Wednesday, January 21, 2009

'बाळ' पर्व


बाळासाहेब ठाकरे. 23 जानेवारी 2009 या दिवशी ते आपल्या वयाची 83 वर्षे पूर्ण करतील.भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना किंबहून प्रत्येक नेत्याला साहेब म्हणण्याची सवय आहे.मात्र ख-या अर्थाने साहेब हे नाव ज्या नेत्याला अगदी चिकटून बसलंय.ते म्हणजे बाळ केशव ठाकरे..अर्थात बाळासाहेब ठाकरे.गेली चाळीस वर्षात या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदरांच, मानाचं आणि धाकाचंही स्थान मिळवलंय.. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा आजवरचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे ह्या नावाला टाळून पुढं जाणं अशक्य आहे.
काही व्यक्ती ह्या त्यांच्या जिवंतपणीच अगदी दंतकथा बनून गेल्या असतात..मला आठवतय 1992 साल..मी तेंव्हा जेमतेम नऊ वर्षाचा असेल.आंम्ही सारे त्यावर्षी दक्षिण भारतामध्ये प्रवास करण्यास गेलो होतो.त्या वर्शी आंम्ही जाऊ तिथं आंम्ही महाराष्ट्रीयन आहोत हे कळाले की दक्षिण भारतीय लोक बाळासाहेब ठाकरेंविषयी विचारत.त्यानंतर 2005 साली मी दिल्लीला गेलो होतो.त्याही ठिकाणी मी मराठी आहे हे समजताच दिल्लीकर लोक आंम्हाला आधी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतचं विचारत.दिल्ली पासून अगदी कन्याकुमारी पर्यंतच्या भारतीयांच्या मनात सर्वात जास्त कुतूहल असलेले बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव मराठी नेते आहेत.गेली चाळीस वर्षे या नेत्यानं शिवसेना ही संघटना आपल्या मुठीत ठेवलीय.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे एक अगदी घट्ट असं समीकरण आहे.
हे समीकरणं मुळात जन्माला आलं तो काळ मोठा विलक्षण आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापना नुकतीच झाली होती.मराठी माणसांचं राज्य निर्माण झालं आपले सारे प्रश्न सुटतील असं वाटणारा एक मोठा समाज या राज्यात होता.मात्र नौकरी असो अथवा उद्योगधंदे प्रत्येक पातळीवर मराठी तरुण मागं पडलेत असं चित्र त्या काळात अनेकांनी दाखवायाला सुरु केली होती (हेच चित्र आजही अनेक जण रंगवतात ) वाचा आणि स्वस्थ बसा या नावाची मालिकाचं त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंचे मार्मिक हे साप्ताहिक चालवत असे.मराठी माणसांच्या असंतोषाचा असा संपूर्ण वापर करत बाळासाहेबांनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेनेची स्थापना केली.आज या घटनेला 42 वर्षे झाली आहेत.ज्या उद्देशाकरता शिवसेनेची स्थापणा झाली आहे त्यामधले किती प्रश्न अजून सुटले आहेत,याचा विचार सर्वच मराठी माणसांनी यानिमीत्तानं कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता शांतपणे करायला हवा.
रस्त्याच्या नाक्यावर टर्रेबाजी करणा-या,कोणत्याही मुद्यावर राडे करण्यास तयार असलेला संतप्त मराठी युवक हे शिवसेनेचं सर्वात मोठं बलस्थान होत.याच पोरांच्या जोरावर बाळासाहेबांचा आवाज सा-या राज्यभर आणि देशभर पोचला.बाळासाहेबांची आज जी लार्जर दॅन लाईफ अशी इमेज झालीय..ती इमेज बनवण्यात याच पोरांचा सर्वात जास्त वाटा आहे.
काही कालावधीनंतर शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका आली...ठाणे,औरंगाबाद या महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला.सेनेचे आमदार,खासदार निवडूण आले.1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. खर तर शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा कालखंड ठरला असता. मराठी माणसांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा उठता बसता गजर करणा-या शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रतल्या मतदारांनी कौल दिला होता.मला मान्य आहे तूंम्ही साडेचार वर्षात राज्य बदलू शकत नाहीत मात्र तूमच्याकडं ते बदलण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे हे तरी दिसायला हवं..परंतु त्या साडेचार वर्षात किंवा त्या कालावधीचा अभ्यास करत असताना आजही ही इच्छा शक्ती युती सरकारमध्ये होती असं आज वाटत नाही.युती सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातामध्ये होता असे मा.बाळासाहेब ठाकरे देखील या अपयशाला तेवढेच जवाबदार आहेत.
माझं हे बोलणं काहींना अतातयीचं वाटेल परंतु युती सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा मला होत्या.त्यामुळे या सरकारच्या अपयशी कामगिरीचं शल्य मला डसतय..ज्या एनरॉन करारला अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा या नेत्यांनी केली होती.त्य़ाच नेत्यांनी या कंपनीकरता लाल गालीचा अंथरला. धारावीतल्या झोपडपट्टीवासीयांना मोफत घर का बांधीन देण्याच्या 'ठाकरी' घोषणेचाही असाच बोजावरा उडाला..वीजेच्या बाबतीत एकेकाळी स्वयंपूर्ण असणारा महाराष्ट्र अंधारात बुडाला..मुंबईत घुसणारे बांगलादेशी लोंढे कमी झाले नाहीत,लालाबाग-परळ या भागातल्या मराठी कामागारांची झाडाझडती थांबली नाही. तरीही युतीचे हे नेते त्यांच्या युवराजानं प्रायोजीत केलेल्या मायकल जॅक्सनच्या शो मध्ये गुंग होते.विचार करा मायकल जॅक्सनला कोणी कॉँग्रेसी नेत्यानं मुंबईत आणलं असत...तर बाळासाहेबांनी किती गजहब केला असता..हा कोण अमेरिकी XXX म्हणून सा-या मुंबईत शिमगा करायला त्यांनी कमी केलं नसंत. पण लाडक्या युवराजाचा हट्ट पुरवण्यास सारं युती सरकार सज्ज होतं..एक मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग सोडला तर युती सरकारच्या कालावधीत फारसं चांगलं काय घडलं हेच आता आठवावं लागतं..
युतीचं सरकार पडलं, 2004 मध्ये अगदी अनुकूल वातावरण असतानाही युतीला सत्ता मिळवता आली नाही.याही वर्शी सत्ता मिळवण्यासाठी युतीमधल्या सर्वच नेत्यांना एकदिलानं अतिशय नेटानं प्रयत्न करावे लागतील. द्रमुक,तेलगू देसम,आसाम गण परीषद,अकाली दल यासारख्या प्रादेशीक पक्षांनी स्वत:च्या जीवावर आपआपल्या राज्यात सत्ता मिळवली आहे. शिवसेना बा महाराष्ट्रातला प्रादेशीक पक्ष स्वबळावर सत्ता मिळवेल अशी शक्यता नजीकच्या कालावधीमध्ये तरी कुठही दिसत नाही.मला वाटतं बाळासाहेबांच अनिश्चीत आणि लहरी राजकारणाचा हा परिणाम आहे.
अशा प्रकारचे मुद्दे अनेक सांगता येतील तरीही बाळासाहेबांचा करीष्मा कमी होत नाही.एक रोखठोक बिनधास्त आणि मनस्वी माणूस अशीच त्यांची प्रतिमा आहे.त्यांचा दबदबा इतका आहे की छगन भूजबळ,नारायण राणे राज ठाकरे यासारखे नेते त्यांना वंदन करुनचं आपली बंडखोरी रेटत असतात.
आपल्या एका शब्दावर पेटून उठणारे, आपल्या आयुष्याची होळी करणारे युवक आपले अनुयायी असावेत असं प्रत्येक नेत्याची महत्वकांक्षा असते.बाळासाहेब या बाबतीत नेहमीच श्रीमंत राहीले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अशी श्रीमंती खचितच एखाद्या मराठी नेत्याच्या वाटेला आली असेल.
बाळासाहेब ठाकरे ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी ठरवलं सतं तर राज्याचा इतिहास हा बराच बदलला असता,...राज्याचा इतिहास बदलण्याची क्षमता असलेल्या या अत्यंत कमी नेत्यामंध्ये बाळासाहेबांच स्थान वरचे आहे. आपल्या शक्तीचा आणि क्षमतेचा या माणसांनं पूर्णपणे वापर खरचं केला का ? असा प्रश्न मला नेहमी पडतो..राज्याच्या इतिहासातील या झंझावती 'बाळ' पर्वाचा अभ्यास करत असताना मराठी माणसांनी खरचं अगदी शांतपणे कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता याचा विचार करायला हवा

Thursday, January 8, 2009

'तरुण' भारताचे म्हातारे नेते


माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत ह्यांच सध्याचं वय आहे 86. ते राजस्थानचे तीन वेळा मुख्यमंत्री होते.भारताचं उपराष्ट्रपतीपद भूषवण्याचा मानही त्यांना मिळालाय.राष्ट्रपतीची निवडणुकही त्यांनी लढवलीय.तरीही त्यांच्या मधला राजकारणी निवृत्त किंबहूना त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अजुनही तृप्त झालेला नाही.त्यामुळेचं लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय.' सत्तातुराणाम् न भयम् म लज्जा ' या संस्कृत सुभाषीताप्रमाणे वागणारे शेखावत हे केवळ एकमेव भारतीय नेते नाहीत.तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये ही समानता आढळते.

लोकसभेच्या 15 व्या निवडणुकीला आता अवघे काही महीने उरलेत.आजपासून सहा महिन्यानंतर ही निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाली असेल. आपल्या देशात 20 ते 35 या गटातल्या तरुणांची संख्या मोठी आहे.या गटात जगातली सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये असल्यामुळे भारताला तरुणांचा देश असंही म्हंटलं जातं.मात्र या तरुण भारताचे बहुतेक नेते हे सत्तरी ओलांडले आहेत.सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच वय आहे 77..या पदासाठी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत लालकृष्ण अडवाणी त्यांचे वय आहे 81...मनमोहन सिंगाचे मंत्रीमंडळातले सहकारी प्रणब मुखर्जी यांच वय आहे 73.गृहमंत्रीपदावरुन ज्यांना नुकतंच अपमानास्पदरीत्या हाकलपट्टी करण्यात आलं त्या शिवराज पाटील यांचही वय आहे 73. उच्च संस्थामध्ये आरक्षणाचा निर्णय ज्या सन्मानीय मंत्री महोदयांनी कोणालाही विश्वासात न घेता जाहीर केला त्या माननीय अर्जुनसिंहजी आहेत 79 वर्षांचे. दहशतवाद,आर्थिक मंदी,नागरीकरण,ग्लोबल वार्मिंग या सारख्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करणा-या या युवा भारताचा भार हेच म्हातारे नेते आपल्या कृश खांद्यावर वाहणार आहेत.
भारतामध्ये ही परपंरा आताच सुरु झाली आहे का तर अजिबात नाही. भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनीच सुरु केली.स्वातंत्र्यलढ्यात नेहरुंच्या योगदान लक्षात घेऊन देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड होणं अपेक्षित होतं.मात्र पंतप्रधान पदाची एक काराकिर्द पूर्ण होऊन दुस-या नेत्यासाठी पंतप्रधानपद सोडण्याचा मोठेपणा नेहरुंसारख्या विशाल मनाच्या नेत्यांनी दाखवायला हवा होता.परंतू नेहरुंनी शेवटपर्यंत निवृत्ती घेतली नाही.नेहरुंनंतर इंदीरा गांधीही आयुष्याच्या अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत देशाच्या पंतप्रधान होत्या.याच्या उलट आपण ज्यांच सदैव अनुकरण करतो त्या पाश्चात्य देशामधली परिस्थीती मात्र अगदी उलट आहे.बराक ओबामा हे वयाच्या 47 व्या वर्षी जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे अध्यक्ष बनतायत. याच महिन्यात आपली आठ वर्षाची काराकिर्द संपवून जॉर्ज बूश हे अध्यक्षपदावरुन निवृत्त होतील,त्यांच सध्याचं वय आहे 59.बिल क्लिंटन हे 55 व्या तर टोनी ब्लेयर यांनी वयाच्या 54 वर्षी आपल्या देशाची सर्वोच्च पदं खाली ठेवली आहेत.

आपल्या देशात सर्व सरकारी नोक-यांमध्ये निवृत्तीचं वय निश्चित आहे.खाजगी कंपन्यांमध्येतर जीवघेण्या स्पर्धेमुळे निवृत्तीची सरासरी वयोमर्यांदा वरचेवर आणखी खाली येतीय.मात्र राजकारण हे असं एकमेव क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात अजुनही निवृत्तीचं कोणतंही बंधन नाही.उलट तूमचं वय जसं जसं वाढत जातं तसं तूमच्यातला नेता अधिकच मुरत जातो.या नेत्याला महानेता बनवण्याचं काम त्याचे अनुयायी करत जातात.तो नेता हा जीवंतपणीच दंतकथा बनतो.मग हा नेता कार्यकर्ते आणि हाजारो अनुयायींच्या आग्रहास्तव सत्तेच्या तसंच अधिकाराच्या पदी चिकटून राहतो. एन.टी.रामाराव,एम.करुणानिधी तसंच बाळासाहेब ठाकरे हे याचंच अगदी प्रमुख उदाहरण. बाळासाहेबांनी प्रत्यक्ष सत्ता कधी उपभोगली नाही हे खर आहे.मात्र शिवसेनेच्या सा-या सत्तापदांचा रिमोट कंट्रोल त्यांनी आपल्या हातातून कधीही सोडला नाही.हा रिमोट कंट्रोल इतका घट्ट आहे की साठीच्या वरच्या सर्व नेत्यांनी राजकारणामधून निवृत्त व्हावं असं जाहीर विधान त्यांनी पाच वर्षापूर्वीच केलं होतं...तरीही अजूनही वयाच्या 83 व्या वर्षी ते खोकलत,अडखळत शिवाजी पार्कवरुन भाषणं करतचं आहेत.त्याचबरोबर या पक्षातल्या ज्या युवकांना पुढं आणण्याचा उदारपणा ही नेते दाखवतात ती नेते ही याच महान नेत्यांची मुलं असतात..राहुल गांधी,सचिन पायलट,ज्योतीरादित्य शिंदे,उद्वव तसंच राज ठाकरे,सुप्रिया सुळे तसंच स्टॅलीन आणि नवीन पटनाईक ही याचीच प्रमुख उदाहरणं.

खर तर या देशात राजकारण असं एकमेव असं क्षेत्र असावं ज्याच्यावर तरुणांचे वर्चस्व नाही.याची कारण काय आहेत याचाही आपण शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतरची पहिली दोन दशकं या देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉँग्रेस या एकाच पक्षाचं राज्य होत. या काळात सत्तापद सांभाळणारी कॉँग्रेसची बहुतेक नेते ही स्वातंत्र्यलढ्यातली म्हणजे वयाचं अर्धशतक ओलांडलेली होती.ही पिढी अस्ताला गेल्यानंतर ज्यांनी सत्ता स्विकारली ती इंदीराजींची पिढीही वयाच्या 50 व्या वर्षी सत्तेत पोहचली, बरं पंतप्रधान,मुख्यमंत्री यासारखी पद किती वर्ष सांभाळावी याला अमेरिकेप्रमाणे कोणतही बंधन आपल्याकडं नाही..त्यामुळेच वयाच्या 84 व्या वर्षी अच्यूतानंदन केरळचे मुख्यमंत्री होतात.तर 84 वय झालं अनेक वेळा पद उपभोगून झालं तरी अजुनही करुणानिधी मुख्यमंत्रीपद सोडण्याचं नाव घेत नाहीत.

हा दोष फक्त म्हाता-या नेत्यांचा आहे ? मला असं अजीबात वाटत नाही..1970 च्या दशकात ब्रेन ड्रेन ला सुरवात झाली.या देशातला उच्चशिक्षीत वर्ग एकतर भारताच्या बाहेर जायचा,यातला दुसरा वर्ग जो त्यांच्या (खर तर या देशाच्या ) दुर्दैवामुळे इथं राहीला असा वर्ग या देशाला नावं ठेवत अमेरिकेच्या आठवणी जागतचं आपलं आयुष्य काढत असे.या मधला जो तिसरा वर्ग ज्याला खरंच या देशाबद्दल कळकळ असायची किंवा आजही आहे या वर्गाची शक्ती या देशातला भ्रष्टाचार,वशिलेबाजी.गुंडगिरी यांच्याशी लढतानाचं नष्ट होतीय.त्यामुळे या सर्व दिव्यातून राजकारणाच्या मूळ परीघात अगदी थोड्याच व्यक्ती पोचल्या असतील.
आज 2009 साली तरी परिस्थीती फारशी बदलली नाही.ब्रेन ड्रेनचा संपूर्ण उलटा प्रकार आता सुरु झालाय.उच्चविद्याविभूषीत, भला मोठा पगार घेणारे युवक अमेरिकेतून मंदीचा मार खाऊन भारतामध्ये परतायत. तरीही ग्लोबलायझेनच्या या युगात भांडवलशाही अर्थव्यवस्थेची झिंग तरुणांच्या मनातली काही कमी होत नाही. सरकारी नोकरीसाठी जीव टाकणारी पिढी कालबाह्य झाली . आज विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व नावापुरतंच राहिल्याचं दिसतं. विद्यार्थी करिअरिस्ट झालेत.विद्यार्थी संघटनांची मेंबरशीप कमी होत चाललीय. 'मला काय त्याचे ' हा एप्रोचही आता ग्लोबल होत चाललाय.मुंबईवरच्या हल्ल्यानंतर याच वर्गातल्या अनेकांनी मेणबत्ती पेटवत ताजसोमर निदर्शन केली.मात्र ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांचा बळी गेला त्या सीएसटीवर हे मेणबत्तीवाले अजिबात फिरकले नाहीत.हा मुद्दाही विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.आता लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या वेळीच हा वर्ग किती गंभीर आहे हे सिद्ध होईल.

कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशाचं नेतृत्व करणा-या नेत्यांमुळे  होत असते.शंभर कोटींच्या या भारत देशातले अनेक नेते हे वयोवृद्ध,संरजामी वृत्तीचे,घराणेशाहीला चिकटून राहणारे, आणि सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी काहीही करु शकणारे असेच आहेत.भारताची ही ओळख मला नेहमीच अस्वस्थ करते. आपल्या समोर चांगले आदर्श निर्माण केले नाहीत म्हणून या देशातला युवा वर्ग हा आधीच्या पिढीला नेहमीच नावं ठेवत असतो.हाच आरोप पुढच्या पिढीनंही आपल्यावर करु नये याची खबरदारी या देशाच्या युवकांनी घेतली पाहीजे.

चारित्र्यसंपन्न,बुद्धिसंपन्न आणि देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावणारे युवक ह्या देशात निर्माण व्हावेत हेच स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातीला पाहीलं होतं. आज 21 व्या शतकात तरी स्वामीजींचे हे स्वप्न पूर्ण होणार का ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हाता-या नेत्यांच्या तरुण देशाने करायला हवा.

Thursday, January 1, 2009

आरक्षणाची ऐशी की तैशी !


2009 हे निवडणुकांचे वर्ष आहे.लोकसभा तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहेत.निवडणुका आल्या की एखादे नवे प्रकरण (भानगड) उभे करायचे .या मुद्यावर निवडणुका लढवायच्या आणि मतं मिळवून सत्ता मिळवायाची ही परंपरा सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाळत आलेले आहेत.महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या निवडणुकीकरता एक नवा मुद्दा मिळालाय..तो आहे मराठा आरक्षण.
एखाद्या चांगल्या तत्वांची चांगल्या नियमांची या देशात कशा प्रकारे सत्यानाश केला जातो,याचे अगदी क्लासीक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी. ज्या दलीत,मागसवर्गीय समाजाला वर्षानुवर्षे अन्याय सहन करावा लागलाय..ज्या समाजाला पिढ्यान पिढ्या गावकूसाबाहेरचं जीणं जगावं लागलंय...अशा मगास आणि अतिमागास समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याकरता आरक्षण हे तत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं.या आरक्षणाच्या तरतूदींचा दर दहा वर्षांनी अभ्यास केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.मात्र डॉ.आंबेडरकरांनंतर आरक्षणाचा उपयोग हा केवळ व्होट बॅँकेकरताच होऊ लागला.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर तर या देशाच्या मानगूटीवर आरक्षणाचं भूत आणखी भक्कम झालंय..हे भूत उतरवण्यासाठी प्रयत्न करण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नाही..उलट ह्या आरक्षणाकरता आपणचं कसे अधिक पात्र आहोत..ह्याची गरज आपल्याला कशी सर्वात जास्त आहे..या देशात आपलीच जात सर्वात जास्त मागास किंवा अतिमागास कशी आहे.याचा प्रयत्न जो तो करु लागलाय..ज्या महाराष्ट्राचं सारी सत्ताकेंद्र ज्या मराठा ह्या एकमेव पक्षानं इतके दिवसं उपभोगली किंबहूना ब-याच ठिकाणी आजही उपभोगत आहेत तो मराठा समाजही आज आरक्षण मिळवण्याच्या मागे लागलाय...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण मराठा,राज्याचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर मराठा, विधान परिषद सभापती मराठा,राज्यातल्या जमिनीचे सर्वात जास्त मालक मराठा,शिक्षण संस्थाचे मालक मराठा,सहकारी संस्थांचे चालक मराठा, नगराध्यक्ष,महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी मराठा तरीही ह्या समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता काही कडव्या आणि ब-याच अंशी माथेफीरु संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच ह्याच समाजानं राज्याचं नेतृत्व केलं आहे. 1962 ते 1999 पर्यंत राज्य विधानसभेतल्या खूल्या जागेवर निवडूण गेलेले सुमारे 60 टक्के आमदार हे मराठाच आहेत.संपूर्ण राज्यभर सत्तेचं जे मराठा मॉडेल ह्या नेत्यांनी तयार केलं त्याच मराठा मॉडेलचा पराभव म्हणजे ही आरक्षणाची मागणी आहे.
ज्या शाहू-फूले-आंबेडकर यांच्या नावानं मराठा नेते आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच समाजातल्या लोकांचा टोकाचा विरोध ह्या समाजानं आजवर गेला आहे.रिडल्स किंवा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हे ह्याच सर्वात ठळक उदाहरण...अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीलाही याच काही नेत्यांनी जोरदार विरोध केला होता.मराठा समाज हा जर खरचं आरक्षित झाला तर संपूर्ण राज्याच्या समाजकारणावर खूप मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत.राज्याची सध्याच बिघडलेली सामाजिक घडी ह्या निर्णयानंतर तर पार विस्कटून जाऊ शकते.खुल्या गटातले मराठा जर 27 टक्के आरक्षण असलेल्या ओबीसी गटामध्ये दाखल झाले..तर या 27 टक्के वाल्या जातींमध्ये मोठी खळबळ माजू शकते.या जातींमधल्या कूणबीसह अन्य काही प्रबळ आणि शक्तीशाली जाती आपला समावेश मागसवर्गात करावा अशी मागणी करु शकतात.मराठा आरक्षण ह्या न्यायानं त्यांचीही मागणी ह्या कनवाळू सरकारनं मान्य करायलाच हवी...असा ह्यांचा आक्रमक आग्रह असेल.ह्या अन्य जाती आपल्या गटात येऊ नये म्हणून दलीत किंवा त्या प्रकारच्या जाती प्रयत्न करु लागलीत.आरक्षणाची मागणी मान्य करुन घेण्याकरता कशा प्रकारचा मार्ग स्विकारला पाहिजे ह्याचा पॅटर्न गुज्जर समाजानं या देशात घालून दिलाचं आहे.महाराष्ट्रतले नेत तसेच त्यांच्या अनुयायी हे पहिल्यापासूनच देशात सर्वात जास्त प्रगत असल्यानं गुज्जर पॅटर्न पेक्षा आणखी हिंस्त्र,आणखी खूनशी आणि देश तोडण्यासाठी प्रयत्न करणारे विषारी कृती कार्यक्रम अतिशय नियोजीत पद्धतीनं राबवतील ही शक्यता नाकरता येत नाही.
खर तरं या देशातल्या प्रत्येक समाजात ज्याला मराठाही अपवाद नाहीत सत्तेची विकासाची फळं काही ठरावीक वर्गानं आणि ठारावीक कुटूंबीयांनीच चाखली आहेत हे सत्य आहे.मराठा समाजतही बेकारी,दारिद्र्य आणि न्यूनगंडानं पछाडलेल्या व्यक्तींची समस्या मोठी आहे,(याच वैफल्यग्रस्त तरुणांच्या मनगटाच्या जोरावर मराठा समाजातल्या डझनभर संघटनांची दुकानं सूरु आहेत ) पुण्यातल्या भांडरकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सारखी जागतिक किर्तीची संस्था ह्याच वैफल्यग्रस्त तरुणांना हाताशी धरुन ह्या समाजतल्या स्वार्थी नेत्यांनी फोडली होती.आज खरी गरज आहे ह्या वैफल्यग्रस्त समाजाची जखम भरुन
काढण्याची गरज आहे.मराठाचं नाही तर देशातल्या अनेक समाज घटकांना आरक्षणाच्या कूबड्या देण्यापेक्षा त्यांना शैक्षणीक तसंच आर्थिकदृष्ट्य़ा स्वावलंबी बनवण्याकरता सर्वांनी प्रयत्न करायला हवा.
औरंगजेबसारख्या धर्माँध,परकीय जूलमी अशा मोगल सम्राटाची कबर खणणारी मराठा ही जात आहे. परकीय शक्तीपासून दिल्लीचं संरक्षण करणारी जात मराठा आहे. परकीय शक्तींच्या जूलमी टाचांखाली आपला देश भरडला जाऊ नये म्हणून महाराष्ट्रपासून कित्येक किलोमीटरदूर पाणीपतच्या लढाईत सर्वस्वाची होळी करुन घेणा-या पराक्रमी देशअभिमानी सैनीकांची जात म्हणजे मराठा...महाराष्ट्राच्या शौर्याचे,दरा-याचे,राकटपणाचे,कणखरतेचे आणि जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक म्हणजे मराठा...
गेल्या पन्नास वर्षात स्वार्थी राजकारण्यांच्या नादी लागून ह्या समाजतली जनता आता वाहवंत चाललीय. हा समाज असाच वाहवंत गेला तर संपूर्ण महाराष्ट्राची गटारगंगा होऊ शकते.
इंग्रजांच्या अधुनीक आव्हानांचा सामना करण्याकरता आवश्यक ते कौशल्य मराठे शिकले नाहीत..केवळ भाऊबंदीकमध्येच मग्न राहिले,म्हणून त्यांचा पराभव झाला.पर्यायाने सा-या देशाला 150 वर्षे पारतंत्र्य सहन करावं लागलं.गेल्या 60 वर्षात वेगवेगळ्या समस्यांवर मात करुन विकासाच्या मार्गावर वाटचाल करत महासत्ता होण्याचा प्रयत्न भारत करतोय.मात्र दहशतवाद आणि या दहशतवादाला थारा देणा-या पाकिस्तान सारख्या शक्तींमुळे देशासमोर सर्वात गंभीर धोका निर्माण झालाय.अशा परिस्थीत देश मजबूत करण्याकरता प्रयत्न करण्याऐवजी ह्या समाज आरक्षणाची मागणी करु लागलाय. निवडणुकीतला तात्कालीन स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी मराठे नेते त्याला खतपाणी घालत आहेत.
1818 च्या पराभावाला आता 190 वर्षे झाली तरीही मराठा समाज आणि त्याचे नेते काहीच शिकत नाहीत.त्याच चूका पून्हा पून्हा करत राहतात..हे या संपूर्ण देशाचे दुर्दैवच मानलं पाहीजे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...