Tuesday, November 4, 2008

सलाम ' जम्बो '


गेली अठरा वर्षे भारतीय गोलंदाजीचा भार पेलणारा अनिल कुंबळे आता निवृत्त झालाय. नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदान कुंबळेसाठी नेहमीच लकी ठरलंय...याच मैदानावर झालेल्या इराणी चषकाच्या सामन्यातल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कुंबळेनं 1990 साली इंग्लंड दौ-यात जाणा-या भारतीय संघात स्थान मिळवलं होतं...1999 साली याच मैदानावर त्यानं पाकिस्तान विरुद्ध एकाच डावात विकेटस घेण्याचा विश्वविक्रम केला... याच मैदानावर च्यानं 7 कसोटीत तब्बल 58 विकेटस घेतलेत.त्याच मैदानावर कुंबळेनं निवृत्ती जाहीर केली,तेंव्हा आपल्या लाडक्या गोलंदाजाला निरोप देताना कोटलाची खेळपट्टीही हेलावली असेल.
भारतीय संघाला दर्जेदार फिरकी गोलंदाजांची परंपरा लाभलीय.बेदी-प्रसन्ना-चंद्रशेखर या फिरकी त्रयीनं 1970 चं दशक गाजवलं.तोच महान वारसा कुंबळेनं गेली अठरा वर्षे नुसता सांभळला नाही तर एका उत्तूंग शिखरावर उंचीवर नेऊन ठेवला.कसोटी क्रिकेटमध्ये 619 ,आणि वनडेमध्ये 337 विकेटस त्यानं मिळवलेत.मात्र केवळ ही आकडेवारी त्याला महान बनवत नाही....
कुंबळेचं मोठेपण आहे त्याच्या मॅचविनींग बॉलींगमध्ये..अनिल कुंबळेनं खेळलेल्या 43 कसोटीत भारत जिंकलाय... केवळ भारताचा नाही तर क्रिकेट जगतामधला महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो कपील देव संघात असताना भारतानं जिंकलेल्या कसोटींची संख्या आहे 24. एवढचं नाही तर सुनील गावस्कर.सचिन तेंडूलकर या दिग्गज खेळाडूंच्ही विजयी सरासरी कुंबळेपेक्षा कमी आहे.त्याचे चेंडू वेगवेगळ्या कोनात वळत नसतील मात्र फलंदाजांना गोंधळात टाकणार टॉपस्पिन हे त्याचं अस्त्र होत.या टॉपस्पिनला जोड होती ती फ्लिपर आणि खास जम्बो स्पेशल गुगलीची...या अचूक अस्त्रातच्या जोरावर त्यानं गेली अठरा वर्षे टिच्चून गोलंदाजी केली. खेळपट्टीवरील एखाद्या अचूक टप्यावर त्यानं केलेली दिवसभर गोलंदाजी करोडो भारतीयांनी अनेकदा पाहिली आहे. त्याच्या याच जिद्दीमुळे त्यानं केवळ दिल्ली,कोलकत्ता,चेन्नई नाही तर मुलतान,ओव्हल आणि अगदी पर्थमध्येही यश मिळवलंय.उलट वेगवान गोलंदाजांना साथ देणा-या खेळपट्यावर चेंडू बाऊन्स करु शकणारा कदाचित तो एकमेव फिरकी गोलंदाज असावा....
एक महान गोलंदाज हीच केवळ त्याची ओळख नाही..तर एक झुंजार खेळाडू म्हणूनही कुंबळे कायम सा-यांच्या लक्षात राहील.एण्टीगा कसोटीत जबडा फाटल्यानंतरही त्यानं नुसतीच गोलंदाजी केली नाही तर ब्रायन लाराला बादही केलं..कोणताही क्रिकेट रसिक त्याची ही आठवण कधी विसरेल असं मला वाटत नाही. इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटीत त्यानं वयाच्या 37 व्या वर्षी शतक झळकावलं.अगदी त्याच्या शेवटच्या कसोटीतही हाताला अकरा टाके पडले असताना हा लढवय्या खेळाडू मैदानात उतरला आणि त्यानं तीन विकेटस घेतल्या..
भारतीय संघासाठी फक्त 100 नाही तर 1000 टक्के योगदान देणा-या या खेळाडूवर या देशानं मात्र नेहमी अन्यायचं केला...अगदी वन मॅच वंडर म्हणून त्याची हेटाळणी केली गेली. सचिन तेंडूलकरनंतर योग्यता असूनही कर्णधारपद त्याला मिळालं नाही.सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या त्याच्यासाठी ज्यूनीयर असलेल्या खेळाडूंच्या नंतर अगदी नाईलाज म्हणून किंवा तात्पूरती सोय म्हणून त्याला कसोटी संघाचं कर्णधार बनवण्यात आला. अगदी या ऑस्ट्रेलिया दौ-यातही ' कब तक कुंबले ?'सारख्या प्रश्नांचा त्याला सामना करावा लागला..मात्र या सा-याची पर्वा न करता सर्वस्व ओतून त्यानं गोलंदाजी केली.आपली केवळ शारिरीक नाही तर मानसिक उंचीही अन्य खेळाडूंपेक्षा मोठी असल्याचं त्यानं वारंवार दाखवून दिलंय...
टिम इंडीयाला नं. 1 बनवनं हेच कुंबळेचं स्वप्न होत.संघासाठी संपूर्ण योगदान देणारा खेळाडू अशीच आपली ओळख राहावी ही इच्छा त्यानं आपल्या निवृत्तीच्यावेळी बोलून दाखवली...व्यवसाय़ीक क्रिकेटच्या सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कुंबळे सारखी वृत्ती जोपसणारे खेळाडू आता विरळ होत चाललेत.
'जंटलमन्स गेम ' ही क्रिकेटची ओळख जपणा-या या जिगरबाज जम्बोला कोटी,कोटी सलाम !

1 comment:

krishnat said...

I read ur blog. i like. tuze spor knowldge changle ahe. mast lihale ahes.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...