Thursday, February 25, 2010

सचिन, तुला दंडवत !


'' Commit all your crimes when Sachin is batting they will go unnoticed, beacause even lord is watching him playing ''


ग्वाहलेरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सचिनने 200 धावांची न भूतो अशी खेळी केली. या खेळानंतर भारावून गेलेल्या एका ऑस्ट्रेलियन फॅनची ही प्रतिक्रीया आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधला सर्वात दादा संघ. गेली तीन विश्वचषक ज्या देशाने सलग जिंकली. डॉन ब्रॅडमन पासून ते रिकी पॉंटिंग पर्यंत अनेक महान खेळाडू या देशाने क्रिकेट विश्वाला दिले.क्रिकेटमधील अगदी टिपीकल खडूस टीम. अशा देशातल्या एका क्रिकेट चाहत्यानं सचिनला वरील शब्दात मानवंदना दिलीय. सचिन रमेश तेंडुलकर ह्या नावाची लोकप्रियता ही एखाद्या देशाच्या सीमारेषेत बांधता येत नाही. हे पटवून देण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं...

तो आता 37 च्या जवळ आलायं. गेली 20 वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. जवळपास दोन पिढ्यातल्या खेळाडूंसोबत तो खेळलाय. ग्वाहलेरच्या सामन्यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय सामन्य़ात त्याने तब्बल 92 शतकं आणि 147 अर्धशकते झळकावली होती. कसोटीत सर्वाधिक धावा आणि शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सर्वाधिक शतके यासह कितीतरी विक्रम त्याच्या नावावर आहेत. एवढी अफाट आणि अचाट कामगिरी करुनही त्याची धावाची भूक जराही कमी झालेली नाही. ग्वाहलेरच्या मॅचमध्ये अगदी सुरवातीपासून तो दक्षिण अफ्रिकन बॉलर्सवर तूटून पडला. जगातल्या सर्वोत्तम बॉलर्सची फळी अफ्रिकेकडे आहे. मात्र सचिनच्या झंझावातपुढे हे दादा अफ्रिकन बॉलर्स एखाद्या मामुली क्लबचे बॉलर्स वाटत होते. 25 चौकार आणि 3 षटकारांनी सजलेली ही सचिनची डबलफास्ट एक्सप्रेस थेट 200 धावा काढून नाबाद राहीली. त्याच्या 191 धावा 45 व्य़ा ओव्हरमध्येच झाल्या होत्या. नंतरच्या 30 बॉलपैकी अवघे नऊ बॉल सचिनच्या वाटेला आले. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये सचिनला अधिक स्ट्राईक मिळाला असता तर....

गेली 39 वर्षे वन-डे क्रिकेट खेळले जातंय. तब्बल 2, 961 मॅच या काळात खेळल्या गेल्या. तरीही कोणत्याही फलंदाजाला 200 चा जादूई आकडा आतापर्यंत गाठता आला नव्हता. व्हिव्हियन रिचर्ड, लारा,पॉंटिंग, जयसूर्या, हेडन,गिलख्रिस्ट, अफ्रिदी यासारखे अनेक विध्वंसक खेळाडूंनी यासाठी प्रयत्न केले. वीरेंद्र सेहवाग हा विक्रम करेल असे मला सतत वाटायचे. माझ्यासहीत सर्वांचेच अंदाज सचिनने खोटे ठरवले. क्रिकेटमधल्या सर्वात स्पेशल खेळाडूनेच हा विक्रम करावा असे परमेश्वराच्या मनात असावे. त्याने या 200 धावा अफ्रिकन बॉलर्सच्या विरुद्ध केल्यात. बांगलादेश, केनिया, झिंम्बाबे किंवा नामिबिया सारख्या दुबळ्या बॉलर्सविरुद्ध नाही. स्टेन, पारनेल, कॅलीस सारखे दिग्गज बॉलर्स आणि सर्व 11 च्या 11 वर्ल्ड क्लास दर्जाच्या क्षेत्ररक्षकांवर मात करत त्याने द्विशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याच्या या द्विशतकाचे मोल आणखी आहे.

2006पासून टेनिस एल्बो आणि पाठीच्या दुखण्यांनी ग्रासल्यानंतर सचिनची कारकीर्द उतरणीला लागली, असे भाष्य सारेच करू लागले होते. ‘मला 2011मधील विश्वचषक स्पर्धेपर्यंत खेळायचे आहे,’ असे सचिन 2007मध्ये म्हणाला, त्यावेळीही त्याचा तो दावा हास्यास्पद ठरवला गेला होता. संजय मांजरेकर सारख्या क्रिकेट जाणकारांनी त्याला मोडित काढले होते. सचिनवर टीका करणे ही गोष्ट अनेक पत्रकारांसाठी जणू प्रतिष्ठेची गोष्ट बनली होती. एखादा कच्चा खेळाडू असता तर तो केंव्हाच दबून गेला असता. पण तो सचिन तेंडुलकर आहे. आपल्या सर्व टीकाकरांना त्याने नेहमी बॅटमधून उत्तर दिलंय. गेल्या 12 महिन्यात 34 डावात त्याने तब्बल 10 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. टेस्टमध्ये त्याने सलग चार शतक त्याने झळकावलीत.2009-10 या वर्षात त्याची टेस्टमधील वन-डेमधील सरासरी आहे 63.90 तर टेस्टमधील 84.25 .तब्बल 20 वर्षे आणि 442 सामने खेळून झाल्यानंतरही सचिनमध्ये धावा जमवण्याची भूक आणि त्यासाठी आवश्यक ऊर्जा इतक्या प्रमाणात कशी शिल्लक राहते, हा खरा चमत्कार आहे.


वयाच्या 37 व्या वर्षी नुकत्याच मिसरुड फुटलेल्या युवकाला लाजवेल असा उत्साह त्याच्यामध्ये क्रिकेट खेळताना असतो. ग्वाहलेरच्या आधीच्याच जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चौकार अडवताना त्याने अगदी अफलातून असा डाइव्ह मारला. सचिनच्या त्या डाइव्हमुळे एक रन वाचला. नेमक्या त्याच एक रनमुळे भारताने ती मॅच जिंकली. एखाद्या खेळाडूची संघासाठी यापेक्षा वेगळी अशी काय कमिटमेंट असू शकते.


सचिनचा खेळ म्हणजे द्रौपदीची थाळी आहे. जे पाहिजे ते तो देऊ शकतो.गरज पडली तर तो अगदी तंत्रशुद्ध खेळू शकतो. ऑस्ट्रेलिया सारख्या देशाविरुद्ध अगदी मर्यादीत फटक्यांचा वापर करत त्याने 200 धावा केल्यात. जगातल्या सर्वात वेगवान किंवा अगदी आखाडा खेळपट्टीव चौथ्या डावात तो मॅच वाचवू शकतो. कोणत्याही क्षणी अगदी एखादा गियर बदलण्याप्रमाणे तो झंझावात निर्माण करु शकतो.एखादी जमलेली जोडी त हमखास फोडू शकतो, अथवा जयपूरप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा एखादा नमुना सादर करतं सामन्याचा निकाल फिरवू शकतो. क्रिकेट खेळणे ही जगातली सर्वात सोपी आणि सूंदर गोष्ट आहे. असा विश्वास प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्याची शक्ती त्याच्या बॅटमध्ये आहे.

फक्त एकदिवसीय क्रिकेट,कसोटी क्रिकेट,शतक,विक्रम एवढ्यापूरतं सचिनचं मोठेपण आहे ? अजिबात नाही.चित्रविचीत्र पोशाख ,डिस्कोमध्ये उशीरापर्यंत धिंगाना, नटींसोबतचे अफेयर्स, आपल्या संघातल्या किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर किंवा निवड समितीबरोबर वाद यासारखे प्रकार त्यानं कधीचं केले नाहीत.अशाच प्रकारच्या प्रश्न विचारल्यास '' मला फक्त क्रिकेट खेळणं माहीती आहे " असं उत्तर सचिन देतो.मला वाटतं सचिनचं हेच उत्तर त्याला महान बनवतं.

गेली 20 वर्षे सचिन सतत खेळतोय.या 20 वर्षात आपल्या देशात अनेक उलाथपालथी झाल्या. कित्येक सरकार आली आणि गेली,देशाच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला, काही मुठभर अतिरेक्यांनी मुंबईसह सर्व देशाला वेठीस धरलं, कारगीलमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोरी केली, अर्थव्यवस्थेला आव्हान देणारे घोटाळे झाले,कित्येक जातीय दंगली झाल्या,भूंकप,महापूर,चक्रीवादळ,सूनामी सारख्या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींना देशाला सामाना करावा लागला.केवळ सामाजिक आयुष्यात नाही तर व्यक्तीगत आयुष्यातही या शंभर कोटींपेक्षा अधिक असलेल्या या खंडप्राय देशातल्या नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलंय.मात्र या सा-या आपत्तीचा विसर पाडणारं टॉनिक सचिनच्या बॅटनं आपल्याला वारंवार दिलंय़.

महात्मा गांधींबद्दल आईन्सटाईनचे एक छान वाक्य आहे , '' जगात अशा प्रकारचा एखादा हाडामासाचा माणूस होऊन गेला , यावर भावी पिढीचा अजिबात विश्वास बसणार नाही'' आईन्सटाईनच्या या वाक्याचा आधार घेत मला अस म्हणावं वाटत, '' जगात अशा प्रकारचा हाडामासाचा क्रिकेट खेळाडू होऊन गेला यावर भविष्यातल्या क्रिकेट फॅन्सचा अजिबात विश्वास बसणार नाही. '' अशा या महान खेळाडूला दंडवत घालण्याशिवाय आपण काय करु शकतो ?

6 comments:

Gireesh Mandhale said...

Few quotes from TIME magazine:

When Sachin Tendulkar travelled to Pakistan to face one of the finest bowling attacks ever assembled in cricket, Michael Schumacher was yet to race a F1 car, Lance Armstrong had never been to the Tour de France, Diego Maradona was still the captain of a world champion Argentina team, Pete Sampras had never won a Grand Slam.

When Tendulkar embarked on a glorious career taming Imran and company, Roger Federer was a name unheard of; Lionel Messi was in his nappies, Usain Bolt was an unknown kid in the Jamaican backwaters. The Berlin Wall was still intact, USSR was one big, big country, Dr Manmohan Singh was yet to "open" the Nehruvian economy.

It seems while Time was having his toll on every individual on the face of this planet, he excused one man. Time stands frozen in front of Sachin Tendulkar. We have had champions, we have had legends, but we have never had a Sachin Tendulkar and we never will.

खरंच, हे फ्क्त आणि फ्क्त सचिनंच करु शकतो. ग्वाल्हेरच्या मॅचमध्ये तो १९९८ मधल्या फॉर्म प्रमाणे खेळंत होता. त्याचे कितीतरी शॉट्स अप्रतिम होते, स्टेनचा ऑफकडचा लेगला मारलेला शॉट असो किंवा inside out असो.
He played many hard shots so seamlessly that those looked so simple and commentators mentioned again and again that this master is playing at even his best !!
आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण सचिनच्या era मध्ये जन्माला आलो आहोत.
अशा सचिनला त्रिवार प्रणाम !

Niranjan Welankar said...

नमस्कार. चांगला लेख आहे. सचिन धन्य आहे. लेखामधलं शेवटचं वाक्य सार्थक आहे.

Amit Joshi says said...

मीही सचिनचा चहाता आहे. पण एक गोष्ट नहमी मला खटकते. मोक्याच्या ठिकाणी किंवा एखादी धावसंख्या चेस करतांना सचिनने कधीच मोठी खेळी केली नाही.( अपवाद शारजा सारखी दोन झंझावती खेळ वगळता ).यावर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांने पुराव्यासह सिद्ध करावे.
एवढे विक्रम झाले, आता ही तक्रार कामची बंद करण्याकरता सचिनच्या हातून अशी Target Chase करणारी खेळी व्हावी ही परमेश्वराकडे प्रार्थना. शेवट फारचा छान झाला आहे........

आनंद पत्रे said...

सुंदर लेख, आणि सहमत...

santosh gore said...

गिरीश मंधाळेचं म्हणनं अगदी सार्थ आहे की, आपण सचिन युगात जन्म घेतलाय. अमिताभ बच्चनला पडद्यावर पाहताना आपण स्वत: भ्रष्ट समाजाविरोधात पेटून उठतो आहोत असं वाटायचं. तर सचिनच्या खेळी बघताना वाळवंटाप्रमाणे रखरखीत झालेल्या या जिवनात आनंदाची झुळूक आल्याचा भास होतो. सचिनची खेळी ही त्याची वैयक्तीक नसते, तर सर्व क्रिकेट चाहतेच हे त्याच्या रूपात मैदानात खेळत असतात. त्यांचं प्रतिनिधीत्व फक्त सचिन करतो इतकंच.

Unknown said...

yes, i am totally agree with amit joshi. No doubt sachin is great player. But most of the times, in finals, he was fail. Only in sharjah 1998 against australia, wotrld cup 2003 match against pakistan sachin played beautifully though it is important match. Again Sachin is having one more bad habbit i. e. nervous 90.

i feel sachin becomes too cautious at important moments like in finals and near 100.

still sachin is too great...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...