Wednesday, January 26, 2011

वर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 2 ) ---- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड

                                            दक्षिण आफ्रिका


क्रिकेटमधली चोकर्स म्हणून ओळखली जाणारी टीम म्हणजे दक्षिण आफ्रिका. महत्वाच्या क्षणी दडपणात येऊन करुन विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणारी टीम म्हणून ही  ओळखली जाते. ( आठवा 1999 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये क्लूसनरने केलेला गोंधळ )   कधी पावसामुळे डकवर्थ लूईस मेथडचा फटकाही या टीमला बसला आहे.  ( आठवा 1992 आणि 2003 चा वर्ल्ड कप )  संपूर्ण स्पर्धेत चागली कामगिरी करुन एखाद्या क्रिकेटपटूपुढे अथवा बलाढ्य संघापूढे अचानक नांगी टाकण्याची सवय या टीमला आहे. ( आठवा 1996 च्या वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये ब्रायन लाराने ठोकलेले शतक ) क्रिकेट विश्वात अशा प्रकारचे दुर्दैवी प्रसंग आफ्रिकेच्या वाट्याला अनेकदा आले आहेत किंवा दडपणाखाली त्यांनी ते ओढवून घेतले आहेत. त्यामुळेच त्यांना अद्याप  एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता या वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेतेपदासह चोकर्स हा आपल्यावरचा शिक्का पुसून टाकण्याचे आव्हान  ग्रॅमी स्मिथच्या या यंग आफ्रिकन टीमपुढे असणार आहे.

   आफ्रिकेनं जाहीर केलेल्या 15 जणांच्या टीममध्ये केवळ 4 प्लेअर्सनाच ( ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलीस, डि व्हिलियर्स आणि रॉबीन पिटरसन )  वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे. तब्बल 11 आफ्रिकन प्लेअर्स यंदा आपला पहिला वर्ल्ड कप खेळणार आहेत. नव्या दमाच्या या आफ्रिकन टीममध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही.स्मिथ आणि आमला ही जोडी त्यांच्या इनिंगची सुरुवात करेल. हशिम आमला सध्या आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय पिचवरचा त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. तर मोठ्या स्पर्धेत खेळण्याची जिगर स्मिथमध्ये आहे. त्यामुळे या जोडीकडून आफ्रिकेला मोठी आशा असेल. आक्रमण आणि बचाव या दोन्ही भूमिका ही ओपनिंग जोडी एकाच मॅचमध्ये निभावू शकते. डि व्हिलियर्स हा एक सर्वोत्तम फिल्डर,  चपळ विकेट किपर आणि आक्रमक बॅट्समन या वर्ल्ड कपचे खास आकर्षण ठरु शकतो. भारताविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याची कामगिरी ढेपाळली. मात्र त्याच्या सारख्या क्रिकेटपटूला फॉर्मात येण्यासाठी केवळ एक वन-डे पुरेशी ठरु शकते. जॅक कॅलीस नावाचा एक सध्याचा सर्वोत्तम ऑलराऊंडर हे आफ्रिकेचे आणखी एक शक्तीस्थान. सर गॅरी सोबर्सच्या जातकुळीतला क्रिकेटपटू या एका शब्दात त्याचं वर्णन पुरेसं आहे. तसेच त्याच्या जिगरबाज वृत्तीचा अनुभव भारताने नुकताच घेतला आहे. तर जे.पी. ड्युमिनी या युवा आफ्रिकन क्रिकेटपटूचं मी  सध्याच्या क्रिकेटमधला मायकल बेव्हन या शब्दात वर्णन करेल. टीमसाठी खेळणारा हा क्रिकेटपटू आहे. कोणतेही फटके न मारता केवळ एकरी दुहेरी धांवाच्या मदतीने स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याचे काम तो करतो. बेवन प्रमाणेच त्याचं रनिंग बिटविन द विकेट उत्तम आहे. तसेच लोअर ऑर्डरच्या मदतीने टीमला संकटातून बाहेर काढणे त्याला चांगलं जमतं.  बॉलला रन या गतीने तो 50 रन्स आरामात करु शकतो.

                                
       फास्ट बॉलिंग ही आफ्रिकेची नेहमीच शक्ती राहिली आहे. त्यांच्याकडे काल डोनाल्ड होता. आज डेल स्टेन आहे. सध्याच्या क्रिकेटमधला सर्वोत्तम फास्ट बॉलर म्हणून तो ओळखला जातो. भारताच्या पिचवर यापूर्वीही तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेच्या या स्टेन गन पासून सर्व टीमला सावधान राहावे लागेल. डेल स्टेनच्या मदतीला मॉर्ने मॉर्केल, सोत्सोबो हे फॉर्मात असलेले बॉलर आफ्रिकन टीममध्ये आहेत.त्यामुळे वेन पार्नेलला बहुतेक काळ टीमच्या बाहेर बसावे लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये 3 स्पिनर्सचा समावेश असला तरी अंतिम 11 मध्ये केवळ योहान बोथालाच संधी मिळू शकते. तसेच जे.पी. ड्युमिनी आणि रॉबिन पिटरसनच्या पार्ट टाईम बॉलरचाही कॅप्टन स्मिथला उपयोग होऊ शकतो.

    हे सर्व काही खरं असतं तरी आफ्रिकेच्या टीममध्ये सर्व काही आलबेल नक्कीच नाहीय. त्यांच्या मीडल ऑर्डरमध्ये अनुभवाची कमतरता आहे. तसे्च ड्युमिनी वगळता अन्य युवा बॅट्समन्समध्ये सातत्य नाही. त्यामुळे स्मिथ, आमला, कॅलीस आणि डि व्हिलियर्स या चौघांना बॅटिंगचा मुख्य भार व्हावा लागेल. आफ्रिकेचा स्पिन   ऐटॅकही कमकुवत आहे. अनुभवी योहान बोथा भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये फेल गेला. ड्यु प्लेसिस आणि इम्रान ताहीर हे अगदीच नवखे आहेत. स्पिन बॉलिंगला मदत करणा-या भारतीय पिचवर चांगल्या स्पिनरची कमतरता आफ्रिकेला जाणवू शकते.

   दक्षिण आफ्रिकेला आपल्या गटात भारत आणि इंग्लंड या दोन बलाढ्य देशांप्रमाणेच वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोन धोकादायक टीमबरोबर खेळावे लागणार आहे. आफ्रिकेचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश हा नक्की मानला जातोय. त्यापुढच्या तीन मॅचमध्ये मात्र त्यांचा क्रिकेट बरोबरच मानसिक क्षमतेचाही कस लागेल.

                                                            इंग्लंड
                                          

                          

    ज्या गो-या साहेबांनी क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगाला शिकवला त्याच साहेबांच्या देशाला म्हणजे इंग्लंडला आजवर एकदाही वर्ल्ड कप स्पर्धा जिंकता आलेली नाही.  एवढच नाही तर पहिल्या पाचही वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल गाठणारी इंग्लंडची टीम पुढच्या चार वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपूर्वीच आऊट झालीय. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. मागच्या वर्षी झालेली T-20 स्पर्धा इंग्लंडने जिंकलीय.त्यापाठोपाठ इंग्लंडने तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये  अ‍ॅशेस  सीरिज जिंकलीय. या विजयामुळे इंग्लंडचे शेयर्स सध्या गगनाला भिडलेत. अनेक क्रिकेट रसिक तसेच जाणकारांनी यंदा इंग्लंडला आपली पसंती दिलीय. अर्थात इंग्लंडचे हे हवेत असलेलं विमान ऑस्ट्रेलियानेच जमिनीवर आणलंय. हा ब्लॉग लिहत असताना  कांगारु विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये इंग्लिश टीम पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्ल्ड कपच्या कठीन पेपरपूर्वी स्ट्रॉस आणि कंपनीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

    कॅप्टन स्ट्रॉसच्या या टीममध्ये विकेट किपर मॅट प्रायरचा समावेश आश्चर्यकारक मानला जातोय. स्टीव्ह डेव्हिस आणि क्रेग क्रिसवेचर या युवा विकेट किपरच्या ऐवजी प्रायरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.फारशा फॉर्मात नसलेल्या प्रायरवर विकेट किपींग बरोबरच इनिंगची सुरुवात करण्याचाही अवघड जबाबदारी असेल.प्रायरच्या खराब फॉर्मामुळे कॅप्टन स्ट्रॉसचे काम आणखी वाढलंय. त्याला  त्याला कॅप्टनसी बरोबरच टीमला जलद ओपनिंग करुन देण्याचे कामही करावे लागेल. इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमध्ये जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि केविन पीटरसन असे अनुभवी बॅट्समन आहेत. त्यापैकी ट्रॉट आणि बेल सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत.
 तर पीटरसनला ब्रायन लाराप्रमाणे अधुनमधून धमाका करण्याची सवय सोडावी लागेल. पीटरसन हा असा खेळाडू आहे की जो ज्या दिवशी खेळेल त्या दिवसाचा राजा असतो. आक्रमक फटकेबाजीप्रमाणेच अनेक  अपरंपरिक फटकेही त्याच्या भात्यात आहेत. फक्त तो प्रत्येक मॅचमध्ये खेळत नाही ही इंग्लिश टीमची खरी डोकेदुखी आहे. T-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने मिळवलेल्या विजेतेपदात पीटरसनच्या धडाकेबाज कामगिरीचा मोठा वाटा होता. आता  या वर्ल्ड कपमध्ये तो चालावा यासाठी इंग्लिश फॅन्स नक्कीच प्रार्थना करत असतील. इऑन मॉर्गन हा आणखी एक हिरा इंग्लंड टीमला अलिकडच्या काळात सापडलाय. एक वेल फिनिशर असलेल्या मॉर्गनमध्ये मोठा बॅट्समन होण्याचे सारे गूण अगदी ठासून भरलेत. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची चांगली संधी मॉर्गनला आहे. या मिडल ऑर्डरमध्ये पॉल कॉलिंगवूडची भर टाकल्यास इंग्लिश बॅटिंग चांगलीच शक्तीशाली बनते. कॉलिंगवूडची बॅट सध्या त्याच्यावर रुसलीय.  पण एक सर्वोत्तम फिल्डर आणि उपयुक्त बॉलर म्हणून तो उपयुक्त आहे. तसेच भारतीय पिचवर त्याचा अनुभव टीमच्या मोठ्या कामी येऊ शकतो.अर्थात कॉलिंगवूडचा खराब फॉर्म कायम राहिल्यास ल्यूक राईटला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते.
 इंग्लंडने कांगारुंना टेस्ट सीरिजमध्ये लोळवलं ते बॉलिंगच्या जोरावर. जेम्स एण्डरसन हा त्यांचा फास्ट बॉलर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आता त्याला आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय पिचवर शेवटचा पेपर द्यायचा आहे. एण्डसरनच्या मदतीला स्टुअर्ट ब्रॉड, टीम ब्रेसनन अजमल शहझाद अशी फास्ट बॉलरची फौज इंग्लिश आर्मीमध्ये आहे. तर ग्रॅमी स्वान हा सध्याचा जगातला सर्वोत्तम स्पिनर याच टीममध्ये आहे. 1999 चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने  शेन वॉर्नच्या स्पिनच्या जोरावर जिंकला होता. आता तशीच ऐतिहासिक कामगिरी स्वान करतो का याकडे जगाचे लक्ष लागलंय. स्वानच्या मदतीला  मायकल यार्डी आणि जेम्स ट्रेडवेल हे नवखे स्पिनर इंग्लिश टीममध्ये आहेत. मात्र त्यांचा अंतिम 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे कॉलिंगवूड आणि पीटरसन यांच्या बॉलिंगचाही ऑप्शन कॅप्टन स्ट्रॉससमोर उपलब्ध आहे.

               इंग्लंडला आपल्या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि हॉलंड या सहा देशांशी खेळावे लागणार आहे. इंग्लंडचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश नक्की आहे. पण ऑस्ट्रेलिया किंवा श्रीलंका या सारख्या धोकादायक प्रतिस्पर्धी बरोबर क्वार्टर फायनलमध्ये त्यांची लढत होऊ शकते. ही लढत टाळण्यासाठी त्यांना आपल्या गटात अव्वल स्थान पटकवण्याची अवघड कामगिकरी करावी लागेल.

     बलाढ्य प्रतिस्पर्धी प्रमाणेच भारताचे हवामान आणि पिच इंग्लिश आर्मीची परीक्षा पाहणारे आहे. असं असलं तरी 1992 नंतर यंदा पहिल्यांदाच इंग्लंड टीममध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता आहे. आपली ही क्षमता सिद्ध करुन गेल्या 36 वर्षापासून अर्धवट राहिलेलं मिशन वर्ल्ड कप  पूर्ण करण्याचे आव्हान स्ट्रॉसच्या इंग्लिश आर्मीसमोर आहे.


Wednesday, January 19, 2011

वर्ल्डकपचे दावेदार ( भाग 1 )

     येत्या 19 फ्रेबुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होतीय. क्रिकेट हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे. त्यातली सर्वोच्च स्पर्धा म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप. ही स्पर्धा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याची आहे.  दर चार वर्षांनी होणा-या या क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेची मी नेहमीच आतुरतेनं वाट पाहत असतो.
     
     हा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबाबत सध्या वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली स्पर्धा पाहता हा अंदाज लावणं खरंच अवघड आहे. त्यामुळे मी चार भागात वर्ल्ड कपच्या दावेदारांविषयी लिहणार आहे. हे चार भाग पुढीलप्रमाणे असतील

                          भाग 1 -  पाकिस्तान आणि श्रीलंका
                           
                         भाग 2 - दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड
                             
                                         भाग 3 -  ऑस्ट्रेलिया

                                        भाग 4  - भारत


              पाकिस्तान

   क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. तर पाकिस्तान हा क्रिकेटमधला सर्वात अनिश्चित टीम आहे. चढ-उतार हे खेळाचे भाग मानले जातात. पाकिस्तान टीमच्या खेळात ते नेहमीच येत असतात. ही टीम दुबळ्या टीमकडून पराभूत होऊ शकते. तर अगदी बलाढ्य टीमला एकतर्फी पराभूत करु शकते. पाकिस्तानची टीम मैदानाबाहेरच्या प्रकरणामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलीय.  अनेक गुणवत्तापूर्ण प्लेयर्सचा या टीममध्ये समावेश आहे. त्यातंच हा वर्ल्ड कप भारतीय उपखंडामध्ये होत आहे.त्यामुळे पाकिस्तानला हलके लेखून चालणार नाही.

    पाकिस्तान टीममध्ये सध्या चालत असलेल्या वेगवेगळ्या वादविवादांमुळे हा ब्लॉग लिहत असेपर्यंत त्यांनी कॅप्टनचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह- उल- हकमध्ये कॅप्टन पदासाठी मुख्य चुरस आहे.   जागतिक क्रिकेटधल्या पहिल्या  5  विस्फोटक  बॅट्समनमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. तसेच तो एक अत्यंत धूर्त असा लेगस्पिनर आहे. त्यांची ऑलराऊंड कामगिरी पाकिस्तानसाठी महत्वाची ठरेल. मोहम्मद हाफिज आणि अहमद शेहजाद हे पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करतील. युनूस खान, मिसाबह-उल-हक, शाहिद आफ्रिदी अशी अनुभवी मिडल ऑर्डर पाकिस्तानकडे आहे. उमर  आणि कमरान  हे अकमल बंधूही पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरु शकतात.

  इम्रान खान, वासिम अक्रम , वकार युनूसचा पाकिस्तान हा देश गुणवत्तापूर्ण फास्ट बॉलर्सची खाण आहे. मोहम्मद असिफ आणि मोहम्मद आमिर हे त्यांचे दोन अस्सल फास्ट बॉलर स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये नसतील. मात्र तरीही शोएब अख्तर, उमर गुल,सोहल तन्वीर आणि वहाब रियास हे चार अस्सल फास्ट बॉलर त्यांच्या टीममध्ये आहेत. ह्या चारही बॉलर्सच्या गुणवत्तेबाबत काहीच शंका नाही.  ह्या चारही बॉलर्समध्ये एकहाती मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता आहे. तर अब्दुल रज्जाक हा  ऑलराऊंडर तर  सईद अजमल आणि अब्दूर रेहमान हे स्पिनरही टीममध्ये असल्यानं पाकिस्तानची बॉलिंग चांगलीच धोकादायक ठरु शकते.


    पाकिस्तानला साखळी मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, केनिया, झिम्बाब्वे, कॅनडा आणि झिम्बाब्वे या टीमसोबत मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. पाकिस्तानसाठी क्वार्टर फायनलचा प्रवेश हा निश्चित मानला जातोय. पाकिस्तानला पराभूत करण्याची क्षमता प्रतिस्पर्धी टीमपेक्षा त्याच टीममध्ये जास्त आहे. आपआपसातले मतभेद, बेशिस्त आणि फिक्सिंग यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट अक्षरश: पोखरुन गेलंय़. देशातल्या परिस्थितीचाही या टीमला मोठा फटका बसलाय. पाकिस्तानमधलं क्रिकेट सध्या पूर्णपणे थांबलंय. या अशांत परिस्थितीमुळे देशातलं क्रिकेटपूर्णपणे थांबलंय.  या टीमनी पूर्ण क्षमतेनं आणि सर्व मतभेद विसरुन खेळ केला तर ते वर्ल्ड कप नक्की पटकावू शकतात. मात्र गेल्या चार वर्षात क्रिकेटला बदनाम करणा-या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पाकिस्तानची टीम गुंतलेली आढळली आहे. त्यामुळे या टीममध्ये हे आणखी कोणती काळी कामगिरी करते याकडेही क्रिकेट जगाचे लक्ष असेल.


                           श्रीलंका

    भारतीय उपखंडात यापूर्वी झालेला वर्ल्ड कप श्रीलंकेनं जिंकला होता. त्या वर्ल्ड कपच्या आठवणी या स्पर्धेत श्रीलंकेला प्रेरणा देतील. 96 च्या विश्वविजेत्या टीममधला मुरलीधरन हा एकमेव क्रिकेटपटू या टीममध्ये आहे. मुरलीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे.  या वर्ल्ड कप नंतर तो वन-डे क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या या सर्वात महान प्लेयरला विजयी निरोप देण्यासाठी लंका टीम प्रयत्न करेल.


   कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने हे बॅट्समन आणि लसिथ मलिंगा आणि मुरलीधरन हे बॉलर ही श्रीलंकेची मुख्य शक्ती आहे. असं असलं तरी श्रीलंकेला ही स्पर्धा घरच्या मैदानावर खेळायची असल्यानं या टीममधला प्रत्येक प्लेअर महत्वाचा ठरु शकतो. दिलशान आणि उपल थरंगा टीमची सुरुवात करतील. महेला जयवर्धने हा आणखी एक ऑप्शन ओपनिंकसाठी लंककेकडे उपलब्ध आहे. कॅप्टन संगकारासह समरवीरा, जयवर्धने यांच्यावर मीडल ऑर्डरची जबाबदारी असेल. एंजलो मॅथ्यूज हा गुणी ऑलराऊंडर लंकेकडे आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करण्याचे काम तो चांगल्याप्रकारे करु शकतो.

   श्रीलंकेतल्या टर्निंग पिचवर मुरलीधरनला हलकं लेखण्याची चूक कोणतीच टीम करु शकणार नाही. लंकेचा हा अस्सल वाघ आपल्या घरच्या मैदानावर सावज टिपण्यासाठी सज्ज आहे. शिवाय त्याच्या मदतीला कॅरम बॉल फेम अंजथा मेंडिस आणि लेग स्पिनर रंगना हेराथही लंकेच्या टीममध्ये आहेत. फास्ट बॉलिंगची धुरा लसिथ मलिंगावरचं असेल. त्याची गोंधळात टाकणारी बॉलिंग एक्शन, निर्णायक क्षणी यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याला यशस्वी बनवत आल्या आहेत. तसेच रन्स रोखून धरण्याची त्याची क्षमताही वाखणण्याजोगी आहे. मात्र मलिंगाला समर्थ साथीदार लंकेकडे नाही. कुलसेकरा आणि दिलहारा फर्नांडो ह्या फास्ट बॉलरमध्ये सातत्य नाही. अशावेळी अनुभवी चामिंडा वासची कमी टीमला जाणवू शकते. अनुभवी सनथ जयसुर्या आणि युवा स्पिनर सुरज रणदीवला टीममधून वगळण्याचा निर्णय किती योग्य आहे हे लवकरचं स्पष्ट होईल.

       श्रीलंकेला साखळी मॅचेसमध्ये  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, केनिया, झिम्बाब्वे, कॅनडा आणि झिम्बाब्वे या टीमसोबत मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. श्रीलंकेसाठी क्वार्टर फायनलचा प्रवेश हा निश्चित मानला जातोय.  1996 साली अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेनं  वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर क्रिकेटमधल्या मोठ्या स्पर्धत त्यांची कामगिरी नेहमी समाधानकार झालीय. 2007 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका टीम उपविजेता होती. आता घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता या टीममध्ये नक्कीच आहे.
        

Sunday, January 9, 2011

कांगारूंचा कडेलोट !

                               
संपूर्ण क्रिकेट विश्वावर तळपणारा ऑस्ट्रेलियन साम्राज्याचा सूर्य आता मावळलाय. यंदाच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव इतका जबरदस्त आहे की सारे ऑस्ट्रेलियन फॅन्स सध्या एका काळरात्रीचा अनुभव घेत असतील.अगदी दिवार चित्रपटातल्या अमिताभच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पिछले 24 सालमें नही हुआ वो इस बार हुआ है.इंग्लंडने 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात  अ‍ॅशेस सीरिज जिंकलीय.त्यांनी तिन्ही टेस्ट डावाच्या फरकाने जिंकल्या.एकाच सीरिजमध्ये 3 टेस्ट डावाने पराभूत होण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच आलीय. केवळ ऑस्ट्रेलियन फॅन्स नाही तर संपूर्ण क्रिकेट जगसाठी हा एक नवा अनुभव आहे.


         मी क्रिकेटमधले वेस्ट इंडिजचे युग पाहिलेले नाही. लॉईड, रिचर्डस, ग्रिनीच, हेन्स, मार्शल या सारख्या महारथींचा खेळ मी पाहिलेला नाही. मात्र क्रिकेटमधले ऑस्ट्रेलियन यूग पूर्णपणे अनुभवलंय. सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी तसेच एकदिवसीय सीरिज एकतर्फी जिंकण्याचा पराक्रम करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया. प्रतिस्पर्धी टीमला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.मॅच जिंकून देणारे 1 किंवा 2 नाही तर संपूर्ण 11 खेळाडू एकाच टीममध्ये बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. क्रिकेटमधली सर्वात खडूस टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. अशी या ऑस्ट्रेलियन टीमची नाना रुपं मी गेल्या 15 वर्षात अनुभवलीत. क्रिकेटमधल्या एकेकाळच्या सर्वात बलाढ्य टीमसाठी 2010 हे वर्ष अतिशय खराब गेलं. T-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये त्यांचा इंग्लंडकडून एकतर्फी पराभव झाला. त्यानंतर लॉर्डस टेस्टमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यांची टीम केवळ 88 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर याच वर्षाच्या शेवटी मेलबॉर्न टेस्टमध्ये ही टीम 98 रन्सवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानने त्यांना तब्बल 15 वर्षानंतर टेस्ट मॅचमध्ये हरवलं. भारतानं टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये वन-डे सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला.अ‍ॅशेस  सीरिजमध्ये  ही टीम अपमानस्पदरित्या घरच्याच मैदानावर पराभूत झाली. 


                                ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंग हा या साम्राज्याचा  शेवटचा सुलतान ठरलाय. या संपूर्ण वर्षात त्याला केवळ 37 च्या सरासरीनं रन्स करता आले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या 4 टेस्टमध्ये तर त्यानं केवळ 113 रन्स केलेत. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा यांच्या ऑस्ट्रेलियन साम्राज्य उभे करण्यात पॉन्टिंगचा वाटा मोठा आहे. वॉर्न - मॅग्रा,हेडन, गिलख्रिस्ट यांच्या निवृत्तीनंतर दुबळ्या झालेल्या ऑस्ट्रेलियन टीमला त्याच्या बॅटनं अनेकदा तारलंय. आता त्याच पॉन्टिंगचा फॉर्म हरपल्यानं ऑस्ट्रेलियाच्या सा-या मर्यादा क्रिकेट विश्वासमोर उघड्या पडल्यात. टीमची नाव संकटातून बाहेर काढू शकेल असा जिद्दी प्लेअर ( माईक हसीचा काही प्रमाणात अपवाद ) या वर्षात ऑस्ट्रेलियनं टीमला सापडलाच नाही.
   
                                 पॉन्टिंगमधला कॅप्टनही अलिकडच्या काळात हरवलाय. मैदानात सतत फिल्डर्सच्या जागा बदलणे आणि सहका-यांना सूचना देणं ही त्याची सवय आहे. कॅप्टनसीची शैली आहे. मात्र त्याच्या  या सवयीचा फटका त्याच्याच बॉलर्सला बसतोय. सतत बदलणा-या फिल्डिंगमुळे त्याच्या टीममधले अगोदरच सामान्य असलेले बॉलर्स गोंधळून जातायत. भारत  विरुद्धच्या टेस्टमध्ये त्यानं लावलेल्या फिल्डिंगवर शेन वॉर्नने जोरदार टीका केली होती.त्याचबरोबर अखिलाडू वृत्तीबद्दलही तो पुरता बदनाम झालाय. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात सौरव गांगुली आऊट आहे हे ढळढळीत असत्य अंपायरला सांगणारा  पॉन्टिंग आजही सगळ्यांना आठवत असेल. आता तर मैदानावर घडणा-या चुकीच्या गोष्टींच्या बाजुने उभी राहयची त्याला सवयचं लागलीय.  फॉर्म हरपलाय, मॅच हरण्याचे नवे रेकॉर्ड  होतायत. तरी तो कॅप्टनसीवरुन हटायला तयार नाहीयं.एखाद्या राजकारण्याप्रमाणे तो मीच नेतृत्वासाठी कसा सक्षम आणि एकमेव लायक उमेदवार आहे याचे दावे करत सुटलाय. 


        यापूर्वी ऑस्ट्रेलियानं एका सीरिजमधल्या पराभवानंतर ताबडतोब स्टीव्ह वॉला कॅप्टन्सीवरुन दूर केलं होतं. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांना पॉन्टिंगला काढण्याचे धाडस झालं नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ही शोकांतिका आहे.याला कारणही तसेच आहे. त्यांना अजुनही पॉन्टिंगचा सक्षम वारसदार मिळालेला नाही. मायकल क्लार्कला या खालसा झालेल्या संस्थानाचा वारसदार म्हणून ओळखले जाते. मात्र त्याचा गेल्या काही सीरिजमधला फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. फॉर्म हरपलेला आणि कॅप्टन म्हणून टीममध्ये असणारा खे्ळाडू पाहण्याची सवय आता कदाचित  ऑस्ट्रेलियन फॅन्सला करावी लागेल. त्यापेक्षा कॅमेरुन व्हाईट हा मला कॅप्टनसीसाठी योग्य वाटतो. तो एक अस्सल आक्रमक ऑस्ट्रेलियन आहे. व्हिक्टोरिया बुशरेंजर्सची कॅप्टनसी त्यानं यशस्वीपणे हातळली आहे. धाडसी निर्णय घ्यायला तो घाबरत नाही. सहका-यांकडून 100 टक्के खेळ करुन घेण्याची त्याची क्षमता आहे. आता त्याच्याकडे T-20 टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. मात्र त्याला पूर्णवेळ कॅप्टनही करायला हवं.असं मला नेहमी वाटते.


          ऑस्ट्रेलियन प्लेअर्स अ‍ॅशेस  सीरिजमध्ये ज्या पद्धतीने खेळले त्याला खरंच तोड  नाही. ऑस्ट्रेलियन ओपनर्सचे रनिंग बिटवीन द विकेट इतके गचाळ यापूर्वी मी पाहिले नव्हते. ऐडलेड टेस्टच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅटिच आणि वॉटसन यांनी रन चोरताना जो अफलातून गोंधळ घातला त्याला तोड नाही.त्या टेस्टमध्ये सायमन कॅटिच ज्या पद्धतीनं रन आऊट झाला त्याचा आपल्या काही भारतीय बॅट्समन्सनाही हेवा वाटला असेल.


  त्यांच्या टीम निवडीमध्येही कायम गोंधळ होता. मिचेल  जॉन्सला दुस-या टेस्टमध्ये अगदी तडकाफडकी वगळण्यात आलं. मार्कस नॉर्थ आणि नॅथन हॉरित्झकडे दुर्लक्ष करण्यात आले. हॉरित्झ हा त्यांचा सध्याचा फॉर्मात असलेला स्पिनर. मात्र त्याच्या ऐवजी मायकल बियर सारख्या एकदम कोप-यातल्या स्पिनरला हुडकून खेळवण्यात आलं. शेवटच्या टेस्टमध्ये वारंवार नो बॉल टाकून बियरनं आपला   दर्जा काय आहे हे निवड समितीला दाखवून दिलं.


        ऑस्ट्रेलिय क्रिकेट यामधूनही सावरु शकते. मात्र त्यासाठी त्यांनी आता धाडसी बदल करायला हवेत. नवोदित खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी वेळ द्यायला हवा. केवळ मोठ्या खेळाडूंची तात्पूरती रिप्लेसमेंट म्हणून त्यांना खेळवण्याचा प्रयोग करु नये.  कॅलिन फर्गसन, क्लिंजर, ख्रिस्टीन  सारखे अनेक गुणावान प्लेअर ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक लीगमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपला ठसा उमटवत आहेत. त्यांना कुजवण्यात काय अर्थ आहे ? सर्वात महत्वाचे म्हणजे जी जिद्द आणि शेवटच्या बॉलपर्यंत हार न मानण्याची त्यांची सवय त्यांना पुन्हा एकदा लावून घ्यायला हवी.
     
        ऑस्ट्रेलियन टीमनं मागच्या दोन दशकात प्रतिस्पर्धी टीमची जी अवस्था केली तीच आज त्यांची झालीय. दिवसानंतर रात्र येतेच याचा अनूभव विजयाचा माज चढलेल्या या टीमला आला असेल. वीस वर्षांच्या आसपास असलेल्या युवा कांगारुंना हे पाहण्याची सवय नाहीयं. ती सवय त्यांनी आता लावायला हवी. क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणा-या कांगारुंचा साम्राज्यपदावरुन कडेलोट झालाय. क्रिकेट विश्व ख-या अर्थाने आता समतल झालंय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...