Saturday, November 29, 2008

मुंबई 26/11...


मुंबईसह सा-या देशाला 59 तास वेठीस धरणारा दहशतवाद्यांचा नंगानाच आता संपलाय.देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा चिंधड्या उडवणा-या या घटनेचे अनेक कंगोरे येणा-या काही दिवसात पुढं येतील.मात्र या घटनेतून तीन महत्वाच्या गोष्टी समोर येतायत.
यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या संपुर्णपणे चिंधड्या उडाल्या हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.यापुर्वीही कारगील युद्ध किंवा संसदेवरच्या हल्ल्याच्या प्रसंगीही ही गोष्ट समोर आली होती.या दारुण नामुष्कीनंतर वास्ताविक गुप्तचर यंत्रणेनं सावध राहयला हवं होत.मात्र तरीही ही यंत्रणा बेफीकीर राहीली.मुंबईच्या या ताज्या हल्ल्यानंतरतर आपल्या देशाची यंत्रणा जगातली सर्वात खराब गुप्तचर यंत्रणा आहे हेच सिद्ध झालंय.देशातली प्रत्येक इमारत आणि प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणं जगातल्या कोणत्याही पोलीस यंत्रणेला शक्य नाही.कोणत्याही दहशतवादाचा सामना हा गुप्तचर यंत्रणेच्या साह्यानंच केला जातो.आपली यंत्रणा याबाबत संपुर्णपणे झोपलेली होती.हे सर्व दोन डझन अतिरेकी बोटीनं भारतामध्ये आले.मुंबईमधल्या आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोचले.या संपुर्ण स्थळांची माहिती त्यांच्याकडं होती.या सर्व दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण या शहराचे स्थानिक नागरिक होते.त्यांच्या या कार्याला अनेक जगभरातल्या अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत केली गेली,मात्र याचा पत्ता गुप्तचर यंत्रणेला लागला नाही.हे सर्व दहशतवादी बिनभोबाटपणे शहरात घुसले.त्यांना हव्या त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं आणि ठार मारलं.गेले अनेक दिवस वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड पकडले गेले हा भारतीय सुरक्षा यंत्रणेचा दावा किती बिनबूडाचा होता हेच यातून सिद्ध झालंय.
यामधून समोर आलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर चाललेला जिहाद दहशतवाद्यांनी भारतीय भूमीवरही पुढं सुरु ठेवला.ह्या पूर्वीच्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरुन मदत केली जायचे.त्यांच्या घातपातामागची कारणंही स्थानिक होती.(गुजरात दंगल, बाबरी ढाचा पाडणं इ...)मात्र या दहशतवाद्यांचे लक्ष्य वेगळं होत.अमेरिकन ब्रिटीश आणि इस्त्रायल ही दूष्ट राष्ट्रांची नागरिक हेच त्यांचं मुख्य टार्गेट होतं.ताज.ओबेरॉय किंवा नरिमन हाऊस ह्या वास्तू त्यांनी ताब्यात घेतल्या.ह्याचही हेच कारण होतं.धर्माची अफूची गोळी घेऊन जीवावर उदार झालेले हे संतप्त तरुण नव्हते.तर हे तरुण जागतिक दर्जाचे व्यवसायिक दहशतवादी होते.दहशतवादांच्या जागतिक युद्धात आता भारताची जमीनही वापरली जाणार ही गोष्ट या प्रकरणातून समोर आलीय.
या प्रकरणातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा भारताच्या आर्थिक साम्राज्यावरचा हल्ला आहे.अमेरिकेवर 9/11ला झालेल्या या हल्ल्याशीच याची तुलना करावी लागेल.अल कायदानं वर्ल्ड ट्रेड सेंटर निवडलं कारण त्यांना अमेरिकेच्या आर्थिक गंडस्थळावर हल्ला करायचा होता.सा-या अमेरिकेची शान असलेली वास्तू त्यांनी उडवून लावली.या देशात कोणताच अमेरिकी नागरिक सुरक्षित नाही ही भिती त्यांना अमेरिक नागरिकांच्या मनात निर्माण करायची होती. नेमकी हीच भिती सर्व भारतीयांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून अतिरेक्यांनी यंदाच्या हल्ल्याची ठिकाणं निवडली आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतली सर्वात क्रिम समजले जाणारी हॉटेल त्यांनी निवडली.दक्षिण मुंबई हा मुंबईतलाच नाही तर सा-या देशातला सर्वात सुरक्षित भाग समजला जातो.ताज आणि ओबेरॉयमध्ये येणारा व्यक्ती हा देशातला सर्वात उच्चभ्रू समाजातलाच असतो.जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसंच बॅंकांची मुख्यालंय या इमारतीमध्ये आहेत. या इमारतींना वेठीस धरुन अतिरेक्यांनी सा-या देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाच जबरी हादरा दिलाय.विकसीत भारताची स्वप्न देशांनी ज्या व्यक्तींच्या,संस्थेच्या जोरावर पाहिली होती,त्या नव्या युगाच्या स्वप्नांना या अतिरेकी हल्ल्यानं तडा दिलाय.दहशतवादाच्या 59 तास चाललेल्या नंग्यानाचानंतर या तीन महत्वाच्या बाबी समोर आल्यात.
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही शक्ती आहे.या देशाला हाजारो वर्षांचा सांस्कृतीक इतिहास आहे.या देशाच्या लष्करी शक्तीचा सा-या जगात दरारा आहे.या देशाच्या आर्थिक शक्तीची सा-यांनाच आदरयुक्त जाणीव आहे.या महान भारत वर्षावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.अगदी बगदादमध्ये गेला महिनाभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईपेक्षा कमी नागरिक मारले गेलेत. सा-या देशासाठी या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते.
अशा प्रकारचे हल्ले अमेरिका,ब्रिटनवर यापुर्वी झालेत.मात्र या देशांनी या हल्ल्यानंतर धडा घेतलाय.9/11 नंतर अमेरिकेनं जागतिक दबाबवाला बळी न पडता ( तसंच मानवअधिकार आयोगाच्या थयथयाटाकडं दुर्लक्ष करतं ) आपली संरक्षण व्यवस्था भक्कम केलीय.त्यामुळेच दहशतवाद्यांना आता अमेरिकेऐवजी भारतासारखी 'सॉफ्ट टार्गेट' निवडावी लागत आहेत. भारतावर अशा प्रकारचा हल्ला होणार आणि त्या हल्ल्याला पाकिस्तानचे मदत मिळणार याची माहिती आपल्याला होती.तरीही आपलं सरकार गाफील राहील,त्याचे परिणाम आज शंभर कोटींचा देश भोगतोय.
आताही केंद्र सरकारनी अनेक आश्वासनं दिली आहेत मात्र आता आपल्याला आश्वासनं नको कृती हवी आहे.नुसती सैन्याची जमवाजमव नकोय तर या देश तोडणा-या परकीय शक्तीं विरुद्ध आर पारची लढई हवी आहे...


Wednesday, November 19, 2008

इंदिरा आणि भारत !


19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही.याच दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस असतो.माझ्या आयुष्यातल्या आजवरच्या आणि यापुढच्या आयुष्यातही बाबांचा प्रभाव कायम राहील.मात्र स्वत:विषयी लिहण्यासाठी मी हा ब्लॉग वापरणार नाही.हे मी पुर्वीच ठरवलंय.त्यामुळे 19 नोव्हेंबरचं माझ्या देशासाठी आजच्या दिवसाचं असलेल्या महत्वाविषयी मी आज लिहणार आहे.

19 नोव्हेंबर हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा जन्मदिवस.भारताच्या आजवरच्या सर्वात खंबीर पंतप्रधान म्हणून त्यांच नाव आजही अनेकवेळा घेतलं जातं. 1966 साली तडजोडीच्या उमेदवार म्हणून त्या पंतप्रधान बनल्या. त्या काळी आणि (अगदी आजही) कॉँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक दिग्गज नावं शर्यतीमध्ये होते.मात्र या सा-यांना दूर सारुन पंतप्रधान पद त्यांच्याकड चालत आलं (यानंतर अशाच अगदी अनेपेक्षीतपणे 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहरावांकडे पंतप्रधान बनले) मात्र आपण गंगी गुडीया नाही हे त्यांनी नंतरच्या काळात वारंवार सिद्ध केलं.

मोरराजी देसाईंच्या नेतृत्वाखालील दिग्गज कॉँग्रेस नेत्यांचा त्यांना विरोध होता.याच वादामुळे 1969 च्या बंगलोर (आत्ताच बंगळूरु) अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली.पंडित नेहरुंनी रंगवलेल्या स्वप्नामधून भारतीय बाहेर पडत होते.बंगाल,पंजाब,तामिळनाडू सारख्या महत्वाच्या राज्यात कॉँग्रेस पराभूत झाली होती. जनसंघ,समाजवादी, कम्युनिस्ट यासारखे कॉँग्रेस विरोधी पक्ष सांसदीय राजकारणात बाळसं धरु लागले होते. चीन आणि पाकिस्तान यांच्याशी झालेल्या युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.अन्नधान्यांच्या बाबतीत अमेरिकन मदतीवर देशाला अवलंबून राहवं लागयंच या सा-या आव्हानात्मक परिस्थीतीमध्ये वयाच्या 49 व्या वर्षी 1966 साली इंदिराजींना पंतप्रधानांची शपथ घेतली.एखादी सामान्य राजकरणी या ओझ्यामुळं दबून गेली असती.मात्र इंदिराजी सामान्य कधीच नव्हत्या.या सा-या दबावात्मक परिस्थितीमध्ये उसळी मारण्याची क्षमता त्यांच्यात होती.इंदिराजींनी मारलेल्या उसळीनंतर देशातल्याच नाही तर जगभरातल्या अनेक शक्ती गाडल्या गेल्या.

त्यांनी 1969 साली 14 प्रमुख बॅंकाच राष्ट्रीयकरण केलं.या निर्णयाला मोराराजींसह अनेकांचा मोठा विरोध होता.मात्र आज जागतिक मंदीच्या काळातही भारतीयांचा राष्ट्रीय बॅंकावरचा विश्वास जराही कमी झालेला नाही.राष्ट्रीयकरणाच्या जवळपास चार दशकानंतर इंदिरांजींच्या या निर्णयाचं महत्व तितकचं परिणामकारकरित्या पटतंय..अन्नधान्या समस्येवर मात करण्याकरता इंदिराजींच्याच काळात हरीतक्रांतीला चालना देण्यात आली.कृषी विषयक वेगवेगळे संशोधन प्रकल्प उभारणे,रासायनिक खतांचा वापर करुन जमीनीची उत्पादन क्षमता वाढवणे यासारखे वेगवेगळे प्रयोग या काळात राबवले गेले.आज शंभर कोंटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा महान भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे याचं श्रेय याच हरितक्रांती योजनेला आहे.इंदिरांजींनी जगाचा केवळ इतिहास नाही तर भूगोल हबदलवला.पूर्व पाकिस्तानमधल्या लोंढ्यांचा भारतावर पडणारा ताण त्यांनी सहन केला नाही.पाकिस्तानला पोकळ इशारे दिले नाहीत,अथवा जागतीक समुदायाकडं मदतीची फारशी याचना केली नाही.तर देशाच्या लष्कराचा योग्य वापर करुन त्यांनी पाकिस्तानची फाळणी करुन बांगलादेश निर्माण केला...अमेरिका आणि चीन या पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांच्या अगदी नाकावर टिच्चून भारतानं हा विजय मिळवला होता. जनरल सॅम मानेकशा यांच्या खंबीर युद्ध सेनापती बरोबरच इंदिराजींच्या पोलादी नेतृत्वाला या यशाचं सार श्रेय द्यावं लागेल.याच पोलादी नेतृत्वामुळे बंदूकीची कोणतीही गोळी न झाडता सिक्किमचे भारतामध्ये विलीनीकरण झाले.याच कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का देत भारतानं 1974 साली पोखरणमध्ये अणूचाचणी केली.भारत अण्वस्त्रधारी देश बनला.देशाच्या इतिहासात कालालीत बदल घडवणा-या या सा-या इष्ट घटनांमध्ये इंदिराजींचा वाटा सिंहाचा होता हे मान्यचं कराव लागेल.

ह्या झाल्या इंदिराजींच्या सर्व जमेच्या बाजू.मात्र एक या सर्वात खंबीर पंतप्रधानांच खर्चाचं खातंही तेवढंच भक्कम आहे.कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्यच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.आज भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.

इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.
राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमेड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.राजकीय महत्वकांक्षेचा टोकाचा हव्यास इंदिरांजीनी टाळला असता तर हा कटू निर्णय त्यांना घ्यावा लागला असता का याचं उत्तर मला अजुनही सापडलेलं नाही....(तुमच्याकडं असेल तर मला नक्की कळवा.)

आज इंदिराजींच्या मृत्यूला 24 वर्षे झालीत.त्यांच्या हत्येनंतर लहाणची मोठी झालेली 'यंग इंडिया' 21 व्या शतकाचं आव्हान पेलण्यास तयार झालीय.मात्र आजही किंवा या नंतरही पाकिस्तान,दहशतवाद,आर्थिक आणि कृषीविषयक प्रश्वांनाचा विचार करताना इंदिरांजींच्या या क्षेत्रातल्या कामगिरीला विसरता येणार नाही. अगदी ज्या प्रमाणे कालचा,आजचा, आणि अगदी उद्याचा माझा शोध घेणा-या मला माझ्या आयुष्यावरचा माझ्या बाबांचा प्रभाव कधीच पुसता येणार नाही.

माझं आयुष्य आणि माझा देश याचा विचार करत असताना 19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही ते याकरताच....

Tuesday, November 11, 2008

ओबामांची अमेरिका


बराक हुसेन ओबामा हे वादळ आता सा-या जगावर धडकायला सज्ज झालंय.ज्या अमेरिकेला वंशवाद,गुलामगिरी आणि वर्णभेदाचा मोठा इतिहास आहे त्या देशात बराक हुसेन ओबामा या सारख्या चमत्कारीक नावाचा अमेरिकन आफ्रिकन अध्यक्ष होणं ही एक क्रांतीकारक घटना आहे.फक्त बारा वर्षीपूर्वी प्रचलित राजकारणात उतरलेल्या ओबामांनी अमेरिकेमधले सर्वशक्तीमान पद काबीज केलंय.तेही प्रस्थापित व्वस्थेचा भाग बनत,समन्वयवादी भूमीकेतून (कोणतेही जातीय अथवा आर्थिक आरक्षण न घेता किंवा 'अल्पसंख्याक' कार्ड न वापरता...)

अमेरिकेच्या 44 व्या अध्यक्षपदासाठी झालेली निवडणुक हीच मुळात मोठी ऐतिहासीक होती.आठ वर्षाच्या बुशशाहीचा शेवट यंदा होणार हे नक्की होतं..बुश यांच्या पक्षानं जॉन मॅकेन यांना झटपट उमेदवारी जाहीर केली.मात्र डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळवण्याकरता ओबामांना मोठा संघर्ष करावा लागला.हिलरी क्लिंटन सारख्या हाय प्रोफाईल उमेदवाराशी त्यांची फाईट विलक्षण रंगली.या निवडणुकीत हिलरीबाजी मारणार हा सा-यांचा होरा चुकवत ओबामांनी बाजी मारली.डेमॉक्रेटीक पक्षाच्या निवडणुकीत ओबामांनी हिलरीचा पराभव करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं तिकीट मिळवलं. 232 वर्षांच्या अमेरिकन लोकशाहीत प्रथमच एखादा ब्लॅक उमेदवार अध्यक्षपदाचा प्रमुख उमेदवार बनला होता.

बुश यांच्या कारभाराला त्रासलेल्या अमेरिकन जनतेला नवा चेंज हवा होता.बुश अध्यक्ष बनताच वर्षभराच्या आतंच वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.ह्या हल्ल्याचे निमीत्त साधून युद्धपिपासू बुश प्रशासनानं प्रथम अफगाणिस्तान आणि नंतर इराक बेचीराख केलं.या दोन्ही देशात लक्षावधी लोकं मारले गेले.सद्दाम हुसेन यांना फासावर चढवण्यात आलं.इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे कठपूतळी सराकार स्थापन करण्यात आले.मात्र तरीही अमेरिकेला या युद्धात विजय मिळाला नाही. खनिज तेलावर संपूर्ण ताबा मिळवण्याचं अमेरिकन ड्रीम भंग पावलंय. उलट इराकमध्ये रोज मरणारं सैन्य परत बोलवण्याकरता कोणतं कारण तयार करायचं हा प्रश्न आज अमेरिकेपुढ पडलाय.खनिज तेलाच्या किंमती वाढल्यामुळे निर्माण झालेल्या चलनवाढीचा मोठा फटका अमेरिकन अर्थव्यवस्थेला बसलाय.1929 नंतरच्या सर्वात मोट्या अमेरिकन महामंदीला आज अमेरिकाच नाही तर सारं जगं सामोरं जातंय..या सर्व परिस्थिनं गांजलेल्या अमेरिकन जनतेला म्हणबनच यंदा चेंज हवा होता.

मात्र एवढा क्रांतीकारी चेंज अमेरिकन नागरिक स्विकारतील का खरचं मोठा प्रश्न होता.केनियामध्ये जन्मलेला,इंडोनेशीयात बालपण घालवलेल्या बराक ओबामा या 47 वर्षाचे बराक हुसेन ओबामा यांच्या उमेदवारीनं सा-या अमेरिकन नागरिकांना मोठ्या कसोटीवर आणले होते.मात्र या कसोटीमधून अमेरिकन जनता यशस्वीपणे बाहेर पडलीय.अमेरिकेत काहीही अशक्य नाही या ओबांमांच्या विश्वासाला या निवडणुकीत अमेरिकेनं पावती दिलीय.अब्रामह लिंकन,मार्टीन ल्यूथर किंग यांच्या विचारांना आज 21 व्या शतकातल्या भांडवलवादी अमेरिकन्सनं प्रत्यक्षात आणलंय.मध्यमवर्ग आणि युवक या राजकारणामध्ये सहसा लक्ष न घालणा-या समाज घटकांनी यंदा प्रथमच ओबामांना भरभरुन मतदान केलंय.या अमेरिकन निवडणुकीतला हाही एक मोठा बदल आहे.

ओबामांच्या या विजयाचा भारतीय दृष्टीकोणातून अभ्यास करताना मला काही वेगळेच प्रश्न पडलेत. धर्म,वर्ण यांच्या पलीकडं जातं ओबांमानी अमेरिका काबीज केलीय.मात्र भारतीय राजकारण्यांची अस्मिता देशावरुन प्रदेशाकडं प्रदेशावरुन विभागाकडं केंद्रीत होत चाललीय.गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या आसेतु हिमाचल भारतवर्षावर गारुड करु शकेल असा एकही नेता आज दिसत नाही.उलट राजकीय नेते मी पाटण्याचा,मी मुंबईचा ,मी चेन्नईचा या सारख्या विचारांनी देशाच्या एकात्मतेला वारंवार आव्हान देत आहेत.या सारख्या परिस्थीतीमध्ये आधी देश मग प्रदेश असा विचार करणारा नेता भारताला कधी मिळणार हा प्रश्न मला सतावतोय.

अमेरिचे सतत अंधानुकरण करणारे भारतीय युवक ओबामांच्या विजयांचे अनुकरण करणार का ? YES WE CAN ची भारतीय आवृत्ती कधी अनुभवयाला मिळेल याचीच वाट मी सध्या पाहतोय...


Tuesday, November 4, 2008

सलाम ' जम्बो '


गेली अठरा वर्षे भारतीय गोलंदाजीचा भार पेलणारा अनिल कुंबळे आता निवृत्त झालाय. नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदान कुंबळेसाठी नेहमीच लकी ठरलंय...याच मैदानावर झालेल्या इराणी चषकाच्या सामन्यातल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कुंबळेनं 1990 साली इंग्लंड दौ-यात जाणा-या भारतीय संघात स्थान मिळवलं होतं...1999 साली याच मैदानावर त्यानं पाकिस्तान विरुद्ध एकाच डावात विकेटस घेण्याचा विश्वविक्रम केला... याच मैदानावर च्यानं 7 कसोटीत तब्बल 58 विकेटस घेतलेत.त्याच मैदानावर कुंबळेनं निवृत्ती जाहीर केली,तेंव्हा आपल्या लाडक्या गोलंदाजाला निरोप देताना कोटलाची खेळपट्टीही हेलावली असेल.
भारतीय संघाला दर्जेदार फिरकी गोलंदाजांची परंपरा लाभलीय.बेदी-प्रसन्ना-चंद्रशेखर या फिरकी त्रयीनं 1970 चं दशक गाजवलं.तोच महान वारसा कुंबळेनं गेली अठरा वर्षे नुसता सांभळला नाही तर एका उत्तूंग शिखरावर उंचीवर नेऊन ठेवला.कसोटी क्रिकेटमध्ये 619 ,आणि वनडेमध्ये 337 विकेटस त्यानं मिळवलेत.मात्र केवळ ही आकडेवारी त्याला महान बनवत नाही....
कुंबळेचं मोठेपण आहे त्याच्या मॅचविनींग बॉलींगमध्ये..अनिल कुंबळेनं खेळलेल्या 43 कसोटीत भारत जिंकलाय... केवळ भारताचा नाही तर क्रिकेट जगतामधला महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो कपील देव संघात असताना भारतानं जिंकलेल्या कसोटींची संख्या आहे 24. एवढचं नाही तर सुनील गावस्कर.सचिन तेंडूलकर या दिग्गज खेळाडूंच्ही विजयी सरासरी कुंबळेपेक्षा कमी आहे.त्याचे चेंडू वेगवेगळ्या कोनात वळत नसतील मात्र फलंदाजांना गोंधळात टाकणार टॉपस्पिन हे त्याचं अस्त्र होत.या टॉपस्पिनला जोड होती ती फ्लिपर आणि खास जम्बो स्पेशल गुगलीची...या अचूक अस्त्रातच्या जोरावर त्यानं गेली अठरा वर्षे टिच्चून गोलंदाजी केली. खेळपट्टीवरील एखाद्या अचूक टप्यावर त्यानं केलेली दिवसभर गोलंदाजी करोडो भारतीयांनी अनेकदा पाहिली आहे. त्याच्या याच जिद्दीमुळे त्यानं केवळ दिल्ली,कोलकत्ता,चेन्नई नाही तर मुलतान,ओव्हल आणि अगदी पर्थमध्येही यश मिळवलंय.उलट वेगवान गोलंदाजांना साथ देणा-या खेळपट्यावर चेंडू बाऊन्स करु शकणारा कदाचित तो एकमेव फिरकी गोलंदाज असावा....
एक महान गोलंदाज हीच केवळ त्याची ओळख नाही..तर एक झुंजार खेळाडू म्हणूनही कुंबळे कायम सा-यांच्या लक्षात राहील.एण्टीगा कसोटीत जबडा फाटल्यानंतरही त्यानं नुसतीच गोलंदाजी केली नाही तर ब्रायन लाराला बादही केलं..कोणताही क्रिकेट रसिक त्याची ही आठवण कधी विसरेल असं मला वाटत नाही. इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटीत त्यानं वयाच्या 37 व्या वर्षी शतक झळकावलं.अगदी त्याच्या शेवटच्या कसोटीतही हाताला अकरा टाके पडले असताना हा लढवय्या खेळाडू मैदानात उतरला आणि त्यानं तीन विकेटस घेतल्या..
भारतीय संघासाठी फक्त 100 नाही तर 1000 टक्के योगदान देणा-या या खेळाडूवर या देशानं मात्र नेहमी अन्यायचं केला...अगदी वन मॅच वंडर म्हणून त्याची हेटाळणी केली गेली. सचिन तेंडूलकरनंतर योग्यता असूनही कर्णधारपद त्याला मिळालं नाही.सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या त्याच्यासाठी ज्यूनीयर असलेल्या खेळाडूंच्या नंतर अगदी नाईलाज म्हणून किंवा तात्पूरती सोय म्हणून त्याला कसोटी संघाचं कर्णधार बनवण्यात आला. अगदी या ऑस्ट्रेलिया दौ-यातही ' कब तक कुंबले ?'सारख्या प्रश्नांचा त्याला सामना करावा लागला..मात्र या सा-याची पर्वा न करता सर्वस्व ओतून त्यानं गोलंदाजी केली.आपली केवळ शारिरीक नाही तर मानसिक उंचीही अन्य खेळाडूंपेक्षा मोठी असल्याचं त्यानं वारंवार दाखवून दिलंय...
टिम इंडीयाला नं. 1 बनवनं हेच कुंबळेचं स्वप्न होत.संघासाठी संपूर्ण योगदान देणारा खेळाडू अशीच आपली ओळख राहावी ही इच्छा त्यानं आपल्या निवृत्तीच्यावेळी बोलून दाखवली...व्यवसाय़ीक क्रिकेटच्या सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कुंबळे सारखी वृत्ती जोपसणारे खेळाडू आता विरळ होत चाललेत.
'जंटलमन्स गेम ' ही क्रिकेटची ओळख जपणा-या या जिगरबाज जम्बोला कोटी,कोटी सलाम !

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...