Wednesday, October 22, 2008

देश दुभंगणारे ' राज ' कारण


राज ठाकरे यांनी घडवलेल्या एका अराजक नाट्याचा अंक नुकताच संपलाय.गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहण्याची सवय (की नशा ?) त्यांना जडलीय.कधी ते अमिताभ बच्चनला महाराष्ट्रात उपरे ठरवतात,कधी बाळासाहेबांसाठी संसदेचा अनादर करतात,तर कधी जेट कर्मचा-यांच्या आंदोलनात स्वत:ची पाठ थोपटून घेतात.महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत ' मराठी खतरेमें ' असा नारा देत पर्यायी सरकार'राज'तयार करण्याची त्यांचा सध्या प्रयत्न सुरु आहे.
सध्या राज ठाकरेंना नवीन निमीत्त मिळालं ते रेल्वे भरतीच्या परीक्षेच..यापुर्वीही त्यांनी शिवसेनेत असताना ही परीक्षा उधळून लावली होती.राज यांच्या या आक्रमणामुळे शिवसेनाला मी मुंबईकर ही मोहीम आवरती घ्यावी लागली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि परिसरात याच मोठा फटका सेनेला बसला.आता राजनी सेना सोडलीय, मात्र त्यांचा पीळ अजूनही कायम आहे हेच यातून दिसून आलंय.राज यांच्या या आंदोलनाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले.तीन जणांचा बळी गेला.शेकडो बसेस,गाड्या फुटल्या.ऐन दिवाळीच्या हंगामावर जे आर्थिक नुकसान मुंबईसह सा-या राज्याला,देशाला सहन करावं लागलं ते वेगळंच.
राज ठाकरेंच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तर त्यांनी निर्माण केलेल्या राजमार्गावरचा फोलपणा लक्षात येतो.बाळासाहेबांची प्रतिमा म्हणून ते सेनेत पुढं आले.ठाकरे या आडनावाचं सारं ग्लॅमर त्यांना जन्मल्यापासून मिळतंय.मात्र ज्यांनी त्यांना नाव दिलं,सन्मान दिला,प्रतिष्ठा दिली तोच त्यांचा 'विठ्ठल' अडचणीत असताना त्यांनी केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षा पूर्ण करण्याकरता शिवसेना सोडली.फाटापूट या मराठी माणसाला लागलेल्या जुन्या दोषांपासून तेही वेगळे नाहीत हेच यावेळी दिसून आलं.
मनसे निर्माण केल्यानंतर त्यांनी नवनिर्माणाच्या गोष्टी भरपूर केल्या आहेत.मात्र सेनेच्या चाळीस वर्षापूर्वीच्या कॅसटमधूनच त्यांचा नवनिर्माणाचा राग बाहेर पडतोय. परस्परांमध्ये वेगवेगळ्या द्वेषांची भिंत उभी करणा-या या मराठी माणसांवर भाषीक द्वेषाची नवी चादर लपटण्याचा प्रयत्न ते करतायत.ज्या तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ते तरुण देशामधल्या गरीब राज्यामधून आले होते.जातीभेद,लिंगभेद,शैक्षणीक विषमता असणा-या या प्रदेशातून हे सारे तरुण मुंबईत भावी आयुष्य घडवणारी परीक्षा देण्यास आले होते.मात्र त्यांच्या या स्वप्नांना तडा देण्याचं काम मनसैनिकांनी केलं. या आंदोलनानंतर या राज्यातल्या नागरिकांच्या मनात महाराष्ट्रविषयी अढी निर्माण झाली तर याला जवाबदार कोण ? केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षेनी झपाटलेल्या राज यांनी सा-या राज्यात अराजक माजवलंय.ज्या राज्यकर्त्यांनी याला वेसण घालणं आवश्यक आहे ते तर केवळ मतांचा हिशेब करत काम करतायतं.
मनसेची स्थापना झाल्यापासून आघाडी सरकारचा राजबद्दलचा दृष्टीकोण मवाळ झालाय.शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याकरताचं ते या राज सेनेचा वापर करतायत.मुंबई,पुणे नाशिक या राज्याच्या सुवर्ण त्रिकोण समजल्या जाणा-या पट्यात विधानसभेच्या 100 जागा येतात.या भागात राज यांचा प्रभाव आता जाणवण्याइतपत वाढलाय. एकिकडं राज मराठी माणसांची मतं फोडतील अशी व्यवस्था करायची तर दुसरीकडं राजची भिती दाखवून अमराठी मंत मिळवायची अशी या मायबाप आघाडी सरकारची कल्याणकारी योजना आहे.ज्या कॉँग्रेसपक्षानं चाळीस वर्षापूर्वी बाळासाहेबांना बळ दिलं तीच कॉँग्रेस आज मागचा सर्व अनुभव असूनही राजला हिरो करण्याचा प्रयत्न करतीय.
राज यांच्या उपद्रव मुल्याचा आंदाज सहा महिन्य़ापूर्वीच सा-यांना आला होता.यामुळे यावेळी राज यांना अटक करण्यापूर्वी राज्य सरकारनं संपूर्ण तयारी करायला हवी होती.मात्र राज्य सरकार बेफिकीर राहीले. राजच्या कार्यकर्यांनी महाराष्ट्रात राडे सुरु केल्यानंमकरही आपले आर.आर.आबा फक्त इशारेच देत होते.केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील तर आता अशा ठिकाणी जाऊन पोटलेत की तिथून त्यांच्याबद्दल काही अपेक्षा करणंच चुकीचं आहे.अखेर संसदेत झालेल्या गदारोळानंतर देशमुख सरकारवरचा दबाव वाढला आणि त्यांनी राज यांच्या भोवती खटल्यांचा चक्रव्यूह उभा केला.या चक्रव्युहातून आपली सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर राज यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.जर ही गोष्ट राज यांनी दोन दिवसांपूर्वीच केली असती तर हे सारे महाभारत घडलेच नसते.मात्र त्यांना कशाचंही सोयरसूतक नाहीयं. केवळ स्वत:ची प्रतिमा मोठी करण्याचा हा 'राज' हट्ट आहे.
राज यांचा मुद्दा निघाला की दक्षिणेकडची राज्य, बंगालमधले मार्क्सवादी यांची उदाहरण दिली जातात. या सर्व राज्यांचा अतिरेकी भाषाप्रेम ही देखील नक्कीच धिक्कार करण्याची गोष्ट आहे.त्या राज्यातले अशा प्रकराचे अतिरकेकी प्रयत्न हे देखील हाणून पाडायलाच हवेत.मात्र त्याचबरोबर तुमच्या आमच्या महाराष्ट्रानंही आपली सहिष्णुतेची परंपरा एखाद्या महत्वकांक्षी राज ठाकरेंसाठी मोडणं चुकीचं आहे.बिहार उत्तर प्रदेशातले नागरिक हे आपले देशबांधवच आहेत.त्यांना मुंबईसह राज्यात रोजगारासाठी येण्याचा, आणले सण समारंभ साजरे करण्याचा एवढंच नाही तर इंथ स्थायिक होण्याचाही पूर्ण अधिकार आहे. (असाच अधिकार महाराष्ट्रीयन नागरिकांनाही आहे) त्यांना समानतेची वागणूक मिळाली तर अमरसिंह लालूप्रसाद यादव यासारख्या आगलाव्या राजकारण्यांची दुकाणं बंद होतील.
एका 370 व्या कलमामुळे जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामध्ये मोठी भिंत गेल्या साठ वर्षात तयार झालीय.आज राज ठाकरे,करुणानिधी यासारखे काही नेते थेटपणे तर अमर,मुलायम लालूंसारखे नेते अप्रत्यक्षपणे अशा अनेक भिंती या देशात उभ्या करत आहेत.हे देश दुभंणारे ' राजकाराण' थांबवण्यासाठी प्रयत्न करायचा की यासबोत वाहवंत जायचं ह्याचा निर्णय करण्याची वेळ आता आली आहे.

Saturday, October 18, 2008

एक सचिन दुसरे बाकी सर्व...


स्थळ-भारतामधलं प्रेक्षकांनी भरलेलं कोणतही क्रिकेटचं मैदान
सामना-भारताविरुद्ध कोणताही देश
प्रसंग-सचिन तेंडुलकर ग्लोज घालत बॅट घेऊन मैदानावर चालत येतोय....
मैदानात जमलेले हाजारो प्रेक्षक, नाक्यावरच्या टिव्हीवर घोळका करुन बघणारी लाखो पब्लीक,घराघरात टिव्ही बघणारे कोट्यावधी क्रिकेटवेडे या सा-यांची नजर असते फक्त सचिन तेंडूलकरवर....त्याच्या प्रत्येक फटक्यानं ते मोहरुन जातात,त्याच्या चौकार षटकारनं बेभान होतात,त्यानं किमान शतक मारावं हीच त्यांची नेहमी अपेक्षा असते...आणि तो बाद झाला की..मैदानावर टाचणी पडेल अशी शांतता पसरते.नाक्यावरची गर्दी नाहीशी होती,टिव्हीवर क्रिकेट बघणारा रसीक चडफडतो आणि चॅनल चेंज करतो.गेली दिड वर्ष या शंभर कोटीच्या खंडप्राय देशानं हे चित्र वारंवार अनुभवलंय.एखादा कच्चा खेळाडू असता तर या ओझ्यानं केंव्हाच दबून गेला असतो.पण तो सचिन तेंडुलकर आहे.जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...
152 कसोटींच्या खडतर तपश्चर्येनंतर सचिननं आज कसोटी क्रिकेटमधलं अढळपद मिळवलंय.वयाच्या सोळाव्या वर्षी वकार,अक्रम,इम्रान सारख्या खूंखार गोलंदाजाविरुद्ध सचिननं पदार्पन केलं.या खेळाडूंच्या स्पीडला तो घाबरला नाही,त्याच्या शेरेबाजीनं तो खचला नाही,कडव्या पाकिस्तानी प्रेक्षकांना तो दबला नाही.या सा-या दबावांना त्यानं आपल्या बॅटमधून उत्तर दिलं. या घटनेला 19 वर्षे झाली.मात्र कोणत्याही आक्रमनाला बॅटनं उत्तर द्यायचं ही त्याची सवय अजूनही मोडलेली नाही.
सचिनची सोनेरी कारकिर्द अनेक अविस्मरणीय खेळींनी सजलीय.पर्थच्या जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्टीवरचं शतक, टिपीकल इंग्लीश वातावरणात 1990 साली मॅच वाचवणारी त्याची खेळी,जीवघेण्या पाठदुखीकडं दुर्लक्ष करत चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅच वाचवण्यासाठी केलेली एकाकी धडपड जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर भारतीय संघाची फसलेली नौका बाहेर काढण्याचं काम सचिनच्या बॅटनं वारंवार केलंय.सचिननं खेळलेल्या ज्या 47 कसोटीत भारत जिंकलाय त्या 47 कसोटीत त्याची सरासरी आहे 62.11.उलट ज्या 43 कसोटीत त्याची सरासरी 36 वर घसरलीय नेमक्या त्याच 43 कसोटी भारत हरला आहे.सचिन स्वत:साठी खेळतो असं म्हणा-यांचे समाधान करण्याकरता आणखी कोणत उदाहरण द्यायचं.मोहम्मद अझरुद्दीन,सौरव गांगुली,राहुल द्रविड यासर्वांच्या नेतृत्वाखाली त्यानं सर्वस्व ओतून खेळ केलाय.एवढचं काय तर युवा खेळाडूंचा सतत जयघोष करणा-या महेंद्र सिंह धोनीच्या संघातही त्याचं स्थान अगदी फिट्ट आहे.जी ऑस्ट्रेलियातली तिरंगी मालिका जिंकल्यापासून धोनीचे शेअर्स गगनाला भिडलेत.त्या स्पर्धेतल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात सचिननंच मॅचविनींग बॅटींग केली होती.हे कोणीही विसरुन चालणार नाही.
फक्त एकदिवसीय क्रिकेट,कसोटी क्रिकेट,शतक,विक्रम एवढ्यापूरतं सचिनचं मोठेपण आहे ? अजिबात नाही.चित्रविचीत्र पोशाख ,डिस्कोमध्ये उशीरापर्यंत धिंगाना, नटींसोबतचे अफेयर्स, आपल्या संघातल्या किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंवर किंवा निवड समितीबरोबर वाद यासारखे प्रकार त्यानं कझीचं केले नाहीत.अशाच प्रकारच्या प्रश्न विचारल्यास '' मला फक्त क्रिकेट खेळणं माहीती आहे " असं उत्तर सचिन देतो.मला वाटतं सचिनचं हेच उत्तर त्याला महान बनवंत.
गेली 19 वर्षे सचिन सतत खेळतोय.या 19 वर्षात आपल्या देशात अनेक उलाथपालथी झाल्या. कित्येक सरकार आली आणि गेली,देशाच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला,अर्थव्यवस्थेला आव्हान देणारे घोटाळे झाले,कित्येक जातीय दंगली झाल्या,भूंकप,महापूर,चक्रीवादळ,सूनामी सारख्या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींना देशाला सामाना करावा लागला.केवळ सामाजिक आयुष्यात नाही तर व्यक्तीगत आयुष्यातही या शंभर कोटींच्या भारतीय नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलंय.मात्र या सा-या आपत्तीचा विसर पाडणारं टॉनीक सचिनच्या बॅटनं आपल्याला वारंवार दिलंय़.
आता सचिननं क्रिकेटमधली बहुतेक सारी शिखरं सरं केलीत.मात्र तरीही भारतीयांच समाधान अजुनही झालेलं नाही.आता 2011 मध्ये होणारा विश्नचषक सचिननं जिंकून द्यावा.हीच आपली त्याच्याकडून अपेक्षा आहे.अशी अपेक्षा ठेवणंही अगदी रास्त आहे.कारण मी सुरवातीलाच म्हंटलंय....
जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...

Wednesday, October 15, 2008

काळी कोजागिरी


अश्विन शुद्ध पोर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा कालच झाली.
स्वच्छ निरभ्र आकाशामधला शुभ्र चंद्राचे प्रतिबींब दुधाच्या ग्लासं पाहणं हा एक आनंदायी अनुभव असतो.मात्र यावर्षी मला ह्या चंद्राचं प्रतिबींब काळं दिसलं.... आपल्या सभोवताली घडणा-या वेगवेगळ्या घटनांची सावली आपल्या आयुष्यावर पडत असते.तसंच काहीसा प्रकार या शुभ्र शामल चंद्राच्या बाबतीतही झाला असावा असं मला यावेळी वाटलं.जगात विशेषत: माझ्या प्रियतम भारत देशात सध्या घडत असलेल्या वेगवेगळ्या घंटनांची सावली पडून हा चंद्र काळा पडला आहे असंच मला वाटतय...
आपल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर एका अस्वस्थ रात्रीची काळी सावली सध्या देशावर पडलीय असं म्हणाता येईल.देशातल्या अनेक भागात सध्या अस्वस्थता खदखदतीय..
भारतासाठी सर्वात संवेदनशील मानलं जाणा-या जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ प्रश्नावरुन नुकतचं फार मोठा रक्तपात घडून गेलाय.अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेल्या जमीनीवरुन आपल्या देशातले नागरिक काश्मीरमध्ये स्थायीक होतील...त्यांच्या संपर्कातून काश्मीरी जनतेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रुजवलेली फुटीरतावादाची भावना नष्ट होईल,काश्मीरीयतच्या नावाखाली चालणारं राजकीय दुकान संपेल अशी भिती राज्यातल्या काही पक्षांना वाटली.या भितीमधून त्यांनी जे काही केलं तो सारा इतिहास ताजा आहे.लष्कराचे प्रयत्न आणि देशातल्या जनतेच्या दुवांच्या बळावर काश्मीरमधली परिस्थीती सध्या नियंत्रणात आलीय असं वाटतंय..मात्र पंतप्रधानांच्या दौ-यात ही खदखद पुन्हा एकदा बाहेर आली.राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात हा वणवा आणखी पेटेल अशीच दाट शक्यता आहे.
शुर पराक्रमी राजपूतांच्या राजस्थानमध्येही काही वेगळी परिस्थीती नाही.या राज्यात धार्मिक नाही तर जातीय अस्वस्थता आहे.आरक्षणाच्या मागणीकरता राष्ट्रीय संपत्ती वेठीसं धरणारं नवीन 'गुज्जर मॉडेल ' या राज्यानं देशाला दिलंय.गुज्जर आणि मीना या जातींमधली तेढ कमी व्हावी याकरता कोणतचं राजकीय पक्ष नेता प्रयत्न करत नाहीयं...उलट विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो या जातीचा दुराभिमान गोंजारण्याचाच प्रयत्न करतोय.आता राज्यात विधानसभा निवडणुका येतायत.त्यामुळं नवीन आश्वासन दिली जातील....आणि निवडणुकीनंतर ही आश्वासन पुर्ण करण्याकरता दबावाचं आणखी एक मॉडेल समोर येईल...
आर्थिक राजधानी मुंबईतही वेगळी परिस्थीती नाही.अमेरिकन अर्थव्यवस्थेवर साचलेल्या काळ्या ढगाची सावली मुंबईवरही पडलीय...शेअरबाजार कोसळतोय,हवेत संचार करणा-या शेकडो युवकांचे करीयर जमीनदोस्त होतंय.....मोठे उद्योग राज्याकडं पाहतही नाहीत,शेतक-यांच्या आत्महत्या तर सरकारी कुचेष्टेचा विषय बनलाय.सत्ताधारी पक्षं मात्र मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करुन नवीन राजकीय,सामाजिक गणीत (की समाजमनामधली भिंत) उभी करण्याचा प्रयत्न करतायत.तर जवाबदार समजवून घेणारे विरोधी पक्ष संकुचीत भाषीय राजकारणाची वर्षानुवर्षे वाजवलेली टेपचं पुन्हा एकदा बडवतात...
भारतातल्या वेगवेगळ्या भागात घडणारी ही काही प्रातिनिधीक तरीही खुप मोठा दूरगामी परिणाम करणारी उदाहरणं....देशात दिल्लीपासून बंगळूरु पर्यंत आणि अहमदाबाद पासून अगरतळामध्ये बॉम्बस्फोट होतायत....हे स्फोट घडवणारे हात कोणत्या परकीय देशामधले नाही,तर तुमच्या आमच्या सबोत राहणारे,आपले भारतीयचं आहेत. हिंदी चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात व्हीलनची प्रतीमा आता बदलू लागलीय.सध्याच्या समाजातले व्हीलन हे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी करतात.दळणवळणाकरता ईमेल,लॅपटॉप सारखी आत्याधुनीक साधनं वापरतात.पुणे मुंबई धारवाड सारख्या भागात शांत,चार चौघासारखं आयुष्य जगणारे हे तरुण आज तितक-याच थंडपणे दिल्ली अहमदाबाद सारख्या शहरात बॉम्बस्फोट घडवतात या बॉम्बस्फोटामुळे नागरिकांच्या आयुष्यातली मोडलेली घडी बसवण्यापेक्षा राज्यकर्त्यांना आपल्या कपड्याची इस्त्री मोडणार नाही याचीच जास्त काळजी आहे.
देशाचं सारं अवकाश व्यापून टाकणा-या या काळ्या ढगांच्या सावलीमुळे कोजागिरीचा चंद्र मला काळा दिसला असावा... पडलीय.....ही काळी सावली घाणवण्याकरता लक्षावधी दिवे लावण्याची वेळ आता आली आहे...मात्र हे दिवे लावण्याकरता कोण पुढं येणारं .ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता किती काळ्या कोजागिरी पार कराव्या लागतील हे सांगणं शेअर बाजाराचा वार्षिक अंदाज सांगण्यापेक्षाही अवघड आहे.

Friday, October 10, 2008

उद्धवचा उदय


कोणी म्हणतं ते आक्रमक नाहीत...
कोणी ओरडंत ते बाळासाहेबांचा वापर करतात...
कोणी हेटाळणी करतं ते शिवसेना संपवायला निघालेत...
उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून त्यांच्यावर सतत हे आरोप होत आहेत.मात्र शिवसेनेचा या वर्षीचा दसरा मेळावा ज्यांनी बघितला असेल त्या सर्वांना आता नक्की समजलंय की उद्धव हेच भावी शिवसेनाप्रमुख आहेत.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून त्यांना राजकीय पक्ष वंश परंपरेनं मिळाला असेल मात्र या दसरा मेळाव्याला आलेले अनेक सैनीक त्यांनी स्वत: कष्ट करुन मिळवलेत.केवळ राड्यांची भाषा करणा-या शिवसैनीकांचे नवे नेते मात्र त्यांच्यापासून संपूर्ण वेगळे आहेत. केवळ विरोधी पक्षचं नाही तर परप्रांतीय,मुस्लीम या सेनेच्या परंपरागत शत्रूंच्या विरोधातही त्यांनी आतापर्यँत कधी मर्यादेच्या पलीकडं जाऊन (त्याला ' ठाकरी भाषा' असं म्हणातात का ??? ) टिका केलेली नाही.उलंट उद्धव प्रकाशात आले ते मी मुंबईकर या नव्या अभियानामुळं...
ज्या मुद्यांवर आणि ज्या माणंसांच्या जीवावर बाळासाहेबांनी शिवसेना सुरु केली ते मुद्दे आणी माणंस आता बदलंत चाललीत.21 व्या शतकात राजकारण आणि अर्थकारण यांची एकमेंकामधली गुंतागुत वाढलीय..एखाद्या समाजाला एखाद्या व्यक्तीला विरोध करुन दिर्घकाळ यशस्वी होण्यास आता मर्यादा पडतायत.त्यामुळेंच सर्वांना जोडणारं बेरजेचे राजकारण करणारा नेताचं आता राजकारणात यशस्वी होऊ शकतो.हे उद्धव ठाकरेंनी कदाचीत ओळखल असावं..त्यामुळेचं सेनेच्या मुळ गाभ्यालाच धक्का देत उद्धव यांनी मी मुंबईकर हे आंदोलनं सुरु केल होतं..मात्र राज ठाकरे यांनी मराठीचा गजर करत हे आंदोलनचं उधळून लावलं.उद्धवच्या राजकारणाला बसलेला हा पहिला धक्का होता.
मात्र उद्धवना त्याही पेक्षा मोठे धक्के दिले नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी.' स्वाभिमाना ' ची भाषा करत राणेंनी पक्ष सोडला.मालवणच्या पोटनिवडणुकीत राणेंना अनुकूल अशी जबरदस्त हवा होती.भाजपासहं शिवसेनेतल्या अनेक उद्धव विरोधकांचं राणेंना त्याकाळात पाठबळ होत..तरीही उद्धवही हरणारी लढाई नेटानं लढले.राणेंच्यातबालेकिल्याच चक्क मालवणात प्रत्येक गल्लीबोळ त्यांनी त्या निवडणुकीत पिंजून काढलं.ते निवडणुक हरले मात्र ते दरबारी राजकारणी आहेत हा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला असं म्हणता येईल..नंतर आधी श्रीवर्धन आणि रामटेकच्या निवडणुका जिंकत त्यांनी राणेंचा झंझावात रोखला.मात्र मुंबई महापालिका निवडणुक त्यांची खरी परीक्षा होती....
केवळ नारायण राणेचं नाही तर शिवसेनेतले प्रती ठाकरे समजले जाणारे राज ही 'नवनिर्माणाचा' नवा नारा देत त्यांच्या विरोधात उभे होते.बाळासाहेंबासारखा हुकमी एक्का शरपंजरी अवस्थेत असताना उद्धव यांनी ही निवडणुक स्वत:च्या हिमतीवर आणि देसाई,राऊत नार्वेकर यांच्या मदतीनं लढवली.सर्व राजकीय विरोधकांचे आंदाज चुकवून शिवसेनंनं मुंबई महापालीका राखली याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनाच आहे.
या विजयामुळं शिवसेनेमधलं 'आऊटगोईंग' ब-याच प्रमाणात कमी झालं.हाच काळ पक्षाच्या बांधणीकरता उद्धव यांनी वापरला.शेतक-यांची कर्जमाफी,भारनियमन,ऊस आंदोलकांच्या प्रश्नावर उद्धव यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला.परभणी,धुळे,चंद्रपूर,कोल्हापूर सारख्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात याकाळात उद्धवच्या सभा या काळात यशस्वी झाल्या.शिवसेना संपवायला निघालेल्या उद्वव ठाकरेंच्या सभेला सामान्य मराठी माणसांचा हा प्रतिसाद होता.
उद्धव ठाकरे हे रसायन सनातन शिवसैनिकांपेक्षा वेगळं आहे. काही बाबतीत ते थेट शरद पवारांसारखे आहेत असं मला वाटतं.पवारांप्रमाणेचं त्यांच्या मनाचा ठावं घेणं अवघड आहे.पवारांप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधकाला जाहीरपणे न दुखावता अडगळीत टाकण्याची कला त्यांनाही अवगत आहे.मात्र उद्धव यांच्यामागे बाळासाहेबांची शक्ती आहे.याबाबतीत ते पवार,राणे किंवा राज यांच्यापेक्षा नक्कीच उजवे ठरतात.ज्या शिवसैनीकांना दसरा मेळाव्यात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकण्याची सवय आहे...त्या सवयीला उद्वव यांनी यावेळी धक्का दिला.
त्यांच्या भाषणात अटलजींचा गोडवा नाही,बाळासाहेबांसारखा मिश्कीलपणा नाही किंवा राज सारखा आक्रमकपणा नाही.. मात्र शिवसैनीकांना बांधुन ठेवणारी शक्ती नक्कीच आहे.पक्षाचा अजेंडा सांगणारं भाषण बाळासाहेबांचं नाही तर उद्दव यांच होत.हे यावेळी सगळ्यांनाच यंदा संमजलं.
एक नेता,एक मैदान,एक विचार या शिवसेनेच्या दस-या मेळाव्याच्या घोषणेतला एक नेता हा शब्द बदलण्याची वेळ आता आली आहे.हे शिवाजी पार्कच्या गर्दीला यंदा समजलं असावं.भावी शिवसेना प्रमुखाचा उदय आता झाला आहे.यावर्षीचा दसरा मेळाव्याचं हेच मोठं ऐतिहासीक मुल्य आहे.

Tuesday, October 7, 2008

दादा द ग्रेट !


आज सात ऑक्टोबर 2008. भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीनं आज निवृत्ती जाहीर केलीय.ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ही सौरवच्या आयुष्यातली अखेरची मालिका असेल...त्याच्या निवृत्तीचं काऊंट डाऊन आता सुरु झालंय...
महाराजा ही सौरवची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची ओळख...पण या राजाला कायमच टिकेला सामोरं जावं लागलंय. 1996 साली इंग्लंड दौ-यात त्याची संघात निवड झाली पण त्यावेळी त्याला डालमीयांच्यो कोट्यातला खेळाडू असं म्हंटलं गेल.लॉर्डसमधल्या आपल्या पहील्याच कसोटीत शतक झळकावून त्यानं आपला क्लास सिद्ध केला..या कसोटी सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सौरवनं जिद्दीनं खेळ करत शतक झळकावलं होतं. 'जिद्द ' सौरवची कायमची ओळख राहीली.ऑफ शॉटस सरळ सिक्सर ही सौरवची बलस्थानं त्यामुळं ऑफ साईडचा देव या शब्दात सौरवचा राहूल द्रवीडनं खास सन्मान केला होता.
मात्र सौरवची खरी काराकिर्द बहरली ती तो कर्णधार झाल्यावर..ज्या देशात क्रिकेट हाच जन्म मानला जातो या क्रिकेटवेड्या देशात कर्णधारपद हे काटेरी सिंहासन आहे.सचिन,द्रवीडसह अनेक महान फलंदाज हे दडपण पेलू शकलेले नाहीत..सौरव तर भारतीय क्रिकेटच्या सर्वात कठीण काळात कर्णधार झाला होता.
मॅच फिक्सींगच्या किडीनं भारतीय संघ पोखरला गेला होता.सर्वसामान्य क्रिकेट रसिकांच्या मनातली त्यांच्या देवाची प्रतीमा भंगली होती.अशा परिस्थीत सौरव कर्णधार बनला नैराश्यानं ग्रासलेल्या संघात त्यानं जान फूंकली..जो संघ परदेशात केवळ हरण्याकरताच खेळतो अशी अनेकांची समजूत होती त्या संघानं सौरवच्या नेतृत्वाखाली परदेशात 12 कसोटी जिंकल्या आहेत. सौरवच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या सर्वात जवळ पोचला होता....भारतीय संघाचं 'टिम इंडीया ' या संघात त्यानंच रुपांतर केलं...सेहवाग,युवराज,हरभजन,झहीर हरभजन यासरखे टिम इंडीयाचे सध्याचे स्टार्स त्यानंच घडवले.बोर्ड आणि खेळाडूंच्या वादात कर्णधार खेळांडूंच्या पाठीशी उभा आहे हे चित्र पहील्यांदा त्याच्याच कालावधीत दिसलं ...त्यानंतर कर्णधार बनलेल्या द्रवीड आणि धोनीला हाच सौरवचा महान वारसा मिळाला आहे.एवढचं नाही तर ज्या यंग इंडीयाच्या जयघोषात सौरव आणि सिनीयर्सला सध्या वगळलं जातंय त्या यंग इंडीयाचा खरा निर्माता सौरवचं...
सौरवची एकूण काराकीर्द आणि सध्याचा फॉर्म पाहीला तर तो आणखी वर्षभर तर खेळेल असा सगळ्यांचा आंदाज होता.त्यामुळेच सौरवनं आज जाहीर केलेली निवृत्ती अधिक चटका लावणारी आहे.सर्व संघातले महान गोलंदाज,ग्रेग चॅपेल,ऑस्ट्रेलीयन मिडीया भारतीय माध्यमं यांना जिद्दीनं तोंड देणा-या सौरवनं अचानक बॅट खाली ठेवणं सगळ्यानाच अस्वस्थ करणारं आहे.फॉर्म आणि क्लास या दोन्हीचा विचार केला तर तो कसोटी आणि एकदीवसीय संघात असायला हवा मात्र या सौरवला एकदीवसीय संघातून बसवण्यात आलं...केवळ श्रीलंकेची खराब मालिका हा निकष गृहीत धरुन त्याला इराणी चषकातून वगळण्यात आलं...
भारतामधली अनेक मोठी साम्राज्य परकीय आक्रमणामुळं नाही तर अंतर्गत मतभेद आणि दगाबाजीमुळं कोसळली...भारतीय क्रिकेटच्या ख-या खु-या महाराजानंही बहुधा याचं कारणामुळं सन्यासधर्म स्वीकारला असावा.21 वे शतक आणि यंग इंडिया असा नारा देणा-या भारत देशात अजुनही तीच संरजामी वृत्ती शिल्लक आहे...हा प्रश्न आज मला अस्वस्थ करतोय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...