Tuesday, April 28, 2009

इस बार...सुशीलकुमार ?


सध्या संपूर्ण देश निवडणुकीला सामोरा जातोय.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान कोण असणार ह्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही.त्यातचं या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला बहुमत मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसंच प्रादेशिक नेत्यांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत.

काँग्रेस पक्षानं यंदाच्या निव़णुकीत पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना आपला उमेदवार घोषीत केलंय.मात्र युपीएमधल्या सर्व पक्षांमध्ये मनमोहन सिंग यांच्या नावावर एकमत नाही ही बाब आता लपून राहीलेली नाही. त्याचबरोबर अणुकराराच्या मुद्यावरुन डावे पक्ष आणि मनमोहन सिंग यांच्यात संबध बरेच ताणले गेलेत.त्यामुळे डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास मनमोहन सिंग यांना बलिदान द्यावे लागेल.प्रणब मुखर्जी हे काँग्रेस पक्षामधले दुस-या पक्षाचे महत्वाचे नेते. सर्वच महत्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ' पीम इन वेटींग ' असं त्यांच वर्णन केलं जात.डाव्या पक्षांची असलेली जवळीक ही त्यांची आणकी एक जमेची बाजू.परंतु त्यांची आजवरची कारकीर्द पाहीली तर ते पंतप्रधान म्हणून काँग्रेस हायकमांडला नक्कीच डोईजड ठरु शकतात.लालू प्रसाद यादव यांच्या बरोबरबरचे संबधही त्यांचे या निवडणुकीत ताणले गेलेत.त्यामुळे प्रणब मुखर्जींच्या नावाला काँग्रेस पक्ष तसंच युपीए आघाडीतएकमत होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

एनडीए आघाडी या निवडणुकीत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला आली तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणार हे नक्की. त्यांच्या नावाला एनडीएतल्या सर्व घटक पक्षाने आगोदरचं संमती दिली आहे.एनडीएचे संख्याबळ वाढले तर जयललिलातांसारखे कुंपणावरचे पक्षही अडवाणी कॅम्पमध्ये दाखल होतील.मात्र एनडीए आघाडीला मनासाखारख्या जागा मिळल्या नाहीत तर कदाचित नितीशकुमार यांचे नाव पुढे येऊ शकते. गेल्या काही वर्षात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा देशात चांगलीच उजळली आहे.वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्यासाठी नितीशकुमार उपयोगी पडू शकतात.परंतु लालू-पासवान-मुलायम ही प्रादेशिक पक्षांची आघाडी त्यांच्या नावाला पाठिंबा देणार नाही.

शरद पवार यंदा पंतप्रधान नक्की बनणार असा विश्वास राज्यातल्या अनेक जाणकारांना वाटतोय.नवीन पटनायक,जयललिता यांनी त्यांना आता पाठिंबा दिलाय.(अर्थात हे सहकारी कधीही उलटू शकतात ) डावे पक्ष -मुलायम यांनाही पवार जवळचे आहेत.वेगवेगळ्या पक्षांना घेऊन आघाडी सरकार चालवण्याचा त्यांचा अनुभव (आठवा महाराष्ट्रामधले पुलोदचे सरकार ) जुनाच आहे.परंतु पवारांची आजवरची राजकीय काराकीर्द त्यांना त्रासदायक ठरु शकते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी त्यांनी केलेले बंड सोनिया गांधी अजुनही विसरलेल्या नाहीत.त्यातच पवार हे अत्यंत धुर्त आणि महत्वकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात.आपल्या सहकारी पक्षांचा शक्तीपात कतरुन आपली शक्ती वाढवण्याची कला ( आठवा 1999 नंतर राज्यात घसरत चाललेली काँग्रेसची स्थिती,जनता दल,शेकाप सारख्या पक्षांचा झाले -हास ) त्यामुळे अशा धोकादायक व्यक्तीला पंतप्रधान करण्याचा जुगार सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष करेल असे मला वाटत नाही.

या निवडणुकीच्या निकालानंतर सोनिया गांधी पंतप्रधान पदाचा आपला हुकमाचा एक्का बाहेर काढतील असे मला वाटते.सुशीलकुमार शिंदे हा काँग्रेस पक्षासाठी हुकमाचा एक्का ठरु शकतो.धक्कातंत्र देण्यात सोनिया गांधी माहीर आहेत.1999 मध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी दावा करायचा आणि 2004 मध्ये ' आतल्या आवाजाचे ' कारण देत त्यांनी देशादतल्या सर्व राजकारण्यांना चांगलाच धक्का दिला आहे.त्यामुळेच निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे करुन सुशीलकुमार यांना पंतप्रधान सोनिया नक्कीच बनवू शकतात. शिंदे गांधी घराण्याशी एकनिष्ठही आहेत.गेल्या दहा वर्षात कांग्रेस सरचिटणीसपद,महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद,राज्यपालपद, उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी,केंद्रीय मंत्रीपद शिंदेंना मिळालीत.त्यातचं शिंदे मराठी आहेत.शरद पवार यांचे नाव बाजूला करण्यात आणि शिवसेनेला किमान वेळेप्रसंगी किमान तटस्थ ठेवण्यात शिंदेचे मराठीपण कामाला येऊ शकतं.

शिंदेची जात ही त्यांच्यासाठी महत्वाची ठरु शकते.ते दलीत असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष (किमान नाईलाज म्हणून का होईना...) विरोध करु शकणार नाहीत.एका दलित व्यक्तीला पंतप्रधान पदाची उमेदवारी देणं काँग्रेसला राजकीय दृष्ट्या प्रचंड फायद्याचे ठरु शकतं. देशभरात वाढत चाललेल्या माया फॅक्टरला हे चांगलं उत्तर ठरु शकतं. या सर्वाबरोबरच निरुपद्रवीपणा हा शिंदेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.गांधी मॅडमना होयबा म्हणण्यात त्यांना धन्यता वाटते.अशाच होयबा मंडळींना सोनिया गांधी भरभरुन
पाठिंबा देतात. होयबा वृत्तीमुळेच शिवराज पाटील गृहमंत्री म्हणून चार वर्षे राहीले.प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाची 'लॉटरी' लागली.सुशीलकुमार तर या सर्वांपेक्षा नक्कीच चांगले राजकारणी आणि प्रशासक आहेत.फक्त याकरता त्यांच थोडं नशीब चांगलं असायला हवं कारण नशीब बलवत्तर असेल तर दैवेगोडाही
या देशाचे पंतप्रधान बनू शकतात हे आपण अनुभवलं आहे.

Tuesday, April 14, 2009

धुमसता भारत


महिला दहशतवादी भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत-लष्करप्रमुख
ओरिसामधल्या खाणीवर नक्षलवाद्यांचा हल्ला
आसाममध्ये पंतप्रधानाच्या सभेच्या आधी बॉम्बस्फोट
तालिबानी दहशतवाद्यांची सुरु आहे काश्मीरमध्ये घुसखोरी

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु असताना या सर्व घडमोडींना हल्ली वर्तमानपत्रात अथवा वृत्तवाहिन्यांमध्ये फारसे स्थान दिलं जात नाहीय..परंतु देशाच्या सर्व बाजूला सध्या धुमसती परिस्थीती आहे.आपण वेळीच सावध झालो नाही तर विध्वंसाच्या वेढ्यातून बाहेर पडणं आपल्या देशाला अवघड होऊ शकत.

आपला सर्वात डोकेदुखी शेजार म्हणजे पाकिस्तान.एका failed state साठी आवश्यक अशा सर्व कसोट्या आता पाकिस्तानने पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तान काही लाख रुपयात आत्मघातकी व्यक्ती मिळू शकतो असं गृहमंत्री रेहमान मलिक यांनी नुकतेच कबूल केलय.त्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे नियोजन मंत्री असिफ अहमद अली त्यांनी इस्लामाबादमधे एका परिसवादात कबूल केले की पाकिस्तानात आज ४० टक्के लोक गरीबी रेषेच्या खाली आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब हा असाच चौथी पास , बेकार व भुरटा चोर होता ज्याला मुल्लांनी भडकवून ' जिहादी ' बनवला. असे चार कोटी भावी अजमल कसाब आज पाकिस्तानात फिरत आहेत. बेकार व अशिक्षित लोकसंख्येला भारताविरुद्ध ' जिहाद ' लढायला उद्युक्त करण्याचा उद्योग गेले अनेक दशके पाकिस्तानात सुरू आहे.तालिबानी दहशतवाद्यांच्या टोळधाडीने संपूर्ण पाकिस्तानला जर्जर करुन सोडलंय.येत्या सहा महिन्यात पाकिस्तान कोलमडून पडेल असं भाकित अमेरिकेच्या लष्करप्रमुखांचे सल्लागार डेव्हिड किल्सुलेन यांनी नुकतंच व्यक्त केलंय. धर्माँध शक्तींना रोखण्यासाठी पाकिस्तान नावाचे बफर स्टेट असणं भारतासाठी महत्वाचे आहे.या बफर स्टेटचे बाल्कन राष्ट्रांप्रमाणे तुकडे झाले तर त्याची सर्वाधिक झळ आपल्यालाच बसेल.

देशाच्या पूर्व सीमेवरही काही फारशी वेगळी परिस्थीती नाही.दर काही महिन्यांनी ठरावीक बॉम्बस्फोटाने आसाम हादरतोय.हुजी या बांगलादेशी दहशतवादी संघटनेने ईशान्य भारतामधल्या सर्वच राज्यात व्यापक जाळं निर्माण केलंय.आसाममधल्या अनेक लोकसभा मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांना निर्णायक महत्व प्राप्त झालंय.या मतांकडे बघत सत्ताधारी पक्ष वर्षानूवर्षे काहीच कारवाई करत नाही.तर बांगलादेशी घुसखोरांचा बागुलबुवा दाखवत भाजपा आणि असम गण परिषद या पक्षांचे राजकारण सुरु आहे.त्यामुळे आसू संघटनेनं 1980 च्या दशकात ज्या प्रकारे आंदोलन केलं.तसं कोणतही आंदोलन सुरु करण्याची इच्छाशक्ती कोणत्याच संघटनेमध्ये सध्या दिसत नाही.

तामिळ अस्मितेची दुकानदारीही सध्या जोरात सुरु आहे.श्रीलंकेत प्रभाकरनचे काही बरे-वाईट झाले तर वायको इकडे रक्तपात घडवणार. वायकोला प्रभाकरनकडून नियमितपणे पैसे मिळतात असा आरोप आहे.तरीही त्याच्याकडे सर्व पक्ष डोळेझाक करणार कारण बदलत्या राजकीय परिस्थीमध्ये चारही आघाड्यांना वायको हवेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई धमक कोणीच दाखवणार नाही.श्रीलंका लष्कराकडून सर्व बाजूने चिरडली गेलेली एलटीटीई तामिळमाडूमध्ये एखादा मोठा घातपात करुन सर्व जगाचं लक्ष नक्कीच वेधू शकते.1991 च्या लोकसभा निवडणुक प्रचार काळात याच संघटनेनं श्रीपेरम्बदूरला राजीव गांधींची हत्या केली.

पश्चिम भारतामधल्या सीमा किती ठिसूळ आहेत हे यापूर्वी वारंवार सिद्ध झालंय.दहा दहशतवादी कराचीमधून बोटीतून सहजपणे मुंबईमध्ये येतात.तीन दिवस संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.दिल्ली बॉम्बस्फोटामधल्या दहशतवाद्यांना केरळमधल्या जंगलामध्ये प्रशिक्षण दिलं जातं...26 नोव्हेंबरच्या हल्ल्याला चार महिने होत आली तरही आजवर या हल्ल्यातील किमान चार महत्वाच्या दहशतवाद्यांना आपण चक करु शकलेलो नाही. या हल्ल्यातील पाकिस्तानचे सर्व पुरावे जगासमोर मांडले..तरीही पाकिस्तानला कचाट्यात पकडण्यात आपल्याला यश आले नाही.एकाही वॉँटेड दहशतवाद्याचे हस्तांतरण अजुनही पाकिस्तानने भारताकडे केलेले नाही.

देशाच्या चारही सीमांवर सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेत.दहशतवादी हल्ल्याच्या भितीने आयपीएल स्पर्धा निवडणूक काळात आपण आयोजीत करु शकत नाही.जागतिक दहशतवादाच्या रडारावर भारत आलाय. पशूपतीनाथ ते तिरुपती हा नक्षलवाद्यांचा महामार्ग या देशात तयार झालाय.झारखंड.छत्तीसगड,आंध्रप्रदेश ओरिसा या राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 'नक्षली'राज निर्माण झालंय.परंतु या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा कोणताच राजकीय पक्ष करताना दिसत नाही.

या सर्व पार्श्नभूमीवर होणा-या या लोकसभा निवडणुकीला म्हणून खूप मोठे महत्व प्राप्त झालंय.देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारे ताठ कण्याचे सरकार निवडण्याकरता सर्वांनीच मतदान करायला हवे.

Thursday, April 2, 2009

लबाडाघरचे अवताण


सुप्रिया पवार यांच्या बारश्याची तारीख दोनदा बदलण्यात आली होती.याच कारण म्हणजे आपले 'साहेब'
पंतप्रधान होतील आणि ते पंतप्रधान झाल्यावर नव्या घरामध्ये धुमधडाक्यात सुप्रियाचे बारसे साजरे करु असा विचार पवारांच्या जवळच्या व्यक्तींनी केला होता.पंतप्रधान पद आणि शरद पवार याबाबतीत विचार करत असताना एकदा गप्पांमध्ये ऐकलेला विनोद मला नेहमी आठवतो.पंतप्रधान पदावर पवारांची नजर किती दिवसांपासून आहे..आणि त्याचबरोबर पवार समर्थकांना साहेबांना पंतप्रधान करण्याची जुनीच घाई आहे हा सर्व इतिहास या एका विनोदामधून स्पष्ट होतो.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अता चांगलाच वेग आलाय.यंदा काहीही झाले तरी साहेबांना पंतप्रधान करायचेच असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय.या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे प्रत्येक आघाडीशी मैत्री ठेवून पवारांना पंतप्रधान बनवण्याचा चंग राष्ट्रवादी नेत्यांनी बांधलाय.आज देशातल्या चारही आघाडीमध्ये पवारांचे मित्र आहेत.युपीए आघाडीचे ते अधिकृत सदस्य आहेत.एनडीएमधल्या शिवसेनेला त्यांच्या प्रेमाचे वारंवार भरते येते.डाव्या आघाडीशीही त्यांची काही राज्यात युती आहे.मुलायम सिंगाच्या चौथ्या आघाडीलाही ते पंतप्रधान म्हणून हवे आहेत.साहेबांचे नेटवर्क अगदी 'पॉवर' फूल आहे. असाममधल्या प्रफुल्ल कुमार महंत पासून ते महाराष्ट्रातल्या संजय राऊत पर्यंत जम्मू काश्मीरमधल्या फारुक अब्दुल्ला पासून ते तामिळनाडूमधल्या करुणानिधीपर्यंत सर्वच नेत्यांना पवारांनी कधी ना कधी संमोहीत केले आहे.पक्षातीत संपर्क ठेवण्यामध्ये पवारांची बरोबरी करणारा एखादाच राष्ट्रीय नेता असेल.एवढं सारे मित्र असूनही पवार विश्वासनीय आहेत का हा मात्र मोठा प्रश्न आहे.

एकाच वेळी सर्व दगडीवर हात ठेवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.देशाचे संरक्षमंत्री असताना त्यांना मुंबईतल्या अनअधिकृत बांधकामांना नष्ट होत असलेल्या संरक्षणाची चिंता असते.शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी करत असताना पश्चिम महाराष्ट्रासह देशातल्या तमाम बागायतदार शेतक-यांचे कसे भले होईल याचीही ते काळजी घेतात.हिंदुत्तववादी शक्तींवर जोरदार टिका करतात त्याचवेळी पुलोद सरकार,मेघालयच निवडणुक किंवा पुणे पॅटर्न प्रत्येक वेळी या हिंदुत्ववादी शक्तींना पवित्र करण्याचे काम ते करतात.शाहु फुले आंबेडकरांचा सतत जयघोष करायचा आणि भांडराकर संस्थेतले हल्लेखोर, कुमार केतकरांचे घरफोडे यांना काही त्रास होणार नाही ही काळजी घ्यायची ही कलाही त्यांना अवगत आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यापासून रामविलास पासवान पर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलंय.परंतू त्यांच्या पक्षांतरानंतर खंजीर खुपसणे हा वाक्यप्रचार कोणत्याच नेत्यांबाबत वापरला गेला नाही.पासवान,द्रमुक,लोकदल ह्या पक्षांना जवळ घेण्यास डावे उजवे मधले सतत तयार असतात.परंतु आजवर भाजपाशी अधिकृतपणे कधीही युती न केलेल्या युपीए सरकारमधल्या या वजनदार मंत्र्याबाबत सर्वजण साशंक असतात.याचे कारण म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी वैचारीक निष्ठा यासारखे आजकालच्या सर्व पक्षातल्या नेत्यांमधून लोप पावत असलेल्या गुणांचा पवारांनी केंव्हाच त्याग केला आहे.एकवेळेस ते राजकीय सन्यास घेतील पण खरे बोलतील यावर कोणालाही विश्वास ठेवता येणं अवघड
आहे.पवारांच्या नादाला लागून रिपव्लीकन,शेकाप,जनता पक्ष आणि मार्क्सवादी हे महाराष्ट्रातले पक्ष आपली पारंपारिक विरोधी पक्ष ही ओळख विसरुन गेले.इंदिरा गांधीच्या घराणेशाहीला विरोध करत त्यांनी पुलोदचा प्रयोग राज्यात राबवला...पण त्यानंत 1986 मध्ये राजीव गांधींचे 'हात'बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.सोनिया गांधीना अध्यक्षपदासाठी पायघड्या त्यांनीच अंथरल्या.त्यानंतर 1999 मध्ये विदेशीपणाच्या मुद्यावरुन त्याच सोनियांच्या विरुद्ध स्वाभिमानी बंड केले.एवढं सर्व होऊनही देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासाच्या उद्देशानं सोनिया गांधीच्या मर्जीनुसार चालणा-या सरकारमध्ये कृषीमंत्रीपद त्यांनी स्विकारले.मला सांगा विश्वसनीयतेच्या बाबतीत एवढ्या सा-या गोष्टी एकत्रीतपणे ज्याच्या बायोडाटामध्ये आहेत अशा नेत्यावर कोणता पक्ष विश्वास ठेवेल ?

सध्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कमाल शक्यतांचा विचार करुन 15-20 जागा येतील अशी शक्यता आहे.त्यांना पाठिंबा देण्याची भाषा सध्या मुलायम करतात पण पवार-मुलायम युती ही जेट-सहारा या दोन कंपन्याच्या विलीनीकरणाप्रमाणे आहे.25 जागा मिळाल्या तर मुलायम पवारांना कधीही धोबीपछाड करतील.मायावतींना तर स्वत:लाच पंतप्रधान व्हायचे आहे.त्यांची शक्ती पवारांच्यापेक्षा अधिक असणार.याचाच अर्थ डाव्यासहीत सर्वच पक्ष मायावतींच्याच मागे जाणार.त्यांचा आजवरचा इतिहास पाहीला तर सोनिया गांधी ही त्यांना कधी पंतप्रधान बनवण्याचा धोका स्विकारणार नाहीत.आता शेवटचा पर्याय म्हणजे भाजपा अघाडी...त्या आघाडीनं अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलंय.. जर पंतप्रधानपदाचा घास हातातोंडाशी आलाच तर तो सोडण्याचा अविचारपणा अडवाणी कधीच करणार नाहीत.
थोडक्यात काय शरद पवार पंतप्रधानपदी प्रोजेक्ट करणं हे राष्ट्रवादी पक्षाने दिलेलं 'लबाडाघरचे अवताण ' आहे.या अवताणाला काही जण बळी पडतील पण 272 खासदार बळी पडणं ही अवघड गोष्ट आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...