Tuesday, May 26, 2009

आयपीएल धमाका


आयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेची दुसरी आवृत्ती आता पार पडलीय. 'इंडियन प्रिमियर लीग' स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण अफ्रिकेत पार पडली.या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले होते. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की होत.या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्व होते.त्याची चर्चाही झाली.परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजुन महत्व आहे.त्यामुळेच अस्सल क्रिकेटपडूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजलं.

टी -२० हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा गेलाय.या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला त्या गिलख्रिस्टचे वय आहे 37.अंतिम सामन्याचा मानकरी आणि संपूर्ण स्पर्धेत ज्यानं अत्यंत जिगरबाज खेळ केला तो अनिल कुंबळे आहे 38 वर्षाचा..तर या स्पर्धेत ज्यानं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली तो मॅथ्यू हेडन आहे 37 चा.या तिन्ही खेळांडूंना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता केंव्हाच सिद्ध केलीय.किंबहूना सर्व प्रकारची आव्हान यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांनी निवृत्ती स्विकारली. या खेळाडूंना आता कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे उरलेले नाही.तरीही या तिघांनी तरुणांना लाजवेल असा खेळ केला.

गुणवत्ता ही जर अस्सल असेल तर ती कालातीत असते.एखादा क्रिकेटपटू वयस्कर झाला की त्याची विनाकारण थट्टा करण्याचा ट्रेंडचं बनलाय.दर्जेदार खेळाडूंना T-20 चे कारण देत पेन्शनीत काढणा-या सर्व क्रिकेटतज्ज्ञ आणि काही खेळाडूंना या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक दिलीय.

यंदाचे आयपीएल हे भारताच्या बाहेर खेळवले गेले. अफ्रिकेत भारताप्रमाणे पाटा खेळपट्टी नाहीत.त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातला चांगला संघर्ष या स्पर्धेत पाहायला मिळालाय.संपूर्ण स्पर्धेत 200 ची धावसंख्या केवळ एकदाच राजस्थान रॉयल्सने पार केली.केवळ दोनच शतकं नोंदवले गेले. भारतीय खेळपट्ट्यावर खो-याने धावा काढणारे या स्पर्धेत अपयशी ठरले. भारतीय सुवा खेळाडूंनीही या स्पर्धेमधून ब-याच काही गोष्टी शिकल्या असतील.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केलं होतं.यंदाही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचं सिद्ध केलंय.राजस्थानकडे त्यांच्या हंगामातले सर्वात यशस्वी खेळाडू सोहल तन्वीर आणि शेन वॉटसन नव्हते.काही खेळाडू जखमी झाले,कमरान खान पकंज सिंगच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केल्या गेल्या.तरीही शेन वॉर्नचा हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम होता.काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.

कोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरलं.कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला.मल्टीपल कॅप्टन्सचा वाद,सौरव दादाची कर्णधारपदावरुन केलेली हाकालपट्टी,'भू-खा-नन' चे अनाकलनीय डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला.संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता.विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते.सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे.परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली.फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल,झहीरची दुखापत,हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ ,जयसूर्याचा हरवलेला फॉर्म,सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमांकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजी प्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहीला.या संघानं शेवटपर्यंत झूंज दिली.परंतू शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धेनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ यंदा उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

दिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते.भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे.दिल्लीनं साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीनं खेळ केला.नेहरानं या स्पर्धेत शानदार कमबॅक केलं.डिव्हीलीयर्स-दिलशान जोडूनं जबाबदार खेळं केला.कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले.गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.परंतु संपूर्ण स्पर्धेत ग्लेन मॅग्राला बेंचवर बसवण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.विशेषत: विजेतेपदाच्या जवळ येऊन दिल्ली संघ पराभूत झाला.त्यामुळे मॅग्राला न खेळवण्याची सल सेहवागला जाणवत राहील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा चेन्नईला भोवला.सोपे झेल सोडण्याबाबत चेन्नईची कोलकताशी जणू काही स्पर्धाच सुरु होती.तर मुरलीधरन वगळता प्रमुख गोलंदांमध्ये कोणतीच शिस्तबद्धता नव्हती.कोलकत्ता नाईट रायडर या स्पर्धेतल्या सर्वात दुबळ्या संघाविरुद्ध चेन्नईचे गोलंदाज 188 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.धोनीने गोलंदाजीमध्ये काही कल्पक बदल केले.परंतु त्याच्यामधला विध्वसंक फलंदाज गेल्या काही काळात संपूर्णपणे लोप पावलाय.उंपात्य सामन्यात तर धोनीच्या संथ खेळामुळेच चेन्नईच्या वेगाला खिळ बसली.हाच महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.T-20 विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना धोनीचा हा खराब फॉर्मची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. एक कल्पक कर्णधार या एकमेव निकषाच्या जोरावर महेंद्र सिंग धोनी ही विश्वचषक स्पर्धा खेळेल.अशीच चिन्ह आहेत.त्यामुळे कर्णधार पदासाठी धोनीचा समर्थ पर्याय आपण लवकरचं शोधायला हवा.

डेक्कन आणि बंगळूरु या संघाने या स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली.डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरवात केली.मधल्या काळात हा संघ ढेपाळला.परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली.या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच.संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण गोलंदाजी केली.या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान पक्क झालंय.शेवटच्या हाणामारीच्या षटकात त्यानं अनेकदा थंड डोक्याने गोलंदाजी केली.T-20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्वाचा उपयोग होऊ शकेल.

आयपीएल-2 मधली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा खेळ केला.मागच्या वर्षीच्या राजस्थान प्रमाणेच बंगळूरुच्या विजयात कोणत्याही एका खेळाडूचा महत्वाचा वाटा नव्हता.राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोनं एका संघात बनवलं.प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला,सुरक्षिततता दिली.हे सर्व होत असताना कुंबळेनं युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व केलं.अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरु शकेल.

क्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय.लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आलंय. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते.परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्वाची असते.क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत.परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मौजकेच आहेत.या मोजक्या देशातल्या अगदी असमान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचं नाव घ्यावं लागेल.आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरलाय.परंतु करोडो क्रिकेट रसीकांच्या -हदयामधले स्थान त्यानं अढळ ठेवलंय.

4 comments:

अनामिक said...

मस्तं आढावा घेतलाय आयपीएलचा. "विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले" हे वाक्य विशेष आवडलं! सकाळमध्ये पाठवा तुमचा लेख, नक्कीच छापतील.

-अनामिक

krishnat said...

तुझ्या क्रिकेटच्या नॉलेजला मी आव्हान देऊ शकत नाही.पण धोनी एखाद्या स्पर्धेत चालला नाही.म्हणून त्याच्या कप्तानपदावर प्रश्वचिन्ह उपस्थित करणे.फारच धाडसाचे ठरेल.

santosh gore said...

आयपीएल आणि क्रिकेटटूंचे वय हा मुद्दा योग्य असाच आहे. वयाचा आणि खेळाच्या दर्जाचा या स्पर्धेवर परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं.

Niranjan Welankar said...

Atyant sundar, genuine, assal, original, man:purvak blog ahet ! Hardik abhinandan.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...