Wednesday, January 27, 2010

हॉकीचे हाल !


हॉकीची विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास आता अवघा एक महिना उरलाय. तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा भारतामध्ये खेळवली जाणार आहे. मात्र ज्या देशात हॉकीला नॅशनल गेम म्हणून मान्यता आहे त्या भारतीयांना या स्पर्धेचे वेध लागलेत ? मला तरी असे वाटत नाही. कल्पना करा क्रिकेट विश्वचषकास अवघा एक महिना बाकी आहे. त्यावेळी देशात कसे वातावरण असेल... भारतीय कर्णधारापासून ते अगदी रणजी खेळाडूपर्यंत प्रत्येक जण या विश्वचषकात भारताला कशी संधी आहे यावर चर्चा करताना दिसेल. टीम इंडियाला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये चढाओढ रंगेल. इव्हेंट मॅनेजर, खाजगी वाहिन्या, टॅव्हल एजन्सी, टीव्ही कंपनी या प्रत्येकासाठी हा विश्वचषक कमाईचे एक प्रमुख संधी असेल. क्रिकेट विश्वचषकादरम्यान ही संधी कॅच करण्यासाठी जो तो आपल्या परीने सज्ज झाला असेल. भारतीय टीम त्याचा गट, मॅचेसची दिनांक आणि मैदाने याची माहिती असलेली कात्रणे क्रिकेट फॅन्सच्या घराच्या भिंतीवर, कॅलेंडरवर टांगलेली असतील. गल्ली पासून दिल्ली पर्यंत हा समस्त भारत वर्ष ह्या स्पर्धेच्या आगमनाच्या प्रतिक्षेत असेल.


आता हॉकी विश्वचषकाच्या एक महिना आधी काय चित्र आहे ? हॉकी खेळाडूंना आपले थकीत वेतन मिळवण्यासाठी संप करावा लागला. स्पॉनर्स मिळवण्यासाठी खटपट करावी लागली. हॉकी संघटनांच्या पदाधिका-यांमध्ये वाद विकोपाला गेलेत. हॉकी इंडियाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय. हुकूमशहा, माफिया या सारख्या शेलक्या उपाधींनी हॉकी संघटनेच्या अधिका-यांना गौरवण्यात येतंय. सर्वात साधा प्रश्न विचारतो विश्वचषकात खेळणा-या हॉकी टीमच्या 11 खेळाडूंची नावे आपल्यापैकी अनेकांना ( त्यामध्ये मी देखील आलो ) माहिती नाहीत. नॅशनल गेम म्हणून ओखळण्यात येणारा हॉकी हा खेळ आता आपल्यासाठी नॅशनल शेम बनलाय का ? याचा विचार सर्वांनीच गांभिर्याने करायला हवा.


देशात खेळले जाणारे क्रिकेट, क्रिकेटचा अतिरेक ह्यावर चर्चा करण्याची ही जागा नाही. क्रिकेट आणि हॉकीची तुलना करण्याचाही माझा उद्देश नाही.' क्रिकेटकडे अतिरेकी वेडामुळे हॉकीची ही अवस्था झालीय.'असला भंपक विचार माझ्या मनातही येत नाही. पण भारतीय हॉकीची अवस्था पाहिली की इस रात की कब सुबह होगी ? हा प्रश्न मला वारंवार भेडसावतोय.


' हॉकी इंडिया ' ही हॉकीचा कारभार चालवणारी संघटना हॉकीच्या सध्याच्या अवस्थेला जबाबदार आहे. हॉकी हा असा खेळ आहे ज्याचे दर्शन स्पोर्टस चॅनलपेक्षा न्यूज चॅनलवर अधिक होते. वेगवेगळ्या वादांमुळे हा खेळ काय चर्चेत राहीला आहे. कधी के.पी.एस. गिल, सुरेश कलमाडी यांच्यातले वादविवाद, ज्योतिकुमारन यांचे करण्यात आलेले स्टींग ऑपरेशन या सारख्या बातम्या अनेकांना सर्वप्रथम आठवतात. मेंदुला थोडा ताण दिला तर आठवते 1998 मध्ये धनराज पिल्ले आणि खेळाडूंनी केलेले बंड आणि जुगराज सिंगला झालेला कार अपघात. संदीप सिंग किंवा अर्जुन हलप्पा यासारखे खेळाडू भारतीय संघात आहेत. त्यांच्या खेळाची मोहिनी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मनावर आहे. हे अनेकांच्या गावी नसते.


वाद- विवाद हेवेदावे या सारख्या गोष्टी बीसीसीआयमध्येही आहेत. आपला क्रिकेट संघही याला अपवाद नाही. ( वीरु - धोनीमध्ये अमित मिश्रा प्रकरणावरुन उफाळलेला वाद हे याचे अलिकडचे उदाहरण ) पण ज्यावेळी सेहवाग किंवा सचिन शतक झळकवतो त्या दिवशी भारतीय फॅन्स हे सर्व वाद विसरुन जातात. क्रिकेट आणि क्रिकेटपडूंचे कौशल्य याचीच चर्चा सर्वत्र रंगते. याचे कारण म्हणजे क्रिकेट हा खेळ अगदी तळागाळतल्या लोकापर्यंत सर्वत्र जोडला गेलाय. क्रिकेटच्या सर्व मॅचेस आपल्याला घरबसल्या पाहता येतात. त्याउलट आपल्या नॅशनल गेमची अवस्था. गेल्या वर्षी भारतीय संघाने 47 मॅचेस खेळल्या. त्यातील केवळ 7 भारतामध्ये झाल्या. आणि त्यातील केवळ 2 मॅचेस भारतीयांना लाईव्ह बघण्याची संधी मिळाली. हॉकी प्लेअर्सचे दर्शन इतके दुर्मिळ असेल.तर त्या खेळाडूंबाबत भारतीयांना आपुलकी कशी वाटणार ? हॉकी संघाची अशी अवस्था होऊनही भारतीय जनता त्याच्या पाठिमागे रस्त्यावर उतरली नाही याचे हेच कारण आहे.


हॉकी संघटनेचे माजी अध्यक्ष के. पी.एस. गिल यांच्या काळातच हॉकीचे उरले सुरले वैभव रयाला गेले. एकेकाळी सलग सहा ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवलेला भारतीय हॉकी संघ बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रही होऊ शकला नाही. १९९८ साली ३२ वर्षांनंतर एशियाड सुवर्णपदक मिळवल्यावर, 'आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्या', असे कर्णधार धनराज पिल्ले व आशिष बल्लाळसह सहा सीनियर खेळाडू म्हणत होते. संघातील इतर खेळाडूंनी त्यांना साथ न दिल्याने या प्रयत्नांना यश आले नाही आणि 'बंडखोरां'ना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता 12 वर्षानंतर खेळाडूंच्या एकजुटीमुळे त्यांना काही बाकी मिळाली. पण खेळाडूंची ही एकजुट फोडण्याचा प्रयत्न हॉकी इंडियाचे हे शुक्राचार्य करु शकतात. गिल गेल्यानंतर भारतीय हॉकीला दिलासा मिळाला असे सुरुवातीला वाटले, पण अंतर्गत राजकारण, सदस्य संघटनांना संलग्नता देण्यावरून सुरू असलेला संघर्ष, त्यामुळे निर्माण झालेले गटातटाचे राजकारण यातून या हॉकीत सुधारणा होण्याची शक्यता नाही.


सैन्य हे पोटावर चालते असे म्हणतात. त्याच प्रमाणे खेळाडूंना त्याच्या सुरक्षित भविष्याची हमी असेल तरच त्यांना निर्धास्तपणे खेळाचा आनंद लुटता येतो. देशातला साधा रणजी खेळाडूही आयपीएल सारखी स्पर्धा खेळून आता कोट्याधीश बनलाय. पण आजही आपल्या देशातल्या पदधिका-यांना ध्यानचंद कसे अनवाणी पायाने हॉकी खेळत असत ह्याच्या आठवणी काढण्यात धन्यता वाटते. ज्या संघातल्या खेळाडूंना विश्वचषक सहा आठवड्यांवर आला असताना थकीत वेतन मिळावे याकरता संप करावा लागतो ? त्या संघाकडून विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा करणे साफ चूक आहे.


सुरेश कलमाडींच्या पुढाकारानंतर खेळाडूंनी संप मागे घेतला. त्यांना काही रकमचे चेकही देण्यात आले. आता हे सर्व खेळाडू पुण्यात सराव करत आहेत. याचा अर्थ सगळ्या समस्या संपल्या असे मानण्याचे अजिबात कारण नाही. विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंतची ही तात्पुरती सोय मात्र म्हणता येईल. हॉकी इंडियातला वाद अजुनही मिटलेला नाही. पंजाब हॉकी संघटनेसही अनेक राज्य संघटनांची मान्यता ऑलिंपिक असोसिएशनने रद्द केलीय. त्यामुळे या संघटना आता न्यायालयात गेल्यात. राजस्थान हॉकी संघटनेच्या आक्षेपामुळे हॉकी इंडियाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय. सुरेश कलमाडींना माफीया असे संबोधत परगत सिंगने माजी खेळाडूंच्या मनात वर्तमान प्रशासनाबाबत असणा-या रागाला मोकळी वाट करुन दिलीय. हॉकी पदाधिका-यांच्या निवडणुकीदरम्यानही प्रचंड गोंधळ होणार आहे, हे नक्की. त्यामुळे एकीकडे बंड थंड झाले तरी अंतर्गत राजकारणाची आग धुमसतच राहणार आहे. ह्या आगीत होरपळणा-या खेळाडूंकडून विश्वविजयाची अपेक्षा करणे निव्वळ भाबडेपणाचे ठरेल.

2 comments:

santosh gore said...

व्वा हॉकीचे हाल योग्य प्रकारे दाखवले. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, यावर आता विश्वासही बसत नाही. सरकारची अनास्था, माध्यमांचे दूर्लक्ष परिणामी दर्शकांनीही हॉकाला पाठ दाखवलीय. आता सरकारनेच काही पेनॉल्टी कॉर्नर दिला तर, बदल घडू शकेल. नसता अजून काही फार वाईट होऊ शकेल, असंही इथं म्हणण्याची सोय नाही. कारण सध्याची अवस्था हीच वाईटापेक्षाही मोठी आहे.

Amit Joshi says said...

लेख उत्तम झाला आहे.थोडंसं परदेशातील हॉकी खेळाडुंचं मानधन, त्यांना तिथं दिला जाणारा मान, काही किस्से ह्यांची उदाहरण देणं गरजेचं होतं. यामुळं लेख आणखी वजनदार झाला असता. तरिही लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये क्रीडा पानावर छापण्यासारखा लेख आहे. आगे बढो.........

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...