेत. त्यापैकी ट्रॉट आणि बेल सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत.
 तर पीटरसनला ब्रायन लाराप्रमाणे अधुनमधून धमाका करण्याची सवय सोडावी लागेल. पीटरसन हा असा खेळाडू आहे की जो ज्या दिवशी खेळेल त्या दिवसाचा राजा असतो. आक्रमक फटकेबाजीप्रमाणेच अनेक  अपरंपरिक फटकेही त्याच्या भात्यात आहेत. फक्त तो प्रत्येक मॅचमध्ये खेळत नाही ही इंग्लिश टीमची खरी डोकेदुखी आहे. T-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने मिळवलेल्या विजेतेपदात पीटरसनच्या धडाकेबाज कामगिरीचा मोठा वाटा होता. आता  या वर्ल्ड कपमध्ये तो चालावा यासाठी इंग्लिश फॅन्स नक्कीच प्रार्थना करत असतील. इऑन मॉर्गन हा आणखी एक हिरा इंग्लंड टीमला अलिकडच्या काळात सापडलाय. एक वेल फिनिशर असलेल्या मॉर्गनमध्ये मोठा बॅट्समन होण्याचे सारे गूण अगदी ठासून भरलेत. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची चांगली संधी मॉर्गनला आहे. या मिडल ऑर्डरमध्ये पॉल कॉलिंगवूडची भर टाकल्यास इंग्लिश बॅटिंग चांगलीच शक्तीशाली बनते. कॉलिंगवूडची बॅट सध्या त्याच्यावर रुसलीय.  पण एक सर्वोत्तम फिल्डर आणि उपयुक्त बॉलर म्हणून तो उपयुक्त आहे. तसेच भारतीय पिचवर त्याचा अनुभव टीमच्या मोठ्या कामी येऊ शकतो.अर्थात कॉलिंगवूडचा खराब फॉर्म कायम राहिल्यास ल्यूक राईटला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते.
 इंग्लंडने कांगारुंना टेस्ट सीरिजमध्ये लोळवलं ते बॉलिंगच्या जोरावर. जेम्स एण्डरसन हा त्यांचा फास्ट बॉलर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आता त्याला आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय पिचवर शेवटचा पेपर द्यायचा आहे. एण्डसरनच्या मदतीला स्टुअर्ट ब्रॉड, टीम ब्रेसनन अजमल शहझाद अशी फास्ट बॉलरची फौज इंग्लिश आर्मीमध्ये आहे. तर ग्रॅमी स्वान हा सध्याचा जगातला सर्वोत्तम स्पिनर याच टीममध्ये आहे. 1999 चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने  शेन वॉर्नच्या स्पिनच्या जोरावर जिंकला होता. आता तशीच ऐतिहासिक कामगिरी स्वान करतो का याकडे जगाचे लक्ष लागलंय. स्वानच्या मदतीला  मायकल यार्डी आणि जेम्स ट्रेडवेल हे नवखे स्पिनर इंग्लिश टीममध्ये आहेत. मात्र त्यांचा अंतिम 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे कॉलिंगवूड आणि पीटरसन यांच्या बॉलिंगचाही ऑप्शन कॅप्टन स्ट्रॉससमोर उपलब्ध आहे.

               इंग्लंडला आपल्या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि हॉलंड या सहा देशांशी खेळावे लागणार आहे. इंग्लंडचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश नक्की आहे. पण ऑस्ट्रेलिया किंवा श्रीलंका या सारख्या धोकादायक प्रतिस्पर्धी बरोबर क्वार्टर फायनलमध्ये त्यांची लढत होऊ शकते. ही लढत टाळण्यासाठी त्यांना आपल्या गटात अव्वल स्थान पटकवण्याची अवघड कामगिकरी करावी लागेल.

     बलाढ्य प्रतिस्पर्धी प्रमाणेच भारताचे हवामान आणि पिच इंग्लिश आर्मीची परीक्षा पाहणारे आहे. असं असलं तरी 1992 नंतर यंदा पहिल्यांदाच इंग्लंड टीममध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता आहे. आपली ही क्षमता सिद्ध करुन गेल्या 36 वर्षापासून अर्धवट राहिलेलं मिशन वर्ल्ड कप  पूर्ण करण्याचे आव्हान स्ट्रॉसच्या इंग्लिश आर्मीसमोर आहे.


12 comments:

आशिष देशपांडे said...

ek number post! maja aali!!

Prasad said...

ur analysis is perfect!
I have one question
I am wondering why Alister Cook is
not included in world cup squad
Is he injured?

Niranjan Welankar said...

Good consistency. Good description of both the teams. Waiting for India.

Onkar Danke said...

@ आशिष,खूप खूप धन्यवाद.

Onkar Danke said...

@ प्रसाद एलिस्टर कूक हा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला घ्यायला हरकत नव्हती. पण त्याच्यापेक्षा वन-डे क्रिकेटसाठी अधिक उपयुक्त असलेल्या जोनाथन ट्रॉटला (ट्रॉट एक चांगला ऑलराऊंडरही आहे.) इंग्लिश निवड समितीने पसंती दिली असावी.

Onkar Danke said...

@ निरंजन, भारताचा ब्लॉग लिहण्याची आणि त्यावर तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेण्याची मलाही खूप उत्सुकता आहे. पण भारताचे मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय टीमबद्दल सर्वात सविस्तरही लिहावे लागेल. म्हणून तो ब्लॉग सर्वात शेवटी ठेवला आहे.

santosh gore said...

बहुतेक वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच संघांना वर्ल्डकपचे दावेदार मानले आहे का ? सगळेच सहभागी जिंकण्यासाठीच सहभागी झालेत, हे खरे. मात्र सगळेच काही दावेदार असू शकत नाहीत.

Onkar Danke said...

@ संतोष गोरे, ऑस्ट्रेलियाची क्रिकेटवर असलेली सद्दी आता संपली आहे.त्यामुळे क्रिकेटविश्व आता समतल पातळीवर आलंय.याच कारणामुळे यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 टीम्सना आहे. याच सह टीमच्या सर्व बांजूंविषयीची माहिती तुम्ही माझ्या चार भागांच्या सीरिजमध्ये वाचू शकाल.

Unknown said...

साऊथ आफ्रिका:- बिचारे! हा एकच शब्द यांना शोभुन दिसतो, कारण १९९२, १९९९ आणि २००३ मध्ये यांची जी परिस्थिती होती त्यात ते अगदी जिंकता जिंकता हारले, त्यात डकवर्थ लुईस बरोबर साऊथ आफ्रिकेचा कचखाऊपणा आणि त्यांचे गणित (२००३ च्या वेळेसचे) तितकेच जबाबदार आहे. पण सध्याची आफ्रिकेची टीम भारी आहे, विशेष म्हणजे त्या टीममधले अनेक प्लेअर्स भारतात IPL मध्ये खेळलेले आहेत त्यामुळे त्यांना भारतातल्या परिस्थितीची उत्तम जाण आहे, आणि सध्याचा नंबर एकचा बॉलर डेल स्टेन आणि नंबर एकचा ऑलराऊंडर कॅलिस हे एकाच टीममध्ये आहेत, त्यांच्या टीममध्ये एक चांगला स्पिनर नसणे त्यांच्या दृष्टीने थोडे त्रासदायक ठरु शकते पण त्यांची बॅटिंग लाईनअप जी नंबर ८ पर्यंत आहे ती इतरांसाठी त्रासदायक ठरु शकते. तसच ग्रॅम स्मिथचा कॅप्टन म्ह्णुन हा शेवटचा वर्ल्डकप त्यामुळॆ हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी तो आटापिटा करणार हे निश्चीत.

Unknown said...

इंग्लंड चांगली साइड असली तरीही भारतात येऊन इथल्या कंडिशन्सला जुळवुन घेणे आणि तसच त्यांचा सध्याचा वन डे मधला फॉर्म बघितला तर थोडेसे कठिणच वाटते, त्यामुळे ते अगदी हॉट फेवरेट नाही म्हणता येणार. तसेच IPL स्पर्धांमध्ये इंग्लंडचे प्लेअर्सचा सहभाग फार कमी होता त्यामुळे भारतातल्या वातावरणाशी जुळवुन घेणे त्यांना कठिण आहे.

Onkar Danke said...

@ गौरव दक्षिण आफ्रिका टीम यंदाही वर्ल्ड कपची दावेदार आहे. मला वाटते एखादा हुशार विद्यार्थी पहिला क्रमांक मिळवण्याच्या दबावापोटी परीक्षेत कमी मार्क घेतो तशीच काहीची या टीमची अवस्था आहे.

Onkar Danke said...

@ गौरव ऍशेस सीरिज जिंकल्यानंतर जग जिंकल्याचं समाधान बहुधा इंग्लंडला मिळालाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे सीरिजमधला त्यांचा खेळ पाहता ते सेमी फायनल गाठतील असं वाटत नाही.भारतीय पिच आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेणं त्यांना नेहमीच कठीण गेलंय. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्येही ते भारतातल्या क्रिकेट व्यतिरीक्त गोष्टींवर कटकटी करताना हमखास आढळतील.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...