Sunday, July 3, 2011

राम गोपाल वर्मा - द सर्किट ?





Just watched Bbhuddah nd am. angry with bacchan that hes such a xxxx not to do films like this nd am such a xxxx not to realize this. 
   रामगोपाल वर्माने ट्विटरवर ही प्रतिक्रीया दिली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अमिताभ बच्चन सारख्या बॉलिवूडमधल्या 'बाप' कलाकाराबद्दल अशी एखाद्या दिग्दर्शकाने अशा प्रकारच्या आक्षेपार्ह भाषेत दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल नाराजी उठणं हे स्वाभाविक होतं. त्यानंतर प्रथेप्रमाणे रामूनं या प्रकरणावर खुलासा केला. अमिताभ बच्चन यांनी अशाप्रकारचे चित्रपट यापूर्वी  केले नाहीत हा प्रकार अगदी  xxxx आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांची  ही क्षमता ओळखण्यात मला अपयश आलं म्हणून मी xxxx असं स्पष्टीकरण रामूनं दिलंय. अमिताभ बच्चन यांच्या कट्टर फॅन्सचे यामुळे समाधान झाले नसेल. मात्र रामगोपाल वर्मा नावाच्या वल्लीचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांचा रामुच्या या खुलाशावर  विश्वास बसेल. आपल्या मनातले EXPRESSION अशा प्रकारे व्यक्त करण्याची  रामूची सवय जुनीच आहे.


 'आई -वडिलांच्या दृष्टीने मी एक वाया गेलेला मुलगा होतो.' असं  एका मुलाखतीमध्ये सांगणा-या रामूनं सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलंय. मात्र या पठ्ठ्याचं शिक्षणामध्ये कधी मन रमल नाही. कॉलेजमध्ये असताना चित्रपट पाहण्याचं व्यसन त्याला लागलं. 'चित्रपटातला एखादा विशिष्ट सीन पाहण्यासाठी आपण तो चित्रपट  पुन्हा पुन्हा  पाहिला माझ्यातल्या दिग्दर्शकाची त्यामुळेच जडणघडण झाली' असंही त्यानं सांगितलंय.


     तेलगु चित्रपटसृष्टीत काही काळ घालवल्यानंतर शिवा या चित्रपटाने त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. शिवा  हा रामूच्याच गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक.कॉलेज विश्वातल्या गुन्हेगारी  विश्वाचे थेट चित्रण यामध्ये करण्यात आलंय. सायकलची चेन काढून मारामरी करण्याची शिवामधली नागार्जुनाची स्टाईल चांगलीच लोकप्रिय झाली होती. एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट या माध्यमावरची पकड रामूने यामध्ये दाखवून दिली.


   रामू ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला तो रंगीलामुळे. अमिर खान, जॅकी श्रॉफ आणि  उर्मिला मातोंडकर यांच्या या चित्रपटाने त्या वर्षी अनेक रेक़ॉर्ड मोडले. लव्हरबॉय या आमिरच्या पारंपारिक प्रतिमेला छेद देण्याचं काम रामूच्याच रंगीलानं केलं. असं असलं तरी रंगीलाचं खरं आणि निर्विवाद आकर्षण होती ती म्हणजे उर्मिला मातोंडकर. रंगीलापूर्वीही उर्मिलानं काही चित्रपट केले होते.अगदी रामूच्याच द्रोहीमध्ये तिची मुख्य भूमीका होती. मात्र त्यात तिचं कोणतही वेगवेळेपण नव्हतं. वर्षा उसगावकर, अश्विनी भावे यासारख्या त्या काळात बॉलिवूडमध्ये काम    करणा-या मराठी अभिनेत्रींपैकीच एक अशी तिची ओळख होती. रामूनं उर्मिलाची ही ओळख संपूर्णपणे बदलून टाकली. उर्मिलाचा संपुर्ण कायापालट या चित्रपटामुळे झाला. आपल्या शेजारी राहणारी 'गर्ल नेक्सट डोअर' वाटणा-या उर्मिलाला त्यानं  स्वप्नसुंदरी बनवलं. ( रंगीला पाहिल्यानंतर मीही उर्मिलाचा जबरदस्त फॅन झालो. अगदी आजही सध्याच्या कोणत्याही नायिकेपेक्षा उर्मिला माझ्या आवडीची आहे. असो हा विषय संपूर्ण वेगळा आहे. त्याबद्दल पुन्हा कधी तरी...)
        रंगीलानंतर दौड आला आणि गेला.दौडनंतर 1998 साली प्रदर्शित झालेला सत्या हा  हिंदी चित्रपट सृष्टीतला माईलस्टोन आहे. सत्यापूर्वीही अंडरवर्ल्डवरचे अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र दोन गॅँगमधल्या हिंसेच इतकं परिणामकारक चित्रण सत्यामध्येच होतं. या चित्रपटामधली मुंबईही यापुर्वी कोणत्याच चित्रपटामध्ये न पाहिलेली होती. मुंबईतला पावसाचा इतका परिणामकारक वापर क्वचितच कोणी केला असेल. उर्मिला मातोंडकर, चक्रवर्ती, मनोज बाजपेयी, सौरभ शुक्ला, शेफाली शहा, गोविंद नामदेव, मकरंद देशपांडे ह्या सत्यामधल्या गॅंगनं त्या वर्षी धुमाकूळ घातला. सत्यानंतर कंपनी आणि D हे अंडरवर्ल्डवरचे  चित्रपट  रामूनं केले.


     बॉलिवूडमधला एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणूनही रामूचं नाव घ्यावं लागेल.संगीताचे वर्चस्व असलेल्या बॉलिवूडमध्ये एकही गाणे नसलेला चित्रपट कढणे आणि तो यशस्वी करणे ( कौन, भूत )ह्या दोन्ही गोष्टी रामूनं केल्या. बॉलीवूडमध्ये भयपटाची लाट त्यानंच पुन्हा एकदा आणली ( भूत, डरना मना है, डरना जरुरी है ) पाच संपूर्ण वेगळ्या कथा घेऊन एक  चित्रपट काढता येतो हे त्यानंच दाखवलं. ( डरना मना है ) आपल्या साह्यक दिग्दर्शकाला दिग्दर्शकाच्या खूर्चीवर बसवलं. प्रत्येक शुक्रवारी आपला एक चित्रपट रिलीज झाला पाहिजे हे त्याचं स्वप्न आहे. त्यामुळे त्यानं मध्यंतरी अक्षरश: डझनावारी चित्रपटांची निर्मिती केली. नवीन कलाकार, नवे दिग्दर्शक, नवी तांत्रिक टीम, मोजकी लोकेशन ( कौन हा संपूर्ण चित्रपट त्यानं एकाच घरात चित्रीत केला आहे. तसेच या संपूर्ण चित्रपटात केवळ 3 कलाकार आहेत. हाही एक अनोखा प्रयोग मानला पाहिजे ) आणि अगदी झटपट चित्रपटाचे मेकिंग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अन्य निर्माते दिग्दर्शक  एका चित्रपटासाठी पाच-पाच वर्षे खर्च करतात. पण हा बाबू एकाचवेळी पाच चित्रपट बनवत असतो.चित्रपट प्रदर्शित झाला की त्याची कोणतीही चर्चा करायची नाही. कसलीही उसंत न घेता पुढच्या तयारीला लागयचे ही त्याच्या कामाची पद्धत आहे.


           चित्रपटातल्या नायिकांवर रामूसारखं प्रेम बॉलिवूडमधल्या  कोणत्याच दिग्दर्शकाने केले नसेल. उर्मिला मातोंडकर, अंतरा माळी, मेघना कोठारी या आपल्या लाडक्या नायिकांसाठी त्यानं चित्रपटांची 'फॅक्टरी' सुरु केली. अंडरवर्ल्ड, ( सत्या, कंपनी, अब तक छप्पन , D )  नक्षलवाद, ( जंगल, रक्तचरित्र ), लव्ह स्टोरी ( रंगीला, मस्त) भयपट, (रात, डरना मना है, डरना जरुरी है ), एकतर्फी प्रेम,  ( एक हसीना थी, डार्लिंग  ठाकरे घराणे आणि महाराष्ट्रातील राजकारण ( सरकार, सरकार राज ) या सारख्या वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट बनवणा-या रामूनेच  'रामगोपाल वर्मा की आग' हा अत्यंत टुकार, थर्ड ग्रेड, सूपर डूपर फालतू चित्रपटही बनवला.यापेक्षा भंकस चित्रपट आता रामू बनवू शकत नाही ही खात्री ही रामूची  'आग '( आणि आपल्या सर्वांची होरपळ ) पाहिल्यानंतर माझी झाली.


           रामगोपाल वर्मा आणि वाद यांचेही अगदी घट्ट नातं आहे. तेलगु चित्रपट बनवत असताना त्याचा श्रीदेवीच्या आईशी  खटका उडाला ( रंगीलामधला नायिकेची आई दिग्दर्शकाला हैराण करते हा जो सीन आहे .... ( ज्यूस नवंबर मे मिलता है तो नवंबर मे जाके लाव ... वाला सीन  ) त्याची प्रेरणा रामूला याच वादातून झाली.  शाहरुख खान आणि करन जोहरशीही त्याचं वाजलं. ( लव्ह के लिए कूछ भी करेगा या चित्रपटातला आदित्य जोहर सूरज भन्साळी.... हम दिलवालोंको कुछ कुछ होता है हा  सीन आठवा ) यामध्ये रामूनं  या मंडळींची जाम उडवली आहे.


    मुंबई हल्ल्यानंतर  विलासराव देशमुखांसोबत त्यानं 'ताज वारी' केली. आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. विलासरावांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. आता तर ट्विटरच्या माध्यमातून रामूनं दररोज वेगवेगळी मतं मांडण्याचा सपाटाच चालवलाय. राजकारण, मीडिया, चित्रपट, नाते संबध, भ्रष्टाचार, पाऊस असा कोणताही विषय रामुला वर्ज्य नाही. या प्रत्येक विषयावर आपली खास मतं त्यानं ट्विट केले आहेत. 


     8 जूनला रामदेवबाबांचे आंदोलन अगदी जोरात असताना त्यानं If Baba also has to fast to get his way why is he a Baba? असा सवाल विचारला आहे. तर त्याच बरोबर Marriage is like a romantic novel in which the hero dies in the first chapter. असं जगातल्या तमाम पुरुष वर्गाला झटकन अपिल होईल असं ट्विटही रामूनं नोंदवलंय. हल्ली ट्विटरची क्रेझ प्रत्येक वर्गात वाढलीय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. तरीही रामूचं समाधान झालेलं नाही. I just so wish that some gangsters and some terrorists also will come on to twitter. अशी एक खास रामूलाच वाटू शकेल अशी इच्छाही त्यानं व्यक्त केलीय.


                   एम.एफ. हुसेन गेल्यानंतर Met sme who felt vry sad tht M F hussein passed away nd also met sme who ar supr happy tht the value of the paintings thy own of his doubled  हे त्याचं ट्विट मानवी स्वभावाबद्दल बरचं काही सांगून जातं. तर  Unparliamentary language is maximum used by parliamentarians ह्या त्याच्या ट्विटशी आम आदमी झटक सहमत होईल. मारीया सुसराजला चित्रपटात घेण्याची इच्छाही त्यानं आपल्या ट्विटरवर व्यक्त केलीय.  आपण सतत ट्विट करतो कारण आपल्याकडे सांगण्यासारखे आणि विचार करण्यासारखे खूप असते असं त्यानं सांगितलंय.  आपण चुका करतोच. काम करणा-या प्रत्येकाच्या हातातून चुका होत असातात असं रामूचं  लॉजिक  आहे. The only way of not to make any mistakes is to do nothing. हाच चुका टाळण्याचा एकमेव मार्ग आहे असा दावा रामूनं  केलाय. 


   आपण ब्लॉग, ट्विटर या माध्यमातून अनेकांची मनं दुखावतो हे रामूला माहिती असेलच. तरी त्याला त्याची पर्वा नाही. twitter is nt a public platform.its a medium of expression between tweeter nd followers.if u don't like wht I say u r welcome 2 unfollow me. या  स्वच्छ शब्दात  त्यानं आपल्यावरील नाराज मंडळीना  उत्तर दिलंय.


    वेगवेगळ्या विषयावर अगदी इलॉजिकल वाटतील अशी मत लॉजिकल पद्धतीनं मांडणा-या रामगोपाल वर्माला सर्किट म्हणायचे की मनस्वी हा प्रश्न मला पडलाय. 

14 comments:

हेरंब said...

रामू माझाही एकेकाळी अत्यंत आवडता दिग्दर्शक होता. त्याचा ब्लॉगही मी नियमित वाचायचो. त्याच्याबद्दल आणि ब्लॉगबद्दल मागे एकदा थोडक्यात लिहिलं होतं.

http://harkatnai.blogspot.com/2009/09/rgv-zooooom.html

आनंद पत्रे said...

हेरंबशी सहमत.. खूप खूप पेशन्स ठेऊनही वारंवार तसेच चित्रपट काढून वर्माने निराश केलंय आता.. आता त्याच्या चित्रपटाला उत्सुकतेने जाणं होतं नाही.. :(

Niranjan said...

मस्त जमली पोस्ट. छान, रोचक आहे. आवडली.

checkamol said...

मस्त रे ओंकी.. वाचायला मजा आली... यातले बरेच सिनेमे पाहायचे राहिलेत.... वारी संपल्यावर नक्की बघेन आता.

onkardanke said...

@ हेरंब "He writes painfully honst, mann" हे जे रामूचे वर्णन तू तुझ्या ब्लॉगमध्ये केलेस ते अगदी बरोबर आहे. रामूचा मीही आगच्या पूर्वी फॅन होतो. आता नाही.

onkardanke said...

@ आनंद, स्वत:च्याच प्रेमात पडून वाया गेलेला हुशार दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा. देवानंदचे पुर्वीचे चित्रपट आणि आताचे चित्रपट यामध्ये जितका फरक आहे तितकाच 'आग' पूर्वीचा रामू आणि आताचा रामू यात आहे.

onkardanke said...

@ निरंजन, मित्रा माझा ब्लॉग वाचलास आणि लगेच तुझी प्रतिक्रीया नोंदवलीस त्याबद्दल धन्यवाद.

onkardanke said...

@ अमोल, भाई वारीच्या गडबडीत असूनही माझा ब्लॉग वाचलास आणि त्यावर प्रतिक्रीयाही दिलीस त्याबद्दल आभार. रामूचे आगपुर्वीचे चित्रपट बघ. नंतर चे चित्रपट पाहिल्यावर डोक्याचा भूगा झाल्यास ती माझी जबाबदारी नाही.

Gaurav said...

फक्त RGV चा आहे म्हणुन आधी खुप पिक्चर पाहिले पण आता तशी रिस्क घेत नाही (रिस्कसुद्धा मी बघितला होता :p)
लेख मस्त झालाय..

Unknown said...

रामगोपाल वर्माला सर्किट पेक्षाही मनोरग्णच म्हणायला हवं.. तो संवेदनशील दिग्दर्शक होता.. सध्याच्या त्याच्या वक्तव्यांवरुन तो भंजाळलेला दिग्दर्शक जातस्त वाटतो... फॉर्म बरवलेला क्रिकेटर फॉर्मच्या शोधात चाचपडत असतो मात्र तो गवसला नाही तर तरो सैरभैर होतो तसंच रामूचं झालंय. 26/11च्या त्याच्या प्रकरणावरुन तो असंवेदनशील आणि बेजबाबदर नागरिकंही वाटू लागलाय.. असो तू लिहिले ब्लॉग मात्र उत्तम आहे. रामूला काय म्हणावं याबाबत तू कंन्फूज्ड आहेस असं ब्लॉग मध्ये लिहीलंयंस. सो तुला मदत करण्य़ासाठी मी वरील मजकूर लिहीलाय...हा हा...

Amit Joshi says said...

मी पण रामुचा चाहता आहे. रामुचा एकपण फिल्म चुकवत नाही. ब्लॉग नेहमीप्रमाने चांगला zala आहे.

onkardanke said...

@ गौरव..तू रिस्क पाहण्याचीही रिस्क घेतलीस ???? खूपच हिम्मतवाला आहेस. मी तर आगचे चटके बसल्यानंतर अजुनही रामुच्या वाटेला गेलेले नाही.

onkardanke said...

@ Unknown, फॉर्म बरवलेला क्रिकेटर फॉर्मच्या शोधात चाचपडत असतो मात्र तो गवसला नाही तर तरो सैरभैर होतो तसंच रामूचं झालंय अगदी बरोबर आहे.
प्रतिक्रीयेबद्दल खूप खूप धन्स.

onkardanke said...

@ अमित धन्स रे मित्रा.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...