Friday, February 25, 2011

त्रिकोणी युतीचा फॉर्म्युला

शिवसेना-भाजप युतीत मनसेला सामावून घेण्याच्या गोपीनाथ मुंडे यांनी मांडलेल्या "फॉर्म्युला'चे समर्थन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. राज्यातील विरोधकांचे हे त्रिशूल एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकारच्या गंडस्थळावर नक्कीच आघात होईल. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राची सर्वच बाहतीत पिछेहाट झालीय.असं असलं तरी सर्वच पातळीवर नाकार्ते असलेले आघाडी सरकार 2009 साली सत्तेवर आले. आघाडी सरकारला हे यश केवळ मनसे फॅक्टरमुळेच मिळाले होते. हे त्या निकालाचा अभ्यास केला की लगेच स्पष्ट होते.


        2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 तर भाजपला 8 जागांचा फटका बसला. युतीचं संख्याबळं 116 वरुन थेट 90 जागांवर घसरले. 1990 सालापासून पाच विधानसभा निवडणुका भाजपा-सेनंनं एकत्र लढवल्या आहे. या पाच निवडणुकांमधला हा निचांक आहे. भाजपा-सेना युतीच्या मतांची टक्केवारीही सुमारे साडेतीन टक्यांनी यंदा घसरली. तर मनसेनं विधानसभेच्या 144 म्हणजे बरोबर निम्या जागा लढवूनही 13 जागा आणि 5.1 टक्के मतं जिंकली. लोकसभा निवडणुकीत मनेसेमुळे भाजप-सेनेला 8 जागांचा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत तब्बल 63 जागांचा युतीला फटका बसला आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की भाजप-सेना-मनसे हे तीन्ही पक्ष एकत्र असते तर 153 जागा जिंकत ही आघाडी सत्तेवर आली असती. नाकर्त्या आघाडीची सत्ता घालवण्याचे समाधान मराठी जनतेला मिळाले असते.


       राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे हे उघड आहे. मात्र या दोघांचीही महत्वकांक्षा परस्परांशी लढून पूर्ण होऊ शकणार नाही. मागच्या काही वर्षात मुंबई आणि ठाणे या शिवसेनेच्या अभेद्य गडाला राज ठाकरेंनी सुरुंग लावलाय. बाळासाहेब ठाकरेंना पुढे करुन  सर्व प्रकारचे भावनिक आवाहन करुनही हा गड लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत सेनेला वाचवता आला नाही. मुंबई -ठाणे परिसरातील भगदाडं बुझवल्याशिवाय उद्धव ठाकरेंना 'वर्षा' चा उंबरठा ओलांडता येणार नाही.


   मनसेची स्थितीही फारशी वेगळी नाही. राज ठाकरेंकडे करिष्मा आहे. पण नरेंद्र मोदी, नितीशकुमार किंवा दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचे मुख्यमंत्री यांच्यासारखा संपूर्ण राज्यभर त्यांना जनाधार नाही. राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवत आहेत. प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे, शिरीष पारकर, बाळा नांदगावकर यासारखी काही मंडळी या पक्षाकडे आहेत. पण नेत्यांची फौज नाही. त्यातही ही सर्व मुंबईतली नेते मंडळी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा मुंबई-ठाणे परिसरातचं मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भ या राज्यातल्या तीन महत्वाच्या भागात पक्षाचे संघटन करु शकेल निवडणुका जिंकू देऊ शकेल असा एकही नेता मनसेकडे नाहीत. त्यातंच या भागात मनसेचं हुकमी असे मराठी कार्ड चालण्याचीही सूतराम शक्यता नाही. त्यामुळे ज्या नवनिर्माणाच्या गर्जना राज ठाकरे आपल्या संभामधून करतात ते नवनिर्माण स्वबळावर करणे या पक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.


     या त्रिकोणाताला तिसरा कोण आहे भाजपा. मध्यमवर्गीय, व्यापारी आणि मुंबईतील अमराठी मतदार ही या पक्षाची परंपरागत व्होट बॅंक आहे. गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे माधवं ( माळी, धनगर आणि वंजारी ) या जातीच्या मतांची बेरीजही या पक्षाच्या वाढीत महत्वाची ठरली. नितीन गडकरींमुळे विदर्भात तर एकनाथ खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात या पक्षानं आपली पाळेमुळे रुजवली आहेत. मात्र प्रमोद महाजनांचे अकाली निधन, मुंडे-गडकरी गटांचा संघर्ष आणि एकूणच सत्तेपासून दूर राहिल्यामुळे केंद्रीय पातळीवर आलेली निराशा याचा फटका भाजपालाही बसलाय. त्यामुळे शत प्रतिशत भाजप हा राग चिंतन बैठकित अनेकदा गायल्यानंतरही तो प्रत्यक्षात येणं अवघड आहे. याची जाणीव आता त्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाने आता त्रिकोणी युतीच्या फॉर्म्युल्याबाबत पुढाकार घेतला आहे.


     भाजपाला जी जाणीव झाली आहे त्याचं भान अजुनही सेना आणि मनसेला आलेलं नाही त्यामुळे  महाराष्ट्र सतत बदनाम होत असूनही  ह्या दोन्ही प्रादेशिक पक्षांना मुन्नी आणि झेंडुबाम यांचीच काळजी आहे. खरं तर या दोन्ही पक्षांचे नेतृत्व ठाकरे या एकाच घराण्याकडे आहे. दोन्ही पक्षात एकाधिकारशाही आहे. मराठी मतदार हाच त्यांच मुख्य आधार आहे.  बाळासाहेब ठाकरे हेच दोन्ही पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचे दैवत आहे.त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या महत्वकांक्षेपोटी कितीकाळ वेगळा संसार करायचा याचा विचार या दोन्ही पक्षांनी करायला हवा.


     गेल्या 12 वर्षांपासून शिवसेना सत्तेपासून दूर आहे. सत्तेचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नारायण राणे ते किरण पावसकर पर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. 2014 च्या निवडणुकीतही पराभव झाल्यास हा आऊटगोईंचा स्पीड आणखी वाढेल.बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मिता यासारख्या भावनिक मुद्यावर पक्ष कार्यकर्त्यांना भूल देण्याचे सेना नेतृत्वाचे प्रयोग फार काळ चालू शकणार नाहीत. मनसेमध्येही फारसे आलबेल नाही. श्वेता परुळेकर, प्रकाश महाजन यासारखी मंडळी केंव्हाच पक्षातून बाहेर पडली आहेत. कोणत्याही आंदोलनात न उतरता सभेच्या व्यासपीठावरुन बोलबच्चनगिरी करणं हेच राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून केले आहे. तर त्याचवेळी तोडफोडीच्या आंदोलनात सक्रीय असलेल्या राज ठाकरेंच्या मावळ्यांना पोलीसांचा आणि कोर्टाचा जाच सहन करावा लागतोय. 'मराठी खतरे में' हा एकच नारा देऊन कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं राज ठाकरेंना फार काळ जमणार नाही.
     
      भाजपा, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या मर्यादा आहेत. या तिघांनाही दलित मतदारांमध्ये मजबूत बेस नाही. मुस्लिम मतांची फारशी अपेक्षा नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजुनही त्यांना शिरकाव करता आलेला नाही. ग्रामीण महाराष्ट्रात साखर कारखाने आणि सहकारी संस्थांचे पाठबळ नाही. असं असतानाही भाजपा-सेना x मनसे असा संघर्ष करण्यात किती अर्थ आहे याचा विचार आता या पक्षांनी करायला हावा. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.. त्याठिकाणी केवळ हितसंबंध महत्वाचे असतात. हे घासून गुळगुळीत झालेलं सत्य राज आणि उद्धव या चुलत भावंडाला एकत्र का आणू शकत नाही ? 
         
       महाराष्ट्रात सध्या आनंद साजरा कराव्या अशा फार कमी गोष्टी आहे. वीज टंचाई, शेतक-यांच्या आत्महत्या, प्रादेशिक असमतोल, जमीन, पाणी आणि भेसळ माफियांचे साम्राज्य, बकाल शहरे, ओसाड खेडी, भ्रष्टाचारांचे 'आदर्श' उभी करणारी नोकरशाही आणि संवेदनाशुन्य सरकार याच्या विळख्यात आपला ' प्रिय आमुचा एक असा महाराष्ट्र दॆश ' अडकलाय. भाजपा-सेना-मनसे यांचे त्रिकोणी सरकार सत्तेवर आल्यास हे चित्र एका रात्रीत बदलेल अशी भाबडी आशा मला नाही. मात्र ह्या चित्राचे मुख्य चित्रकार असलेले नाकर्ते  सरकार तरी जायला हवे अशी माझी इच्छा आहे.


              राज ठाकरेंचा करिष्मा, उद्धव ठाकरेंचे व्यवस्थापन आणि गोपीनाथ मुंडेंचा जनाधार यांचा त्रिवेणी संगम आघाडी सरकारच्या साम्राज्यावर निर्णायक घाव घालू शकतो. यासाठी आता भाजपाने एक पाऊल पुढे टाकलंय...जय मराठी आणि जय महाराष्ट्र याचा अहोरात्र गजर करणा-या दोन्ही ठाकरेंच्या पक्षानेही त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे. 


     

Friday, February 18, 2011

... तर भारत वर्ल्ड कप जिंकेल !

 

क्रिकेट वर्ल्ड कप 2011 ला आजपासून सुरुवात होतीय. या वर्ल्ड कपमध्ये  14 देश विजेतेपद मिळवण्यासाठी खेळणार आहेत. पण माझ्यासह कोट्यावधी भारतीय फॅन्सची भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत वेगवेगळ्या सूचनांचा भडिमार टीम इंडियावर होत आहे. त्यापैकी काही सूचना इथे एकत्रित देत आहे.


  १ )   भारतीय क्रिकेटपटूंनी जाहिरातीपेक्षा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे

  २ )  वीरेंद्र सेहवागने किमान १५ ओव्हर्स तरी बॅटिंग केली पाहिजे

   ३ ) सचिन तेंडुलकरने स्पर्धेत किमान ६० च्या सरासरीने बॅटिंग करायलाच हवी

    ४ )  मुंबईत फायनल होणार आहे मग तिथं शतकं झळकावणं हा सचिनचा हक्कच आहे... सचिनने
        शतक मारले की बास.... भारताने वर्ल्ड कप जिंकलाच !


  5 )   सचिनने एक बाजू लावून धरुन ५० ओव्हर्स पर्यंत बॅटिंग केली पाहिजे ( कारण सचिन आऊट झाला की टीव्ही बंद करण्याची आमच्याकडे फॅशन आहे )

 ६ )  सेहवागने शांतपणे ! ( What a joke )  बॅटिंग करायला हवी. यार तो सीनियर प्लेअर आहे

 ७ ) गंभीरनं आपलं आडनाव सार्थकी लावण्यारी बॅटिंग करावी


८ ) कोहलीने मोठी खेळी खेळावी  ( 'विराट'  विजय  ही आमची हेडलाईन टेक्सट तयार आहे )


९ ) सेहवाग - गंभीरने आपण बागेत पळत नसून  २२ यार्डांच्या रनिंग बिटविन द विकेटवर पळत आहोत याचे भान ठेवावे. नेहमीप्रमाणे वेंधळ्यासारखे रन-आऊट होऊ नये


१० )  युवराज सिंगने पुन्हा एकदा ६ ब़ॉलवर ६ सिक्स मारावे. तरचं त्याच्या जिंदगीला काही अर्थ आहे.


११ ) युवराजने  पार्टी आणि मैत्रिवरचे लक्ष काढून क्रिकेटवर केंद्रित केले ना की बास.... साली कुणाची गरज नाही... आपणच जिंकणार

१२ ) युसूफ पठाण फक्त टिकला पाहिजे मैदानावर .. मग सिक्सर्स आपोआप जाणार


१३ ) धोनीने त्याचा हेलिकॉप्टर शॉट जाहिरातीमध्ये नाही तर मैदानावरही मारायला हवेत

१४ ) धोनीनं किमान एका मॅचमध्ये ( चुकून का होईना)  धोब्यासारखी नाही तर एखाद्या बॅट्समनप्रमाणे फटकेबाजी करावी


१५  )  स्पिनर्स जास्त खेळवले पाहिजेत बॉस ! तीच आपली खरी शक्ती आहे.


16 ) महत्वाच्या मॅचमध्ये टॉस जिंकायला हवा. धोनी नेहमी टॉस हरतो आणि सगळी गडबड होते.


१7 ) टॉस जिंकला की पहिल्यांदा बॅटिंगच  घ्यायला हवी ( 1996 ला कोलकातामध्ये काय झाले ते आठवते ना ? )


18 ) झहीर खान आणि नेहरा पूर्ण फिट पाहिजेत तरच अर्थ आहे

19 )     झहीरने 2003 च्या फायनल सारखा जास्त अगाऊपणा करु नये

20 ) नेहराने एका ओव्हरमध्ये धुलाई केली की खांदे मुळीच पाडू नये... तो अजिबात चांगला दिसत नाही तसा...

21 )  हरभजन सिंग चालला पाहिजे बॉस ( सिंग इज किंग हे गाणे म्हणायला आणि भांगडा करायला आम्ही मोकळे )


22 )  श्रीशांतने शांत राहाने त्याच्यामुळे नेहमी लोचा होतो.

23 ) श्रीशांतने त्याच्या पद्धतीनेच वागले पाहिजे त्यामुळेच  खरी मजा येते आणि समोरचा बॅट्समन लवकर आऊट होतो


24 )   आपले सगळे क्रिकेटपटू फिट राहणं महत्वाचं आहे. आपलं सगळ चांगलं आहे फक्त फिटनेसमध्ये आपण जरा कमी पडतो


25 ) ऑस्ट्रेलिया , दक्षिण आफ्रिका ह्या टीम लवकर आऊट व्हायला हव्यात ( पाकिस्तानला मात्र भारतानेच हरवले पाहिजे. भले वर्ल्ड कप आला नाही तरी बेहत्तर ! )


26 )  भारतामध्ये मॅच होणार आहेत मग पिच आपल्याला मदत करणारं तयार करणं हे ग्राऊंडमनचे कर्तव्य आहे. पिचवर  गवताची पाती पण  आम्हाला  चालणार नाही.

27 ) भारतीय बॅट्समन्सनी ब्रेट ली, शॉन टेट, अख्तर, डेल स्टेन या सारख्या फास्ट बॉलर्सना घाबरायची गरज नाही.

28 )  फास्ट बॉलर्ससमोर खेळताना फूटवर्क चांगले हवे. तिथंच गडबड होती.

29 ) शॉर्ट पिच बॉलवर कसे खेळायचे याचा सराव गॅरी कस्टर्न यांनी सगळ्यांकडून करुन घ्यायला पाहिजे. त्याच बॉलवर आपले प्लेअर्स नेहमी आऊट होतात.


30 ) स्पिन बॉलिंग आपल्याला खेळता येते ह्या भ्रमात  राहु नये. समोरच्या टीममध्ये काही गल्लीतले बॉलर्स नाही घेतले.


31 ) भारतीय फास्टर्सनी पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सप्रमाणे यॉर्कर टाकायला हवेत. यॉर्कर टाकण अजूनही आपल्या बॉलर्सना सालं जमतचं नाही.

32 ) शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये रन्स वाटण्याची सवय मोडली पाहिजे.


33 ) मोठ्या मॅचचे टेन्शन घेऊ नये.


34 ) जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये ( थोडं राहिलं तर चालेल )

35 )  फिल्डिंग नीट झाली पाहिजे ( कॅचेस विन मॅचेस ! )


 ह्या काही सूचना, काही मतं मला सूचलेली. ही यादी तूम्ही आणखी पण वाढवू शकता.....त्यासाठी खाली दिलेल्या comments ह्या ऑप्शनवर क्लिकर करा आणि  ही यादी तुम्हाला हवी तितकी वाढवा. 


 क्रिकेट वर्ल्ड कप 2011 कोण जिंकणार ? याबाबतचा पोल या ब्लॉगवर सुरु आहे. तेंव्हा तिथं आपलं मत जरुर नोंदवा. 

   

Sunday, February 13, 2011

इजिप्त, सोशल मीडिया आणि भारतEgypt the oldest civilization in the world had the most civilized revolution. टि्वटरवर या विषयाच्या प्रतिक्रीया वाचत असताना ही एक कमेंट मला वाचायला मिळाली. इजिप्तमध्ये नुकत्याच झालेल्या क्रांतीचे अगदी चपखल असे वर्णन या मोजक्या शब्दामधल्या प्रतिक्रीयेमध्ये करण्यात आले आहे. आजवर जगात बंदूकीच्या, सत्याग्रहाच्या, साम्यवादाच्या, निवडणुकीच्या अशा वेगवेगळ्या पस्परविरोधी माध्यमातून क्रांती किंवा ऐतिहासिक असे सत्तांतरण पार पडले आहे.मात्र इजिप्तमध्ये नुकतेच पार पडलेले हे सत्तांतरणामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. हे एकप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेले सत्तांतरण आहे.
     अधुनिक जगात दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र परस्परांमधली संवाद कमी होतोय हे अगदी चावून चोथा झालेलं वाक्य आहे. पण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. हा नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेला धडा आजही सर्वांच्या लक्षात आहे. प्रचंड व्याप  असतानाही आपल्या प्रिय व्यक्तींच्या, समवयस्कांच्या, समान आवडी असणा-यांच्या संपर्कात राहण्याची ओढ सर्वांनाच असते. हीच ओढ सुरुवातीला ऑरकूट आणि आता फेसबुक, टि्वटर, ब्लॉग तसेच यू ट्यूब या सारख्या सोशल मीडियाच्या लोकप्रियतेचे कारण आहे.
         एक टाइमपास, मत प्रदर्शित करण्याचे माध्यम किंवा मिंत्रांशी संपर्क साधण्याचा मार्ग म्हणून या साईट्सकडे पाहिलं जायचं.  याच माध्यमाचा उपयोग अरब राष्ट्रांमधल्या काही तरुणांनी क्रांती करण्यासाठी  केला. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण केवळ इंटरनेटशी नाही तर समाजाशी जोडले गेलेले आहोत हे इजिप्तमधल्या युवकांनी सिद्ध केलंय. आपल्या देशातील हुकूमशाही सरकारचा बुरखा त्यांनी जगासमोर उघडा केला. शेजारच्या देशात ज्या गोष्टी घडू शकतात त्या आपल्या देशात का घडू शकत नाहीत ? ह्या प्रश्न त्यांनी नेटवर्किंग साईट्सवर उपस्थित केला. केवळ प्रश्न विचारुन ते थांबले नाहीत तर  आपले साध्य साध्य करण्यासाठीही याच माध्यमाचा वापर त्यांनी मोठ्या कौशल्याने केला. 


       इजिप्तच्या पूर्वी ट्युनिशियामध्ये सत्तांतरण झाले. याच काळात घडलेल्या घटनांचे धाडसी चित्रण    अस्मा महफूज या इजिप्तियन तरुणीनं केलं. ते तिनं यू ट्युबच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवलं. इजिप्तमधली हुकमशाही राजवट किती दिवस सहन करणार असा सवाल तिनं आपल्या बांधवांना केला. अस्मानं पेटवलेल्या या ठिणगीचा वणवा झाला. संपूर्ण देशात तो पसरला. मुबारक राजवट हटवण्याच्या उद्देशानं हजारो इजिप्तच्या युवकांनी तहरीर चौकाकडे धाव घेतली. या सर्व युवकांना अशाप्रकारच्या चळवळींचा कोणताही अनुभव नव्हता. कोणीही नेता नव्हता. कोणतीही जबरदस्ती, प्रलोभनं नसताना ही हजारो मंडळी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तहरीर चौकात ठाण मांडून बसली. त्यांच्या या न भूतो अशा क्रांतीचा दखल अमेरिकेपासून जपान पर्यंत ब्राझील पासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्वांनी घेतली.या देशातल्या अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सच्याच माध्यमातून या लढ्याला पाठिंबा दिला. एकप्रकारे या लढ्याला जागतिक अधिष्ठाणही याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाले. देशातील युवकांचा निर्धार आणि त्याला वाढत चाललेला जागतिक पाठिंबा ह्यापुढे अखेर होन्सी मुबारक यांनी गुडघे टेकले. मुबारक यांच्या  30 वर्षांच्या हुकूमशाही राजवटीमधून इजिप्त मुक्त झाला.
      इजिप्तप्रमाणेच अशीच क्रांती भारतातही घडणार का ? आपल्याकडचे मुबारक कधी जणार ? अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. भारतामध्ये लोकशाही राजवट आहे. विरोधी पक्ष, प्रसिद्धीमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यांना स्वातंत्र्य आहे. असं असलं तरी आपल्याकडे हे घडू शकतं का ? हा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय. या प्रकारच्या क्रांतीचं सूप्त आकर्षण अनेकांच्या मनात निर्माण झालंय. हे मान्य करावेच लागेल.


                 वाढती महागाई, नक्षलवाद, देशातल्या कोणत्याही भागात आपलं टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता असलेले दहशतवादी, भ्रष्टाचार, ढिसाळ आणि संवेदनशून्य प्रशासन ,  घराणेशाही, एखाद्या पक्षाकडे अथवा व्यक्तीकडे झालेले सत्तेचे केंद्रीकरण अशा प्रकारच्या अनेक अनिष्ट प्रवृत्तींनी या देशाला घेरलंय. संपूर्ण क्रांती घडण्यासाठी अगदी अनुकूल असे वातावरण ह्या देशांमध्ये आहे. मात्र तरीही अशा प्रकारची क्रांती घडण्याची चिन्हं इतक्यात दिसत नाही. हे असं का याचं उदाहरण आपल्या सोशल मीडियामध्येच सापडतं. 


         इजिप्तमधल्या युवकांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकारी दमनयंत्रणेची लक्तरं जगासमोर टांगली. तर भारतामध्ये मात्र अजुनही आपला किंवा मित्रांच्या वाढदिवसाचे अथवा सहलीचे फोटो लोड करणे, आपले दैनंदिन वेळापत्रक टाकणे या सारख्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जातंय. इजिप्तमधल्या युवकांनी या मीडियाचा वापर हा समाजाला जोडण्यासाठी केला. आपल्याकडचा सोशल मीडिया मात्र ब-याच प्रमाणात व्यक्तीकेंद्रित आहे. देशातल्या महानगरातून इंटनेटचा सतत वापर करणारे बहुतांश युवक मतदान करण्याचे कष्टही घेत नाहीत.मुंबईमध्ये मागच्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 50 टक्यांपेक्षाही कमी होती. हा वर्ग मुंबई हल्ल्याच्या विरोधात मेणबत्ती मोर्चा काढतो. मात्र या मोर्च्यामध्ये तळमळीपेक्षा इव्हेंट साजरा करण्याची प्रवृत्तीचं जास्त असते. एखाद्या दिवशी एखादा इव्हेंट असल्याप्रमाणे ठराविक प्रकारचे कपडे, रंगरंगोटी घालून एकत्र यायचे तो दिवस संपला की पुन्हा आपल्या आयुष्यात स्वत:ला बंदिस्त करुन घेण्याचे प्रमाण महानगरांमधल्या तरी युवकांमध्ये तसेच या सोशल मीडिया वापरणा-या वर्गामध्ये जास्त आहे. 


      ज्या  देशानं  अन्यायी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी  सत्याग्रह हा नवा मंत्र जगाला दिला. त्याच देशातील युवक देशातल्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वत:ला हा बंदिस्त कोषात गुरफूटून घेत आहेत. त्याचप्रमाणे 'शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात' ही आपली अगदी पूरातन वृत्ती आजही सर्वांना घट्ट चिकटून बसलीय.त्यामुळे इजिप्तच्या युवकांनी जे करुन दाखवलं त्याच्या बरोबर उलटा प्रवास आपल्याला पाहयाला मिळतोय. 


  हा उलटा प्रवास सुरु असेपर्यंत आपल्याकडचे मुबारक यांचे भाईबंदाना अस्वस्थ होण्याचे अथवा घाबरण्याचे  कोणतेही कारण नाही.       

Sunday, February 6, 2011

वर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 4 ) --- भारत


भाजपा आणि भारतीय क्रिकेट टीम यांच्यामध्ये एक साम्य आहे. या दोघांच्याही समर्थकांना प्रत्येकवेळी आपणच जिंकणार असा ठाम विश्वास असतो. भाजपावाले फार पूर्वीपासून 'अगली बारी अटलबिहारी' या घोषणा देत आले आहेत. तर 1983 नंतर प्रत्येक वर्ल्ड कपपूर्वी आपणचं वर्ल्ड कप जिंकणार हे भारतीय फॅन्सनी गृहित धरलेलं असतं. आता हा वर्ल्ड कप तर भारतीय उपखंडामध्ये होतोय.त्यामुळे संपूर्ण देश क्रिकेटमय होऊ लागला आहे. जाहिराती, न्यूज कव्हरेज, प्लेअर्सच्या मुलाखती या सगळ्या माध्यमातून क्रिकेटचा भडीमार होत आहे. टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार... जणू आता 2 एप्रिलला महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्याची औपचारिकताच बाकी आहे अशा प्रकारचे वातावरण देशामध्ये तयार होऊ लागलंय. भारतीय टीमचं वर्ल्ड कप जिंकावी अशी माझी 100 नाही तर 1000 टक्के इच्छा आहे. पण बाकीच्या टीम ह्या हरण्यासाठी वर्ल्ड कप खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय टीमची बलस्थाने तसेच कमकुवत बाजू यांचा विचार होणं आवश्यक आहे.


              निवड समितीनं निवडलेली टीम इंडिया कागदावर तर नेहमीप्रमाणे भक्कम आणि संतुलित आहे.  देशातले सर्वोत्तम 15 प्लेअर्सची निवड निवड समितीनं केली आहे. पण दुखापती तसेच रोटोशन पॉलिसी यामुळे हे 15 जण कधीही  एकत्र खेळलेले नाहीत.  यापैकी दुखापत ही टीम इंडियासमोरची मोठी समस्या आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौ-यातूनही सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि प्रवीण कुमार हे चार जण दुखापतीमुळे माघारी परतले.  आता वर्ल्ड कपपूर्वी हे सर्व जण फिट होतील. पण संपूर्ण स्पर्धेत फिट राहण्याचं अवघड आव्हान या चौंघासमोर ( तसेच अन्य 11 जणांवरही ) असेल . विशेषत: सचिन, सेहवाग आणि गंभीर या तिंघापैकी एखादा प्लेअर निर्णायक मॅचपूर्वी अनफिट ठरला तर त्याचा टीमच्या भवितव्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.         भारताची बॅटिंग ऑर्डर नेहमीप्रमाणेच यंदाही भक्कम आहे. सचिन-सेहवाग ही जगातली सर्वात विस्फोटक ओपनिंग जोडी आपल्याकडे आहे. कोणत्याही मॅचचा निकाल ही जोडी आरामात निश्चित करु शकते. इतकी अनुभवी, आक्रमक आणि खतरनाक ओपनिंग जोडी या वर्ल्ड कपमध्ये अन्य कोणत्याही टीमकडे नाही. कोणत्याही टीमला विश्वविजेता बनवण्यामध्ये त्यांच्या ओपनर्सची महत्वाची भूमिका असते. हेन्स-ग्रिनीच किंवा हेडन- गिलख्रिस्ट यांनी हे पूर्वी दाखवून दिलंय. या दोन्ही जोडींप्रमाणे सचिन-सेहवाग ह्या जोडीलाही भारताच्या विश्वविजेतेपदाचा पाया रचावा लागेल.भारतासाठी एक आशादायक बाब म्हणजे वर्ल्ड कपमधला ह्या जोडीचा रेकॉर्ड. या जोडीनं वर्ल्ड कपमध्ये आजवर 10 वेळा ओपनिंग केलीय. त्यापैकी 9 वेळा भारत विजयी झाला आहे. केवळ 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत पराभूत झाला होता.  सचिन-सेहवागपैकी कोणी जखमी झाल्यास गौतम गंभीर हा ओपनिंगसाठी  एक चांगला पर्याय भारताकडे आहे.

           सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप म्हणून या वर्ल्ड कपचा मोठा गाजावाजा होतोय. सर्वत्र टीम इंडियापेक्षा सचिनची जास्त चर्चा आहे. सचिनसाठी क्रिकेटमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काहीचं उरलेलं नाही. हा वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही तरीही त्याची क्रिकेटपटू म्हणून महानता अजिबात कमी होणार नाही. पण वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य बनण्याचा बहुमान त्याला मिळणार नाही. कपिल देव, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, व्हिव्हियन रिचर्ड, अरविंद डिसल्वा , शेन वॉर्न ह्या महान क्रिकेटपटूंनी स्वत:च्या हिमतीवर ( निर्णायक मॅचमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करत ) वर्ल्ड कप जिंकला आहे. या सर्वांपेक्षा सचिन कुठेही कमी नाही. त्यामुळे आता यादीमध्ये आपली भर पाडण्यासाठी 38 व्या वर्षी क्रिकेटच्या या महान जादूगाराला आपला आजवरचा सर्वोत्तम खेळ या वर्ल्ड कपमध्ये करावा लागेल.

          क्रिकेटमधले कोणतेच नियम ज्याला लागू होत नाहीत असा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग.कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे आक्रमकता ही त्याला जन्मत: मिळालेली देणगी असावी.  ख-या अर्थाने गेमचेंजर. प्रतिस्पर्धी टीम, समोरचा बॉलर,मॅचमधली परिस्थिती याचा कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही. भारतीय उपखंडातले पिच त्याच्या बॅटिंगसाठी नेहमीच फायदेशीर ठरल्यात. खराब फिटनेस आणि गचाळ रनिंग-बिटविन-द-विकेट ह्या विरुच्या दोन मोठ्या समस्या आहेत. त्याचबरोबर शॉर्ट पिच बॉलवर आऊट होण्याची त्याला वाईट सवय आहे. या गोष्टींची काळजी त्याने घेतली तर कोणत्याही बलाढ्य टीमचा तो आरामात निकाल लावू शकतो.    

            टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरची मोठी भिस्त गौतम गंभीरवर असेल. गौतम गंभीरचा 3 नंबरवर बॅटिंग करण्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे.वन-डेमधला त्याचा सर्वोत्तम स्कोर ( 150 नाबाद ) हा त्यानं तिस-या क्रमांकावर बॅटिंगला येऊनच काढलाय. त्यानं तिस-या क्रमांकावर येऊन 31 मॅचेसमध्ये 1161 रन्स काढलेत.त्यामध्ये त्याची सरासरी आहे 43. यामध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.  गंभीर नंतर येणारे बॅट्समन हे युवा किंवा बेभरवशाचे आहेत. त्यामुळे त्याचवरची जबाबदारी आणखी वाढलीय. त्याला एक बाजू लावून धरुन भारतीय डावाला आकार देण्याची जबाबदारी 'गंभीर' पणे पार पाडावी लागेल.

          गंभीरनंतर चौथ्या क्रमांकावर येणारा विराट कोहली हा आणखी एक भरवशाचा बॅट्समन आपल्याकडे आहे. 2010 हे वर्ष विराटसाठी भलतंच यशस्वी ठरला. या वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये हशिम आमला नंतर सर्वात जास्त रन्स त्याच्याच नावावर आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका सीरिजमध्येही त्यानं आपला ठसा उमटवला आहे. क्रिकेटमधले सर्व शॉट्स त्याच्याकडे आहेत. तसेच अलिकडच्या काळात डावाला आकार देण्याचं कौशल्यही त्यानं आत्मसात केलंय.विराट कोहली हा भविष्यात टीम इंडियाचा कॅप्टन होईल असा माझा अंदाज आहे. विराटवरचा माझा विश्वास किती योग्य आहे हे या वर्ल्ड कपमध्ये स्पष्ट होईल.

  

                    भारताला हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर युवराज सिंग चाललाच पाहिजे. अफाट गुणवत्ता, प्रचंड विध्वसंकारी, क्लिन हिटर म्हणजे युवराज.आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकाच ओव्हर्समध्ये 6 सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड असलेला या वर्ल्ड कपमधला एकमेव बॅट्समन.  पण या युवराजच्या बॅटवरची 'प्रीती' हल्ली दिसेनाशी झालीय. मागचं वर्ष त्याच्यासाठी खराब गेलं. क्रिकेट बाह्य कारणामुळेच तो जास्त गाजला.आता पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंगचे आपणच महाराजा आहोत हे दाखवण्याची संधी युवराजला चालून आलीय.  या वर्ल्ड कपमध्ये अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला रैनाशी स्पर्धा करावी लागणार आहे. रैनासारखा एक आक्रमक बॅट्समन अंतिम 11 मध्ये  प्रत्येक मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे.मात्र युवराज सलग 2-3 मॅच फेल गेला तर रैना आतमध्ये येऊ शकतो. त्यामुळे युवराजला आपलं स्थान टिकवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करुन दाखवावेच लागेल.

       महेंद्रसिंग धोनीबद्दल मी कब तक धोनी  ? या माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहले होते. एक बॅट्समन म्हणून त्याच्या बद्दलची माझी मते आजही कायम आहेत. तंत्रशुद्ध बॅट्समन म्हणून तो कधीच ओळखला गेला नाही. धोबी ज्या पद्धतीने काठीने कपडे बडवतो त्याचपद्धतीने बॅटने बॉल वर जोरदार प्रहार करणे ही त्याची मूळ शैली आहे. पण कॅप्टन कूल होण्याच्या नादात त्याची आक्रमकता पार नाहीशी झालीय. धोनी क्रिकेटमध्ये आला तेंव्हा त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त होता. आता 2010 वर्षातला त्याचा स्ट्राईक रेट 76 वर घसरला. तर या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाच वन-डेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 65 वर घसरलाय. ज्या हेलिकॉप्टर शॉट्ससाठी धोनी ओळखला जातो. तो शॉट आता फक्त जाहिरातीमध्येच दिसतो. मैदानावर तो शॉट बहुधा धोनी विसरला असवा. धोनीच्या या खराब फॉर्ममुळे मिडल ऑर्डरच्या अडचणी आणखी वाढल्यात.

      या वर्ल्ड कपमध्ये खेळणा-या भारतीय बॅटिंग लाईन-अपचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे युसूफ पठाण. न्यूझीलंड विरुद्ध बंगळूरु वन-डेमध्ये किंवा आफ्रिका सीरिजमध्ये त्यानं अगदी श्वास रोखून धरायला लावणारी फटकेबाजी केली. कोणत्याही मॅचचा रिझल्ट शेवटच्या काही ओव्हर्समध्ये बदलण्याची शक्ती या पठाणच्या पॉवरमध्ये आहे.भारताच्या संथ पिचवर तर तो आणखी धोकादायक ठरु शकतो. पण लागला तर फटका नाही तर चटका ही जुनी सवय पठाणनं यंदा मोडली पाहिजे. ती सवय त्यानं मोडली तर 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये लान्स क्लूसनर जे काम आफ्रिकेसाठी करायचा ते काम यंदा पठाण आपल्यासाठी करु शकतो.   त्याशिवाय हरभजन सिंग, प्रवीण कुमार,  आर.अश्विन आणि पियुष चावला हे हाणामारी करु शकणारे बॉलरही भारतीय टीममध्ये आहेत.

         भारतीय बॅट्समन्सना आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे बॅटिंग प़ॉवर प्ले. या पॉवर प्लेचा मोठा फायदा आजवर आपल्याला उठवता आलेला नाही. पॉवर प्लेच्या दरम्यान गरज नसताना बेजावबदार फटके मारुन आपले बॅट्समन अनेकदा आऊट झालेत. अथवा प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर अनेकदा भारतानं बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे. त्यामुळे या पॉवर प्लेचा फायदा  भारताला आजवर फारसा उठवता आलेला नाही.त्याचबरोबर मोठ्या मॅचमध्ये रन्सचा पाठलाग करता आपली बलाढ्य बॅटिंग ऑर्डर कोसळल्याचे अनेक उदाहरणं क्रिकेट इतिहासात आपल्याला आढळतात. या इतिहासाची पूनरावृत्ती होऊ नये अशीच प्रार्थना आपण केली पाहिजे.


        भारताचा बॉलिंग ऐटॅक त्या तुलनेत फारसा मजबूत नाही. झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल आणि प्रवीण कुमार हे चार फास्ट बॉलर आपल्या टीममध्ये आहेत. या चौघांनाही भरपूर रन्स वाटण्याचा आणि वारंवार अनफिट होण्याचा मोठा इतिहास आहे. यापैकी कोणता बॉलर जखमी झाल्यास श्रीशांत टीममध्ये येऊ शकतो. अनुभवी झहीर खान आणि आशिष नेहरा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. या दोघांनाही 2003 च्या वर्ल्ड कपचा ( विशेषत:  फायनलचा )  चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव त्यांना या वर्ल्ड कपमध्ये कामी येऊ शकतो.  झहीर खान हा भारताचा सर्वात अनुभवी फास्टर आहे. पण त्याची अवस्था ही सध्या 'उरलो फक्त टेस्टपुरता ' अशी झालीय. एकतर तो फारशा वन-डे मॅच खेळत नाही. तसेच ज्या वन-डे खेळतो ( उदा. दक्षिण आफिका सीरिज ) यामध्ये तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे आपल्यामध्ये अजुनही वन-डे क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी झहीरला आपला जलवा दाखवावा लागेल. त्याशिवाय शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये भरपूर रन्स देण्याची फास्ट बॉलर्सची सवय टीम इंडियाला मोठी अडचणीची ठरु शकते.

       हरभजन सिंग, पियूष चावला आणि आर. अश्विन हे तीन स्पिनर भारतीय टीममध्ये आहेत. यापैकी हरभजनचा अंतिम 11 मधला समावेश नक्की आहे.. रन्स रोखून धरण्याची जबाबदारी तो चोखपणे पार पाडतो. मात्र मोठ्या प्रमाणात  विकेट्स मिळवण्यात तो अपयशी ठरलाय. भारतीय पिचवर विकेट घेऊ शकणा-या आक्रमक स्पिनर्सची कमतरता टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. अशा  परिस्थितीमध्ये हरभजनच्या मदतीला आर. अश्विनचा अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात यावा. चेन्नईचा हा युवा बॉलर एक आक्रमक स्पिनर आहे. विकेट मिळवण्यासाठी रिस्क घेण्याची कला त्याच्या बोटात आहे. त्याशिवाय हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याची कलाही त्याला अवगत आहे. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये समोरच्या टीमला गोंधळात टाकण्यासाठी अश्विनचा वापर करता येऊ शकतो.


             पियूष चावला हा लेगस्पिनर आपल्या  टीममध्ये आहे. 2008 नंतर त्याची थेट वर्ल्ड कपसाठीच निवड समितीला आठवण झाली. त्यात भर म्हणजे तो भारतीय पिचवर अद्याप एकही वन-डे खेळलेला नाही.  असं असलं तरी देशांतर्गत मॅचमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. लेगस्पिन बॉलरचा एक चांगला ऑप्शन चावलाच्या रुपाने आपल्याकडे आहे. आता निवड समितीनं दाखवलेला मोठा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी चावलावर आहे. भारतीय टीमचा आजवरची परंपरा लक्षात घेता आपण 4 बॉलर्स घेऊन बहुतेक मॅच खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे युवराज, युसूफ, सेहवाग आणि रैना ( अंतिम 11 मध्ये खेळला तर ) या पार्ट टाईम बॉलर्सचा चांगला उपयोग धोनीला करुन घ्यावा लागेल. यापैकी युवराजची बॉलर म्हणून अलिकडच्या काळात समाधानकारक कामगिरी झालीय. जमलेली जोडी फोडण्याचं काम त्यानं अनेकदा बजावलंय. पाचव्या बॉलर्ससाठी असलेल्या या 10 ओव्हर्स धोनी कशा पद्धतीने हातळतो ह्यावरही मॅचचे भवितव्य अवलंबून असेल.


              भारतीय टीमची या वर्ल्ड कपमधली आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे अस्सल ऑलराऊंडरची कमतरता. 1983 च्या विश्वविजेत्या टीममध्ये कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल यासारख्या ऑलराऊंडरची कामगिरी निर्णायक ठरली होती. या वर्ल्ड कपमध्येही शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलिया), जॅक कॅलिस ( दक्षिण आफ्रिका ) , शाहिद आफ्रिदी, अब्दूल रझ्झाक ( पाकिस्तान ) , एंजलो मॅथ्यूज ( श्रीलंका ) असे उपयुक्त ऑल राऊंडर प्रतिस्पर्धी टीमकडे आहेत. वन-डे मॅचमध्ये 10 ओव्हर्स पूर्ण टाकून  1-2 विकेट्स हमखास घेऊ शकणारा तसेच 50 रन्स हमखास करणारा ऑलराऊंडर या टीममध्ये एकही नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्सना आपली जबाबादारी चोखपणे पार पाडावी लागेल.


              भारताचा या वर्ल्ड कपमध्ये ग्रृप  B मध्ये समावेश आहे. या ग्रृपमध्ये भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि नेदरलॅंड या टीम्स आहेत. या पैकी कोणत्याही टीमला कमी लेखण्याची चूक 2007 च्या अनुभवानंतर भारतीय टीम करणार नाही भारताचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश तरी निश्चित मानला जातोय..क्वार्टर फायनल पासूनची प्रत्येक मॅच ही करा वा मरा या स्वरुपातली असेल.

   100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. या अब्जावधी लोकांच्या सा-या अपेक्षांचे ओझे 15 जणांच्या टीम इंडियावर असेल. त्यातच यंदाचा वर्ल्ड भारतीय उपखंडात होतोय. त्यामुळे घरच्या मैदानावर हे ओझं कित्येक पटीनं वाढणार आहे. भारतीय प्रेक्षकांची उपस्थिती आणि फेव्हिरिटचा दर्जा हे ओझं नसून जबाबदारी आहे याची खबरदारी भारतीय टीमनं घ्यायला हवी. गेल्या अनेक काही वर्षांपासून टीम इंडिया ज्या स्पिरिटने खेळतीय ते पाहता ही जबादारी ही टीम पार पाडू शकेल अशी आशा नक्कीच बाळगता येईल. भारतीय फॅन्सचा 28 वर्षांचा दुष्काळ ह्या टीमने संपवावा अशीच प्रार्थना आता आपण सर्वांनी करायला हवी.            


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...