Tuesday, May 19, 2009

मतदारराजाचा विजय असो !


लोकशाही राजवटीतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक.पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आता लागलेत.गेल्या काही महिन्यांपासून माझे या निवडणुकींवर लक्ष होतं..या निवडणुकांचे माझ्या परीने विश्लेषण या ब्लॉगवर करणं अपेक्षित आहे. मात्र या निवडणुक निकालानं माझ्या आजवरच्या सा-या गृहीतकांना तडा गेलाय.

संपूर्णपणे फसलो.या दोनच शब्दात या निवडणुक निकालांचे वर्णन मला करावेसे वाटते.1991 पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुका मी पाहतं आलोय. राजकीय विषयांमध्ये मला गती आहे असा माझा काहीसा समज होता.त्यात पत्रकार म्हणून मी कव्हर करत असलेली पहिली निवडणूक. त्यामुळे या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील याची मला काहीशी खात्री होती. 26/11 चा हल्ला,चिंदबरम यांच्यावर फेकण्यात आलेला जोडा,मुलायम-लालू यांनी काँग्रेसशी घेतलेली फारकत, मायावतींचे मॅजीक,तामिळ इलम, डाव्यांचे डाव,कमजोर पंतप्रधान,अनअनुभवी राहुल हे मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरतील असं मला वाटलं होतं. परंतु मी सुरवातीलाच म्हंटल्याप्रमाणे संपूर्णपणे फसलो.

26/11 च्या घटनेनंनंतर सर्व शहरी वर्ग विशेषत: मुंबईमध्ये राष्ट्रीय सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा बनलाय.प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा हा संताप मतपेटीमधून बाहेर पडेल अशी समजूत होती.परंतु याबाबत तावातावाने बोलणारा शहरी वर्ग केवळ न्यूज चॅनलपुरताचं मर्यादीत राहीला. मुंबईकरांचा मतदानासारख्या संवेदनशील विषयावरचा असंवेदनशीलपणा यंदाही कायम राहीला.हे माझ्यासकट अनेकांना जाणवलं नाही.'जागो रे'टाईप स्टोरीज आंम्ही इतक्या केल्या की मुंबईकरांच्या ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं .मी ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या मराठी माणसात मनसेची लाट आहे हे मला थेट 16 मेलाच समजलं.

जर्नेलसिंग प्रकरणानंतर शिख मतदारांची मतं काँग्रेसच्या विरोधात फिरतील..हाही एक असाच समज परंतू दिल्लीत काँग्रेस सातही जागी विजयी झाली.त्याचबरोबर पंजाबमध्येही पक्षाची कामगिरी चांगली झालीय. लालू-पासवानचा सफाया होऊ शकतो. बिहारचे मतदार जातीपातीच्या राजकारणाच्या पलिकडे जाऊन नितीशकुमार सारख्या मुख्यमंत्र्याला कौल देऊ शकतो हा खरचं थक्क करणारा अनुभव आहे.मायावतींची 'माया'जाल दिल्लीवर पसरणार ही नुसती कल्पनाचं अस्वस्थ करणारी होती.परंतु भारतीय मतदार खरंच सूज्ञ आहे.खंडणी,बदल्या,हुजरेगीरी,पुतळेबाजी आणि फसव्या सोशल इंजिनिअरींगच्या भुलभुलैय्याला हा मतदार भुलला नाही.मायावतींच्या सा-या महत्वकांक्षेला या निवडणुकीत सुरुंग लागलाय.

उत्तरेतल्या मतदारांनी जातीपातीच्या पलिकडं जात मतदान केलं.तर दक्षिणेतल्या तामिळनाडूनं तामिळ इलमच्या ठेकेदारांना घरी बसवलं. एलटीटीईच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात होती. तरीही स्वंत्र तामिळ इलमचा मुद्दा मतदारांनी नाकारला.प्रभाकरनचा पगारी माणूस अशी ज्यांची ओळख आहे अशा वायकोला या निवडणुकीत काँग्रेसच्या एका तरुण उमेदवाराने पराभूत केलं. तसंच प्रभाकरच्या बाजूने उपोषण करणा-या करुणानिधींनाही हे मतदार फारसे बधले नाहीत.त्याचबरोबर जयललितांच्या यू टर्नलाही भूलले नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष पराभूत झालेत.हे गेल्या अनेक वर्षांपासून मनामध्ये रेखाटलेलं चित्र या निवडणुकीत प्रत्यक्षात आलं.कोणत्याही मुद्यावर थयथयाट करणे,प्रत्येक विकासकामांना भांडवलवादी अथवा अमेरिकावादी म्हणून टिका करणे, जातीय राजकारणाचा अहोरात्र द्वेष करत असताना लालू-मुलायम पासून ते अगदी मायावतीपर्यंतच्या सर्व 'जाती'वंत राजकारण्यांशी समोझाता करणा-या अस्सल डाव्या नेत्यांचा या निवडणुकीत शक्तीपात झालाय..

डाव्यांचा शक्तीपात झालाय..तर भाजपलाही त्यांची जागा या मतदारांनी दाखवून दिलीय. अटलजींच्या काळातली पक्षाची लोकप्रियता ढासलीत.लालकृष्ण अडवाणी अनुभवी आहेत..परंतु त्यांच्याजवळच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही.अडवाणींच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय.आर्थिक मंदी ,वाढती महागाई,सुरक्षेचा प्रश्न या सारखे प्रश्न तर सोडाचं परंतु भाजपचा जो बेस आहे ते रामंदीर,370 वे कलम सारखे मुद्दे आघाडीधर्म म्हणून बासनात गुंडाळले गेले.अन्य पक्षाच्या उपद्रव मुल्यावरच भाजपवाले पुर्णपणे विसंबून राहीले.शत प्रतिशत भाजप या संकल्पनेवर या पक्षाचा विश्वास होता.मात्र गेल्या 28 वर्षात केरळ,तामिळनाडू,आंध्र,पश्चिम बंगाल या पक्षात भाजपला आपले पाय रोवता आले नाहीत.ओरिसामध्ये बिजू जनता दलानं भाजपचा वापर केला.नितीशकुमारही तोच कित्ता गिरवत आहेत,महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आजही भाजप मित्रपक्षाशिवाय पांगळा आहे.उत्तर प्रदेशात पक्षाचा बेस बरवलाय.तो परत मिळवून देण्याकरता राहुल गांधी सारखा नेता भाजपला अजुन सापडलेला नाही.मग आता जी काही मोजकी राज्य उरलीत..त्या राज्याच्या जोरावर भाजप सत्ता कशी मिळवणार ?

या देशातल्या मतदारांना आता स्थिर सरकार हवंय.उत्तर प्रदेश,बिहार,कर्नाटक पासून वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत स्थिर सरकार देऊ शकणा-या पक्षालाचं मतदारांनी पसंती दिलीय.तरीही या लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा येणार ही माझी खात्री होती.माझी ही समजूत खोटी ठरली.काही पुस्तके वाचून ,इलेक्टोनिक मिडीयाच्या कार्यालयात बसून, ठराविक विचारांच्या वर्तुळात फिरुन देशाच्या जनमानसाचा अंदाज बांधणं हे शुद्ध भंपकपणाचं आहे ही शिकवण या निवडणुकीनं मला दिलीय.

माझ्या देशातले केवळ 50 टक्केचं मतदार मतदान करतात. परंतु हे मतदार नक्कीच सुज्ञ आहे.जातीपातीचं राजकारण,राजकीय ब्लॅकमेलिंग,स्वत:च्या शक्तीविषयीचा फाजील आत्मविश्वास बाळगणा-या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला या मतदारांनी जागा दाखवलीय.त्याचबरोबर माझ्या सारख्या असंख्य कुडमुड्या पत्रकारांनीही त्यांनी तोंडघाशी पाडलंय..म्हणूनच या ब्लॉगच्या शेवटी मला एवढंच म्हणावस वाटत मतदाराजाचा विजय असो !

6 comments:

santosh gore said...

पुस्तके वाचून, कार्यालयात बसून, ठराविक विचारांच्या वर्तुळात फिरुन अर्ध्या किंवा एक तासाचा टाईमपास देता येतो. मतदारांमध्ये फिरल्याशिवाय त्यांचे प्रश्न एसीतल्या संपादक, अँकर यांना काय कळणार. काही हजार सर्वक्षणाच्या आधारे देशाच्या जनमानसाचा अंदाज बांधणं हा शुद्ध मुर्खपणा असल्याचं दर निवडणुकीला खणखणीतपणे सिद्ध होतं. मात्र तरीही प्रत्येक निवडणुकीत नव्या दमाने हा खेळ खेळला जातोच. जाऊ द्या. मात्र जनतेने देशात एका स्थिर सरकारला कौल दिल्यामुळे राजकीय ब्लॅकमेलींग थांबून समतोल विकास साधायला मदत होईल, अशी अपेक्षा या मुळे व्यक्त करायला काय हरकत आहे.

Unknown said...

nivadnukicha ha nikal nakkich dhakkadayak asla tari to sarvanna manya aahe hi goshta aapan nakaru shakat nahi. Aani aatache Kongress wale khaun baslele aslya mule nakkich te Desh kalyana kade lakshya detil aani Recession var todga kadhail hich Apeksha.

madhuraa said...

खरं तर राजकारण हा विषय असा आहे की तो फक्त चार भिंतींमध्ये बसून अंदाज आणि विश्लेषणाचा नाही...डोळे उघडे ठेवून,चर्चा करुन आणि बाहेर फिरूनच राजकारणातील काही गुप्त गोष्टी कळतात हे यापुढे लक्षात ठेव....अंदाज वर्तवणं चुकीचे आहे असं नाही पण,अंदाज चुकले म्हणून अंदाज बांधू नये असंही नाही...एकूणच या लोकसभेच्या निकालावरून हे स्पष्ट झालयं की, सर्वसामन्य जनतेला स्थिर सरकार हवयं...त्यामुळे मला असं वाटतं की, मतदारांचा कौल योग्य आहे...पण, तू तुझे अंदाज predictiions सुरूच ठेव, कारण त्यामुळे तुझ्या विचारांना अधिक चालना मिळेल आणि तू एका चौकटीबाहेर जाऊन विचार करू शकतोस....

मधुरा सुरपूर

Unknown said...

he nivdnuk nikal mhanaje anek goshtincha paripak aahe.tyamule tu nirash hou nakos,karan pratek matdarsanghatil prashn vegale hote,rajkiy paristithi vegali.berij vajabakichya ganitat congress jinkali etakach.yat aata deshhit lakshat gheun pavle takali ter changle.

http://swapneelbapat.blogspot.com said...

निकाल महत्वाचा नाही.. आपण चुकलो का? यालाही महत्व नाही.. पण आपण का चुकलो? याचा विचार करायची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं.. विधानसभा निवडणूक जवळ आहे.. आपण मुख्यमंत्री ठरवू शकत नाही.. पण मत तयार करू शकतो.. बातमीदार म्हणून आपण या निवडणुकीतून काय शिकलो? हे महत्वाचं.. तू मस्त लिहिलंस... खूप दिवसानी तुझा ब्लॉग वाचला... छान..
- स्वप्नील

Sandeep Khedmanorkar said...

Kupach cham vishleshan kele ahe.....

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...