Saturday, January 23, 2010

नो पाकिस्तानी प्लीज !भारतीयांची पाकिस्तान बद्दलची भूमिका प्रत्येक पिढीनुसार बदलत चाललीय. माझ्या आजोबांच्या पिढीतल्या व्यक्तींना पाकिस्तान बद्दल कुठतरी हळवा कोपरा होता. फाळणी ही काही काळापूरती झालेली गोष्ट आहे. काही काळानंतर भारत-पाकिस्तान एकत्र येतील ( हिंदी सिनेमात जसे लहानपणी हरवलेले दोन भाऊ शेवटी एकत्र येतात. ) असा त्यांचा विश्वास होता. पंडित नेहरुंचे लाहोरमधील संपूर्ण स्वराज्याबाबतचे भाषण, खान अब्दुल गफार खान यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, कराची, लाहोर या शहरांबद्दलच्या आठवणींनी त्यांच्या -हदयात घट्ट घर करुन ठेवलं होतं.


माझ्या वडिलांच्या पिढीने भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली दोन युद्ध पाहिली. युद्ध असो वा क्रिकेट कोणत्याही क्षेत्रात भारतीयांना कोणत्याही मार्गाने हरवायचे. ही खास पाकिस्तानी मनोवृत्ती या पिढीने जवळून अनुभलीय. पाकिस्तानी नागरिक आपले पूर्वीचे भाऊ आहेत. हे त्यांनाही मान्य होतं. परंतु बदलत्या काळात पाकिस्तानच्या सिंधू- रावी किंवा भारताच्या गंगा-यमुना नदीतून बरेच पाणी वाहून गेलंय. हे त्यांना उमजू लागलं होतं. तरीही हे दोन भाऊ एकत्र नाही तर जवळ येतील असं त्यांनाही वाटत असे. व्यापार, संगीत, चित्रपट आणि क्रिकेट यासारख्या मिळेल त्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या पिढीने केला. इंडो-पाक पीस फोरम सारख्या अनेक संस्था याच काळात निर्माण झाल्या. पाकिस्तानी नागरिकांच्या मानगुटीवरचे भारत विरोधी उतरवण्याचा प्रयत्न ह्या पिढीने अनेकदा अनेक माध्यमातून केला.


माझ्या पिढीच्या नजरेतून पाकिस्तान कसा वाटतो ? काश्मिरी पंडितांना हूसकावून लावण्याकरता दहशतवाद्यांना मदत करणारा देश, शिख बांधवांमध्ये अलग खलिस्तानाची भावना वाढवणारे कपटी राष्ट्र, कारगीलच्या बर्फाळ शिखरांवर घुसखोरी कराणारा विश्वासघातकी शेजारी, देशाच्या वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट घडवणारी ना 'पाक' शक्ती म्हणजे पाकिस्तान. अशीच पाकिस्तानची वेगवेगळी ओळख लहानपणापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर आंम्हाला होत आलीय.


13 डिसेंबर 2001 हा दिवस आमचीच काय कोणतीही भारतीय पिढी कधी विसरु शकणार नाही. भारतीय संसदेवर, लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरावर या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला रसद पाकिस्तानमधून पूरवण्यात आली हे लगेच सिद्ध झाले. या दिवसानंतर दोन्ही देशाच्या सीमेवरची परिस्थिती कमालीची बदलली. भारतीय लष्कराची मोठी जमावाजमव पाकिस्तानच्या सीमेवर करण्यात आली. कोणत्याही क्षणी पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला आपला देश आता तयार झालाय. हे आम्हाला जाणवतंय. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यानंतर तर दोन देशांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन अण्विक शक्तींमध्ये युद्ध होऊ नये याकरता जागतिक समुदयाचा मोठा दबावगट कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन देशांमधले युद्ध गेल्या दहा वर्षांपासून टळत आलंय. परंतु पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला कधीही या तोंड फूटू शकते याची जाणीव माझ्या पिढीला आहे.


या सा-या इतिहासाची आठवण माझ्या पिढीत ताजी आहे. त्यामुळेच ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या तिस-या आवृत्तीच्या लिलावात पाकिस्तानी खेळांडूंवर बोली लागली नाही याचे दु:ख अथवा आश्चर्यही आमच्या पिढीतल्या अनेकांना वाटले नाही. आयपीएल ही निव्वळ व्यवयासियक स्पर्धा आहे. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले जातात. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी यामध्ये गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीने तयार केलेले हे मॉडेल आहे. यामुळे यामध्ये निव्वळ व्यवसायिक गोष्टींना सर्वात जास्त महत्व येणे स्वाभाविक आहे.


या स्पर्धेतले संघ मालक जेंव्हा एखाद्या खेळाडूवर बोली लावतात. त्यावेळी त्या खेळाडूकरता लावलेला प्रत्येक पैसा वसूल होईल याची खबरदारी ते घेणार हे उघड आहे. त्यामुळेच संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या पोलार्ड, बाँड, रोच आणि पानेर्ल या खेळाडूंना त्यांनी अधिक पसंती दिली. शाहिद अफ्रिदी किंवा उमर गुल या सारख्या खेळाडूंच्या गुणवत्तेबद्दल कोणाला शंका नाही. मात्र राजकीय परिस्थितीमुळे हे खेळाडू भारतात येऊच शकणार नसतील तर त्यांच्यासाठी करोडो रुपये कशाला मोजायचे ?


आयपीएल स्पर्धा मार्चमध्ये सुरु होणार आहे. मार्चपर्यंत अथवा ही स्पर्धा सुरु असताना भारतात एखादा दहशतवादी हल्ला होणार नाही याची खात्री कोणी देऊ शकेल ? मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान बद्दलचे भारतीय जनमत प्रक्षुब्ध आहे. पाकिस्तानी खेळाडू दहशतवादी नाहीत हे मान्य. पण भारतविरोधी दहशतवादी पुरवणा-या देशाचे ते प्रतिनिधी आहेत हे कोण विसरेल ? देशातल्या नागरिकांच्या रोषाला, राजकीय संघटनेच्या दादागिरीला ते बळी पडू शकतात. अशा परिस्थीत त्यांच्या सुरक्षेचा खर्च संघ व्यवस्थानाने का पेलावा ? यासारखे अनेक प्रश्न या लिलावानंतर उपस्थित झाले आहेत.


या लिलावानंतर पाकिस्तानंमध्ये उमटलेल्या प्रतिक्रीया अनेकांना अतातायी किंवा आक्रस्ताळ्या वाटतील. पण ह्या सर्व पाकिस्तानी मनोवृत्तीला साजेशा अशाच आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळाचा भारतीय दौरा रद्द करण्यात आला. पाकिस्तान संघाच्या कबड्डी दौ-यावरही सरकारी कु-हाड कोसळली. भारत सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सरकारने केला. पाकिस्तानी केबल चालकांनी आयपीएल स्पर्धा न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. (भारतीय चित्रपटांनाही पाकिस्तानमध्ये बंदी होती. मात्र त्याकाळातही भारतीय चित्रपटांच्या व्हीडीओ कॅसेट पाकिस्तानात सर्रास मिळत असे ) आयपीएल स्पर्धा ही पाकिस्तानी फॅन्सना या पद्धतीने पाहायला मिळणार यात शंका नाही. आता पीसीबी आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रारही करणार आहे. पाकिस्तानी सडकेपासून ते संसदेपर्यंत सर्व माध्यमातून आयपीएलच्या निमित्ताने तयार झालेले भारतविरोधी वातावरण एकवटण्याचा प्रयत्न सध्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून केला जातोय.


पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थीतीला ब-याच अंशी पाकिस्तानी राज्यकरतेच जबाबदार आहेत. या राज्यकर्त्यांने जे पेरले तेच आता पाकिस्तानमध्ये उगवलंय.. जागतिक दहशतवाद्यांचे पाकिस्तान माहेरघर बनला आहे. आता परिस्थिती आमच्या हातामध्ये नाही याची कबुली पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही दिलीय. त्यामुळेच कोणताही संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला तयार नाही.चॅम्पीयन्स ट्रॉफी, विश्वचषक या सारख्या महत्वाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागले आहे. श्रीलंका संघाव हल्ला करणा-या मारेक-यांचा शोध अजुनही लागलेला नाही.


पाकिस्तानच्या या सध्याच्या अवस्थेला त्यांचे खेळाडू जबाबदार नाहीत. हे मान्य. पण ज्या देशातून भारतविरोधी शक्तींना सतत खतपाणी घातले जाते. त्याच देशाचे ते प्रतिनिधी आहेत. मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे ते देशबांधव आहेत. हे आमची पिढी कधीही विसरु शकणार नाही. याबद्दल कोणत्याही पाकिस्तानीला माफ करण्याचा आमचा मूड नाही. आमच्या पिढीची ही मानसिकता ओळखून आयपीएल मालकांनी, 'नो पाकिस्तानी प्लीज ' असा बोर्ड लावला तर त्यात वावगे काय ?

3 comments:

Niranjan Welankar said...

नमस्कार. लेख ठीक आहे. नेहमीच्या दर्जाचा नाही वाटला. विषय लेखकाच्या योग्यतेचा नाही असं वाटलं.

Amit Joshi says said...

लेख चांगला आहे, सर्व बाजू आल्या,वैयक्तिक मतंही पटले.

santosh gore said...

पाकिस्तानविषयी आपले नेमके धोरण काय ? या प्रश्नाचं उत्तर सरकारही देऊ शकत नाही. तेच प्रतिबिंब येथेही दिसतं. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करा असं जनमत होतं. कारगिल युद्धाच्या वेळेसही पाकिस्तानात सैन्य घुसवावं या मताचे कोट्यवधी नागरीक होते. तर दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये संवाद असावा यासाठीही प्रयत्न करणारे अनेक आहेत. पाकिस्तानला कायमचा शत्रू मानावा की त्याच्या मनोवृत्तीत बदल घडेल अशी अपेक्षा करावी या द्वंद्वात नागरिक गुंतलेले आहेत. आणि आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, यातून आपलं दुर्बल्य सिद्ध होतं. राहिला क्रिकेटचा मुद्दा...आता दहशतवाद महत्वाचा की क्रिकेट...प्रश्न कायम भेडसावतच राहणार आहे. मग या प्रश्नाचे मूळ असलेले पाकिस्तानातील दहशतवाद जेव्हा संपेल तेव्हाच या प्रश्नावर उत्तर मिळू शकेल...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...