Wednesday, February 25, 2009

स्लमडॉगच्या निमित्तानं


पोलीसांना त्रास देणारी वात्रट पोरं...या पोरांना पिटाळणारे ,पोलीस या पोलीसांपासून दूर पळणारे झोपडपट्टीतले मुलं..धारावीची अरुंद गल्लीबोळं आणि ठिकठिकाणी दिसाणारं घाणीचं,अस्वच्छतेचं,दारीद्र्याचं साम्राज्य...खरं तर कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये सहज खपून जाईलं असं हे दृश्य. पण आज या दृश्याचा प्रचंड जयघोष केला जातोय कारण हे दृश्य आहे तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळवणा-या स्लमडॉग मिलिनिअर या चित्रपटामधलं.


मी काही चित्रपट समीक्षक नाही. एखाद्या चांगल्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं योग्य कथानकाच्या साह्यानं बनवलेला कोणताही चित्रपट मला सहज प्रभावित करु शकतो.यापूर्वी अशा अनेक चित्रपटांनी मला सहज भूरळ घातलीय.त्यामुळे स्लमडॉग मिलिनिअर पाहण्यापूर्वी या चित्रपटाबद्दलची अनेक परीक्षण मी वाचली होती.त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय,मास्टरपीस,क्लासीक आणि असा आणखी बराच काही असेल..या चित्रपटाचा कालावधीत एका वेगळ्याच अनोख्या दुनियेचं वास्तववादी दर्शन मला घडेल.अशा कल्पनेत मी होतो.परंतु माझं दुर्दैव असं की माझ्या मनातले मांडे अगदी मनातच राहीले.यापैकी काहीही मला वाटलं नाही.एक चांगला परंतु असामान्य अजिबात नाही असा आणखी एक चित्रपट मी पाहिला.अशीच भावना हा चित्रपट पाहील्यानंतर माझ्या मनात उमटली.
स्लमडॉग ही संपूर्ण बॉलिवूड कथा आहे. विकास स्वरुप यांच्या मूळ कथेवर डॅनी बॉयलनं छान चित्रपट तयार केलाय.परंतु ही कथा इतकी सशक्त आहे की या कथेवर बालिवूडमधले दर्जात्मक सिनेमे बनवणारा एखादा भारतीय दिग्दर्शक याच्यापेक्षा सरस चित्रपट अगदी सहज बनवू शकला असता.अशी पैज लावण्यास मी तयार आहे.
स्लमडॉग ही जमाल आणि लतीका यांची प्रेमकथा आहे.परंतु यापेक्षा कितीतरी सरस प्रेमकथा आपल्या मुंबईत तयार झाल्या आहेत. मुस्लीम नायकाच्या आईला जातीय दंग्यामध्ये हिंदूंनी मारणे,खलनायकाच्या शक्तीवर आपल्या युक्तीनं मात करुन सहज पसार होणारे छोटे जमाल आणि सलीम...लतिकाच्या भेटीनं मुंबईत सर्व धोका पत्कारुन आलेला नायक जमाल..हे सगळे अगदी टिपीकल हिंदी फिल्मी घटक या चित्रपटामध्ये दिसतात.
जमाल आणि त्याच्या भाऊ सलीम यांचीही ही कथा आहे. या कथेमध्ये एक भाऊ चांगला आणि दूसरा गैरमार्गी असणे हा अगदी दिवार (किंवा कदाचीत त्याच्याही आधीपासून मला चित्रपटांबद्दल फारसं माहीत नाही ) सुरु असलेली प्रथा या चित्रपटामध्येही पाळण्यात आलीय.त्याचबरोबर खलप्रवृत्तीच्या भावाच्या मृत्यूला त्याचा सदाचारी भाऊच जबाबदार असणे हा फॉर्म्युला या चित्रपटातही वापरण्यात आलाय.या चित्रपटाच्या शेवटी नायकाचा विजय होतो.परंतु लगान चित्रपटाच्या शेवटी नायकाच्या यशाशी जसे प्रेक्षक एकरुप होतात. आमीर खानच्या प्रत्येक फटक्यावर जसा प्रेक्षकांमध्ये जल्लोष तसा कोणताही जल्लोष अथवा चित्रपटाशी एकरुपता या चित्रपटाशी प्रेक्षकांचा निर्माण होत नाही.
लगान,तारे जमींपर,सलाम बॉम्बे,मदर इंडिया यासारखे कित्येक सरस चित्रपट भारतामध्ये तयार झालेत.परंतू हे सर्व चित्रपट परदेशी भाषेच्या विभागात मोडतात.त्यामुळे या चित्रपटाला जगभरातल्या सर्वच तगड्या चित्रपटांशी तूलना करावी लागली.त्यामुळेच आजवर भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळू शकलेले नाही असं मला वाटतं. (अर्थात याला ऑस्करसाठी भारतीय चित्रपटाची निवड करणारी निवड समितीही तेवढीच जबाबदार आहे. दिल तो पागल है,तसंच एकलव्य सारखे चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवणा-या निवड समितीकडून कोणत्या अपेक्षा करणं हेच मुळात चूक आहे. ) त्यामुळेच ब्रिटीश निर्मात्याकडून निर्माण झालेल्या या चित्रपटाला अधिक नामांकनं मिळणं ऑस्करची निवड प्रक्रीया पाहीली तर अगदी स्वाभाविक वाटतं..थोडक्यात स्लमडॉगची इंग्रजी भाषा आणि त्याचा इंग्रजी दिग्दर्शक ही ऑस्करसाठी हा चित्रपट निवडला जाण्याची एक मोठी बलस्थाने आहेत.
स्लमडॉगच्या यशाचा अर्थ बदललेल्या जागतिक परिस्थितीमध्ये आहे. भारतानं 1991 साली खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं.त्यानंतर काही वर्षांनीच विश्वसुंदरी आणि जगत सुंदरी हे किताब भारतीय युवतीनं सतत काही वर्षे पटकावली. सोंदर्यप्रसाधनं आणि यासारख्या अनेक परदेशी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी ह्या स्पर्धेचा या स्पर्धेतल्या विजयी सुंदरींचा अत्यंत हूशारपूर्वक वापर केला.आज अमेरिकेसह सा-या जगात मंदीच वातावरण आहे.ह्या मंदीचा मोठा फटका हॉलिवूडला बसलाय.त्यामुळे मंदीच्या या वातवरणात बॉलिवूड ह्या जगातल्या सर्वात मोठ्या फिल्म उद्योगात शिरकाव करण्यासाठी एक साधन म्हणून स्लमडॉगवर ऑस्करचा वर्षाव केला जात नाही ना असाही एक स्वाभाविक प्रश्न आहे. अमेरिका तसंच ब्रिटनचा आजवर राजकीय,सामाजिक आणि व्यापारी इतिहास पाहीला तर या प्रश्नाचं उत्तर ठामपणे नाही असं म्हणता येणार नाही.
स्लमडॉगच्या यशाचा येता जाता जयघोष करणा-या भारतीयांनी या चित्रपटाच्या निमीत्तानं निर्माण झालेल्या प्रश्नांचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे.

5 comments:

Dr. Pravin Patil said...

onkya
slumdog is a nice movie
stop criticizing....

Niranjan Welankar said...

Sundar lekh. Atyant swatantra vishleshan. Lay aavadla. Pan A R Rahman cha kautuk ani ya ghatnetle anya positive aspects jast pudhe aanle nahit asa vatala.
Tarihi Lay bhari. Good going. Jai Ho !

madhuraa said...

ओकार तू लिहलेला स्लमडॉगवरील लेख अतिशय उत्कृष्ट आहे. त्यात विशेष करून,या चित्रपटातून तुम्ही एका महत्वाच्या प्रश्नाला हात घातल्याचं नमूद केल्यामुळे, ते अधिक विचारात टाकतयं...एखाद्या हॉलिवूड दिग्दर्शकाने मुंबईतल्या जीवंत विषयावर चित्रपट करणं आणि त्याने ऑस्करच्या आठ बाहूल्या पटकावणं नक्कीचं अभिमानास्पद आहे...पण, हे आपल्या इकडच्या दिग्दर्शकांना केव्हा समजणार...हा खरोखरच एक वादाचा मुद्दा आहे.आपले दिग्दर्शक कुठे कमी पडतात हे यानिमित्तानं मात्र, समोर आलयं.. त्यामुळे भारतीय दिग्दर्शकांनी याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

मधुरा सुरपूर

santosh gore said...

छान लेख आहे. बाकी स्लमडॉगच्या निमीत्ताने हॉलीवुडचा केंद्रबिंदू आता हिंदी सिनेसृष्टीकडे वळेल.

checkamol said...

इंग्रजी दिग्दर्शक हे ऑस्कर मिळवण्यासाठी या चित्रपटाचं बलस्थान आहे, हे मान्य. मात्र आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांचा हा वीक पॉईंट नाही का... हा टिपिकल बॉलिवूडपट आहे असे तू म्हणतोस, पण प्रश्न हा आहे की स्लमडॉग हा एक अत्यंत उत्तम दर्जाचा, एलिट सिनेमा असेल, अशी अपेक्षा तो चित्रपट पाहण्याअगोदरच का केली गेली.. हाच चित्रपट भारतीय दिग्दर्शकानं तयार केला असता, तर प्रतिक्रीया संमीक्ष जरूर असत्या, मात्र हा चित्रपट पाहण्याअगोदरच अपेक्षा वाढवून, नंतर अपेक्षाभंग होण्याचं प्रमाण कमी राहिलं असतं

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...