Thursday, February 25, 2010

सचिन, तुला दंडवत !


'' Commit all your crimes when Sachin is batting they will go unnoticed, beacause even lord is watching him playing ''


ग्वाहलेरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सचिनने 200 धावांची न भूतो अशी खेळी केली. या खेळानंतर भारावून गेलेल्या एका ऑस्ट्रेलियन फॅनची ही प्रतिक्रीया आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधला सर्वात दादा संघ. गेली तीन विश्वचषक ज्या देशाने सलग जिंकली. डॉन ब्रॅडमन पासून ते रिकी पॉंटिंग पर्यंत अनेक महान खेळाडू या देशाने क्रिकेट विश्वाला दिले.क्रिकेटमधील अगदी टिपीकल खडूस टीम. अशा देशातल्या एका क्रिकेट चाहत्यानं सचिनला वरील शब्दात मानवंदना दिलीय. सचिन रमेश तेंडुलकर ह्या नावाची लोकप्रियता ही एखाद्या देशाच्या सीमारेषेत बांधता येत नाही. हे पटवून देण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं...

तो आता 37 च्या जवळ आलायं. गेली 20 वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. जवळपास दोन पिढ्यातल्या खेळाडूंसोबत तो खेळलाय. ग्वाहलेरच्या सामन्यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय सामन्य़ात त्याने तब्बल 92 शतकं आणि 147 अर्धशकते झळकावली होती. कसोटीत सर्वाधिक धावा आणि शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सर्वाधिक शतके यासह कितीतरी विक्रम त्याच्या नावावर आहेत. एवढी अफाट आणि अचाट कामगिरी करुनही त्याची धावाची भूक जराही कमी झालेली नाही. ग्वाहलेरच्या मॅचमध्ये अगदी सुरवातीपासून तो दक्षिण अफ्रिकन बॉलर्सवर तूटून पडला. जगातल्या सर्वोत्तम बॉलर्सची फळी अफ्रिकेकडे आहे. मात्र सचिनच्या झंझावातपुढे हे दादा अफ्रिकन बॉलर्स एखाद्या मामुली क्लबचे बॉलर्स वाटत होते. 25 चौकार आणि 3 षटकारांनी सजलेली ही सचिनची डबलफास्ट एक्सप्रेस थेट 200 धावा काढून नाबाद राहीली. त्याच्या 191 धावा 45 व्य़ा ओव्हरमध्येच झाल्या होत्या. नंतरच्या 30 बॉलपैकी अवघे नऊ बॉल सचिनच्या वाटेला आले. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये सचिनला अधिक स्ट्राईक मिळाला असता तर....

गेली 39 वर्षे वन-डे क्रिकेट खेळले जातंय. तब्बल 2, 961 मॅच या काळात खेळल्या गेल्या. तरीही कोणत्याही फलंदाजाला 200 चा जादूई आकडा आतापर्यंत गाठता आला नव्हता. व्हिव्हियन रिचर्ड, लारा,पॉंटिंग, जयसूर्या, हेडन,गिलख्रिस्ट, अफ्रिदी यासारखे अनेक विध्वंसक खेळाडूंनी यासाठी प्रयत्न केले. वीरेंद्र सेहवाग हा विक्रम करेल असे मला सतत वाटायचे. माझ्यासहीत सर्वांचेच अंदाज सचिनने खोटे ठरवले. क्रिकेटमधल्या सर्वात स्पेशल खेळाडूनेच हा विक्रम करावा असे परमेश्वराच्या मनात असावे. त्याने या 200 धावा अफ्रिकन बॉलर्सच्या विरुद्ध केल्यात. बांगलादेश, केनिया, झिंम्बाबे किंवा नामिबिया सारख्या दुबळ्या बॉलर्सविरुद्ध नाही. स्टेन, पारनेल, कॅलीस सारखे दिग्गज बॉलर्स आणि सर्व 11 च्या 11 वर्ल्ड क्लास दर्जाच्या क्षेत्ररक्षकांवर मात करत त्याने द्विशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याच्या या द्विशतकाचे मोल आणखी आहे.

2006पासून टेनिस एल्बो आणि पाठीच्या दुखण्यांनी ग्रासल्यानंतर सचिनची कारकीर्द उतरणीला लागली, असे भाष्य सारेच करू लागले होते. ‘मला 2011मधील विश्वचषक स्पर्धेपर्यंत खेळायचे आहे,’ असे सचिन 2007मध्ये म्हणाला, त्यावेळीही त्याचा तो दावा हास्यास्पद ठरवला गेला होता. संजय मांजरेकर सारख्या क्रिकेट जाणकारांनी त्याला मोडित काढले होते. सचिनवर टीका करणे ही गोष्ट अनेक पत्रकारांसाठी जणू प्रतिष्ठेची गोष्ट बनली होती. एखादा कच्चा खेळाडू असता तर तो केंव्हाच दबून गेला असता. पण तो सचिन तेंडुलकर आहे. आपल्या सर्व टीकाकरांना त्याने नेहमी बॅटमधून उत्तर दिलंय. गेल्या 12 महिन्यात 34 डावात त्याने तब्बल 10 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. टेस्टमध्ये त्याने सलग चार शतक त्याने झळकावलीत.2009-10 या वर्षात त्याची टेस्टमधील वन-डेमधील सरासरी आहे 63.90 तर टेस्टमधील 84.25 .तब्बल 20 वर्षे आणि 442 सामने खेळून झाल्यानंतरही सचिनमध्ये धावा जमवण्याची भूक आणि त्यासाठी आवश्यक ऊर्जा इतक्या प्रमाणात कशी शिल्लक राहते, हा खरा चमत्कार आहे.


वयाच्या 37 व्या वर्षी नुकत्याच मिसरुड फुटलेल्या युवकाला लाजवेल असा उत्साह त्याच्यामध्ये क्रिकेट खेळताना असतो. ग्वाहलेरच्या आधीच्याच जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चौकार अडवताना त्याने अगदी अफलातून असा डाइव्ह मारला. सचिनच्या त्या डाइव्हमुळे एक रन वाचला. नेमक्या त्याच एक रनमुळे भारताने ती मॅच जिंकली. एखाद्या खेळाडूची संघासाठी यापेक्षा वेगळी अशी काय कमिटमेंट असू शकते.


सचिनचा खेळ म्हणजे द्रौपदीची थाळी आहे. जे पाहिजे ते तो देऊ शकतो.गरज पडली तर तो अगदी तंत्रशुद्ध खेळू शकतो. ऑस्ट्रेलिया सारख्या देशाविरुद्ध अगदी मर्यादीत फटक्यांचा वापर करत त्याने 200 धावा केल्यात. जगातल्या सर्वात वेगवान किंवा अगदी आखाडा खेळपट्टीव चौथ्या डावात तो मॅच वाचवू शकतो. कोणत्याही क्षणी अगदी एखादा गियर बदलण्याप्रमाणे तो झंझावात निर्माण करु शकतो.एखादी जमलेली जोडी त हमखास फोडू शकतो, अथवा जयपूरप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा एखादा नमुना सादर करतं सामन्याचा निकाल फिरवू शकतो. क्रिकेट खेळणे ही जगातली सर्वात सोपी आणि सूंदर गोष्ट आहे. असा विश्वास प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्याची शक्ती त्याच्या बॅटमध्ये आहे.

फक्त एकदिवसीय क्रिकेट,कसोटी क्रिकेट,शतक,विक्रम एवढ्यापूरतं सचिनचं मोठेपण आहे ? अजिबात नाही.चित्रविचीत्र पोशाख ,डिस्कोमध्ये उशीरापर्यंत धिंगाना, नटींसोबतचे अफेयर्स, आपल्या संघातल्या किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर किंवा निवड समितीबरोबर वाद यासारखे प्रकार त्यानं कधीचं केले नाहीत.अशाच प्रकारच्या प्रश्न विचारल्यास '' मला फक्त क्रिकेट खेळणं माहीती आहे " असं उत्तर सचिन देतो.मला वाटतं सचिनचं हेच उत्तर त्याला महान बनवतं.

गेली 20 वर्षे सचिन सतत खेळतोय.या 20 वर्षात आपल्या देशात अनेक उलाथपालथी झाल्या. कित्येक सरकार आली आणि गेली,देशाच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला, काही मुठभर अतिरेक्यांनी मुंबईसह सर्व देशाला वेठीस धरलं, कारगीलमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोरी केली, अर्थव्यवस्थेला आव्हान देणारे घोटाळे झाले,कित्येक जातीय दंगली झाल्या,भूंकप,महापूर,चक्रीवादळ,सूनामी सारख्या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींना देशाला सामाना करावा लागला.केवळ सामाजिक आयुष्यात नाही तर व्यक्तीगत आयुष्यातही या शंभर कोटींपेक्षा अधिक असलेल्या या खंडप्राय देशातल्या नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलंय.मात्र या सा-या आपत्तीचा विसर पाडणारं टॉनिक सचिनच्या बॅटनं आपल्याला वारंवार दिलंय़.

महात्मा गांधींबद्दल आईन्सटाईनचे एक छान वाक्य आहे , '' जगात अशा प्रकारचा एखादा हाडामासाचा माणूस होऊन गेला , यावर भावी पिढीचा अजिबात विश्वास बसणार नाही'' आईन्सटाईनच्या या वाक्याचा आधार घेत मला अस म्हणावं वाटत, '' जगात अशा प्रकारचा हाडामासाचा क्रिकेट खेळाडू होऊन गेला यावर भविष्यातल्या क्रिकेट फॅन्सचा अजिबात विश्वास बसणार नाही. '' अशा या महान खेळाडूला दंडवत घालण्याशिवाय आपण काय करु शकतो ?

Thursday, February 18, 2010

सूपरफास्ट सेहवागभारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आज टेस्टमध्ये टीम इंडिया ख-या अर्थाने नंबर वन बनलीय. टीम इंडियाला नंबर वन बनवण्यात सेहवागच्या खेळाचा मोठा वाटा आहे. टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय सेहवागन एकहाती मिळवून दिलेत. सेहवागची बॅटींग पाहताना गेल्या अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचारांना या ब्लॉगमध्ये बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न...


वीरेंद्र सेहवागची बॅटींग ही एखाद्या मुक्तछंदामधल्या कवितेसारखी असते. क्रिकेटमधले पारंपारिक नियम, रुढी, परंपरा यांच्यात ती कधीही अडकत नाही. कोणत्याही परंपरेत तील बंदिस्त करता येत नाही.सेंच्युरी जवळ आली तरी त्याची धावगती कमी होत नाही. समोरच्या बॉलर्सच दडपण तो कधीही घेत नाही.


कानपूर असो की कराची... मुंबई असो की मॅलेबोर्न खेळपट्टी...मॅचचा दिवस मॅचमधली सिच्युएशन यापैकी कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. गेल्या दहा वर्षांत टीम इंडियाच्या बॅटनं कात टाकलीय.पूर्वी भारतीय फलंदाजांचे नाव जगात आदराने घेतलं जायचं. आता वीरेंद्र सेहवाग या नजफगडच्या नवाबाची जगातल्या सर्व बॉलर्सना दहशत वाटतेय. T-20 मध्ये 200 धावांचा पाठलाग असो अथवा टेस्टमध्ये 1 दिवसात 400 रन्स.... वीरुची बॅट चालली की कोणतही टार्गेट अशक्य नसंत. चांगल्या बॉलचा आदर करायचा... खराब चेंडूची वाट बघायची या सारख्या पारंपारिक कल्पना त्याला रुजत नाहीत. द्रविड, लक्ष्मण या सारख्या फलंदाजांप्रमाणे तो बॉलशी लोकशाही पद्धतीने वाटाघाटीही कधी करत नाही. येणा-या प्रत्येक बॉलवर तुटून पडणे एवढाच एक मंत्र त्याच्या रक्तात भिनलाय.


खेळताना त्याचे पाय हलत नाहीत... नो प्रॉब्लेम.. पण संघाचा धावफलक तरी हलतो ना.अगदी बॉलर्सला धाप लागेल इतक्या वेगाने तो पळत असतो. उसळत्या चेंडूंचा तो सामना करु शकत नाही अशी टीका नेहमी केली जाते. पण अशा चेंडूवर तो नेहमी कोसळतो असे नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका या देशातल्या वेगवान खेळपट्टीवर त्याने शतक झळकावली आहेत.तंत्र हेच पूर्णब्रम्ह हे सत्य त्यानं कधीही स्विकारले नाही. वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधली सीमारेषाच त्याने पूसून टाकलीय. फक्त ड्रेस कोडमध्ये काय तो बदल. पण दोन्ही कडे रिझल्ट एकच. बॉलर्सचे डोळे पांढरे होणे.


सिक्सर आणि कॅचमध्ये नेहमीच एक धोकादायक सीमारेषा असते. सेहवाग सारख्या बॅटसमनचे नेहमी त्या धोकादायक रेषेवर वास्तव असतो. त्यामुळे चौकार किंवा षटकार खेचत शतक पूर्ण करण्याचा बेदरकारपणा त्याने अनेकदा दाखवलाय. यामध्ये तो अयशस्वी झाला तरी त्याची त्याला पर्वा नसते. कारण रेकॉर्ड, भविष्यातील टीममधील स्थानची तरतूद हा विचार त्याच्या गावीही नसत. वर्तमान काळात जगणा-या पिढीचा सेहवाग हा प्रतिनिधी आहे. त्यामुळेच वर्तमान काळात जगणा-या लाखो तरुणांचा तो आयडॉल बनलाय. जोपर्यंत तरुणांची ही पिढी आहे. तो पर्यंत वीरेंद्र सेहवाग नावाच्या वल्लीचे महत्व कायम राहणार आहे.

Friday, February 5, 2010

मराठीचे प्रयोग !


महाराष्ट्रापुढचे सर्व प्रश्न बहुधा संपले आहेत. राज्यात इतका उजेड पडलाय की आता भारनियमन कुणाला आठवत नाही. गहू, साखर सर्व आवश्यक वस्तू आता मुबलक प्रमाणात मिळू लागल्यात. सिंचनाचा अनुशेष केंव्हाच भरलाय. कुपोषणाची समस्या संपलीय. नक्षलवाद्यांनी आता शस्त्र खाली ठेवलीत. सवर्ण-दलित यांच्यातली दरी संपलीय. त्यामुळे आता एकचं प्रश्न आता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना सतावतोय तो म्हणजे मराठीचा अभिमान टिकला पाहिजे. या राज्यात मराठी भाषेला गंभीर धोका निर्माण झालाय. त्यामुळे आता मराठीच्या रक्षण करणे हेच विरोधीपक्ष ( शिवसेना आणि मनसे ) यांचे मुख्य काम उरलंय. मराठी, मराठी, मराठी अगदी कंटाळा आलाय आता या चावून चावून चोथा झालेल्या मुद्याचा.


मी मराठी आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मी त्याच्या अगोदर मी भारतीय आहे. भारतीय असण्याचा मला गर्व आहे. पण हे मी उघडपणे बोलू लागलो की मी महाराष्ट्र द्रोही ठरतो. तरी नशीब मी कोणी मोठा सेलिब्रिटी नाही. नाही तर लगेच माझ्यावर बंदीचे फतवे छापले गेले असते. मुंबई भारतीयांची आहे.असं म्हणा-या व्यक्तींना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जातायत.


राजकीय पक्षांचे ठिक आहे हो.... तो त्यांचा धंदाच आहे. पण माध्यमांचे काय ? राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या सर्व हिंदी मीडिया तुटून पडलाय. राज-उद्धव यांचा मराठीचा गजर स्वार्थी आहे हे मान्य आहे. पण ही माध्यमं टीआरपीची रॅट रेस जिंकण्यासाठी मराठी द्वेषाचे बीज हिंदी भाषकांच्या मनात निर्माण करण्याचे काम करतायत. राज ठाकरेंना कधी भिंद्रानवाले तर कधी महंमद अली जिना संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. राज ठाकरेंचे भाषण हे आग आणि किंवा जहर ओकणारे असते आणि अबु आझमी किंवा मुलायमसिंग यांच्या भाषणातून ज्ञानेश्वरांच्या ओव्या बाहेर पडत असतात का ? लालू- मुलायम उघडपणे सिमी सारख्या दहशतवादी संघटनेचे समर्थन करतात.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना बटाला हाऊसमधले एन्काउंटर हे बनावट असल्याचा साक्षात्कार आता होतो. पण ही मंडळी धर्मनिरपेक्षता या गोंडस नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करतात.पण राज आणि उद्धव यांना खलनायक ठरवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.


मला मान्य आहे की वरील दोन्ही परिच्छेदामधील मुद्दे हे काहीसे परस्परभिन्न आहेत.पण गेल्या काही दिवसांत या सा-या घडामोडी इतक्या वेगाने घडतायत की डोक्याचा पार ' केमीकल लोचा ' झालाय.अगदी अटलजींच्या शब्दात सांगयाचे तर,'' कौरव कोण पांडव कोण बडा तेढा सवाल है चारों और शकुनी का फैला मायजाल है ''असं म्हणण्याची पाळी माझ्यावर येतीय.


आता या सर्व गदारोळात भर पडलीय ती राहुल गांधींची. अनेकांना ते युथ आयकॉन वाटतात. काँग्रेसी कार्यकर्त्यांना ते मर्यादा पुरुषोत्तम आणि अगदी भावी पंतप्रधान वाटतात.गांधी घराण्याचा पंतप्रधान असता तर बाबरी मशीद पडलीच नसती. अशी दर्पोक्ती काही वर्षांपूर्वी करणारे हेच ते राहुल गांधी आहेत.आता काँग्रेसच्या या युवराजांना राज्याभिषेक करण्याची घाई झालीय. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या महत्वकांक्षेने त्यांना सध्या झपाटलंय. निवडणुका जिंकणे ही राजकीय नेत्यांची महत्वकांक्षा असणे स्वाभाविक आहे. पण बिहारच्या निवडणुका जिंकण्याकरता महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यातली दरी वाढवण्याचे काम ते करत आहेत.


खरं तर प्रादेशिक अस्मितांना गोंजारण्याचे काम काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वारंवार केलंय. भिंद्रनवालेचे पंजाबमध्ये भूत इंदिरा गांधींनी निर्माण केले होते. वेगळ्या काश्मीरचा नारा देणा-या पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या सारख्या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसने अनेकदा युती केलीय.सुरवातीच्या काळात शिवसेना आणि नंतर मनसे यांना मोठं करण्याचे काम काँग्रेसने केलंय. एवढंच नाही तर प्रभाकरन चे समर्थन करणा-या, राजीव गांधींच्या हत्येची चौकशी करणा-या जैन आयोगाच्या अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवलाय अशा द्रमुक पक्षाबरोबर काँग्रेसची गेल्या साडेपाच वर्षांपासून युती आहे.सत्तेसाठी सर्व प्रकारचे मार्ग वैध समजण्याची प्रथा सर्वप्रथम काँग्रेसने सुरु केली. आज प्रत्येक राजकीय पक्ष ही प्रथा अगदी कसोशीने पाळतायत.


आता राहुल गांधींना बिहारची निवडणूक जिंकण्याची स्वप्न पडतायत. यासाठी देशाकरता लढणा-या सैन्यामध्ये प्रांतीय भेद निर्माण करण्याचे काम ते करतायत. भारतीय लष्करांमध्ये लढणा-या जवांनांना प्रांत, जात, धर्म नसतो. त्यांचा केवळ एकच देश असतो तो म्हणजे भारत. आजवर सर्वच राज्यांनी राज्यकर्त्यांनी ह्याचे भान पाळलंय. मात्र अनेक मोठ्या (?) व्यक्ती ज्यांना भावी पंतप्रधान समजतात अशा राहुल गांधींना सभेत भाषण करत असताना याचे भान राहीलेले नाही.


बरं महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. 105 जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीय. ही एकच टेप बाळासाहेबांची आणि राजसाहेबांची सेना कायम वाजवत असते. ( संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या बद्दल मला आदर आहे.कृपया कोणताही गैरसमज करु नये.) परंतु या व्यक्तींच्या बलिदानाचा राजकीय वापर किती काळ करणार ? शिवरायांच्या पुण्याईवर जगणारी उत्तर पेशवाई इंग्रजांनी बुडवली. आता हे नाकर्ते राज्यकर्ते महाराष्ट्र बुडवण्यास सज्ज झाले आहेत.


महाराष्ट्रातल्या निम्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. महागाईने सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झालंय.मानव विकास निर्देशांकात राज्यातले अनेक जिल्हे मागे पडलीत. विभागवार अनुशेष वाढत चाललाय. मोठे उद्योग राज्यात येत नाहीत.शहरे बकाल आणि खेडी भकास बनत चाललीत. पण त्याची पर्वा कुणाला आहे ? महागाईच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अशोक चव्हाण अनुपस्थित राहीले. कारण त्यांना राहुल गांधींचे स्वागत करायचे होते.राज्याचा मुख्यमंत्री सुमारे दोन तास घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या युवराजाची प्रतिक्षा करत होते. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेचे जबाबदारी आहे. पण त्यांना राहुल गांधींचे जोडे सांभाळणे महत्वाचे वाटले.संजय गांधींचे जोडे सांभाळण्याचे काम शंकरराव चव्हाण यांनी केलं होत. त्याच ग्रेट काँग्रेसी परंपरेचं पालन रमेश बागवे करत आहेत.


राहुल गांधींचा मुंबई दौरा हा तसा या राज्यासाठी महत्वाचा विषय नाही.पण ही जणू काही एखाद्या स्वातंत्र्यसेनानीचा दौरा होता. राहुल गांधी हे जणू सुभाषचंद्र बोस यांचे अवतार ! त्यांनी शिवसैनिकांच्या हातावर तूरी देऊन लोकलने कसा प्रवास केला.याची वर्णने केली जातील.शिवसेना संपली,वाघ घायळ झाला, मुंबई जिंकली, ठारे हरले अशा प्रकारच्या हेडलाईन्सला आता जोर येईल. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना पुन्हा एखादा नवा ड्रामा करेल. त्यावर तुरी देण्यासाठी राज ठाकरेंचे नवे प्रयोग.... महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले आहेत. महाराष्ट्र आबादी -आबाद आहे. त्यामुळे या मराठीच्या प्रयोगाला पुन्हा सर्वत्र जोर येऊ लागेल.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...