Thursday, January 8, 2009

'तरुण' भारताचे म्हातारे नेते


माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत ह्यांच सध्याचं वय आहे 86. ते राजस्थानचे तीन वेळा मुख्यमंत्री होते.भारताचं उपराष्ट्रपतीपद भूषवण्याचा मानही त्यांना मिळालाय.राष्ट्रपतीची निवडणुकही त्यांनी लढवलीय.तरीही त्यांच्या मधला राजकारणी निवृत्त किंबहूना त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अजुनही तृप्त झालेला नाही.त्यामुळेचं लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय.' सत्तातुराणाम् न भयम् म लज्जा ' या संस्कृत सुभाषीताप्रमाणे वागणारे शेखावत हे केवळ एकमेव भारतीय नेते नाहीत.तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये ही समानता आढळते.

लोकसभेच्या 15 व्या निवडणुकीला आता अवघे काही महीने उरलेत.आजपासून सहा महिन्यानंतर ही निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाली असेल. आपल्या देशात 20 ते 35 या गटातल्या तरुणांची संख्या मोठी आहे.या गटात जगातली सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये असल्यामुळे भारताला तरुणांचा देश असंही म्हंटलं जातं.मात्र या तरुण भारताचे बहुतेक नेते हे सत्तरी ओलांडले आहेत.सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच वय आहे 77..या पदासाठी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत लालकृष्ण अडवाणी त्यांचे वय आहे 81...मनमोहन सिंगाचे मंत्रीमंडळातले सहकारी प्रणब मुखर्जी यांच वय आहे 73.गृहमंत्रीपदावरुन ज्यांना नुकतंच अपमानास्पदरीत्या हाकलपट्टी करण्यात आलं त्या शिवराज पाटील यांचही वय आहे 73. उच्च संस्थामध्ये आरक्षणाचा निर्णय ज्या सन्मानीय मंत्री महोदयांनी कोणालाही विश्वासात न घेता जाहीर केला त्या माननीय अर्जुनसिंहजी आहेत 79 वर्षांचे. दहशतवाद,आर्थिक मंदी,नागरीकरण,ग्लोबल वार्मिंग या सारख्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करणा-या या युवा भारताचा भार हेच म्हातारे नेते आपल्या कृश खांद्यावर वाहणार आहेत.
भारतामध्ये ही परपंरा आताच सुरु झाली आहे का तर अजिबात नाही. भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनीच सुरु केली.स्वातंत्र्यलढ्यात नेहरुंच्या योगदान लक्षात घेऊन देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड होणं अपेक्षित होतं.मात्र पंतप्रधान पदाची एक काराकिर्द पूर्ण होऊन दुस-या नेत्यासाठी पंतप्रधानपद सोडण्याचा मोठेपणा नेहरुंसारख्या विशाल मनाच्या नेत्यांनी दाखवायला हवा होता.परंतू नेहरुंनी शेवटपर्यंत निवृत्ती घेतली नाही.नेहरुंनंतर इंदीरा गांधीही आयुष्याच्या अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत देशाच्या पंतप्रधान होत्या.याच्या उलट आपण ज्यांच सदैव अनुकरण करतो त्या पाश्चात्य देशामधली परिस्थीती मात्र अगदी उलट आहे.बराक ओबामा हे वयाच्या 47 व्या वर्षी जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे अध्यक्ष बनतायत. याच महिन्यात आपली आठ वर्षाची काराकिर्द संपवून जॉर्ज बूश हे अध्यक्षपदावरुन निवृत्त होतील,त्यांच सध्याचं वय आहे 59.बिल क्लिंटन हे 55 व्या तर टोनी ब्लेयर यांनी वयाच्या 54 वर्षी आपल्या देशाची सर्वोच्च पदं खाली ठेवली आहेत.

आपल्या देशात सर्व सरकारी नोक-यांमध्ये निवृत्तीचं वय निश्चित आहे.खाजगी कंपन्यांमध्येतर जीवघेण्या स्पर्धेमुळे निवृत्तीची सरासरी वयोमर्यांदा वरचेवर आणखी खाली येतीय.मात्र राजकारण हे असं एकमेव क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात अजुनही निवृत्तीचं कोणतंही बंधन नाही.उलट तूमचं वय जसं जसं वाढत जातं तसं तूमच्यातला नेता अधिकच मुरत जातो.या नेत्याला महानेता बनवण्याचं काम त्याचे अनुयायी करत जातात.तो नेता हा जीवंतपणीच दंतकथा बनतो.मग हा नेता कार्यकर्ते आणि हाजारो अनुयायींच्या आग्रहास्तव सत्तेच्या तसंच अधिकाराच्या पदी चिकटून राहतो. एन.टी.रामाराव,एम.करुणानिधी तसंच बाळासाहेब ठाकरे हे याचंच अगदी प्रमुख उदाहरण. बाळासाहेबांनी प्रत्यक्ष सत्ता कधी उपभोगली नाही हे खर आहे.मात्र शिवसेनेच्या सा-या सत्तापदांचा रिमोट कंट्रोल त्यांनी आपल्या हातातून कधीही सोडला नाही.हा रिमोट कंट्रोल इतका घट्ट आहे की साठीच्या वरच्या सर्व नेत्यांनी राजकारणामधून निवृत्त व्हावं असं जाहीर विधान त्यांनी पाच वर्षापूर्वीच केलं होतं...तरीही अजूनही वयाच्या 83 व्या वर्षी ते खोकलत,अडखळत शिवाजी पार्कवरुन भाषणं करतचं आहेत.त्याचबरोबर या पक्षातल्या ज्या युवकांना पुढं आणण्याचा उदारपणा ही नेते दाखवतात ती नेते ही याच महान नेत्यांची मुलं असतात..राहुल गांधी,सचिन पायलट,ज्योतीरादित्य शिंदे,उद्वव तसंच राज ठाकरे,सुप्रिया सुळे तसंच स्टॅलीन आणि नवीन पटनाईक ही याचीच प्रमुख उदाहरणं.

खर तर या देशात राजकारण असं एकमेव असं क्षेत्र असावं ज्याच्यावर तरुणांचे वर्चस्व नाही.याची कारण काय आहेत याचाही आपण शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतरची पहिली दोन दशकं या देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉँग्रेस या एकाच पक्षाचं राज्य होत. या काळात सत्तापद सांभाळणारी कॉँग्रेसची बहुतेक नेते ही स्वातंत्र्यलढ्यातली म्हणजे वयाचं अर्धशतक ओलांडलेली होती.ही पिढी अस्ताला गेल्यानंतर ज्यांनी सत्ता स्विकारली ती इंदीराजींची पिढीही वयाच्या 50 व्या वर्षी सत्तेत पोहचली, बरं पंतप्रधान,मुख्यमंत्री यासारखी पद किती वर्ष सांभाळावी याला अमेरिकेप्रमाणे कोणतही बंधन आपल्याकडं नाही..त्यामुळेच वयाच्या 84 व्या वर्षी अच्यूतानंदन केरळचे मुख्यमंत्री होतात.तर 84 वय झालं अनेक वेळा पद उपभोगून झालं तरी अजुनही करुणानिधी मुख्यमंत्रीपद सोडण्याचं नाव घेत नाहीत.

हा दोष फक्त म्हाता-या नेत्यांचा आहे ? मला असं अजीबात वाटत नाही..1970 च्या दशकात ब्रेन ड्रेन ला सुरवात झाली.या देशातला उच्चशिक्षीत वर्ग एकतर भारताच्या बाहेर जायचा,यातला दुसरा वर्ग जो त्यांच्या (खर तर या देशाच्या ) दुर्दैवामुळे इथं राहीला असा वर्ग या देशाला नावं ठेवत अमेरिकेच्या आठवणी जागतचं आपलं आयुष्य काढत असे.या मधला जो तिसरा वर्ग ज्याला खरंच या देशाबद्दल कळकळ असायची किंवा आजही आहे या वर्गाची शक्ती या देशातला भ्रष्टाचार,वशिलेबाजी.गुंडगिरी यांच्याशी लढतानाचं नष्ट होतीय.त्यामुळे या सर्व दिव्यातून राजकारणाच्या मूळ परीघात अगदी थोड्याच व्यक्ती पोचल्या असतील.
आज 2009 साली तरी परिस्थीती फारशी बदलली नाही.ब्रेन ड्रेनचा संपूर्ण उलटा प्रकार आता सुरु झालाय.उच्चविद्याविभूषीत, भला मोठा पगार घेणारे युवक अमेरिकेतून मंदीचा मार खाऊन भारतामध्ये परतायत. तरीही ग्लोबलायझेनच्या या युगात भांडवलशाही अर्थव्यवस्थेची झिंग तरुणांच्या मनातली काही कमी होत नाही. सरकारी नोकरीसाठी जीव टाकणारी पिढी कालबाह्य झाली . आज विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व नावापुरतंच राहिल्याचं दिसतं. विद्यार्थी करिअरिस्ट झालेत.विद्यार्थी संघटनांची मेंबरशीप कमी होत चाललीय. 'मला काय त्याचे ' हा एप्रोचही आता ग्लोबल होत चाललाय.मुंबईवरच्या हल्ल्यानंतर याच वर्गातल्या अनेकांनी मेणबत्ती पेटवत ताजसोमर निदर्शन केली.मात्र ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांचा बळी गेला त्या सीएसटीवर हे मेणबत्तीवाले अजिबात फिरकले नाहीत.हा मुद्दाही विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.आता लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या वेळीच हा वर्ग किती गंभीर आहे हे सिद्ध होईल.

कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशाचं नेतृत्व करणा-या नेत्यांमुळे  होत असते.शंभर कोटींच्या या भारत देशातले अनेक नेते हे वयोवृद्ध,संरजामी वृत्तीचे,घराणेशाहीला चिकटून राहणारे, आणि सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी काहीही करु शकणारे असेच आहेत.भारताची ही ओळख मला नेहमीच अस्वस्थ करते. आपल्या समोर चांगले आदर्श निर्माण केले नाहीत म्हणून या देशातला युवा वर्ग हा आधीच्या पिढीला नेहमीच नावं ठेवत असतो.हाच आरोप पुढच्या पिढीनंही आपल्यावर करु नये याची खबरदारी या देशाच्या युवकांनी घेतली पाहीजे.

चारित्र्यसंपन्न,बुद्धिसंपन्न आणि देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावणारे युवक ह्या देशात निर्माण व्हावेत हेच स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातीला पाहीलं होतं. आज 21 व्या शतकात तरी स्वामीजींचे हे स्वप्न पूर्ण होणार का ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हाता-या नेत्यांच्या तरुण देशाने करायला हवा.

1 comment:

Gireesh Mandhale said...

Lekh changla zala ahe. Mala vatata Bharataltil bahutek mothi nete mandali hi vayovrudhha asanyacha ajun ek karan mhanje Rajkarnat pay thevlyapasun mothya padaparyant(CM, PM etc) pochnyas lagnara vel..
This is one of the reason why this field is not dominated by Youth as compared to other fields.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...